Tuesday, February 19, 2008

भव्य पोशाखीपट


भव्य पोशाखीपट



ऐतिहासिक पटाच्या निर्मितीसाठी कोणत्याही दिग्दर्शकाकडे अत्यावश्‍यक असणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे "पेशन्स' आणि "पॅशन.' दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्याकडे या दोन्ही गोष्टी अंगभूत आहेत. म्हणूनच "जोधा अकबर'बद्दलच्या अपेक्षा अगदी आकाशाला जाऊन भिडतात.
अकबराचं चरित्र सर्वांनाच ठाऊक आहे; पण या चरित्रातलं एक निसटलेलं आणि दुर्लक्षिलेलं पान म्हणजे शहेनशहा आणि महाराणी जोधाबाई यांची प्रेमकहाणी. तीन तास 20 मिनिटं लांबीचा हा पोशाखी पट प्रेक्षकाला चार शतकं मागं घेऊन जाण्यात नक्कीच यशस्वी ठरलाय. दिग्दर्शकाची माध्यमावरची पकड, किरण देवहन्स यांचं अप्रतिम कॅमेरावर्क, नितीन देसाई यांनी उभं केलेलं मोघल व राजपूत साम्राज्य, ए. आर. रहमानचं पार्श्‍वसंगीत, हृतिक रोशनचं राजबिंडं रूप व ऐश्‍वर्य रायचं मूर्तिमंत सौंदर्य... आदी जमेच्या बाजूंनी हा चित्रपट अगदी ठासून भरलाय. परंतु, तरीही हा चित्रपट संपल्यानंतर काहीतरी राहून गेल्याची खंत आपला पिच्छा सोडत नाही. एक तर हा चित्रपट खूपच लांबलाय. दोन तासांचा पूर्वार्ध पाहणाऱ्याची कडी परीक्षा घेतो. जोधा-अकबरची "आऊट ऍण्ड आऊट' प्रेमकहाणी... या अपेक्षांवरही हा चित्रपट काही प्रमाणात निराशा करतो. या दोघांच्या प्रेमापेक्षा चित्रपटाचा फोकस तरुण अकबराच्या योगदानावरच अधिक केंद्रित झालाय. या काही त्रुटी वगळल्यास एकदा तरी आवर्जून पाहावा असा हा ऐतिहासिक पट आहे.
"लगान'प्रमाणेच हा चित्रपटदेखील अमिताभ बच्चन यांच्या "नॅरेशन'नं सुरू होतो. काही मिनिटांमध्ये त्यांचा भारदस्त आवाज प्रेक्षकाला सोळाव्या शतकामधील मोघल-राजपूत राजकारणात घेऊन जातो. "मोघल-ए-आझम' आणि "रझिया सुलतान' या चित्रपटांच्या संवादांवर उर्दू भाषेचा खूप प्रभाव होता. गोवारीकर यांनी ही गोष्ट आपल्या फिल्ममध्ये प्रकर्षानं टाळलीय. के. पी. सक्‍सेना यांचे संवाद समजायला सोपे आहेत. अकबराचं खरं नाव जलालुद्दीन महम्मद. मानलेली आई आणि वरिष्ठांच्या आज्ञेखाली वाढलेल्या जलालुद्दीनचा सुरुवातीचा काळ दिग्दर्शकानं खूप छान टिपलाय. अकबर आणि जोधामध्ये विवाहाच्या निमित्तानं एक राजकीय करारनामा झाला होता. हा भागसुद्धा चित्रपटात अत्यंत परिणामकारकरीत्या उतरलाय. पूर्वार्धातला सर्वात लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे अकबरानं माजलेल्या हत्तीशी केलेली झुंज. त्यानंतर जोधाबरोबर अकबराचा झालेला विवाह आणि मनं जुळेपर्यंत शरीरानं एकत्र न येण्याचा जोधाबाईचा निर्णय हे प्रसंगसुद्धा लक्षात राहतात. गोवारीकर यांच्यातला कुशल तंत्रज्ञ आपल्यातल्या "स्टोरी टेलर'वर अधिक कुरघोडी करून गेलाय. त्यामुळेच बऱ्याच दृश्‍यांमधली देखणी चित्रचौकट भावूनही कथानक फार पुढे सरकत नाही. पूर्वार्धातली सर्वात मोठी त्रुटी म्हणजे कथानकाचा संथ वेग आणि लांबी. काही प्रसंग चमकदार आहेत; पण त्यांच्यात सातत्य नसल्यामुळे पाहणाऱ्याचं लक्ष "इंटरव्हल'च्या पाटीची प्रतीक्षा करू लागतं. त्याउलट उत्तरार्धाचं झालंय. एक तास 20 मिनिटांचा उत्तरार्ध कधी संपलाय ते कळतच नाही. या दोन्हीचा "बॅलन्स' साधला गेला असता, तर हा चित्रपट अधिक परिणामकारक ठरला असता. उत्तरार्धही जोधा-अकबरच्या प्रेमापेक्षा सत्तेच्या रक्तरंजित राजकारणावर अधिक भाष्य करणारा आहे. जोधाबाई आणि अकबरामधल्या प्रेमकहाणीवर इतिहासात फार कमी लिहिलं ग
ेलंय. त्यामुळेच कदाचित हा भाग म्हणावा तितका प्रभावशाली ठरलेला नाही. निव्वळ प्रेमकहाणीच्या दृष्टीनं या फिल्मचा पूर्वार्ध अगदी चार पावलं पुढे गेलाय. अकबरानं आपल्या न केलेल्या चुकीसाठी माहेरी पाठविल्यानं जोधा त्याच्यावर नाराज असते. या दोघांमधल्या तलवारबाजीचा प्रसंग रोमांचक आहे; पण या एकमेव कारणामुळे जोधाचं हृदयपरिवर्तन संभवत नाही. आपल्या बहिणीच्या पतीबरोबर अकबराची झालेल्या लढाईची दृश्‍यंही थोडी लांबल्यासारखी वाटतात.
हा ऐतिहासिक पट जमून आलाय ते कलाकारांच्या झक्क कामगिरीमुळे. हृतिक रोशननं अकबराची साकारलेली व्यक्तिरेखा त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम ठरली आहे. आपल्या राजबिंड्या रूपाला त्यानं अभिनयाची अतिशय उत्तम जोड देत एक कठीण व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेनं साकारलीय. ऐश्‍वर्या रायचं सौंदर्य चित्रपटगृहाचा पडदा व्यापून टाकणारं आहे. सोनू सूद, नितकीन धीर या दोन तरुण कलाकारांचा अभिनय लक्षात राहण्याजोगा आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी या चित्रपटात अकबराच्या आईची व्यक्तिरेखा साकारलीय; पण त्यांना मर्यादित वाव आहे. ए. आर. रहमान हे त्यांच्या संगीताऐवजी त्यांच्या पार्श्‍वसंगीतासाठी अधिक कौतुकास पात्र आहेत. "अझीम ओ शान शहेनशहा', "ख्वाजा मेरे ख्वाजा' ही गाणी सुरेल चालींबरोबरच त्याच्या नृत्यांसाठी लक्षात राहतात. ऐतिहासिक पट आपल्याकडे क्वचितच बनतात. म्हणूनच काही खटकणाऱ्या गोष्टी असूनही गोवारीकरांच्या या पोशाखी पटाला भेट द्यायलाच हवी.

No comments: