Monday, June 23, 2008

सनई चौघडे - review

हा खरा धक्का!
मराठी सिनेमांमधले वेगवेगळे विषय आणि त्याचा "लूक' हा गेल्या काही वर्षांमधला चर्चेचा विषय आहे. तरीदेखील भाषेच्या दृष्टीनं आपला सिनेमा अजूनपर्यंत पुस्तकी भाषेतच अडकला होता. आजच्या तरुणाईच्या भाषेची नस त्याला काही केल्या सापडत नव्हती. हे अवघड काम साध्य करण्यात निर्माते श्रेयस-दीप्ती तळपदे आणि दिग्दर्शक राजीव पाटील यांना यश आलंय. या सिनेमातली काही दृश्‍यं वाजवीपेक्षा भडक दाखविली गेली असली तरी खऱ्या अर्थानं हा आजच्या पिढीचा सिनेमा आहे. "मॅरेज ब्युरो'च्या नावाखाली लग्नाचा मांडलेला बाजार आणि कुमारी मातृत्वाची समस्या या चित्रपटात खूप वेगळ्या आणि प्रभावीपणे मांडण्यात आलीय. संजय पवार यांच्या लेखणीनं तरुणाईची नेमकी भाषा अधोरेखित केलीय; मात्र काही प्रसंगांमध्ये त्यांची लेखणी अनावश्‍यक धारदार झालीय. सई ताम्हणकर, सुबोध भावे, संतोष जुवेकर या त्रिकुटाचा जमलेला अभिनय, अवधूत गुप्तेचं संगीत आणि उत्तम निर्मिती मूल्यांच्या जोरावर हा सिनेमा चांगला जमलाय.
हा सिनेमा म्हणजे सईच्या (सई ताम्हणकर) आयुष्यातली अनेक वेडीवाकडी वळणं आहेत. वडील नसल्यामुळं सईची आईच तिला बेळगावसारख्या ठिकाणी वाढवते. कॉलेजमध्ये असताना सईला तिच्या स्वप्नातला राजकुमार (श्रेयस तळपदे) भेटतो; मात्र त्याची साथ तिला फार काळ लाभत नाही. आईच्या मृत्यूमुळे सई आपल्या पुण्यातल्या लग्न झालेल्या बहिणीकडे (शिल्पा तुळसकर) राहायला येते; मात्र तिच्या जिजाजींना अमेरिकेतली नोकरी मिळाल्यामुळे सईच्या लग्नासाठी घाई सुरू होते. अत्यंत आधुनिक पद्धतीनं लग्न जमविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या "कांदे पोहे' या संस्थेत तिचं नाव नोंदविलं जातं. इथं तिला हवा तसा मुलगा (संतोष जुवेकर) सापडतो. मात्र या निर्णायक क्षणी ती आपल्याला लग्नापूर्वीच मूल झाल्याचं सांगून खळबळ उडवून देते. तिच्या या घोषणेमुळं लग्न जुळविण्यात शंभर टक्के माहिर असलेल्या "कांदे पोहे' संस्थेचा संचालक असलेल्या आदित्यचेही (सुबोध भावे) काही क्षण धाबे दणाणते. सईच्या पूर्वायुष्यात डोकावून तो तिचे आणि संतोषचे नाते जोडण्याचा प्रयत्न करतो; मात्र ते न जमल्यानंतर त्याला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो.
"सनई चौघडे' या शीर्षकावरून हा सिनेमा "फील गुड' पद्धतीचा असल्याची शंका येते; परंतु हा सिनेमा सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला एकापाठोपाठ एक धक्के देण्याचे काम करतो. चित्रपटाची सुरुवात फारशी झोकदार झालेली नाही. सईच्या आईचा मृत्यू आणि मृत्यूसमयीची दृश्‍यं अगदी "फिल्मी' वाटतात. त्यानंतर सईचं "मॅरेज ब्युरो'त दाखलं होणं, पाच जोड्यांची परीक्षा सुरू होणं... इथपर्यंतचा प्रवास आस्ते आस्तेच झालाय. सई एकीकडं आपलं लग्न जुळवीत असताना दुसरीकडं तिच्या पूर्वायुष्यातला "ट्रॅक' दाखवून दिग्दर्शकानं भविष्यातल्या वादळाची कल्पना दिलीय; पण हे वादळ ती कुमारी माता असण्याइतकं भयानक असेल याची कल्पना येत नाही. इथून या सिनेमानं गती घेतलीय. आपल्या नायिकेला विवाहापूर्वीच आई बनवून लेखक-दिग्दर्शकानं मग थेट आपल्या संस्कृती-परंपरेचा लेखाजोखा घेऊन त्याची आजच्या काळाशी सांगड घातलीय; पण ही सांगड घालताना हा सर्व संवाद आजचा वाटेल, याचीही काळजी घेण्यात आलीय. पूर्वी विवाहबाह्य संबंधातून होणारी गडबड "मैं तुम्हारे बच्चे की मॉं बननेवाली हूँ' या संवादावर येऊन थांबे. हा सिनेमा त्याच्या एक पाऊल पुढं गेलाय. यातली नायिका आपल्या नायकाला हा गुळगुळीत संवाद न ऐकवता "माझे पिरीयडस्‌ चुकलेत' असं म्हणताना दाखविलीय. हे एक उदाहरण असून असे आणखी काही संवाद या सिनेमाला आजच्या काळाशी "रीलेट' करण्यात यशस्वी ठरलेत. या जमेच्या बाजू असताना काही त्रुटीही राहून गेल्यात. सुबोध भावेच्या व्यक्तिरेखेचा प्रवास ज्या दिशेनं दाखविण्यात आलाय, त्या दिशेचा शेवट सईच्या आयुष्यापाशी येऊन थांबणार, याची आधीच कल्पना आलेली असते. त्यामुळे त्यानं "क्‍लायमॅक्‍स'ला दिलेला "जोर का धक्का' पाहणाऱ्याला "धीरे से' लागण्याची शक्‍यता आहे.
या सिनेमाची मजबूत बाजू म्हणजे कलाकारांचे अभिनय. सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि संतोष जुवेकर यांच्या जमलेल्या अभिनयामागचं कारण म्हणजे त्यांच्या वाट्याला आलेल्या दमदार व्यक्तिरेखा. सुबोध या सिनेमात खूप छान दिसलाय आणि मस्त वावरलाय. तीच गोष्ट संतोषचीही म्हणावी लागेल. नवोदित सई ताम्हणकर कॅमेऱ्याला खूप सराईतपणानं सामोरी गेलीय. मुख्य म्हणजे तिघांनीही परस्परांना अभिनयात "कॉम्प्लिमेंट' केल्यानं त्याचा परिणाम अधिक जाणवतो. श्रेयस तळपदे "गेस्ट ऍपियरन्स'मध्ये चांगला भाव खाऊन गेलाय. तुषार दळवी ठीकठाक. मात्र शिल्पा तुळसकर आणि भारती आचरेकर यांच्याबाबत असं म्हणता येत नाही. शिल्पा एक तर खूप थकलेली आणि "एजेड' वाटते. भारती आचरेकर यांचा "कॉमेडी' ट्रॅक जमलेला नाही. अवधूत गुप्तेंचं संगीत "कॅची' आहे. चित्रपटाला "फ्रेश' आणि आकर्षक "लूक' देण्यात दिग्दर्शक राजीव पाटील यांना चांगलंच यश आलंय. एकंदरीत चकचकीत "कॅपसूल'मधून दिलेली ही कडू गोळी चांगलीच पचनी पडणारी आहे.

No comments: