Friday, June 6, 2008

"शोले'चा "रिमेक' पुन्हा करेन...


रामगोपाल वर्मा हे नाव उच्चारलं तरी दचकावं अशी सध्या स्थिती आहे. "आग'च्या माध्यमातून वर्मांनी "शोले'च्या "रिमेक'बाबत जो काही खेळ केला, तो विसरावा म्हटलं तरी विसरणं कठीण आहे. खुद्द वर्मांनाही त्याची कल्पना आहे. म्हणूनच आपल्या अपयशाबद्दल ते सहजपणे मन मोकळं करून टाकतात. "आग'चं अपयश आणि उद्या रिलीज होणाऱ्या "सरकार राज'बद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
----
ः शिवसेनेतील घडामोडींवर "सरकार राज' आधारलाय का?
ः राजकारणात मला फारसा रस नाही. राजकारणापेक्षा मला रस असतो तो राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये. "सरकार' हा सिनेमा जिथं संपलाय, तिथून "सरकार राज' सुरू झालाय. "सरकार'चा शेवट केल्यानंतर त्यातल्या व्यक्तिरेखा पुढं कशा पद्धतीनं वागतील, या विचारातून "सरकार राज' बनलाय.

ः "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी तुम्ही "सरकार राज' बनवलात, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे. त्याबद्दल काय सांगाल?
ः "आग'च्या अपयशावर प्रेक्षकांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आल्या, की मला स्वतःलाच आपण गब्बर झालो असं वाटलं. "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी मी "सरकार राज' बनविलेला नाही किंवा माझा एखादा चित्रपट "फ्लॉप' ठरला तर त्याचं अपयश धुऊन काढावं, असं मला वाटत नाही. माझ्यात जेवढी गुणवत्ता आहे, त्याच दर्जाचा मी सिनेमा बनवू शकतो.

ः "आग' चित्रपट आवडला नाही असं सांगणारे हजारो प्रेक्षक सापडतील, पण हा चित्रपट आवडला अशा काही प्रतिक्रिया तुमच्याकडं आल्या का?
ः (हसत) एकही नाही. कदाचित कोणाला हा चित्रपट आवडला असेल तर ते मला सांगण्याची हिंमत झाली नसावी. माझी आई माझ्या चित्रपटांची "फॅन' आहे. "आग'पूर्वी मी बनविलेले सर्व चित्रपट तिला आवडले होते, परंतु "आग' पाहिल्यानंतर तिनं मला साधा एक फोनसुद्धा केला नाही.

ः या सिनेमाच्या अपयशाचं "डिसेक्‍शन' केलंयत का?
ः मी माझ्या कोणत्याही सिनेमाच्या यश-अपयशात रमत नाही. माझ्या दृष्टीनं सतत कार्यरत राहणं महत्त्वाचं असतं. कोणीही "चलो, एक फ्लॉप फिल्म बनाते हैं।' या उद्देशानं सिनेमा करीत नाहीत. अर्थात, "आग'चं चित्रीकरण झाल्यानंतर मला तो जमला नसल्याची कल्पना आली होती.

ः "आग'च्या पटकथेवर आपण अधिक मेहनत घ्यायला हवी होती, असं तुम्हाला आता वाटतं का?
ः फक्त "आग'च का, आतापर्यंत मी स्वतः दिग्दर्शित केलेल्या एकाही चित्रपटाच्या पटकथेवर मेहनत केलेली नाही. "सत्या' हा एक "कल्ट' सिनेमा मानला जातो, पण त्या सिनेमाचीसुद्धा पटकथा लिहिली गेली नव्हती. माझ्या मते कोणताही सिनेमा हा "आयडिया'वर बनतो. "स्क्रीप्ट इज अ किंग' असं म्हटलं जातं; मात्र पटकथेवर तीनचार वर्षं मेहनत घेऊनही ते सिनेमे रद्दड निघाल्याची अनेक उदाहरणं सापडतील. "सरकार', "रंगीला', "कंपनी' या चित्रपटांच्या पटकथेवर मी दोनतीन दिवसांपेक्षा अधिक काम केलेलं नव्हतं.

ः "आग' नेमका कुठं फसला असं वाटतं?
ः "शोले'चा "रिमेक' हा मूळ चित्रपटापेक्षा चांगला करायचा, या उद्धटपणातून मी हा चित्रपट बनविला आणि तिथंच मी फसलो. कोणताही "रिमेक' करताना तुमचा हेतू चांगला असावा लागतो. त्यात गडबड असता कामा नये. "कितने आदमी थे...' असं "शोले'तील गब्बर म्हणतो, तर "आग'मधला बब्बन फक्त "कितने...' म्हणतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं मी "इंटरप्रिटेशन' करीत गेलो, पण त्यांच्यात भावनिक नातं जोडण्यात मात्र मला अपयश आलं. म्हणूनच प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला असावा.

ः "रिमेक'वरच तुमचा नेहमी भर का असतो?
ः कारण कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' आहे असं मला वाटत नाही. प्रभावित होण्याची गोष्ट फक्त सिनेमापुरतीच मर्यादित नाही. एखादी घडलेली घटना, कोणाचा तरी वास्तवातील अनुभव, वर्तमानपत्रातील "कव्हरेज'... यावरून जर एखादा सिनेमा बनला असेल तर त्याला "रिमेक'च म्हणावं लागेल. म्हणूनच माझी कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' नाही, असं मी म्हणू शकतो.

ः "आग' प्रदर्शित झाल्यानंतर "शोले'फेम रमेश सिप्पी यांनीही बरीच नाराजी व्यक्त केली होती...
ः (हसत) "आग' खूप वाईट बनल्यानं खरं तर सिप्पींना आनंद व्हायला हवा.

ः संधी मिळाली तर "शोले'चा रिमेक पुन्हा करायला आवडेल का?
ः का नाही? जरूर करीन. फक्त प्रेक्षकांची हा "रिमेक' पाहण्याची तयारी असावी.

ः नवीन कोणते सिनेमे करताय?
ः "कॉन्ट्रॅक्‍ट' नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केलाय. मुंबईतल्या गुन्हेगारीवर हा सिनेमा आधारलाय. येत्या जुलैमध्ये तो प्रदर्शित होईल. त्याचबरोबर चंदनतस्कर वीरप्पनवरही मी एका सिनेमाची निर्मिती करतोय.

No comments: