Wednesday, July 4, 2012

‘काकस्पर्श’च्या स्पर्शामागचं ‘लॉजिक’

यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या द्विशतकी टप्पा गाठणार आहे. प्रेक्षक, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि कलाकारांसाठीही हा एक मोठा धक्का आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीतील आलेली सध्याची ‘बूम’ पाहता हा आकडा अगदीच फसवा नसल्याचं जाणवतं. हल्ली कोणालाही मराठी चित्रपट बनवायचाय. त्यामागचं कारण म्हणजे एक तर मराठी चित्रपट हिंदीच्या तुलनेत खूप कमी किमतीत बनतो आणि त्यामध्ये केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची कागदावरील परतफेड अगदी सुखकर आहे. तरीदेखील मराठी चित्रपटांच्या यशाचं प्रमाण हे अगदीच नगण्य आहे. अगदी संख्याच मांडायची झाल्यास दर शंभरी अवघे पाच चित्रपट यशस्वी झाल्याचं निदर्शनास येतं. यंदाच्या वर्षीचं चित्र तर खूपच निराशाजनक आहे. ‘काकस्पर्श’चा अपवाद वगळता एकाही मराठी चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिस’वर दणदणीत यश मिळवता आलेलं नाही. ‘काकस्पर्श’च्या यशाबद्दल लिहायचं झाल्यास गुणवत्ता, नशीब आणि मेहनत या तीनही गोष्टींचा संगम या चित्रपटात झाल्याचं आढळतं. मराठीत चांगले चित्रपट येत नाहीत असं नाही. परंतु, प्रत्येक चित्रपटच ‘काकस्पर्श’एवढा यशस्वी ठरलेला नाही. म्हणूनच या चित्रपटाच्या यशाचं मोल अधिक आहे. एखाद्या चित्रपटाची ‘सक्सेस पार्टी’ आयोजित केली की त्यामध्ये संबंधित चित्रपटाची मंडळी उपस्थित होतात. परंतु, ‘काकस्पर्श’च्या यशाची पार्टी त्यास अपवाद ठरली. या पार्टीस या चित्रपटाशी संबंधित नसलेली बरीच मंडळी होती. विशेष म्हणजे ‘काकस्पर्श’ ज्या चित्रपटगृहांमध्ये धो धो चालला त्या चित्रपटगृहांचे व्यवस्थापक आणि मालकांना आवर्जून बोलाविण्यात आलं होतं. मराठी चित्रपटाच्या यशाची ताकद यापूर्वी ‘नटरंग’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांबाबत अनुभवायला आली होती. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत या दोन्ही चित्रपटांचं यश अगदी उठून दिसलं होतं. मराठी चित्रपटांना चांगले ‘शो टायमिंग्ज’ मिळत नसल्याची खंत नेहमीच व्यक्त केली जाते. परंतु, त्यात तथ्य दिसत नाही. ‘काकस्पर्श’ला प्रेक्षकांनी कौल दिल्याचं लक्षात आल्यानंतर दुसर्‍या आठवड्यापासून या चित्रपटाला महाराष्ट्रातील सगळी चांगली चित्रपटगृहं आणि चांगले ‘टायमिंग्ज’ मिळाले. व्यावसायिक हिंदी चित्रपट दाखवून चित्रपटगृह रिकामं ठेवण्यापेक्षा चालणारा मराठी सिनेमा आपल्या चित्रपटगृहामध्ये कोण लावणार नाही ? परंतु, हल्ली नकारार्थी विचार करण्याकडेच आपला कल वाढला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणमीमांसा करताना एक हक्काचं कारण म्हणून चित्रपटगृहांच्या ‘टायमिंग’चं कारण पुढं केलं जातं. परंतु, ते किती खोटं आहे हे ‘काकस्पर्श’च्या यशानं सिद्ध झालं आहे. ‘काकस्पर्श’च्या यशामागचं आणखी एक ठळक कारण म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीनं या चित्रपटाला दिलेला पाठिंबा. मालिका आणि ‘रिऍलिटी शोज’मधील रेटिंगमध्ये भले ही वाहिनी आपल्या स्पर्धकांच्या थोडी मागं पडली असेल. परंतु, या वाहिनीनं आपली सगळी ताकद ‘काकस्पर्श’च्या मागं उभी केली. आपली एकही मालिका किंवा ‘रिऍलिटी शो’ या वाहिनीनं सोडला नाही की ज्यावर या चित्रपटाची प्रसिद्धी झाली नाही. मुळात ‘काकस्पर्श’ हा काही ‘गोलमाल सिरीज’ किंवा आमिर खानचा नवीन चित्रपट नव्हता की प्रेक्षकांनी प्रदर्शनाच्या दिवशीच त्याच्यावर उड्या टाकाव्यात. तसेच चित्रपटाच्या शीर्षकामध्येही नकारात्मकता अगदी स्पष्ट दिसत होती. कोणत्याही चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये ‘लॉंग इनिंग’ खेळायची असेल तर त्याची ‘माऊथपब्लिसिटी’ चांगली होणं खूप महत्त्वाची असते. ‘झी’नं नेमकं हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं. या चित्रपटाच्या ‘प्रोमोज’चा, जाहिरातींचा, त्यातील कलाकारांच्या वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर जाण्याचा एवढा मारा झाला की प्रेक्षकांना ‘काकस्पर्श’ आता बघण्यापासून दुसरा पर्याय नाही, असंच वाटायला लागलं. ‘काकस्पर्श’ प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचीही मानसिकता थोडी लक्षात घ्यायला हवी. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. मराठी तर जाऊदे पण चांगला हिंदी चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळाला नव्हता. ‘आयपीएल’च्या ‘ओव्हरडोस’नं प्रेक्षकही कंटाळले होते. थोडक्यात प्रेक्षकांना आपल्या खिशातले पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन काहीतरी चांगलं पाहायचं होतं. त्यामुळे एखाद्या कलाकृतीच्या यशामध्ये त्याच्या प्रदर्शनाचं ‘टायमिंग’देखील किती महत्त्वाचं असतं, ते या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं. ‘काकस्पर्श’च्या यशाला कारणीभूत असलेल्या या काही तांत्रिक गोष्टी. परंतु, प्रत्यक्ष कलावंतांची कामगिरीही तितकीच लक्षणीय होती. गिरीश जोशीसारखा चांगला लेखक या कलाकृतीमुळे झळाळून निघाला हे खूप चांगलं झालं. ज्या पटकथेसाठी सचिन खेडेकर आणि गिरीश जोशी यांनी निर्मात्यांचे उंबरठे झिजवले, तीच कलाकृती एवढी लोकप्रिय ठरली. ज्या चित्रपटाच्या पटकथेत गाणी कुठं आहेत, असा प्रश्‍न दिग्दर्शक महेश मांजरेकरांना पडला होता. त्याच मांजरेकरांना प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी त्याची ध्वनीफित प्रकाशित करावी लागली. खरोखरीच या चित्रपटसृष्टीत कसलेही आडाखे बांधता येत नाहीत. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर या दोन नावांशी आता विश्‍वासाचं नातं जोडलं गेलंय. या विश्‍वासाला ही जोडी जागल्यामुळे ही कलाकृती खरी बनली. ‘बॉक्स ऑफिस’साठी ओढून ताणून कराव्या लागणार्‍या क्लृप्त्या त्यात नव्हत्या. जे काही होतं ते प्रामाणिक होतं. ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ होतं. हीच गोष्ट कदाचित प्रेक्षकांना भावली असावी. अशा कलाकृती आता वारंवार बनाव्यात एवढीच अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे. - मंदार जोशी --------------

No comments: