Saturday, June 16, 2012
‘स्टार्स’ जमीन पर...
‘पुढारी’च्या बहार पुरवणीमधील माझा ताजा लेख
--------
‘स्टार्स’ जमीन पर...
-------
गेल्या आठवड्यात एक आक्रीत घडलं. दिबाकर बॅनर्जीच्या ‘शांघाय’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच समीक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अक्षरशः खिरापत वाटल्यासारखे ‘स्टार्स’ समीक्षकांकडून वाटले गेले. विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रांनी तर या चित्रपटावर अधिकच आपली कृपानजर केली. चार ‘स्टार्स’च्या खाली ‘स्टार’ देणे हा गुन्हा आहे, असं समजून सर्वांनी ‘स्टार्स’ वाटले. या चित्रपटाची परीक्षणं वाचताना अनेक वेळी दिबाकर बॅनर्जीला या मंडळींनी व्ही. शांताराम, सत्यजित रे, विजय आनंद यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रांगेतच नेऊन बसवलंय, त्याचा भास झाला. इम्रान हाश्मी या कलाकाराचा अभिनय किती ‘ग्रेट लेव्हल’ला गेलाय, अशी धक्कादायक मनोरंजक माहितीदेखील वाचायला मिळाली. सर्वसाधारणपणे समीक्षकही माणूस असल्यामुळे त्याच्याही आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे बहुतेक चित्रपटांबाबत समीक्षकांमध्ये कधीच एकमत आढळत नाही. कोण दोन स्टार देतो, तर कोण तीन... पण ‘शांघाय’बाबत अतिरेकच घडला. आता एवढ्या तार्यांचा मारा झाला असताना ‘शांघाय’ किमान हिट तरी होणं आवश्यक होतं. पण झालं भरलंच. हा चित्रपट प्रदर्शनानंतर जेमतेम ३० टक्के व्यवसाय करू शकला आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिसवर’ १५ टक्क्यांचीही मजल मारता आलेली नाही. ‘शांघाय’ला या मिळालेल्या ‘स्टार्स’ची पान पान भरून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही करण्यात आली. परंतु, तरीदेखील त्याचा परिणाम काही प्रेक्षकांवर झाला नाही.
एकीकडे ‘शांघाय’ला नाकारणार्या प्रेक्षकांनी अक्षयकुमारच्या ‘रावडी राठोड’वरील प्रेमात थोडीही कुचराई केली नाही. या चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. तेव्हा प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच हवंय, अशीही ओरड काहींनी केली. थोडं तटस्थपणे या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहायला गेल्याचं ठरवल्यास काही वेगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. इंग्रजी समीक्षकांची मानसिकताच अनेकदा समजत नाही. कोणत्याही इंग्रजी वर्तमानपत्रामधील समीक्षा वाचून संबंधित चित्रपटाचा कसलाच अंदाज प्रेक्षकाला बांधता येत नाही. दिबाकर बॅनर्जीचा ‘ओये लक्की लक्की ओये’ या साधारण चित्रपटालाही समीक्षकांनी यापूर्वी डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे ‘शांघाय’ हा चित्रपट मी या इंग्रजी समीक्षकांसमवेतच पाहिला आणि बर्याच दृश्यांमध्ये माझ्याकडून कसलीच प्रतिक्रिया येत नसताना ही इंग्रजी समीक्षक मंडळी टाळ्या वाजवत होती, अधूनमधून ओरडत होती. याच वेळी मला ‘शांघाय’वर ‘स्टार्स’चा वर्षाव होणार असल्याचा अंदाज आला होता आणि शेवटी तो खरा ठरला. ‘शांघाय’ हा निश्चितच एक वेगळा चित्रपट आहे. परंतु, तो सर्वसामान्य प्रेक्षकाच्या डोक्यावरून जातो, हे सत्य नाकारता येत नाही.
अलीकडच्या काळात चित्रपट समीक्षेत कोणते मुद्दे मांडलेत यापेक्षा त्याला कोणी किती ‘स्टार्स’ दिलेत, याला अधिक महत्त्व आलंय. ‘स्टार्स’चं हे महत्त्व एवढं ठसलं गेलंय की हल्ली प्रेक्षकवर्गदेखील चित्रपटाची समीक्षा वाचण्याच्या फंदात पडत नाही. चित्रपटाला मिळालेले ‘स्टार्स’ पाहून तो ते वाचायचं की नाही, याचा निर्णय घेतो. चित्रपटसृष्टीतील मंडळीदेखील या ‘स्टार्स’च्या संख्येला अधिक महत्त्व देतात. आपल्या प्रतिस्पर्धी गटातील कलावंताच्या चित्रपटाला कमी स्टार्स मिळाले की ही मंडळी आनंदतात. परंतु, आपल्याही आयुष्यात एखादा शुक्रवार येणार आहे, याची आठवण त्यांना त्यावेळी तरी होत नाही. मराठीत अजूनपर्यंत समीक्षणाच्या ‘स्टार्स’ला तेवढं महत्त्व आलेलं नाही हे खरंय. परंतु, हा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. मराठीत हल्ली वर्तमानपत्रांपेक्षा मुंबईतील एका खासगी एफ.एम. केंद्रावरील समीक्षेला अधिक महत्त्व आलंय. त्यामागचं कारण म्हणजे या एफएम वाहिनीचा ‘आरजे’ आपलं रेटिंग किमान तीन या आकड्यापासून सुरू करतो. त्यामुळे हल्ली निर्माते मंडळींचा तो एक आधारस्तंभ बनल्याचं बोलंय जातं. त्याच्या आगमनाखेरीज ‘प्रेस शो’ सुरू केला जात नाही. गेल्या दोन एक वर्षातलं सर्वसाधारण ‘ऍव्हरेज’ काढायचं झालं तर या ‘आरजे’नं बहुतेक चित्रपटांना किमान तीन ते चार स्टार्स दिले आहेत आणि बहुतांशी चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे हे खरंय. परंतु, अशा पद्धतीनं चित्रपटांना पाठिंबा मिळणं हेदेखील गैर नाही का ?
थोडक्यात ‘शांघाय’च्या निमित्तानं चित्रपट समीक्षा ही गांभीर्यानं घ्यावी का, याचा विचार करण्याची वेळ आलीय. त्यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे समीक्षकांच्या लेखनाचा दर्जा आणि अनुभव. वर्तमानपत्रामधील सर्वात दुर्लक्षित अंग म्हणजे चित्रपट पत्रकारिता आहे. अशाप्रकारच्या पत्रकारितेसाठी गुणवत्ता असावी लागते, याचा विसर माध्यमांनाच पडला आहे. त्यामुळे समीक्षकाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची गुणवत्ता तपासली जात नाही आणि मग नंतर अपघात घडतात. अनेकांच्या मते चित्रपट समीक्षा ही आता कालबाह्य गोष्ट झाली आहे. आताचा प्रेक्षक हुशार आणि सुजाण आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याचा संबंधित चित्रपट पाहावा की नाही, याबद्दल निर्णय झालेला असतो. एखादा प्रेक्षक जर सलमान खान आणि आमिर खानचा चाहता असेल तर त्याच्या दृष्टीनं समीक्षकाच्या समीक्षेला फारसं महत्त्व नसतं. समीक्षा नकारात्मक असली तरी तो चित्रपटगृहात जाऊन संबंधित चित्रपट पाहतोच. तसेच चित्रपट समीक्षेबद्दल चित्रपटसृष्टीमधील मंडळींकडून येणारा कौल हा सापेक्ष असतो. ज्याच्या चित्रपटाबद्दल चांगली समीक्षा प्रसिद्ध झाली असते, तेव्हा तो सातव्या अवकाशात असतो आणि समीक्षकांकडून टीकेचा भडिमार होतो तेव्हा माध्यमांमधून चित्रपट समीक्षा हा प्रकारच रद्द केला जावा, अशी मागणीही करायला तो मागेपुढे पहात नाही.
- मंदार जोशी
----------
Saturday, December 3, 2011
जीवनातला आनंद गेला...
क्रेझ ‘कोलावेरी डी’ची

-------
क्रेझ ‘कोलावेरी डी’ची
-------------
‘सातवे आसमान पे’ याचा खरा अर्थ कोणाला समजून घ्यायचा असेल तर त्यानं तमीळ स्टार धनुषला जाऊन चेन्नईला भेटावं. हा धनुष काही दक्षिणेतला फार मोठा कलाकार नाही. २८ वर्षांच्या या कलाकारच्या नावावर काही जेमतेम बरे चित्रपट जमा आहेत. किंबहुना सुपरस्टार रजनीकांतचा जावई अशीच त्याची आजवरची ओळख आहे. परंतु, त्याची ही ओळख आता जुनी झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलंय ते अवघ्या पंधरवड्यापूर्वी आलेलं ‘कोलावेरी डी’ हे गाणं. एवढ्या कमी कालावधीत या गाण्याला ‘यू ट्यूब’वर सुमारे एक कोटी हिट्स मिळाल्या आहेत. हा आजवरचा उच्चांक मानला जातोय. फेसबुक, ट्विटरवरही हे गाणं सध्या फिरतंय. खासगी एफएम स्टेशन्सच्या आरजेंनी तर या गाण्याला उचलून धरलंय. दर तासाला प्रत्येक स्टेशनवर हे गाणं वाजवलं जातंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते खेडेगावातील एखादा अशिक्षितापर्यंतचा फॅनवर्ग या गाण्याला मिळालाय. असं भाग्य एखाद्याच गाण्याला किंवा गायकाला लाभतं.
