Friday, April 29, 2011

हार आणि प्रहार

हार आणि प्रहार
------------
कलावंतांच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी पाठीवर दिली जाणारी थाप म्हणजे पुरस्कार. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांचं जे पीक आलंय, त्यामध्ये कलावंतांचं कौतुक होण्याऐवजी त्यांची बदनामीच अधिक होत असल्याचं चित्र प्रकर्षानं समोर आलं आहे. प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यानं "झी मराठी' वाहिनीविरूद्ध नुकतीच जी तोफ डागली आणि त्यानिमित्तानं मराठी चित्रपटसृष्टीत ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्या पाहिल्यानंतर या विषयाचं महत्त्व लक्षात येतं. "झी'च्या पुरस्कार सोहळ्यात आपल्या चारित्र्याचं हनन केल्याचं प्रसादचं म्हणणं आहे. अर्थात, प्रसादसारखा अनुभव यापूर्वीही अनेक कलावंतांच्या वाट्याला वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये आलाय. फक्त मराठी चित्रपट पुरस्कारांपुरताच हा विषय मर्यादित नसून विविध संस्थांतर्फे दिल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्येही असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर-साजीद खान यांच्यातील शेरेबाजीही अशीच बराच काळ वादग्रस्त ठरली होती. परंतु, पूर्वीच्या कटू प्रकारांमधून काही धडा न घेता पुरस्कारांचं आयोजन करणारी मंडळी आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये सहभागी होणारी मंडळी त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती करीत आहेत.

पुरस्कार सोहळ्यांची संख्या वाढल्यानं हल्ली प्रत्येक वाहिनी आपला सोहळा इतरांपेक्षा कसा वेगळा आणि "हट के' होईल, याकडे अधिक लक्ष देत आहे. परंतु, "हट के' करण्याच्या नादात आपल्याकडून होणाऱ्या चुका त्यांच्या लक्षात येत नाहीत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वाहिन्यांवर कलाकारांची बदनामी केल्याचा आरोप आहे, त्या आणि संबंधित कलाकारांचे तत्पूर्वी अतिशय चांगले संबंध असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कलावंतांच्या बदनामीचे प्रकार नक्की कोणत्या कारणामुळे घडतात, हा खरोखरीच एक शोधाचा विषय बनलाय. असा एखादा प्रकार घडला की संबंधित वाहिनी सोहळ्याचे आयोजन आणि "स्क्रीप्ट' लेखकांना झालेल्या चुकीबद्दल जबाबदार धरतात. परंतु, अशी जबाबदारी निश्‍चित झाल्यानंतरही कोणावर कसलीही कारवाई झाल्याचं ऐकीवात नाही. तसेच ज्या वाहिन्या कलावंतांचा "अजिंक्‍यतारा' नावानं गौरव करतात, तसेच त्यांना आपले "ब्रॅंड ऍम्बेसेडर' बनवितात, त्या वाहिन्यांनी अपघातानं का होईना कलावंतांची बदनामी झाली तरी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवित नाहीत.

या सगळ्या प्रकारामध्ये कलावंतांकडून होणाऱ्या चुकांना माफ करता येणार नाही. सूत्रसंचालकाकडून भलतंच वक्तव्य केलं गेलं की तो त्यासंबंधीची जबाबदारी स्वतःवर न घेता "स्क्रीप्टरायवर'वर टाकून मोकळा होतो. आपल्या तोंडी असलेलं वक्तव्य जर आपल्याच परिवारातील एखाद्या सहकाऱ्याशी संबंधित असेल तर ते न म्हणण्याचं धाडस सूत्रसंचालक का दाखवीत नाहीत ? तसेच एखाद्या कलाकाराची बदनामी झाल्याचं सर्वांना समजत असूनही संबंधित वाहिनीविरुद्ध कधी कोणी एकत्रितपणे आवाजही उठवीत नाहीत. त्यामागचं कारण म्हणजे प्रत्येकाला लोकप्रिय वाहिनीबरोबरचे आपले हितसंबंध जपायचे असतात. त्यामुळेच वाहिन्यांकडून चूक झाल्याचं समजत असूनही त्याविरुद्ध एकत्रितपणे लढा देण्याचं कोणाला उमजत नाही. तसेच ज्या कलाकाराची वाहिन्यांकडून कथित बदनामी झाली आहे, त्या कलाकारांची भूमिकादेखील तळ्यात-मळ्यात असते. संबंधित वाहिनीविरुद्ध भविष्यात आपण काम करणार नाही, अशी भूमिका घेण्याचं धाडस ते का दाखवीत नाहीत ?

सर्वसामान्यांच्या दृष्टीकोणातून या घडामोडींचा विचार केल्यास त्यात त्यांना फारसं काही खटकत नाही. कारण, टीव्हीवरील कार्यक्रम असतात ते मनोरंजनासाठी. पुरस्कार सोहळे हे कधीच गांभीर्यानं घ्यायचे नसतात, असा समज रुढ झालाय. त्यामुळे अशाप्रकारची थट्टा-मस्करी त्यात चालतेच, असं प्रेक्षकांनीच आता गृहित धरलंय. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांचं आयोजन करणाऱ्यांनी आपली विश्‍वासार्हता तपासायला हवीय तसेच कलावंतांनीही निव्वळ प्रसिद्धी मिळतेय, यावर आनंद न मानता आपण कोणत्या सोहळ्यात सहभागी होतोय, याचीही काळजी घ्यायला हवी. तसं घडलं तरच अशा अपघातांची संख्या कमी होईल.

प्रीमियर' मासिक