Saturday, December 3, 2011

क्रेझ ‘कोलावेरी डी’ची


-------
क्रेझ ‘कोलावेरी डी’ची
-------------
‘सातवे आसमान पे’ याचा खरा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल तर त्यानं तमीळ स्टार धनुषला जाऊन चेन्नईला भेटावं. हा धनुष काही दक्षिणेतला फार मोठा कलाकार नाही. २८ वर्षांच्या या कलाकारच्या नावावर काही जेमतेम बरे चित्रपट जमा आहेत. किंबहुना सुपरस्टार रजनीकांतचा जावई अशीच त्याची आजवरची ओळख आहे. परंतु, त्याची ही ओळख आता जुनी झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते अवघ्या पंधरवड्यापूर्वी आलेलं ‘कोलावेरी डी’ हे गाणं. एवढ्या कमी कालावधीत या गाण्याला ‘यू ट्यूब’वर सुमारे एक कोटी हिट्स मिळाल्या आहेत. हा आजवरचा उच्चांक मानला जातोय. फेसबुक, ट्विटरवरही हे गाणं सध्या फिरतंय. खासगी एफएम स्टेशन्सच्या आरजेंनी तर या गाण्याला उचलून धरलंय. दर तासाला प्रत्येक स्टेशनवर हे गाणं वाजवलं जातंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते खेडेगावातील एखादा अशिक्षितापर्यंतचा फॅनवर्ग या गाण्याला मिळालाय. असं भाग्य एखाद्याच गाण्याला किंवा गायकाला लाभतं.

आगामी ‘थ्री’ या तमीळ चित्रपटामधील हे गाणं आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्‍वर्या रजनीकांतनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते अनिरूद्ध रवीचंदर या नव्या दमाच्या संगीतकारानं. सध्या तरुणाईची ओढ ही स्थानिक भाषेऐवजी इंग्रजीकडे अधिक आहे. त्यामुळेच हल्लीच्या गाण्यांमध्ये इंग्रजीचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ‘हिंग्लिंश’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘मिंग्लिश’ (मराठी आणि इंग्रजी) हा प्रकार आजवर माहित होता. परंतु, या गाण्याच्या निमित्तानं ‘तंग्लिश’ (तमीळ आणि इंग्लिश) हा नवीन प्रकार रूढ झाला आहे. हे गाणं खुद्द धनुष यानं लिहिलं आणि गायलं आहे. एका प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या मनातील भावना या गाण्यात व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक धनुष हा काही ‘प्रोफेशनल’ गायक किंवा गीतकार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यानं स्वतःची ओळख बाथरूम सिंगर अशीच करून दिली आहे. तसेच अभिनेता हीच आपली खरी ओळख असून काव्यलेखन हे आपण फावल्या वेळेत करतो, असंही त्यानं म्हटलं आहे. परंतु, त्याच्या या फावल्या वेळातील कामगिरीनं त्याला अभूतपूर्व असं यश आणि स्टारडम मिळवून दिलं आहे. खुद्द धनुषला या गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे मोठा धक्का बसला आहे. परंतु, त्यानंही विनम्रपणे हे गाणं आपल्या हातून घडून गेल्याची कबुली दिलीय. या गाण्यातील शब्द हे रोजच्या वापरातील आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे गाणं आपलं वाटण्यासाठी एखादा ‘रॉ’ आवाज निर्माता-दिग्दर्शकाला हवा होता. त्यामुळेच गायनात फार मोठी मजल न मारलेल्या धनुषचा आवाज वापरण्यात आला.

या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं ते चेन्नईमध्ये. यावेळी धनुषसह त्याची पत्नी ऐश्‍वर्या, संगीतकार अनिरूद्ध रवीचंदर आणि या चित्रपटाची नायिका श्रृती हसन उपस्थित होती. त्यावेळी यापैकी कोणालाच हे गाणं लोकप्रियतेचा इतिहास घडवेल याची कल्पना आली नव्हती. ‘कोलावेरी डी’ची लोकप्रियता सध्या एवढी वाढलीय की त्याच्या व्यापारीकरणासही सुरुवात झाली आहे. ‘कोलावेरी डी’ हा शब्द असलेले टी शर्टस् लवकरच बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असला की निर्मात्यांतर्फे चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा एक भाग म्हणून अशाप्रकारच्या कल्पना लढविल्या जातात. परंतु, एखाद्या गाण्याला मिळालेलं यश पाहून बाजारधुरिणांकडूनच निर्मात्यांना अशाप्रकारचं ‘मर्चंडायजिंग’ करण्याची गळ घातली गेली आहे.

या गाण्याची चाल इतकी सहजसोपी आणि ‘कॅची’ आहे की अनेकांना ते ऐकताना त्यावर नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. ‘यू ट्यूब’वर या गाण्याचे मेकिंग ‘पोस्ट’ झाले आहे. प्रत्यक्षात चित्रपटामधील गाणं अजून कोणालाही पाहायला मिळालेलं नाही. परंतु, तरीदेखील काहींनी या गाण्यावर स्वतः नृत्य करीत त्याचे व्हिडीओज ‘यू ट्यूब’वर अपलोड केले आहेत आणि त्यालादेखील इंटरनेटवर भरपूर हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे चिनी, जपानी लोकांनाही हे गाणं खूप भावलं आहे. नायकानं गायलेली गाणी हिट होण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झालाय. अमिताभचं ‘मेरे अंगनेमें’ हे गाणं गाजलं आणि नायकांचा आवाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. अभिनेता आमिर खानच्या ‘आती क्या खंडाला’ (चित्रपट ः गुलाम) या गाण्यानंही साधारण १२-१३ वर्षांपूर्वी मोठी लोकप्रियता मिळवली. परंतु, अवघ्या १५ दिवसांमध्ये ‘कोलावेली डी’नं जो झंझावात घडवला, तो अभूतपूर्वच म्हणायला हवा. ‘कोलावेरी’चे शब्द आणि त्याला संगीतकारानं दिलेली चाल ही काही गीत-संगीताच्या दृष्टीनं ‘ग्रेट’ नाही. परंतु, रसिकांना कधी काय आवडेल, याचा भरवसा नसतो. ‘कोलावेरी डी’नं हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. आता पाहूया, प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं किती धमाल उडवून देतंय ते.
- मंदार जोशी
----------------

No comments: