Saturday, August 11, 2012

एक चावट काळ...

------------- एक चावट काळ... ---------- इंट्रो... चित्रपट आणि टीव्ही या माध्यमांमध्ये सध्या लैंगिक विषयांचीच चलती आहे. मराठी रंगभूमीवरही आता असे विषय येऊ लागले आहेत. प्रेक्षकांच्या भावनांना हात घालण्याऐवजी भावना चाळविणार्‍या विषयांनाच प्राधान्य दिलं जात आहे. आयटेम सॉंग, चावट विनोद आणि लैंगिक दृश्यांनी चित्रपटांमध्ये उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कलाकृतींना व्यावसायिक यशदेखील मिळत आहे. त्यामुळे आपल्याकडचा सरसकट प्रेक्षकवर्ग आंबटशौकीन होऊ लागलाय की निर्माते-दिग्दर्शक मंडळीच त्यांना वाममार्गाला नेण्यास भाग पाडत आहे, याचं कोडं अनेकांना पडलं आहे. ---------- नेहा धुपिया नावाच्या एका अभिनेत्रीला मानायला हवं. अभिनयात तीर मारायला तिला कधी जमलं नाही. परंतु, तिनं काही वर्षांपूर्वी केलेलं एक वक्तव्य आता तंतोतंत खरं ठरत आहे. ‘बॉलीवूडमध्ये फक्त सेक्स आणि सलमान-शाहरुख खानच विकले जातात...’ असा बॉम्ब तिनं टाकला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यांना मिळालेलं यश पाहता नेहाच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं जाणवतं. ‘जिस्म २’, ‘क्या सुपर कुल है हम’ या दोन ताज्या चित्रपटांनी सध्या सगळीकडे हैदोस मांडलाय. आतापर्यंत चित्रपट हा सिनेमास्कोप तसेच ७० एम.एम.चा असतो, हे सर्वांना ठाऊक होतं. परंतु, ‘जिस्म-२’ची ठिकठिकाणी झळकलेली सनी लिओनची अर्धनग्न सिनेमास्कोप पोस्टर्स पाहून हा ‘स्कोप’ भलताच आहे, हे प्रेक्षकांनाही जाणवलंय. फक्त प्रसिद्धी आणि प्रेक्षकांमध्ये असलेली चर्चा या दोन मुद्यांना धरूनच क्रमवारी लावायची ठरवली तर सनी लिओनीनं दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यासारख्या अभिनेत्रींनाही मागं टाकलं आहे. दिग्दर्शक महेश भट या सनीला एका ‘रिऍलिटी शो’मधून हिरोईन म्हणून ब्रेक देतात काय आणि ही सनी प्रेक्षकांना वेड लावते काय, सगळाच अजब प्रकार आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात तीस कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाच्या डिजिटल हक्कविक्रीच्या वेळी ‘जिस्म’ या शब्दावरच ‘ऍपल’ कंपनीनं आक्षेप नोंदवला होता. परंतु, या चित्रपटाची निर्माती पूजा भटनं ‘जिस्म’ म्हणजे शरीर आणि त्यात आक्षेपार्ह असं काहीच नाही, अशी आपली बाजू मांडली होती. मात्र त्यामुळे ‘ऍपल’च्या मंडळींचं काही समाधान झालं नाही आणि ‘गुगल’, ‘यू ट्यूब’ या ‘ऍपल’च्या स्पर्धक कंपन्यांनी मग ‘जिस्म’वर आपला ताबा घेतला. इथं विशेष उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे पूजा भटची निर्मिती असलेल्या ‘जिस्म’नं २००३ मध्ये तब्बल १४ कोटींचा व्यवसाय केला होता आणि या चित्रपटाचा पुढील भागही आता चांगला व्यवसाय करतो आहे. एकीकडे ‘जिस्म २’ चांगला व्यवसाय करीत असताना ‘क्या सुपर कूल है हम’ हा चित्रपटदेखील फारसा मागं नाही. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटानं ४४ कोटींचा व्यवसाय केलाय. ‘हाऊसफुल-२’ने या वर्षी शंभर कोटींचा टप्पा पार केलाय. ‘जिस्म २’मध्ये अश्‍लील दृश्यांची रेलचेल आहे तर ‘क्या सुपर कूल...’मध्ये चावट विनोदांचा भडीमार आहे. ‘सेक्स’ आणि चावट विनोद हा हिंदी चित्रपटांच्या यशाचा नवीन फॉर्म्युला बनलाय. एवढंच नव्हे तर गेल्या एक-दोन वर्षांमध्ये यशस्वी चित्रपटांच्या नावावर नजर टाकली तरी ‘सेक्स कॉमेडी’ हा हिंदी चित्रपटांचा ‘जॉनर’ बनल्याचं जाणवतं. ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल-२’, ‘विकी डोनर’, ‘दोस्ताना’, ‘दिल्ली बेली’ हे सर्व चित्रपट या ‘जॉनर’शी नातं सांगणारे आहेत. इम्रान हाश्मी तर ‘सेक्सी’ चित्रपटांचा बादशहाच बनलाय. ‘किसींग किंग’ असा बहुमान आता त्याला देण्यात आलाय. इम्रानची प्रमुख भूमिका असलेला ‘शांघाय’ चित्रपट त्याच्या ‘किसींग’ इमेजशी मिळताजुळता नसल्यामुळेच पडला असं म्हणतात. स्वच्छ, प्रसंगनिष्ठ विनोद आता इतिहासजमा झालाय. या विनोदाला लावलेला तडका म्हणजेच ‘सेक्स कॉमेडी’ हा प्रकार आहे. पूर्वीच्या काळात शक्ती कपूर, कादर खान, जॉनी लिव्हर यासारखी मंडळी अगदी थोड्या प्रमाणात विनोदासाठी चित्रपटात असायची. या चित्रपटांमधील नायिकांच्या अंगप्रदर्शनालाही मर्यादा होती. मात्र खलनायकानं नायिकेवर केलेल्या अतिप्रसंगाची दृश्ये मात्र तेव्हा भरपूर पाहायला मिळत. खलनायकीकडून कॉमेडीकडे वळलेल्या शक्ती कपूरनं १९८०च्या दशकात भरपूर आचरटपणा आणि चावटपणा करण्यास सुरुवात केली. त्याला खतपाणी घातलं ते गोविंदानं. उडत्या चालीची गाणी आणि द्वैअर्थी संवादांचं बेसुमार पीक आलं. आता तर अजय देवगण, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, तुषार कपूर, रितेश देशमुख यासारख्या ‘ए ग्रेड’ कलाकारांना चावट विनोदनिर्मितीमध्ये डांबण्यात आलं आहे. ‘आयटेम सॉंग’शिवाय हल्लीचा चित्रपट पूर्णच होत नाही, अशी परिस्थिती आलीय. करिना कपूर, दीपिका पदुकोणसारख्या नायिकांनाही अशी गाणी करावी लागताहेत. त्यात काही गैर वाटणं तर सोडाच, उलट फक्त ‘आयटेम सॉंग’साठी आपल्याला बोलावणं आलं तर या अभिनेत्री स्वतःला धन्य समजत आहेत. ‘सेक्स’ आणि चावट विनोदांमध्ये फक्त चित्रपट माध्यमच आघाडीवर नाही. टीव्ही माध्यमात तर दररोज हा प्रकार पाहायला मिळतोय. ‘बडे अच्छे लगते है’मधील राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यातील तो ‘सुपरहिट’ प्रेमप्रसंगाचा ‘एपिसोड’ तर आता ‘माईलस्टोन’ ठरलाय. या भागानं टीव्हीवरील सगळी गणितंच बदलली आहेत. ‘सुपरहिट’ या शब्दाचा उपयोग करण्यामागचं कारण म्हणजे ‘बडे अच्छे लगते है’मधील ‘तो’ भाग ‘यू ट्यूब’वर अपलोड करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये या भागाला तब्बल २२ लाख प्रेक्षकांच्या हिट्स मिळाल्या आहेत. तसेच या भागाचे तुकडे करून टाकलेल्या ‘क्लिप्स’ आणि त्यांना मिळालेल्या ‘हिट्स’ची बेरीज केल्यास ही संख्या आणखी मोठी होते. ‘बडे अच्छे..’चा हा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर मोठं वादळ उठलं होतं. कारण चित्रपटामधील प्रेमप्रसंग किंवा गाणी ही फार तर दोन-चार मिनिटांची. पण ‘बडे अच्छे...’चा हा भाग अर्ध्या तासाच्या प्रणयदृश्यांनी व्यापला होता. या वादळानंतर निर्माती एकता कपूरनं प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं होतं, ‘मला असं वाटतं की हा भाग लोकांना आवडलाय. ज्यांना आवडला नाही त्यांची मी माफी मागते.’ अशा एका वाक्यात तिनं हा विषय संपवून टाकला होता. ‘बडे अच्छे...’चं हे वादळ अपेक्षेप्रमाणे केव्हाच संपुष्टात आलंय आणि त्यानंतर या भागापेक्षा बर्‍याच ‘अच्छे अच्छे’ गोष्टी टीव्हीवर दाखविल्या जात आहेत. चावट विनोद आणि ‘सेक्स’ला प्राधान्य देणार्‍या कलाकृतींना यश मिळाल्यामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न निर्माण होतोय. आपल्याकडचा सर्वच प्रेक्षक आंबटशौकीन झालाय का ? खुद्द बॉलीवूडमधील ‘मेकर्स’ मंडळींना आपला प्रेक्षकवर्ग आंबटशौकीन नसून सुजाण झाल्याचं वाटतंय. फेसबुक, ट्विटर, मेल, एसएमएस आदी माध्यमांमधून आपला प्रेक्षकवर्ग ज्या पद्धतीनं स्वतःला व्यक्त करतोय ते पाहिल्यानंतर तो बंधनमुक्त झालाय असंही या मंडळींना वाटतंय. हे काही प्रमाणात खरंही आहे. मात्र बॉलीवूड चित्रपट लाटांसाठी प्रसिद्ध आहेत हेदेखील विसरता येणार नाही. चावट विनोद आणि ‘सेक्स’ हीदेखील एक लाट असू शकते. ती विरली की पुन्हा एखादा नवीन ‘जॉनर’सुद्धा जन्म घेईल. पण आत्ताचा काळ मात्र चावट आहे हे मात्र खरंय. फक्त त्याचा आपण भाग व्हायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. - मंदार जोशी -----------

No comments: