Tuesday, July 19, 2011

नटसम्राट


नटसम्राट
---------
"नटसम्राट' हे नाटक साकारण्याची प्रत्येक प्रतिभावंत कलावंताची इच्छा असते. परंतु, "नटसम्राट' न साकारताही नीळकंठ कृष्णाजी फुले नावाचा एक कलाकार "नटसम्राट' बनला. प्रेक्षकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं. एवढं की खलनायकी व्यक्तिरेखांमुळे स्त्रियांचा अनेकदा रोषही त्यांना पत्करावा लागला. भूमिका कोणतीही द्या, तिचं सोनं करण्याची खात्री देणारा हा कलावंत होता. पुढारी, पाटील, सावकार, बॅंक-साखर कारखाना चेअरमन... या भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. एका कलावंतामध्ये किती वेगवेगळी रूपं दडलेली असतात, याचं ते सर्वोत्तम उदाहरण होते.

निळूभाऊंचा जन्म म्हटला तर एका सामान्य कुटुंबातला आणि म्हटला तर एका असामान्य कुटुंबातला. कारण, त्यांच्या घराण्याचं मूळ थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी निगडीत. निळूभाऊंचं एकत्र कुटुंब. घरात सख्खी अकरा भावंडं. त्यांचं बालपण गेलं ते मध्यप्रदेश आणि विदर्भात. घरचं वातावरण स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल होतं. निळूभाऊंचे वडील भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक होते. चित्रपटाशी निळूभाऊंचा संबंध आला तो खामगावमध्ये. इथंच त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला चित्रपट पाहिला. परंतु, त्यावेळी त्यांना या क्षेत्रामध्ये आपली मोठी कारकीर्द घडेल, असं काही वाटलं नव्हतं. 1945 मध्ये निळूभाऊ पुण्यात आले. सेवादलाशी संलग्न असलेल्या बाबूराव जगताप यांचं मार्गदर्शन यावेळी त्यांना लाभलं आणि तिथून ते सेवादलाच्या कार्याशी निगडीत झाले. सुरुवात केली ती कलापथकापासून. कालांतरानं या पथकाचे ते प्रमुखही झाले. सेवादलातल्या भाऊसाहेब रानडे यांच्याकडून ते बरंच काही शिकले. ग. प्र. प्रधान यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. इथं काम करत असताना निळूभाऊंना पहिल्यांदा नट होण्याची इच्छा झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुढं शिकण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यांनी आर्मड्‌ फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात माळ्याची नोकरी स्वीकारली. ही नोकरी त्यांनी अवघ्या 80 रुपये मासिक पगारावर तब्बल दहा वर्षं केली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात निळूभाऊंनी "येरा गबाळ्याचे काम नोहे' या वगलेखनापासून केली. पु. ल. देशपांडे यांच्या "पुढारी पाहिजे'मधील त्यांनी साकारलेली रोंग्याची भूमिका खूप गाजली. या नाटकाचे सहा वर्षांत तब्बल सहाशे प्रयोग झाले. याचवेळी त्यांनी "बिनबियांचे झाड', "कुणाचा कुणाला मेळ नाही' यासारख्या नाटकांमधूनही कामं केली. मा
त्र, त्यांच्यात दडलेल्या उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडलं ते "कथा अकलेल्या कांद्याची' या वगनाट्यामधून. यातील भजनवल्ली अविचतरावांच्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. निळूभाऊंच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणास हेच वगनाट्य कारणीभूत ठरलं.

निळूभाऊंच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेलं वर्ष म्हणजे 1964. या काळात समाजवादी पक्षात दुफळी माजली. वाराणशीमधील अधिवेशनात बडबड झाल्यामुळे निळूभाऊ प्रचंड नाराज झाले. या अस्वस्थ मानसिकतेमधून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचं ठरविलं. पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेली चौकट त्यांना परिस्थितीमुळे मोडावी लागली. पुढे विख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी ही भूमिका पाहून "एक गाव बारा भानगडी'मधील झेलेअण्णांची व्यक्तिरेखा निळूभाऊंना दिली. या भूमिकेनं पुढं इतिहास घडविला आणि निळूभाऊंच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरली. अर्थात, ही भूमिका यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी तेवढेच कष्ट घेतले. भूमिकेत घुसण्याचं कसब त्यांना पहिल्यापासूनच साधलं होतं. "एक गाव...'चे लेखक शंकर पाटील यांची मदत घेत निळूभाऊंनी या व्यक्तिरेखेची तब्बल आठ-दहा वर्षं रंगीत तालीम केली. भूमिकेमधील इब्लिसपणा, संवादांमधील मोक्‍याच्या जागा, अचूक संवादफेक, चेहऱ्यावर सतत बदलत जाणाऱ्या हावभावांमुळे निळूभाऊ प्रत्येक भूमिकेवर स्वार झाले आणि प्रेक्षकांचं तब्बल चार दशके त्यांनी मनोरंजन केलं. या चार दशकांच्या प्रवासात त्यांनी जवळपास 140 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1970 ते 1990 ही दोन दशकं निळूभाऊंनी साकारलेल्या पाटीलकीनं गाजवली. "सामना', "सिंहासन', "चोरीचा मामला', "शापीत', "पुढचं पाऊल' या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. "सामना'मधील हिंदुराव धोंडो पाटील या भूमिकेनं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. "सूनबाई घर तुझंच आहे' हे नाटक करीत असताना निळूभाऊंची भेट रजनी मुथा यांच्याशी झाली आणि कालांतरानं त्या त्यांच्या जीवनसाथी झाल्या.

निळूभाऊंनी नाट्यसृष्टीसाठी दिलेलं योगदानही तेवढंच महत्त्वाचं आहे. "सखाराम बाईंडर', "सूर्यास्त', "बेबी' ही नाटकं त्यांनी गाजवली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्या काळात आलिशान गाड्या नव्हत्या. साध्या बसमधून प्रवास करावा लागायचा. निळूभाऊ असा प्रवास नेहमी करायचे. एवढा मोठा कलावंत असूनही बसमध्येच ते झोपायचे. बऱ्याचदा प्रवासात बस बंद पडे. मग त्यातून उतरून दुसऱ्या ट्रक-टेम्पोमधून प्रवास करण्यासही त्यांची तयारी असे. कधीकधी बंद पडलेल्या बसला धक्का देण्याचंही काम त्यांनी केलं आहे. "डाऊन टू अर्थ' प्रकारात मोडणारा हा अभिनेता होता. जेवणा-खाण्याचे कसलेही चोचले नसत. एखाद्या गावात शूटिंग असलं की कोणत्याही घरातली मीठभाकरी त्यांना चाले.

अभिनयाबरोबर निळूभाऊ रमले ते समाजकारणात. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी पक्षाचं त्यांनी मनापासून काम केलं. राजकारणात त्यांची स्वतःची अगदी ठाम मतं होती. राजकारणात गेलं की माणूस निगरगट्ट होतो, हे त्यांच्या मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं होतं. म्हणूनच कोणतंही पद न घेता ते आनंदानं तिसऱ्या फळीत राहायचे. निवडणुकांदरम्यान ते गावोगाव फिरायचे. उत्तम भाषणं करून सभा जिंकण्यात तर त्यांना खूपच आनंद मिळायचा. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली. परंतु, बोफोर्स प्रकरणात अमिताभचं नाव गोवलं गेल्यानंतर त्याच्याविरूद्ध निवडणुकीत प्रचार करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक समाज, हमाल पंचायत चळवळ, शेतमजूर, देवदासी आदींसाठी त्यांनी मदत केली. नाटकांच्या प्रयोगामधून मिळणारं उत्पन्न ते सामाजिक कृतज्ञता निधीत जमा करायचे आणि पुढे त्याचा उपयोग त्यांनी समाजपयोगी कामांसाठीच केला.

निळूभाऊंनी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर हिंदी चित्रपटांमधूनही काही भूमिका केल्या. बहुसंख्य कलाकार आपल्यातल्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु, निळूभाऊ त्यालाही अपवाद ठरले. "मला हिंदी नीट बोलता येत नाही,' असं प्रांजळ कथन त्यांनी केलं होतं. तरीदेखील त्यांना भरपूर हिंदी चित्रपट मिळाले. परंतु, या ग्लॅमर दुनियेत ते फारसे रमले नाहीत. मुंबईतल्या जुहू किंवा लोखंडवालासारख्या आलिशान वस्तीत त्यांना राहणं सहज शक्‍य होतं. परंतु, त्यांनी शहरातला आपला बाडबिस्तारा आवरून निसर्गरम्य अशा ठिकाणी आपलं वास्तव्य केलं. ज्या माळीकामापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ते माळीकाम आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सुरू ठेवलं. लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही त्यांच्या डोक्‍यात कधी हवा गेली नाही. त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते. एखाद्या कार्यक्रमाला गेले की रिक्षातून उतरल्यानंतर स्वतः ते सहजतेनं पैसे देत. निळूभाऊ नट म्हणून मोठे होते की माणूस म्हणून हा प्रश्‍न अनेकांना पडला. अर्थात त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही.
- मंदार जोशी
-----------------
निळू फुले जीवनपट...
जन्म ः 1930
मृत्यू ः 13 जुलै 2009
उल्लेखनीय चित्रपट ः एक गाव बारा भानगडी, सामना, सोबती, चोरीचा मामला, सहकार सम्राट, सासुरवाशीण, पिंजरा, शापीत
उल्लेखनीय नाटके ः सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, बेबी
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः बागकाम
आवडते कलाकार ः नसिरुद्दीन शाह, ओमपुरी

No comments: