Tuesday, February 12, 2008

परीक्षण - चेकमेट


परीक्षण - चेकमेट

जंजाळ

बुद्धिबळाचे अनेक डाव एखाद्या हॉलमध्ये एकाच वेळी मांडलेत आणि त्याचा मनमुराद आनंद लुटा, असं कोणा संयोजकानं सांगितलं तर? नेमका हाच प्रश्‍न संजय जाधव यांचा "चेकमेट' चित्रपट पाहताना पडतो. रहस्य आणि थराराचं खूप छान मिश्रण पाहण्याची ताकद या चित्रपटात होती; परंतु दिग्दर्शकानं रहस्याचे अनेक "प्लॉट्‌स' एकाच वेळी सुरू ठेवत पाहणाऱ्याला उगीचच दोन-अडीच तास भिरभिरत ठेवलंय. हॉलीवूड स्टाईलची हाताळणी आणि कलाकारांचे अभिनय या दोन भक्कम बाजूंनी हा चित्रपट वेगवान झालाय. पण सरळ फ्रेम्समधूनही सांगता येणारा आशय दिग्दर्शकानं सतत वाकड्यातिकड्या कॅमेरा अँगल्सनं टिपलाय. फ्लॅशबॅक या तंत्राचाही अतिरेक झाल्यानं कथानकातली गुंतागुंत वाढून सगळा जंजाळ झालाय. दिग्दर्शकानं खूपच "ऑफ बीट' वाटेवर न चालता "स्टोरी टेलिंग'चा सोपा मार्ग निवडला असता तर हा चित्रपट आणखी रंगतदार अनुभव ठरला असता.
"चेकमेट'ची कथा-पटकथा स्वतः दिग्दर्शकानंच लिहिलीय. अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, राहुल मेहेंदळे या तीन तरुणांची ही कथा आहे. तीस दिवसांत पैसे दुप्पट... अशा प्रकारचं गाजर दाखविणाऱ्या एका स्कीममध्ये हे तिघंही तरुण कोटीच्या घरातली रक्कम गुंतवतात. अर्थातच हे पैसे बुडतात. तेव्हा बुडालेले पैसे पुन्हा परत मिळवण्यासाठी त्यांची एकच पळापळ सुरू होते. या पळापळीत त्यातला एक जण आपल्या मैत्रिणीला सहभागी करून घेतो. एक गुन्हा केला तरी शिक्षा आणि दहा गुन्हे केले तरी शिक्षा. या न्यायानं मग त्यांना पैसे कमावण्यासाठी कोणताच मार्ग वर्ज्य उरत नाही. प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांच्या या खेळात दोन पोलिस अधिकारी (रवी काळे-उदय सबनीस), एक राजकीय नेता आणि त्याचा मुलगा (विनय आपटे-संजय नार्वेकर) आदी मंडळी सहभागी होतात. शह-काटशहामुळे हा खेळ उत्तरोत्तर रंगत जातो.
कॅमेऱ्यातलं आपलं नैपुण्य सिद्ध केल्यानंतर जाधव यांनी दिग्दर्शन क्षेत्राकडे वळणं साहजिक आहे. या मार्गावरून यापूर्वी अनेकांनी वाटचाल केलीय आणि प्रत्येकाकडून एक ढोबळ चूक झालीय. ही सर्व मंडळी दिग्दर्शनाच्या पहिल्या प्रयत्नात आपल्यात दडलेल्या दिग्दर्शकाऐवजी कॅमेरास्कीलच अधिक दाखवीत असतात. "चेकमेट'मध्येही नेमकं असंच घडलंय. चित्रपटाची सुरुवात त्यांनी चांगली केलीय. तीन मित्रांची झालेली आर्थिक फसवणूक आणि त्यानंतरच्या जाळ्यात त्यांची झालेली फसगत दिग्दर्शकानं चांगली दाखवलीय. पण फ्लॅशबॅक तंत्राचा अवाजवी वापर आणि सतत भिरभिरणाऱ्या कॅमेऱ्यामुळे पाहणाऱ्याला दिग्दर्शकानं कथानकात स्थिरावूच दिलेलं नाही. रहस्याची गुंतागुंत एवढी वाढलीय की शेवटी शेवटी त्यातला पाहणाऱ्याचा "इंटरेस्ट' कमी होतो. चित्रपटाचा शेवटसुद्धा अपेक्षित वळणावर झालाय.
हा चित्रपट तोलून धरलाय तो त्यातल्या कलाकारांनी. अंकुश चौधरी, राहुल मेहेंदळे, विनय आपटे, रवी काळे, उदय सबनीस, आनंद अभ्यंकर... आदी कलावंतांची कामं छान आहेत. मात्र, सर्वात लक्षात राहतो तो स्वप्नील जोशी. चित्रपट माध्यमानं आता आपल्याला अधिक "सिरीयसली' घ्यायला हवं, असा परफॉर्मन्स त्यानं या चित्रपटातून दिलाय. संजय नार्वेकरने काही ठिकाणी हशा मिळवलाय खरा; पण त्याची व्यक्तिरेखा आणखी छान रेखाटता आली असती. एकंदरीत मराठी भाषेतून हॉलीवूडचा फील घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायला हवा.
- मंदार जोशी

No comments: