Wednesday, July 23, 2008

"कॉन्ट्रॅक्‍ट' review

हुकमाचा एक्काही कामी !
"सरकार राज'ला बऱ्यापैकी आकार देण्यात रामगोपाल वर्मांना यश आल्यानं हा दिग्दर्शक पुन्हा माणसात येतोय, असं वाटत होतं. मात्र, "कॉन्ट्रॅक्‍ट' पाहिल्यानंतर तसं काही झालं नसल्याची खात्री पटते. गेल्या काही वर्षांमध्ये वर्मांनी आपल्या चित्रपटांमधून बरेच प्रयोग केले. "गॅंगवॉर'पट सोडले तर त्यांचे बहुतेक सर्व प्रयोग फसले. "सत्या', "कंपनी'नंतर वर्मांनी "कॉन्ट्रॅक्‍ट' बनवला तो गॅंगवॉरपटांची त्रिधारा पूर्ण करण्यासाठी. या विषयात त्यांची मातब्बरी असल्यानं "कॉन्ट्रॅक्‍ट'द्वारे ते निराश करणार नाहीत, असं वाटत होतं. पण, सूर हरवलेल्या वर्मांचा हुकमाचा एक्काही या सिनेमात चाललेला नाही. या सिनेमात त्यांनी "अंडरवर्ल्ड'चा दहशतवादाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, एवढा स्फोटक विषय हाताळण्यासाठी आवश्‍यक तेवढी मेहनत वर्मांनी घेतलेली नाही. "रॉ स्टॉक'मधली काही दृश्‍यं जोडून एखादा सिनेमा तयार व्हावा, असा "फील' हा चित्रपट पाहताना येतो. दहशतवादाच्या मुळाशी जाण्याऐवजी वर्मांनी दोन गॅंगमधला बटबटीत हिंसाचार चित्रपटभर दाखवलाय. एका प्रतिभाशाली दिग्दर्शकाची ही उतरती भाजणी खऱ्या सिनेमा शौकिनासाठी धक्कादायक आहे.
अमन (अध्मिक महाजन) हा लष्करातून बाहेर पडलेला एक तरुण. त्याचं सळसळतं रक्त पाहून अहमद हुसेन (प्रसाद पुरंदरे) हा पोलिस अधिकारी प्रभावित होतो. दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचं तो ठरवतो. "आरडी' नावाच्या दहशतवादाच्या टोळीत शिरून त्याचा बंदोबस्त करण्याची योजना तो त्याच्यापुढं ठेवतो. पण, अमनला शांततेत आयुष्य जगायचं असल्यानं तो हे काम करण्यास नकार देतो. काहीच दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात अमनची पत्नी आणि मुलीचा मृत्यू होतो. आपल्या घरापर्यंत पोचलेलं हे दहशतवादाचं लोण पाहून अमन हादरतो. अहमद हुसेन यांचा "प्लॅन' तो मान्य करतो आणि गुन्हेगार बनून "आरडी'च्या टोळीत सहभागी होतो. "आरडी'चा "नंबर वन' शत्रू असलेल्या गुंगाच्या (उपेंद्र लिमये) टोळीवर तो तुटून पडतो. मात्र, सरतेशेवटी या चक्रव्यूहातून बाहेर पडणं त्याला कठीण होतं.
वर्मांचा सूर साफ हरविल्याची लक्षणं संपूर्ण "कॉन्ट्रॅक्‍ट'मध्ये पाहायला मिळतात. टोळीयुद्धाचा दहशतवादाशी संबंध जोडताना वर्मांकडून अभ्यासपूर्ण हाताळणीची गरज होती. पण, दोन गॅंगमधला रक्तरंजित हिंसाचार एवढ्यापुरताच हा सिनेमा मर्यादित राहतो. चित्रपटाचा हीरो अमन लष्करातून बाहेर का पडतो, याचे सबळ कारण सिनेमात पाहायला मिळत नाही. केवळ एका पोलिस अधिकाऱ्याच्या इच्छेसाठी तो "आरडी' या दहशतवाद्याच्या टोळीत शिरायला तयार होतो, असं या सिनेमात दाखविण्यात आलंय. तसेच त्याचा या टोळीतील प्रवेश अगदी लुटूपुटूचा वाटतो. आरडीचा शत्रू गुंगाला कायम समुद्रातल्या बोटीवर दाखवून दिग्दर्शकानं त्याच्या अस्तिस्तावरही मर्यादा आणल्यात. बोटीवरचे सगळेच प्रसंग अगदीच बटबटीत झाले आहेत. वर्मांमधल्या दिग्दर्शकानं आपल्या सहाय्यकांकडून तांत्रिक कामं छान करवून घेतली आहेत. पण, चांगल्या सिनेमासाठी आवश्‍यक असलेल्या पटकथेबाबत त्यांनी डोळेझाक केलीय. या चित्रपटातले संवाद अगदीच कामचलाऊ आहेत. अमनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अध्मिक महाजनचा हा पहिला चित्रपट असून त्याचं नवखेपण जाणवत राहतं. पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रसाद पुरंदरे यांनी आपली चांगलीच छाप उमटवली आहे. उपेंद्र लिमये यांची व्यक्तिरेखा सुरुवातीला चांगली वाटते. पण, नंतर या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकानं जे जे चाळे करायला लावलेत, त्यामुळं तिचा प्रभाव कमी झालाय. दिग्दर्शकाला ही व्यक्तिरेखा "सत्या'मध्ये मनोज वाजपेयीनं साकारलेल्या भिकू म्हात्रेच्या जवळपास नेण्याची इच्छा असावी. पण, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. अमृता सुभाष यांनी आपल्या वाट्याला आलेली "लाऊड' भूमिका आणखीनच "लाऊड' केलीय. अमृता खानविलकरची भूमिका खूपच छोटी आहे. अमर मोहिले यांचं संगीत त्यातल्या त्यात बरं आहे. एकंदरीत वर्मांमधल्या दिग्दर्शकाचा असा हरवलेल
ा सूर पाहणं, ही खरोखरीच खूप तापदायक गोष्ट आहे.

Tuesday, July 22, 2008

किस्मत कनेक्‍शन review

"लूज' कनेक्‍शन !
दिग्दर्शक अजिज मिर्झांची ओळख म्हणजे "राजू बन गया जंटलमन', "येस बॉस', "चलते चलते' हे चित्रपट. हलकेफुलके विषय आणि त्याची तितकीच हलकीफुलकी हाताळणी, हे त्यांच्या सिनेमाचं ठळक वैशिष्ट्य. "चलते चलते'च्या यशानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी "किस्मत कनेक्‍शन' हा सिनेमा बनवलाय. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमा खूप बदललाय. त्यांची ही विश्रांती सिनेमातही जाणवते. यावेळी मिर्झांनी आपल्या सिनेमातून मनोरंजनाबरोबरच "सोशल मेसेज' देण्याचा प्रयत्न केलाय. पण या दोन्ही गोष्टींचं करण्यात आलेलं "कनेक्‍शन' चांगलंच "लूज' झालंय आणि इथंच हा सिनेमा गडबडलाय. काही "पॅचेस'मध्ये हा सिनेमा चांगला वाटतो. मात्र, तेवढ्यासाठी तो संपूर्ण पाहणं तापदायक ठरेल. "जब वुई मेट' आणि "लगे रहो मुन्नाभाई' असं भिन्न पद्धतीचं मनोरंजन दिग्दर्शकाच्या डोक्‍यात होतं. ते प्रत्यक्षात पडद्यावर भलत्याच रूपात उतरलंय.
हिंदी सिनेमातल्या हीरोचं चावून चोथा झालेलं नाव म्हणजे राज मल्होत्रा. मिर्झांनी आपल्या हीरोला नेमकं हेच नाव दिलंय. शिक्षणात त्यानं मोठी मजल मारलेली असते. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन पाच वर्षें उलटली तरी त्याला नोकरी-व्यवसायात जम बसवता आलेला नसतो. त्याचं नशीब उघडतं ते प्रियाच्या (विद्या बालन) आगमनानंतर. दोन-चार प्रसंगात या दोघांची अपघातानं भेट होते आणि प्रत्येक वेळी ही भेट राजला फायदेशीर ठरते. प्रिया एक वृद्धाश्रम (मिर्झांनी त्याला "कम्युनिटी सेंटर' असं गोंडस नाव दिलंय) चालवीत असते. या वृद्धाश्रमाच्या जागेवर एक मॉल उभारण्यात येणार असतो. या मॉलचं काम मिळवण्यासाठी राजची धडपड सुरू असते. वृद्धाश्रम सुरू ठेवून तिथं आपण मॉल बांधण्याचा बिल्डरवर दबाव आणू, असं चित्र तो प्रियासमोर उभं करतो. प्रियाला ते खरंच वाटतं. या प्रवासादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण मॉल उभारण्याचा निर्णय होऊन तिथं वृद्धाश्रम बांधलं जाणार नसल्याचं स्पष्ट होतं तेव्हा प्रियाचे डोळे उघडतात. अखेरीस राजसुद्धा प्रियाच्या प्रेमासाठी आपला "प्रॅक्‍टिकल ऍप्रोच' दूर ठेवतो आणि एक प्रेमकहाणी यशस्वी होते.
संजय छेल या यशस्वी पटकथा लेखकानं हा सिनेमा लिहिलाय. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मनोरंजन आणि "सोशल मेसेज' यांचा सांधा त्यांना जोडता आलेला नाही. छेल आणि मिर्झा बऱ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेत. एक तर त्यांना शाहिद कपूर आणि विद्या बालन यांच्यातली प्रेमकहाणीसुद्धा छानपणे रंगविता आलेली नाही. "जब वुई मेट'च्या "ट्रॅक'वर ही प्रेमकहाणी चालते खरी. मात्र, त्या चित्रपटातला फ्रेशनेस, त्याची ट्रीटमेंट इथं पाहायला मिळत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध "लगे रहो...'च्या वळणानं जातो. पण इथंही तीच चूक पुन्हा घडलीय. विद्या बालनचा ना वृद्धाश्रम खरा वाटतो, ना त्यातली वृद्ध मंडळी. सगळाच प्रकार अगदी बेगडी झालाय. संपूर्ण चित्रपट कॅनडामध्ये चित्रीत झालाय.
कलाकार कितीही चांगला असो, पटकथेत गडबड झाली की त्याची मात्रा चालत नाही. हा अनुभव शाहिद कपूरचा अभिनय पाहताना येतो. त्यानं अनेक दृश्‍यांमध्ये शाहरूख खान आणि दिलीपकुमार यांची नक्कल केलीय. मात्र, "जब वुई मेट'मध्ये दिसलेला खराखुरा शाहिद कपूर इथं अपवादानंच दिसतो. विद्या बालननं या सिनेमातून आपला "लूक' बदललाय. पण व्यक्तिरेखेनं तिला यावेळी हात दिलेला नाही. त्यामुळं या दोघांचं पडद्याबाहेरचं "कनेक्‍शन' सध्या गाजत असलं तरी प्रत्यक्ष चित्रपटात ते अपवादानंच पाहायला मिळतं. शाहिदच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या विशाल मल्होत्रानं केलेली धमाल त्यातल्या त्यात प्रेक्षकांची करमणूक करते. ओम पुरी यांनी साकारलेली बिल्डरची भूमिकाही चांगली आहे. प्रितम यांनी संगीतबद्ध केलेली एक-दोन गाणीच जमली आहेत.

Monday, July 14, 2008

किरण देवहन्स interview

कॅमेरामन से डायरेक्‍शन तक!
"कयामत से कयामत तक', "अक्‍स', "कभी खुशी कभी गम' आणि "जोधा अकबर' या परस्परभिन्न चित्रपटांचे छायादिग्दर्शक ही किरण देवहन्स यांची एक ठळक ओळख. जाहिरात क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली कामगिरी ही त्यांची दुसरी ठळक ओळख. त्यांच्या नावावर सध्या हजारहून अधिक जाहिराती जमा आहेत. चित्रपट तसेच जाहिरात क्षेत्रामधील करियरबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
किरण देवहन्स मूळचे पुण्याचे. कॅमेरामन, ऍडफिल्ममेकर म्हणून नाव कमावणारे देवहन्स चांगले चित्रकार आहेत. शालांत अभ्यासक्रमातील "एलिमेंटरी' परीक्षेत ते तीन दशकांपूर्वी राज्यातून पहिले आले होते. मात्र, त्या काळात कला क्षेत्राकडं चांगल्या नजरेनं पाहिलं जात नसल्यामुळं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं पदवी घेतल्यानंतर "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मध्ये (एफटीआयआय) त्यांनी प्रवेश घेतला. चित्रपट माध्यमातल्या सर्व शाखांचं तिथं शिक्षण दिलं जात असलं तरी देवहन्स यांना कॅमेरा या प्रकारातच अधिक गती होती. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षी ते आपल्या गटात सर्वोत्कृष्ट कॅमेरामन ठरले. मुंबईतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ते सांगतात, ""नदीम खान यांच्याकडे मी सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम केलं. "कसम पैदा करनेवालो की', "इल्जाम', "अलग अलग' यांसारखे अनेक चित्रपट मी त्या वेळी केले. त्या काळात छायादिग्दर्शकांना फारसे चांगले मानधन मिळत नसे. त्यामुळे त्यांना एका वेळी पाच-सहा चित्रपट करावे लागायचे. माझ्या नशिबानं खान यांच्याकडचे दोन सहाय्यक एकाच वेळी नोकरी सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्या पथ्यावर पडून काही चित्रपटांचं मला स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. "तारे जमीं पर'मुळे प्रकाशात आलेले अमोल गुप्ते माझे चांगले मित्र. त्यांच्यामुळं माझी मन्सूर खान यांच्याबरोबर ओळख झाली आणि मला "कयामत से कयामत तक' हा पहिला सिनेमा मिळाला. तत्पूर्वी मी त्याच्यासोबत दोन वर्षं जाहिरात क्षेत्रासाठी काम केलं होतं. या काळात मी त्याच्याबरोबर तब्बल 500 जाहिराती केल्या.''
सर्वसाधारणपणे कोणत्याही कलाकाराचा कारकिर्दीतला पहिला सिनेमा हिट गेला की त्याच्यावर नवीन चित्रपटांचा वर्षाव होतो. देवहन्स यांच्याबाबत नेमकं तसंच घडलं. शेखर कपूर, राहुल रवैल या मान्यवरांबरोबरच अनेकांनी देवहन्स यांना आपल्या चित्रपटासाठी छायादिग्दर्शक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण यापैकी एकही ऑफर न स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना देवहन्स म्हणतात, ""काही चित्रपटांची फोटोग्राफी करूनही मला चांगले मानधन मिळाले नव्हते. चार जणांच्या खोलीतील एक अशीच माझी मुंबईतील ओळख होती. बाहेरगावहून कोणी नातेवाईक मला भेटायला आला तर त्याची व्यवस्था कुठं करायची, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा जाहिरात क्षेत्र की सिनेमा या दोन्हीपैकी एकाची निवड करणं गरजेचं होतं. कारण, जाहिरात क्षेत्रात चांगलं नाव कमाविण्यासाठी प्रथम तिथं चार-पाच वर्षं घालवावी लागतात. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी जाहिरात क्षेत्राची निवड करून पुढची दहा वर्ष तरी सिनेमासाठी काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. आज जेव्हा मी तटस्थपणे विचार करतो तेव्हा माझा हा निर्णय योग्य होता, असं लक्षात येतं. कारण, जाहिरात क्षेत्रात त्या काळात फारसे चांगले कॅमेरामन नव्हते. त्यामुळं मी चित्रीत केलेल्या बहुतेक सर्व जाहिराती गाजल्या. कालांतरानं मी माझं स्वतःचं "कॅंडिड क्रिएशन्स' नावाचं "प्रॉडक्‍शन हाऊस' सुरू केलं. या कंपनीतर्फे शाहरूख खान, सचिन तेंडुलकर, जुही चावला यांच्यावर चित्रीत केलेल्या सर्व जाहिराती खूप गाजल्या.''
1988 ते 1998 या दहा वर्षांमध्ये देवहन्स यांनी जवळपास एक हजारहून अधिक जाहिराती केल्या. राकेश मेहरांच्या "अक्‍स'मुळं पुन्हा ते छायादिग्दर्शनाकडं वळले. या चित्रपटांचे "रशेस' पाहिल्यानंतर करण जोहरनं आपल्या "कभी खुशी कभी गम' चित्रपटासाठी त्यांना आमंत्रित केलं. "फाईव्ह स्टार' सोयीसुविधा पुरविणारा दिग्दर्शक असा ते करणचा उल्लेख करतात. आशुतोष गोवारीकर यांचा "स्वदेस' चित्रपट त्यांना इतर "कमिटमेंटस्‌'मुळं करता आला नाही, पण गोवारीकर "जोधा अकबर'ची तयारी करीत आहेत, हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपण या चित्रपटासाठी काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या चित्रपटातील देवहन्स यांचं कॅमेरावर्क वाखाणलं गेलं. जाहिरात क्षेत्रामधील अत्युच्च दर्जाचं काम आणि बिगबजेट चित्रपटांमुळं देवहन्स कमी बजेटमध्ये काम करायलाच तयार नाहीत, असा एक समज या काळात त्यांच्याबद्दल झाला. तो खोटा ठरविण्यासाठी ते आता अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या नवीन चित्रपटासाठी काम करणार आहेत. या चित्रपटापाठोपाठ एखाद्या बिगबजेट चित्रपटाचं छायादिग्दर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करायचाय. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाचं एक ना एक दिवस दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न असतं. देवहन्स यांचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास अगदी अंतिम टप्प्यात आहे.

Friday, July 4, 2008

हरमन बावेजा - interview

दिग्गजांच्या अपेक्षांना न्याय दिला पाहिजे...

इंट्रो...
"दिलवाले', "दिलजले', "कयामत' यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा, ही हरमन बावेजाची खरी ओळख. हृतिक रोशनसारखं दिसणं, ही त्याची दुसरी ओळख. मात्र, "लव्हस्टोरी 2050' हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक त्याच्यावर फिदा झालेत. आपल्या वाटचालीचा त्यानं घेतलेला हा मागोवा.
---------------
ः "लव्हस्टोरी 2050' हा त्याच्या नावाप्रमाणे खरोखरीच काळाच्या पुढचा सिनेमा आहे. प्रेमकहाणीच्या पार्श्‍वभूमीवर 2050 मध्ये मुंबई कशी बदलली आहे, त्याचं चित्र या सिनेमात पाहायला मिळेल. मुंबईकरांची रोजची पायाखालची ठिकाणं, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, फ्लोरा फाऊंटन यात आम्ही दाखवली आहेत. फक्‍त ही ठिकाणंच आधुनिक झालेली नाहीत, तर माणूसही आधुनिक झाला आहे. त्याची कामंही तो आधुनिक पद्धतीने करायला लागला आहे. मुंबई महापालिकेचे सफाई कर्मचारी आपल्या पायांना एक अत्याधुनिक व्हॅक्‍युम क्‍लीनर लावून शहराची सफाई करीत असताना या चित्रपटात पाहायला मिळतील. 2050 मधला मुंबईतला गाडीवरचा चहावाला कसा दिसेल, याचाही आम्ही अंदाज केला आहे. या सिनेमात तब्बल 1200 स्पेशल इफेक्‍टस्‌ आहेत. निर्मिती खर्चाच्या दृष्टीनं हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट आहे.
ः लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती; मात्र 15-16 वर्षांचा झाल्यानंतर मला हॉटेल मॅनेजमेंटचं आकर्षण वाटू लागलं. स्वतःचं हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. स्वप्नपूर्तीसाठी मी स्वित्झर्लंडला या शाखेचं शिक्षण घेण्यासाठी गेलो. ग्लास कसे सर्व्ह करायचे, हातात ट्रे कसा पकडायचा असतो, बाथरूममध्ये टॉवेल्स कसे लावले जातात, आदींचं मी शिक्षण घेतलं. वास्तविक, हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीनं या सर्व गोष्टी शिकणं, हे खूप आवश्‍यक आहे. तिथं पहिल्या वर्षी मला रौप्यपदकही मिळालं. पण त्या शिक्षणात मी फार काळ रमू शकलो नाही. एकदा भारतात आल्यानंतर मी माझ्या पापांना खरं काय ते सांगून टाकलं. माझ्या आई-वडिलांनी आपले निर्णय कधीही माझ्यावर लादले नाहीत. माझा हा निर्णयसुद्धा त्यांनी अत्यंत शांतपणे स्वीकारला. "तुम नहीं चाहते हो तो ठीक है।' असं म्हणत दुसऱ्या दिवसापासून पापांनी मला त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितलं.
ः त्यानंतरची सात-आठ वर्षं मी खूप मेहनत केली. मला या क्षेत्रातच "करियर' करायचं असल्यानं पापांनी माझ्याकडून थोडी जास्तच मेहनत करून घेतली. सिनेमा बनविण्याच्या प्रत्येक घटकाचं मी शिक्षण घेतलं. "दिन रात एक किया।' हा संवाद खरोखरीच माझ्या त्या काळातल्या आयुष्याला लागू होईल. या वेळी पापांना एकच गोष्ट सांगितली होती की केवळ तुमचा मुलगा म्हणून मला पदार्पणाची संधी देऊ नका. ज्या दिवशी खरोखरच तुम्हाला मी अभिनय करू शकतो हे जाणवेल, त्याच दिवशी संधी द्या. त्यामुळं, पापासुद्धा माझ्या पदार्पणासाठी कसलीही घाई करण्याच्या मनस्थितीत नव्हते. "प्यार तो होना ही था', "नो एन्ट्री', "वेलकम'फेम दिग्दर्शक अनीस बज्मी एके दिवशी आमच्या घरी आले होते. "हरमनला तुम्ही ब्रेक दिला नाहीत तर मी देतो!' असं त्यांनी थेट सांगून टाकलं. बज्मींसारखा यशस्वी दिग्दर्शक आपल्या मुलाला "ब्रेक' देण्याची भाषा करतो, हे ऐकून पापांनी तातडीनं "लव्ह स्टोरी 2050' हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.
ः हा माझा पदार्पणातला सिनेमा असला तरी मला अनावश्‍यक "फुटेज' मिळालेलं नाही. उलट, माझ्यापेक्षा प्रियांका चोप्राला यात अधिक वाव आहे. एक वडील या नात्यानं पापा मला संधी देणारी अनेक दृश्‍यं या सिनेमात दाखवू शकले असते. या सिनेमात काम करणाऱ्या बमन इराणी यांनाही ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली होती. "इतना अनसेल्फिश डिरेक्‍टर मैं पहली बार देख रहा हूँ ।' असे त्यांचे उद्‌गार आहेत. फिल्म चांगली झाली तर साहजिकच हरमनही त्यात उठून दिसेल, एवढंच पापांचं "लॉजिक' आहे आणि मला ते अगदी योग्य वाटतं.
ः प्रियांका चोप्राबरोबर माझी पाच वर्षांची मैत्री आहे. तिनं या सिनेमासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलंय. आमच्या दोघांमधल्या चांगल्या मैत्रीमुळं सध्या बऱ्याच अफवा पसरल्यात, याची आम्हाला कल्पना आहे. या अफवांचेच आम्ही सध्या शिकार झालोत. मात्र त्याचं आम्ही काहीच करू शकत नाहीत. सध्या तरी मी माझ्या करिअरवरच लक्ष केंद्रित केलंय. संजय लीला भन्साळी, आशुतोष गोवारीकर यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांनी मला संधी दिलीय. अशी संधी एखाद्याच्याच वाट्याला येते; मात्र या दिग्गजांच्या अपेक्षांना आपण न्याय दिला पाहिजे, याचं दडपण माझ्यावर आहे.

Thursday, July 3, 2008

इम्रान खान interview

अभिनेता आमीर खानचा भाचा या एका ओळखीमुळं इम्रानबद्दल अनेकांना मोठ्या आशा आहेत. आमीरची चुलत बहीण नुझत खान यांचा तो मुलगा आहे. "जाने तू या जाने ना' प्रदर्शित होण्यापूर्वीच इम्रानला आणखी दोन सिनेमे मिळाले आहेत. चित्रपट माध्यमाबद्दलची आपली मतं, आमीर आणि आपल्या करियरबद्दलची त्याची ही निरीक्षणं.
-------------
ः "जाने तू...'मध्ये जयसिंग राठोड असं नाव असलेल्या तरुणाचा "रोल' मी साकारतोय. गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर त्याचा विश्‍वास आहे. "टिपिकल' हिंदी चित्रपटांमधला तो "हीरो' नाही. तो एखाद्या उद्योजकाचा मुलगा नाही. मध्यमवर्गात तो वाढलेला असतो. फॅन्सी कपडे घालण्याची त्याला आवड नाही की त्याच्याजवळ बाईकही नाही. त्याचं हे सीधंसाधं असणं मला फार आवडलं. चित्रपटसृष्टीत मी आलो ते दिग्दर्शक बनायला. कारण "हीरो'साठी आवश्‍यक असलेली "मसल पॉवर' माझ्याकडं नाही. पण अब्बास टायरवालानं या सिनेमातली जयसिंगची व्यक्तिरेखा ऐकवल्यानंतर मी अभिनय करण्याचा मोह आवरू शकलो नाही. तारुण्य हा या सिनेमाचा "यूएसपी' आहे. विशी-पंचविशीच्या घरातल्या आम्ही मंडळींनी एकत्र येऊन हा सिनेमा केलाय. "फॉर यंग पीपल, बाय यंग पीपल' असंच मी म्हणेन. "कयामत से कयामत तक' हा सिनेमासुद्धा दोन दशकांपूर्वी तरुण टीमनंच केला होता आणि तो प्रचंड यशस्वी ठरला होता. त्यामुळं तशा प्रकारच्या यशाची पुनरावृत्ती व्हावी, अशी आशा मी बाळगून आहे.
ः "जाने तू...'च्या सुरुवातीला आमीरमामू (आमीर खान) त्याची निर्मिती करीत नव्हते. काही कारणांमुळं हा सिनेमा रखडला. त्या वेळी मी आणि या सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास टायरवाला मोठ्या टेन्शनमध्ये होतो. अर्थात, सिनेमा रखडणे हा प्रकार काही आम्हाला नवीन नव्हता. इथे कोणतीच गोष्ट वेळेत होत नाही. कागदावर सर्व काही ठरवलेलं असतं; पण अचानक पाऊस येणं, सेटवर अपघात होणं, कलाकारांच्या एकत्रित "डेटस्‌' न मिळणं... अशा काही गोष्टी असतात की, त्याला कोणी काहीच करू शकत नाही.
ः अशी विपरीत स्थिती असतानाही माझा अब्बासवर आणि त्याचा माझ्यावर पूर्ण विश्‍वास होता. आम्हा दोघांनाही कसल्याही परिस्थितीत हा सिनेमा पूर्ण करायचा होता. आमीरमामूंनी मला चित्रपटसृष्टीत "ब्रेक' देण्यासाठी या सिनेमाची निर्मिती केली, अशी सध्या सगळीकडे चर्चा आहे. मात्र ती साफ खोटी आहे. कारण आमीरमामू कधीच "इमोशनली' निर्णय घेत नाहीत. त्यांच्याकडं जेव्हा आम्ही या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हा त्यांनी प्रथम "स्क्रीप्ट' ऐकव असं सांगितलं. आमच्या सुदैवानं त्यांना ही "स्क्रीप्ट' खूप आवडली. या वेळी त्यांनी मला दोन प्रश्‍न विचारले. एक होता, इम्रान, तुला ही "स्क्रीप्ट' आवडली आहे का? आणि दुसरा होता, या पटकथेवर अब्बास एक चांगला सिनेमा बनवू शकेल, याची तुला स्वतःला खात्री आहे? या दोन प्रश्‍नांची माझ्याकडून होकारार्थी उत्तरं ऐकल्यानंतर त्यांनी "आमीर खान प्रॉडक्‍शन'तर्फे हा सिनेमा बनविण्यास होकार दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पुन्हा माझी "ऑडिशन' घेतली. त्यात मी चांगला वाटल्यानंतरच त्यांनी हा सिनेमा सुरू केला.
ः आमीरमामूंना जेव्हा मी क्षेत्रात येत आहे, असं सांगितलं तेव्हा माझ्या सांगण्यावर प्रथम त्यांचा मुळीच विश्‍वास बसला नाही. एक अभिनेता बनण्यासाठी जे गुण लागतात, ते माझ्यात नाहीत, असं त्यांचं मत होतं; पण काही दिवसांनी त्यांना जाणवलं की, त्यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं तेव्हासुद्धा लोक त्यांच्याबद्दल असंच निगेटिव्ह बोलायचे. आमीरमामूंनी मला कधीही अंधारात ठेवलेलं नाही. मला त्यांनी आजपर्यंत कसल्याही "टिप्स' दिलेल्या नाहीत. "तुझा रस्ता तुलाच ठरवायचाय,' हे त्यांचं सांगणं आहे. "यशस्वी झालास तर त्याचं क्रेडिट तू स्वतःच घे आणि अपयशी ठरलास तरी तूच त्याला सामोरं जा, असं त्यांचं सांगणं असतं. त्यांच्या दृष्टीनं हा सिनेमा यशस्वी ठरणं अधिक महत्त्वाचं आहे. सिनेमा यशस्वी ठरला तर मी आपोआपच लोकांना आवडेन, हे त्यामागचं "लॉजिक' असावं.
ः "जाने तू...' प्रदर्शित होण्यापूर्वीच मला "किडनॅप' आणि "लक' हे दोन सिनेमे मिळाले आहेत. कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन ही "लक'मध्ये माझी हिरोईन आहे. "लव्ह स्टोरी 2050' या सिनेमातून हरमन पदार्पण करीत असल्यामुळं त्याच्याबरोबर माझी स्पर्धा असल्याचं चित्र सध्या "मीडिया'तून रंगवलं जातंय. पण तसं करणं योग्य ठरणार नाही. कारण आम्ही दोघं काही शंभर मीटर रनिंग स्पर्धेत भाग घेतलेला नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेत फक्त एकच विजेता असतो. आमच्याकडे मात्र सगळ्यांना संधी आहे. भविष्यात मला दिग्दर्शक बनायचं असलं तरी सध्या अभिनयावरच मी लक्ष केंद्रित केलंय.