Monday, March 31, 2008

खोल खोल पाणी

खोल खोल पाणी

शरीराची भूक, कोवळं प्रेम आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेलं भयावक वास्तव म्हणजे "डोह' हा चित्रपट. प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या "काळेशार पाणी' या वादग्रस्त लघुकादंबरीवर हा चित्रपट आधारलाय. मराठे यांनी 1970 च्या दशकात ही कादंबरी लिहिली होती. तब्बल चार दशकांनंतर तिला पडद्यावर येण्याचं भाग्य लाभलंय.
मानवी नात्यांचे पदर चित्रपटातून उलगडणं म्हणजे खूप कठीण गोष्ट. "डोह'सारखा मन विषण्ण करणारा विषय असेल, तर दिग्दर्शकाची खरी कसोटी लागते. पुष्कराज परांजपे यांनी चित्रपट करताना मूळ कादंबरीतल्या काही गोष्टी घेतल्यात; तर काही टाकल्यातसुद्धा. एक स्वतंत्र चित्रपट म्हणून "डोह' पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो; पण कादंबरीच्या तुलनेत त्याचा परिणाम थोडा उणावल्यासारखा वाटतो. तरीदेखील एक "बोल्ड' विषय साधेपणानं कसा सादर करता येऊ शकतो, याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
भिकी (लीना भागवत) ही भजी विकून स्वतःचं व आपल्या तीन मुलांचं पोट भरत असते; पण गावातल्या रिकामटेकड्या विष्णूची "ठेवलेली बाई' अशीच तिची ओळख असते. कमळी ही तिची वयात आलेली मोठी मुलगी. अभ्यासात मंद असलेल्या कमळीचा हात चित्रकलेत अगदी सफाईनं चालत असतो. वर्गातल्या एका टारगट मुलाची आणि गावातल्या वाण्याची तिच्यावर नजर असते; पण खुद्द कमळीला मुंबईहून शिकण्यासाठी आलेल्या हुशार व देखण्या अजयबद्दल ओढ वाढू लागते. इकडे आपल्या वासनेवर ताबा ठेवू न शकणाऱ्या भिकीचीही अजयवर नजर पडते. विष्णूचा अकाली मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर आकाश कोसळतं. घरातली चूल सुरू ठेवण्यासाठी कमळीच्या शरीराचा सौदा ठरविण्यापर्यंत तिची मजल जाते. इकडे भिकीच्या तावडीतून सुटलेला अजय अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. परीक्षेत नापास झाल्याचं अपयश पचवू न शकल्याने तो आत्महत्या करतो. अजयच्या मृत्यूनं वेड्यापिशा झालेल्या कमळीला बरं करण्यासाठी भिकी मग एका मांत्रिकाला बोलावते. हा मांत्रिक कमळीचं शरीर तर लुटतोच; पण तिच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. कमळीचे प्राण गेल्यानंतर तिच्या एका चित्राला "युनेस्को'कडून पुरस्कार मिळाल्याची बातमी भिकीच्या कानावर येते; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
"काळेशार पाणी' ही कादंबरी वादग्रस्त ठरली, ती त्यातल्या मानवी व्यक्तिरेखांच्या थेट चित्रीकरणासाठी. या कादंबरीचा शेवट खूपच धक्कादायक आहे; पण हा धक्का चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला कदाचित पचणार नाही, या हेतूने या चित्रपटाचा शेवट बदलण्यात आलाय. अंधश्रद्धेचा एक स्वतंत्र "ट्रॅक' चित्रपटाच्या शेवटाशी जोडण्यात आलाय. कादंबरीचा विषण्ण करणारा भाव अवघ्या दीड तासात पकडण्यात दिग्दर्शकाला यश आलंय; पण भिकी आणि कमळीच्या व्यक्तिरेखेतील गुंतागुंत पुरेशी स्पष्ट झालेली नाही. भिकी एकीकडे पोटासाठी परपुरुषाशी संबंध ठेवण्याची भाषा करते आणि दुसरीकडे ती आपल्या मुलीच्या वयाच्या अजयकडेही आकर्षित होताना दाखवलीय. भिकीची व्यक्तिरेखा आणखी व्यवस्थित स्पष्ट व्हायला हवी होती; ती न झाल्यामुळे कमळीच्या मृत्यूनंतर भिकीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं की नाही, याबाबत दिग्दर्शक संभ्रमावस्थेत पडल्याचं जाणवतं.
"डोह'ला उंचीवर नेण्याचं काम त्यातल्या कलाकारांनी केलंय. लीना भागवत यांनी भिकीच्या व्यक्तिरेखेतले सर्व भाव छान टिपलेत. हर्षदा ताम्हनकर आणि अभय महाजन या दोन तरुण कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखा खूप समरसून केल्यात. सुहास पळशीकर छोट्याशा व्यक्तिरेखेत लक्षात राहतात.

Wednesday, March 19, 2008

"मल्लिका ए हुस्न'ला पोस्टाची सलामी....


"मल्लिका ए हुस्न'ला पोस्टाची सलामी....
इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात पोस्ट खातं आपलं अस्तित्वच हरवून गेलंय. संपूर्ण जग बदललं. पण हे खातं काही आपली "लाइफस्टाईल' बदलायला तयार नाही. म्हणूनच मधुबालावर पोस्ट खातं विशेष तिकीट प्रकाशित करतंय, हे कळल्यानंतर खूप मोठा धक्का बसला होता. टपाल खात्यानं 18 मार्चला मुंबईत एका विशेष कार्यक्रमात मधुबालावर तिकीट प्रकाशित करून या अभिनेत्रीच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला सलाम केला. हा सोहळा खरोखरीच छान रंगला.
मधुबाला... जिच्या हसण्यानं निर्जीव सेट जिवंत व्हायचा. तिचं मूर्तिमंत सौंदर्य तरुणाईच्या काळजाचा ठोका चुकवायचं. जिचा सहज अभिनय लाखोंच्या हृदयाला हात घालायचा; पण नियतीचा खेळ असा अजब की अवघ्या 36 व्या वर्षीच तिला मृत्यूनं गाठलं. मात्र त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या दिग्गजांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी पसरलेली होती. म्हणूनच आपल्या भावनांना वाट करून देताना प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक मनोजकुमारना "सीनेमें सुलगते है अरमॉं, आँखोमें उदासी छायी है...' या गीताचा आधार घ्यावा लागला.
या सोहळ्याला मनोजकुमार यांच्यासह टपाल खात्याचे सचिव आय. एम. जी. खान, ज्येष्ठ दिग्दर्शक शक्ती सामंता, ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला, निमी, सोनाली कुलकर्णी, निवेदक अमिन सयानी आणि मधुबाला यांची बहीण मधुरभूषण उपस्थित होती. मधुबाला या आपल्या ज्येष्ठ भगिनी असल्या, तरी आईप्रमाणे त्यांनी आपला सांभाळ केल्याचं मधुरभूषण यांनी सांगितलं. "मुघल-ए-आझम' या चित्रपटानंतर मधुबाला यांनी काही चित्रपटांमध्ये काम केल्याचं बोललं जातं; पण त्यात तथ्य नसून 27 व्या वर्षीच या अभिनेत्रीनं काम थांबविल्याचंही मधुरभूषण यांनी सांगितलं. अभिनेत्री शशिकला यांनी मधुबाला यांच्या सेटवरील शिस्तीचे वर्णन केलं. मुंबईतल्या पावसाळ्यानं एके दिवशी चांगलाच जोर धरल्यानं बहुतेक कलाकारांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. मात्र मधुबाला ही एकमेव अभिनेत्री त्या दिवशी स्टुडिओतील सेटवर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत उपस्थित असल्याचेही शशिकला यांनी सांगितलं.
शक्ती सामंता यांनी मधुबाला यांच्यासमवेत "हावडा ब्रिज'सह एकूण तीन चित्रपट केले. चित्रीकरणाच्या वेळी सर्वाधिक आनंद मधुबाला यांच्याकडून मिळाल्याचे सामंता म्हणाले. मनोजकुमार यांनी मधुबाला यांच्यासमवेत आपणास प्रत्यक्ष काम करण्याची संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. टपाल खात्याने तिकिटाच्या निमित्तानं सन्मानित केलेलं मधुबाला हे एकंदरीत तिसावं व्यक्तिमत्त्व. मात्र चित्रपटसृष्टीत अजून अनेक रत्नं तिकिटाच्या प्रकाशनाची वाट पाहत असल्याचा उल्लेख मनोजकुमार यांनी केला.
---------------------------
मधुबाला यांना आपल्या मृत्यूची कल्पना आली होती. एके दिवशी त्यांनी शक्ती सामंता यांना आपल्या घरी बोलावून घेतलं. मधुबाला यांना "मेकअप'मध्ये पाहून सामंता चक्रावले. कारण आजारपणामुळे ही अभिनेत्री बराच काळ कॅमेऱ्यापासून दूर होती. आपल्या "मेकअप'चा खुलासा करताना मधुबाला म्हणाल्या, "दादा, आपने मुझे बेस्ट फॉर्ममें देखा है। आपके सामने बिना मेकअप मैं नही आ सकती ।'

Saturday, March 15, 2008

जीवन्या...



गिरीश कुलकर्णी मुलाखत
चित्रपटातील सहकलाकाराची व्यक्तिरेखा दीर्घकाळ लक्षात राहणं ही अलीकडे खूप दुर्मिळ गोष्ट झालीय. म्हणूनच "वळू'त जीवन्याची व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेनं साकारणारे गिरीश कुलकर्णी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लेखन आणि अभिनयाच्या पातळीवर चमक दाखविणाऱ्या या कलाकाराकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा ठेवता येतील.
-------------------
"वळू'मधला जीवन्या म्हणजे मूर्तिमंत चैतन्य आहे. चित्रपट संपला तरी तो चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपली सोबत करतो. लांबलचक संवाद नाहीत की छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व नाही. तरीदेखील तो आपल्या हृदयात घर करतो. हे यश आहे, गिरीश कुलकर्णींचं- एका लेखकाचं आणि अभिनेत्याचं. ते मूळचे मेकॅनिकल इंजिनीयर; पण कलेच्या आवडीनं त्यांनी आपली वाट बदलली. सध्या पुण्यात "रेडिओ मिर्ची'चे "क्‍लस्टर प्रोग्रॅमिंग हेड' म्हणून ते काम पाहताहेत. रेडिओसाठी काम करता करता लिखाण आणि अभिनयाची आवडही त्यांनी जोपासलीय. "वळू'च्या निर्मिती प्रवासाबद्दल ते सांगतात, ""अनिरुद्ध बेलसरे हा आमचा एक डॉक्‍टर मित्र आहे. बैल पकडायला त्याला नेहमीच बोलावलं जातं. एकदा आम्ही त्याच्याबरोबर ही गंमत पाहण्यासाठी गेलो आणि तिथंच "वळू'च्या कथानकाचा जन्म झाला. वेसण न घातलेला, दावं न बांधलेला बैल म्हणजे वळू. तो मुक्ततेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. मनोरंजनाबरोबरच चित्रपटातून हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला.''
आपल्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल ते म्हणतात, ""शालेय जीवनापासून मी स्टेजशी सरावलोय. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये मी भाग घेतला होता. एका कलाकारासाठी जे जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात, त्या सर्वांवर वावरलोय. त्यामुळे मला हे माध्यम काही नवीन नाही. उमेश कुलकर्णीबरोबर मी अनेक वर्षांपासून काम करतोय. नाटक करण्यासाठी आम्ही "आंतरिक' नावाचा आमचा स्वतःचा ग्रुप स्थापन केला होता. या वेळी माझी नोकरी सुरूच होती. या काळात सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर उमेशनं पुण्याच्या "फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच्या प्रोजेक्‍टस्‌ना मदत करायला लागलो. आमच्या सर्वांच्या मेहनतीमधून साकारलेला "गिरणी' लघुपट तब्बल 40 आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून दाखवला गेला. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या यशामुळे नवीन काही तरी करण्याचं बळ आम्हाला मिळालं.''
"वळू' प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केलं. त्याचा ग्रामीण बाज रसिकांनी उचलून धरला. अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर अशा कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं; पण बाजी मारली ती जीवन्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गिरीशनी. या व्यक्तिरेखेबद्दल, तसेच तिच्या लोकप्रियतेबद्दल ते म्हणतात, "" "वळू'मधली माझी व्यक्तिरेखा आणि माझा अभिनय ही बऱ्याच लोकांसाठी आश्‍चर्याची गोष्ट ठरलीय. माझं काम बघून अनेक जण चकीत झालेत. हा कोण कलाकार आहे? याला पूर्वी आपण कधी पाहिलेलं कसं नाही? असा प्रश्‍नही अनेकांना पडलाय. अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते आमीर खान, विजय तेंडुलकर, अमोल पालेकर... या दिग्गजांकडून माझ्या वाट्याला कौतुकाचे चार शब्द आलेत. डॉ. जब्बार पटेल तर हा चित्रपट पाहिल्यानंतर मला म्हणाले, ""गिरीश, अरे तुझ्यासाठी मला आता एक नवीन सिनेमा करायला हवा!' मोठ्या लोकांच्या या कौतुकामुळे आता माझ्यावर सुप्त दडपण आलंय.''
जीवन्याची व्यक्तिरेखा लिखाणातच झक्क जमल्यामुळे ती साकारायचा मोह झाला का, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणतात, ""जीवन्याची व्यक्तिरेखा लिखाणाच्या पातळीवर खूपच छान जमली होती. तो खूप मोकळा आहे. प्रामाणिक आहे, अगदी पाण्यासारखा आरपार नितळ आहे. त्याला कशाचंही भय नाही. समोर मोठी व्यक्ती असली तरी तो स्पष्ट बोलणं पसंत करतो. त्याची निरागसता, त्याचं मुक्त होणं मला खूप आवडलं. माझं व्यक्तिमत्त्व या व्यक्तिरेखेच्या खूप जवळ जाणारं होतं. ही व्यक्तिरेखा मी लिहिली असल्यानं तिला आपणच चांगला न्याय देऊ, याची मला खात्री होती.''
"वळू'चं सध्या भरपूर कौतुक होतंय. या कौतुकाच्या वर्षावात लेखक-कलाकार वाहवत जाण्याची भीती असते; पण गिरीश यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. "वळू'तल्या कमतरतेबद्दल ते म्हणतात, ""हा चित्रपट लिखाणाच्या पातळीवर खूपच छान जमला होता; पण काही कारणांमुळे आम्हाला तो हवा तसा "शूट' करता आला नाही. पण, आमची ही सुरुवात आहे. पुढच्या कलाकृतींमध्ये "वळू'मध्ये राहिलेल्या त्रुटी आम्ही जरूर दूर करू.

Thursday, March 13, 2008

दादा माणूस


दादा माणूस
प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांचा 14 मार्चला दहावा स्मृतिदिन. सलग नऊ सुवर्णमहोत्सवी चित्रपट दिल्याबद्दल "गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस्‌'मध्ये स्थान मिळविणाऱ्या दादा कोंडकेंवर रसिकांनी भरभरून प्रेम केलंय. आजही त्यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालतात. अभिनेते मकरंद अनासपुरे व विजय कोंडके यांनी दादांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
--------------
"थेटर'चा पडदा फाटेल, इतकं खळखळून हास्य निर्माण करणाऱ्या दादा कोंडकेंचा आज दहावा स्मृतीदिन. कलाकाराचं मोठेपण ठरतं ते त्याला लाभणाऱ्या लोकाश्रयात. याबाबतीत दादांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. कारण, आजही त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये तुफान चालताहेत. "रिपीट रन'ला सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही दादांच्या नावावर नोंदला जाऊ शकतो. लालबागमधल्या एका सामान्य गिरणीकामगाराच्या कुटुंबात दादा जन्मले. साधा कामगार, बॅन्ड कंपनीतील सहकलाकार, सेवा दलाचा कार्यकर्ता, वगनाट्यातील कलाकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता...दादांच्या आयुष्याचा प्रवास हा असा चढत्या भाजणीनं झाला. "तांबडी माती' चित्रपटातून फुटलेलं दादा कोंडके नावाचं तांबडं कालांतरानं मराठी चित्रपटसृष्टीला उजळवून गेलं. मराठी चित्रपटाच्या सर्व चौकटी त्यांनी मोडीत काढल्या. ढगळी अर्धी चड्डी, त्यावर लोंबणारी नाडी आणि विस्कटलेला शर्ट अशी त्यांची वेशभूषा. असा हा अजागळ प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला तो त्याच्या साध्याभोळ्या आणि सरळसोट स्वभावानं. गावरान भाषा, ग्रामीण ढंगातला विनोद हा त्यांच्या सिनेमाचा "यूएसपी.' दादांमधल्या शाहिरानं तमाशा, वग, लावणी... असा कोणताही कलाप्रकार वर्ज्य मानला नाही. त्यांचा "डबल मिनिंग'चा विनोद काहींनी डोक्‍यावर घेतला तर काहींनी त्यामुळेच त्यांच्यावर कायमस्वरूपी फुली मारली. "कॉमन मॅन'ची सुख-दुःखं त्यांनी जाणली होती. म्हणूनच दादांच्या प्रत्येक चित्रपटाच्या पदरात रौप्यमहोत्सवाचे, सुवर्णमहोत्सवाचे दान प्रेक्षकानं टाकलं. "आये' ही त्यांची हाक घुमली की थिएटरच्या निर्जीव भिंतीही जाग्या होत. राज्य शासनाच्या करपरतीच्या योजनेला त्यांनी कडाडून विरोध केला. आपला चित्रपट पडण्याची खात्री असणाऱ्यांनी चित्रपट निर्मितीकडे वळूच नये, असं ते स्पष्टपणे सांगत. "चित्रपट पाहण्यास
ाठी येणाऱ्या प्रेक्षकाचे पैसे शंभर टक्के वसूल झालेच पाहिजेत, या उद्देशानं ते चित्रपट निर्मिती करीत. शाहिराचे विचार अमर असतात. कोणी निंदा, कोणी वंदा... दादा कोंडके या शाहिराचा विनोद भविष्यातही मराठी माणसाच्या सोबतीस असेल.


दादांचे चित्रपट "क्‍लासिक'!
ज्या माणसानं आयुष्यात खूप जास्त दुःख भोगलंय, त्याला उत्तम विनोद करता येतो, असं म्हणतात. दादा कोंडकेंनी खूप भोगलं म्हणूनच त्यांचे सर्व चित्रपट एकापेक्षा एक असे सरस मनोरंजन करणारे ठरले. सामान्य माणसाला समजेल, उमजेल असा विनोद त्यांनी आपल्या चित्रपटाद्वारे सादर केला. त्यांच्या व्यक्तिरेखेत भोळेपणा, भाबडेपणा असायचा. मुख्यतः त्यांच्या चित्रपटांमधून काहीतरी संदेश सादर केला जायचा. त्यांच्या एका चित्रपटातला प्रसंग मला अगदी स्पष्ट आठवतोय. एका नेत्याची सभा उधळण्याचा हा प्रसंग आहे. सभेला लोकांची मोठी गर्दी जमलेली असते. एक सायकलस्वार या गर्दीत घुसून मोठ्यानं ओरडतो, "अरे, राशनवर साखर आली रे!' बस, दुसऱ्या क्षणी ही सभा उधळली जाते. अशा प्रकारची जाणीव त्यांच्या चित्रपटांमधून पाहायला मिळायची. त्यांच्या विनोदात नेहमी सामाजिक भाष्य असायचं. अशा प्रकारचं भाष्य नसतं, तर त्यांचे चित्रपट आजच्या काळात चित्रपटगृहांमधून प्रदर्शितच झाले नसते.
दादांच्या विनोदाला दुय्यम स्थान देण्यात आलं, ते त्यातल्या "डबल मिनिंग'च्या संवादांमुळे. मनोरंजनासाठी त्यांनी हा प्रकार कदाचित केलाही असेल; पण मला तो कधीही खटकला नाही. लोकनाट्य, वगनाट्य आणि मुक्तनाट्यात लोकांना हसविण्यासाठी द्वयर्थी विनोदाचा आधार कधी कधी घेतला जातो; पण त्यामुळे हा विनोद आचरट किंवा वाईट ठरत नाही. मराठी भाषा ही वळवावी तशी वळते. तेव्हा दादांना भाषिक विनोदाची खूप चांगली जाण होती, असं मी म्हणेन. काहींना दादांचे चित्रपट "क्‍लासिक्‍स' न वाटता सर्वसाधारण वाटतात. ठराविक साच्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं म्हणजे "क्‍लासिक', असं काहींना वाटतं; पण माझ्या मते- दादांचे सर्व चित्रपट हे "क्‍लासिक'च होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा एक ऐकलेला किस्सा मी इथं नमूद करतो. त्यांच्या "एकटा जीव सदाशिव' या चित्रपटाला राज्य शासनाचे बरेच पुरस्कार मिळाले होते. हे पुरस्कार स्वीकारताना दादा स्टेजवरून म्हणाले, ""आपल्याकडे पडेल आणि भिकार सिनेमांना पुरस्कार देण्याची परंपरा आहे; पण माझ्या "एकटा जीव सदाशिव'नं सिल्व्हर ज्युबिली केलीय. तेव्हा परीक्षकांनी अजूनही या चित्रपटाचं बक्षीस काढून घेतलं तरी माझी काही हरकत नाही.''
- मकरंद अनासपुरे

काळाच्या पुढचा दिग्दर्शक
"सोंगाड्या' पूर्ण होऊन त्याला वितरक मिळत नसतानाचा हा किस्सा आहे. या चित्रपटाच्या जवळपास 30-35 "ट्रायल्स' झाल्या; पण चित्रपट विकत घ्यायला कोणी पुढे येत नव्हतं. या चित्रपटातील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीवर अनेकांचा आक्षेप होता. ते या चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांना पाहत होते. वितरकांचं अडेलतट्टू धोरण पाहून दादांनी मला वितरणाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितलं. त्या वेळी मी नुकताच कुठे बी.कॉम. झालो होतो. वितरकांच्या नकारामुळे दुसरा एखादा निर्माता घाबरून गेला असता; पण दादा कमालीचे डेअरिंगबाज होते. हा चित्रपट अमावस्येच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. चित्रपटसृष्टीतील काही ज्येष्ठ मंडळींनी या दिवसाला आक्षेप घेतला. मी हा दादांजवळ मुद्दा काढल्यानंतर ते म्हणाले, ""कसली अमावस्या अन कसलं काय? लावून टाक. बघूया काय होतंय ते!'' आश्‍चर्य म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. त्यानंतर एकदा "कोहिनूर' चित्रपटगृहाचा मालक आम्हाला त्याचं चित्रपटगृह लावण्यास देत नव्हता. आता काय करायचं, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. आम्ही विचारात पडलो असताना दादा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. मराठीवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून, त्यांनी आपली बाजू बाळासाहेबांकडे मांडली. अर्थातच, हा प्रश्‍न त्यांनी लगेचच सोडवला. एकंदरीत कोणत्याही अडचणीवर मात करण्याची शक्ती दादांमध्ये होती, त्याचे हे प्रसंग म्हणजे पुरावा आहेत.
दादांनी आपल्या कामाची विभागणी खूप छान पद्धतीनं केली होती. लेखन-दिग्दर्शनावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांनी वितरणाची धुरा माझ्यावर सोपविली होती. दादांचा विनोद हा चावटपणाकडे झुकणारा होता, अशी आजही त्यांच्यावर टीका केली जाते; पण- माझ्या मते दादा हे काळाच्या पुढचा विचार करणारे दिग्दर्शक होते. दादांनी केलेल्या विनोदाची नक्कल हल्लीच्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्रास केली जाते; पण ती कोणाला आक्षेपार्ह वाटत नाही. दादांचे "तेरे मेरे बीचमें' आणि "अंधेरी रात में दिया तेरे हात में' हे दोन हिंदी चित्रपट खूप यशस्वी ठरले होते. त्यावरून प्रेरणा घेऊन अभिनेते कादर खान यांनी आपल्या चित्रपटांमध्ये "डबल मिनिंग' संवाद लिहिण्यास सुरुवात केली होती. त्याबद्दल दिल्लीच्या एका वर्तमानपत्रात कादर खान यांच्या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध झालेला मथळा मला अजूनही आठवतोय, "दादा कोंडके टाइप डबलमिनिंग फिल्म'.
- विजय कोंडके

1) सोंगाड्या
2) एकटा जीव सदाशिव
3) राम राम गंगाराम
4) पांडू हवालदार
5) तुमचं आमचं जमलं
6)आंधळा मारतो डोळा
7) ह्योच नवरा पाहिजे
8) बोट लावीन तिथं गुदगुल्या
9) आली अंगावर

(दादांच्या या सुपरडुपर हिट चित्रपटांपैकी तुमचे आवडीचे सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडा आणि दादांच्या कारकिर्दीवर आपला अभिप्रायही नोंदवा.)

Wednesday, March 12, 2008

आमीर खान "वळू'च्या प्रेमात...


आमीर खान "वळू'च्या प्रेमात...
"वळू'ची टीम सध्या यशाच्या शिखरावर आहे. एक तर हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात अतिशय जोरात चालतोय आणि दुसरीकडे मान्यवरांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. "वळू'च्या प्रेमात पडलेलं अगदी "लेटेस्ट' नाव म्हणजे आमीर खान. हा चित्रपट त्यानं नुकताच अंधेरीतल्या "सिनेमॅक्‍स' चित्रपटगृहात पाहिला आणि तो अक्षरशः भारावला. लेखक गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि प्रमुख कलावंत अतुल कुलकर्णी यांचं त्यानं तोंडभरून कौतुक केलं. "वळू'च्या टीमचं अभिनंदन करण्यासाठी आमीर खानसोबत त्याची पत्नी किरण राव, दिग्दर्शक राकेश मेहरा, सचिन पिळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. "वळू'बद्दल बरेच काही ऐकायला मिळाल्यानं हा चित्रपट आपण पाहण्यास आल्याचे आमीरनं या वेळी सांगितलं. एवढ्यावरच न थांबता त्यानं दिग्दर्शक उमेश कुलकर्णीला आपल्या ऑफिसमध्ये येऊन भेटण्यास सांगितलं. आमीर तसा मराठी वर्तुळात क्वचितच दिसतो. अलीकडच्या काळात त्यानं अपवादानेच मराठी चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे, "मिनिंगफुल सिनेमा'च्या कायम शोधात असणाऱ्या या कलाकारानं "वळू'च्या प्रेमात पडणं ही निश्‍चितच आनंदाची गोष्ट आहे.
ता. क.
"वळू'चं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. तुमचं "वळू'बद्दलचं मत मला जाणून घ्यायला निश्‍चितच आवडेल. तेव्हा केवळ ब्लॉग न वाचता प्रतिक्रियाही देत राहा. म्हणजे आणखी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठी बळ येईल.

Monday, March 10, 2008

मळलेली वाटच बरी



ब्लॅक ऍण्ड व्हाईट

मळलेली वाटच बरी

सध्या सगळीकडे बदलांचं वारं वाहतंय. या वाऱ्याची एक झुळूक आपणही अनुभवायला काय हरकत आहे, असा प्रश्‍न हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना हल्ली पडलाय. "ब्लॅक ऍण्ड व्हाईट' पाहताना प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईंनासुद्धा या प्रश्‍नानं घेरलंय याची खात्री पटते. सध्याची तरुण दिग्दर्शक मंडळी सध्या खूप वेगवेगळे विषय अगदी सहजरीत्या हाताळत आहेत. त्यामुळे आपल्या नेहमीच्या मसालापटांपासून थोडं दूर जात घईंनी "ऑफबीट' चित्रपटाची वाट पत्करण्याचा धोका पत्करलाय.
एखाद्या अपरिचित दिग्दर्शकानं "ब्लॅक ऍण्ड व्हाईट' दिग्दर्शित केला असता तर कदाचित तो अधिक भिडलाही असता, पण घईंच्या दिग्दर्शनामुळं या चित्रपटाची गुणवत्ता वेगळ्या दृष्टीनं पडताळावी लागते. दहशतवादावर आधारलेल्या अनेक चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही साधारण त्याच पठडीतला आहे. विदेशातील कट्टरपंथीय दहशतवादी आणि दहशतवादाच्या रस्त्यावर जबरदस्तीनं चालणाऱ्या भारतातल्या काही तरुणांच्या मानसिकतेवर दिग्दर्शकानं प्रकाश टाकलाय. हा एकमेव वेगळा "अँगल' वगळता हा सिनेमा फार काही मोठी मजल मारू शकलेला नाही. त्यामुळे असल्या प्रयोगापेक्षा घई आपल्या "ट्रॅक'वरच राहिले असते तर ते अधिक चांगलं ठरेल.
रंजन माथूर (अनिल कपूर) हे नवी दिल्लीतल्या एका कॉलेजमधले उर्दूचे प्रख्यात प्राध्यापक. राजकीय क्षेत्रातही त्यांची बऱ्यापैकी उठबस असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारी रोमा (शेफाली शहा) ही त्यांची पत्नी. एके दिवशी नुमेर (अनुराग सिन्हा) हा तरुण माथूर यांच्या संपर्कात येतो. गुजरातमधल्या जातीय दंग्यांमध्ये त्याच्या आई-वडिलांना जाळण्यात आलेलं असतं. या गोष्टीचा नेमका फायदा घेत काही कट्टरपंथीय मंडळी नुमेरचं माथं भडकवतात. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात तो मानवी बॉम्ब म्हणून जाणार असतो. नुमेरचा हा चेहरा माथूर ओळखू शकत नाहीत. ते आपल्या घरी त्याला आश्रय देतात, पण त्याच्यामुळेच त्यांना आपली पत्नी गमवावी लागते. आपली प्रतिष्ठा पणाला लावून ते त्याला 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचा पास मिळवून देतात. तेव्हा शेकडो निरपराध व्यक्तींना मारण्यास तयार झालेल्या नुमेरचं मन पालटतं.
वरुण वर्धन यांच्या कथानकातला दहशतवादाचा मूळ धागा दिग्दर्शकानं चांगला पकडलाय, पण या धाग्याचं वस्त्र करताना दिग्दर्शकाला बऱ्याच अडचणी आल्यात. मुळात हा चित्रपट त्यांनी द्विधा मनोवस्थेत केलाय. एकीकडे त्यांना सर्व काही प्रयोगात्मक पातळीवर करायचंय आणि दुसरीकडे हा प्रयोग त्यांना व्यावसायिक स्तरावर यशस्वीही करायचाय. ही सांगड घालण्यात त्यांना अपयश आलंय. "लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा आपल्या चित्रपटातून रेखाटणं ही घईंची खासियत. आपल्या या बलस्थानाला मुरड घालून त्यांना हा चित्रपट करावा लागलाय. या कसोटीत त्यांना संमिश्र यश लाभलंय. रंजन माथूरची व्यक्तिरेखा ठसठशीत झालीय खरी, पण तीच गोष्ट नुमेरच्या व्यक्तिरेखेबाबत घडलेली नाही. त्याच्या संपर्कात कोणत्या अतिरेकी संघटना आहेत, याची दिग्दर्शकाला माहिती द्यावीशी वाटलेली नाही. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्याला पुरेशा गांभीर्याची जोड मिळालेली नाही. त्यात भर म्हणून घईंनी नुमेरच्या व्यक्तिरेखेला एक "लव्ह ट्रॅक'ही जोडलाय. त्याच्या अवतीभवतीनं गाणीही पेरलीयत. रोमाची व्यक्तिरेखा खूपच बटबटीत झालीय. 14 ऑगस्टच्या रात्री तिची हत्या होते आणि 15 ऑगस्टला सकाळी माथूर तिच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार करून स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याचं दाखविण्यात आलंय. पटकथेतील ही त्रूट धक्कादायक आहे. नुमेरचं मनःपरिवर्तन होण्यामागचा घटनाक्रम पडद्यावर नीट आलेला नाही. त्याचे प्राण वाचविण्यामागची माथूर यांची भूमिकासुद्धा गोंधळात टाकणारी आहे.
अनिल कपूरनं माथूर यांची व्यक्तिरेखा सफाईदारपणे साकारलीय. नवोदित अनुराग सिन्हाचा म्हणावा तितका कस लागलेला नाही. चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखविता तो वावरलाय. व्यक्तिरेखेच्या गरजेपोटी हे घडलंय की त्यामागचं आणखी काही कारण आहे, हे जाणण्यासाठी अनुरागचा दुसरा चित्रपट यायला हवा. शेफाली शहाची व्यक्तिरेखा बटबटीत असूनही ती आपला प्रभाव उमटविण्यात यशस्वी झालीय. कथानकाकडून गीत-संगीताची मागणी नसल्यामुळे सुखविंदर यांचं संगीत लक्षात राहत नाही.

Wednesday, March 5, 2008

"बूम'

"बूम'
ग्लॅमर क्षेत्रातील सर्वाधिक "हॅपनिंग इंडस्ट्री' म्हणून सध्या मराठी चित्रपटसृष्टीचं नाव घेतलं जातंय. अवघ्या दशकभरापूर्वी जी चित्रपटसृष्टी मरणासन्न अवस्थेला जाऊन पोचली होती, ती आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही उंचच उंच भराऱ्या मारण्याचं स्वप्न पाहतेय. काही चित्रपटांनी अनपेक्षित यश मिळवलंय, तर काहींना अपयशही चाखावं लागलं. अगदी अमराठी प्रेक्षकही तिची सध्या दखल घेताना आढळतोय. पण, मराठी चित्रपटसृष्टीची सध्या नेमकी काय अवस्था आहे ? एकीकडे मराठी चित्रपटाचा दर्जा उंचावलाय, तर दुसरीकडे त्यांना चांगली चित्रपटगृहं मिळणं दुरापास्त झालंय. या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ज्ञ मंडळींबरोबर चर्चा करून सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीचा घेतलेला हा आढावा.
-------------
लालबागमधलं "भारतमाता' चित्रपटगृह हे नेहमी चर्चेत असतं ते या चित्रपटागृहाच्या संरक्षणासाठी रसिकांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनामुळं. मात्र, पंधरवड्यापूर्वी हे चित्रपटगृह एका निराळ्या विक्रमाच्या निमित्तानं रसिकांच्या नजरेस आलं. या चित्रपटगृहात एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे "शोज' होण्याचा चमत्कार घडला. मराठी चित्रपटसृष्टीला भरभराटीचे दिवस आल्यानेच हा चमत्कार घडल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण, मराठी चित्रपटांनी घेतलेल्या भरारीचं समर्थन करण्यास हे एकमेव उदाहरण पुरेसं नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी चित्रपटांचं चित्रपटगृहांमधील उत्पन्नाचा टक्का वाढलाय. या चित्रपटांच्या सॅटेलाईट, व्हिडीओ तसेच सीडी-डीव्हीडी हक्कांना मोठी मागणी आलीय. मराठी चित्रपटांच्या संगीताच्या कॅसेटस्‌बाबतही रसिक विचारणा करीत आहेत. मराठी चित्रपटांमधील भरभराट लक्षात आल्यानं निर्माते-वितरक मंडळी आपल्या "प्रॉडक्‍ट'चं चांगलं "मार्केटिंग'करू लागले आहेत. सुभाष घई, अनिल अंबानी, डी. रामानायडू, परवेझ दमानिया ही अमराठी मंडळी मराठी चित्रपटांच्या निर्मितीत रस घेऊ लागली आहेत. "डोंबिवली फास्ट'चा विषय आणि निशीकांत यांचं तांत्रिक कौशल्य आवडल्यानं अब्बास-मस्तान यांनी त्याचा तमीळमध्ये "रीमेक' करण्याचं धाडस दाखविलं.
गेल्या वर्षभरात निव्वळ विषयांच्या दृष्टीनं खूप चांगल्या कलाकृती पडद्यावर आल्या आहेत. "टिंग्या', "वळू', "एवढंसं आभाळ', "जिंकी रे जिंकी' ही काही त्याची ठळक उदाहरणं. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, चंद्रकांत कुलकर्णी, स्मिता तळवलकर, संजय सूरकर, सुमित्रा भावे-सुनील सुकठणकर... आदी जाणत्या निर्माता-दिग्दर्शकांबरोबरच उमेश कुलकर्णी, बिपीन नाडकर्णी, गिरीश मोहिते हे नव्या दमाचे लेखक-दिग्दर्शक आता उत्साहानं पुढं येत आहेत, ही चांगली गोष्ट आहेत. दंतवैद्यकशास्त्रात विशेष नाव कमावणारे डॉ. उदय ताम्हनकर आता "काय द्याचं बोला'च्या यशानंतर आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आपला मुख्य व्यवसाय सांभाळून त्यांनी मराठी चित्रपटाच्या वितरण यंत्रणेत दाखविलेला रस, ही खूप विशेष गोष्ट मानावी लागेल.
"झी टॉकिज'ची निर्मिती असलेल्या "साडे माडे तीन' चित्रपटानं आतापर्यंत तब्बल साडे चार कोटींचा व्यवसाय केला. बहुचर्चित "वळू' चित्रपटानंही अवघ्या चार आठवड्यांमध्ये दोन कोटींपर्यंत मजल मारलीय. "चेकमेट'नं पहिल्याच आठवड्यात 85 ठिकाणी प्रदर्शित होऊन आपला ठसा उमटवला. आतापर्यंत हिंदी चित्रपटांच्या अधिकाधिक प्रिंटस्‌बद्दल चर्चा व्हायची. मात्र, त्याबाबतीत आपण मागं नसल्याचं हे द्योतक आहे, असं वितरक सचिन पारेकर यांनी सांगितलं. या दोन्ही चित्रपटांच्या यशात त्यांच्या वृत्तपत्र आणि टीव्हीवरून केलेल्या प्रसिद्धीला खूप महत्त्व दिलं जातंय. मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी आता स्वतंत्र "बजेट' असायला हवा, हा मुद्दा निर्मात्यांच्या पचनी पडू लागला आहे. पूर्वी मराठी चित्रपटगृहांना चांगली चित्रपटगृहं मिळायला बऱ्याच अडचणी यायच्या. परंतु, आता प्रतिष्ठीत मल्टिप्लेक्‍सगृहांचे चालक आपणहून मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास इच्छुक असल्याची माहिती प्रसिद्ध वितरक सादिक चितळीकर यांनी दिली. मल्टिप्लेक्‍समध्ये सक्तीनं मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा राज्य शासनाचा आदेश चित्रपटसृष्टीच्या पथ्यावर पडला आहे. अगदी एक-दोन वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांच्या सॅटेलाईट हक्कांना अगदी क्षुल्लक किंमत मिळे. पण, आता निर्मात्यांना आपल्या कलाकृतीची किंमत कळून ते मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याची माहिती या क्षेत्रात काम करणाऱ्या नानूभाई यांनी दिली.
ह्या झाल्या सर्व जमेच्या बाजू. पण, या यशाला काळी किनार आहेच. मार्केटिंग, प्रसिद्धी आणि वितरण हे चित्रपट निर्मितीमधले तीन प्रमुख खांब. या तीन खांबांकडेच निर्माते-वितरक मंडळींचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे "साडे माडे तीन' आणि "वळू'सारखे चित्रपट उत्तम कामगिरी करीत असतानाच दुसरीकडे अनेक चित्रपट धराशायी झाले. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे वितरण यंत्रणेचा अभाव आणि चित्रपटाच्या प्रदर्शनातील विसंगत अंतर. महाराष्ट्रात सध्या सुमारे 550 ठिकाणी मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची सुविधा आहे. परंतु, तो प्रत्यक्षात अवघ्या 50 ते 55 सेंटरमध्येच प्रदर्शित केला जातो. त्याचा विपरीत परिणाम मराठी चित्रपटांच्या एकूण उत्पन्नावर होत आहे. राज्यातील अनेक विभाग असे आहेत की जिथे मराठी चित्रपट प्रदर्शितच होत नाही. कोकण, वाशीम, जालना, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात गेल्या काही वर्षांमध्ये किती चित्रपट प्रदर्शित झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार सांगतात, ""राज्यातल्या अनेक भागात मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही, ही खरी बाब आहे. पण, ही समस्या दूर करण्यासाठी मी स्वतः सध्या कष्ट घेत आहे. नागपूर, मराठवाड्यातील हिंदीभाषिक वितरकांबरोबर मी नुकतीच चर्चा केली आहे. या वितरकांनी आता आपल्या विभागात मराठी चित्रपट लावण्यास तयारी दर्शविली आहे.''
चित्रपटांमधून "ब्रॅण्डस्‌'ची प्रसिद्धी करण्यास सुरुवात झाली असली तरी हे तंत्र अजूनही आपल्याकडच्या निर्माते-मंडळींना अवगत झालेलं नाही. ते अवगत झाल्यास निर्मात्यांना आपला निर्मितीखर्च वसूल करण्याची वेगळी वाट सापडण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात जवळपास 15 ते 20 मराठी चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले आणि त्याचा फटका सर्वांनाच बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे वितरक आहेत. चांगल्या वितरकांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच निर्मात्यांनीही प्रदर्शनाची घाई करू नये, अशी माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली. वितरणाच्या समस्येयाबाबत सादिक चितळीकर म्हणतात, ""प्रदर्शनाबाबत घाई केल्यानं काही चित्रपटांना फटका बसल्याचा मुद्दा बरोबर आहे. परंतु, मी स्वतः वितरक असल्यानं दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये योग्य अंतर ठेवण्याची नेहमीच काळजी घेतो. "बकुळा नामदेव घोटाळे' हा चित्रपट सेन्सॉरसंमत असूनही प्रदर्शनयोग्य काळ न वाटल्यानं तो आम्ही तब्बल तीन महिन्यांनी प्रदर्शित केला. निर्मात्यांनी फक्त स्वतःचा फायदा न बघता संपूर्ण चित्रपटसृष्टीचा विचार करण्याची वेळ आता जवळ आली आहे.''
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे... ही सध्याची मराठी चित्रपटसृष्टीतील गाजणारी नावं. तरीदेखील मराठी सिनेमा अजूनही ताज्या दमाच्या नायक-नायिकेच्या शोधात आहे. पुढील दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीची आणखी भरभराट करायची झाल्यास ही त्रुटी लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. मराठी चित्रपटासृष्टीला कधीच चांगल्या अभिनेत्यांची कमतरता जाणवली नाही. इथं उणीव आहे ती "स्टार्स'ची. श्रेयस तळपदे आणि रितेश देशमुख हे हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे सध्याचे दोन मराठी कलाकार. त्या दोघांनाही मराठी चित्रपट करायचा. त्यांच्या "स्टार स्टेटस'ला फायदा उठविण्याचे प्रयत्न आता व्हायला हवेत. या सर्व गोष्टी जुळून आल्यास चित्रपट माध्यमात तरी मराठीवर कोणी अन्याय करण्यास धजावेल, असं वाटत नाही.

चौकट करणे

मराठी चित्रपटाच्या कमाईचे विविध मार्ग
1) चित्रपटगृहातील उत्पन्न
2) व्हिडीओ, केबल, सॅटेलाईट राईटस्‌
3) राज्य शासनाचे अनुदान (15 ते 30 लाख)
4) चित्रपटातून "ब्रॅण्डस्‌'ची प्रसिद्धी