आगामी ‘थ्री’ या तमीळ चित्रपटामधील हे गाणं आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतनं हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाला संगीत दिलं आहे ते अनिरूद्ध रवीचंदर या नव्या दमाच्या संगीतकारानं. सध्या तरुणाईची ओढ ही स्थानिक भाषेऐवजी इंग्रजीकडे अधिक आहे. त्यामुळेच हल्लीच्या गाण्यांमध्ये इंग्रजीचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. ‘हिंग्लिंश’ (हिंदी आणि इंग्रजी), ‘मिंग्लिश’ (मराठी आणि इंग्रजी) हा प्रकार आजवर माहित होता. परंतु, या गाण्याच्या निमित्तानं ‘तंग्लिश’ (तमीळ आणि इंग्लिश) हा नवीन प्रकार रूढ झाला आहे. हे गाणं खुद्द धनुष यानं लिहिलं आणि गायलं आहे. एका प्रेमभंग झालेल्या तरुणाच्या मनातील भावना या गाण्यात व्यक्त करण्यात आली आहे. वास्तविक धनुष हा काही ‘प्रोफेशनल’ गायक किंवा गीतकार नाही. एका मुलाखतीमध्ये त्यानं स्वतःची ओळख बाथरूम सिंगर अशीच करून दिली आहे. तसेच अभिनेता हीच आपली खरी ओळख असून काव्यलेखन हे आपण फावल्या वेळेत करतो, असंही त्यानं म्हटलं आहे. परंतु, त्याच्या या फावल्या वेळातील कामगिरीनं त्याला अभूतपूर्व असं यश आणि स्टारडम मिळवून दिलं आहे. खुद्द धनुषला या गाण्याला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे मोठा धक्का बसला आहे. परंतु, त्यानंही विनम्रपणे हे गाणं आपल्या हातून घडून गेल्याची कबुली दिलीय. या गाण्यातील शब्द हे रोजच्या वापरातील आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे गाणं आपलं वाटण्यासाठी एखादा ‘रॉ’ आवाज निर्माता-दिग्दर्शकाला हवा होता. त्यामुळेच गायनात फार मोठी मजल न मारलेल्या धनुषचा आवाज वापरण्यात आला.
या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं ते चेन्नईमध्ये. यावेळी धनुषसह त्याची पत्नी ऐश्वर्या, संगीतकार अनिरूद्ध रवीचंदर आणि या चित्रपटाची नायिका श्रृती हसन उपस्थित होती. त्यावेळी यापैकी कोणालाच हे गाणं लोकप्रियतेचा इतिहास घडवेल याची कल्पना आली नव्हती. ‘कोलावेरी डी’ची लोकप्रियता सध्या एवढी वाढलीय की त्याच्या व्यापारीकरणासही सुरुवात झाली आहे. ‘कोलावेरी डी’ हा शब्द असलेले टी शर्टस् लवकरच बाजारामध्ये विक्रीसाठी येणार आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असला की निर्मात्यांतर्फे चित्रपटाच्या प्रसिद्धी मोहिमेचा एक भाग म्हणून अशाप्रकारच्या कल्पना लढविल्या जातात. परंतु, एखाद्या गाण्याला मिळालेलं यश पाहून बाजारधुरिणांकडूनच निर्मात्यांना अशाप्रकारचं ‘मर्चंडायजिंग’ करण्याची गळ घातली गेली आहे.
या गाण्याची चाल इतकी सहजसोपी आणि ‘कॅची’ आहे की अनेकांना ते ऐकताना त्यावर नृत्य करण्याचा मोह आवरत नाही. ‘यू ट्यूब’वर या गाण्याचे मेकिंग ‘पोस्ट’ झाले आहे. प्रत्यक्षात चित्रपटामधील गाणं अजून कोणालाही पाहायला मिळालेलं नाही. परंतु, तरीदेखील काहींनी या गाण्यावर स्वतः नृत्य करीत त्याचे व्हिडीओज ‘यू ट्यूब’वर अपलोड केले आहेत आणि त्यालादेखील इंटरनेटवर भरपूर हिट्स मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे चिनी, जपानी लोकांनाही हे गाणं खूप भावलं आहे. नायकानं गायलेली गाणी हिट होण्याचं हे काही पहिलंच उदाहरण नाही. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झालाय. अमिताभचं ‘मेरे अंगनेमें’ हे गाणं गाजलं आणि नायकांचा आवाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागली. अभिनेता आमिर खानच्या ‘आती क्या खंडाला’ (चित्रपट ः गुलाम) या गाण्यानंही साधारण १२-१३ वर्षांपूर्वी मोठी लोकप्रियता मिळवली. परंतु, अवघ्या १५ दिवसांमध्ये ‘कोलावेली डी’नं जो झंझावात घडवला, तो अभूतपूर्वच म्हणायला हवा. ‘कोलावेरी’चे शब्द आणि त्याला संगीतकारानं दिलेली चाल ही काही गीत-संगीताच्या दृष्टीनं ‘ग्रेट’ नाही. परंतु, रसिकांना कधी काय आवडेल, याचा भरवसा नसतो. ‘कोलावेरी डी’नं हीच गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. आता पाहूया, प्रत्यक्ष चित्रपटात हे गाणं किती धमाल उडवून देतंय ते.
- मंदार जोशी
----------------
Tuesday, July 19, 2011
नटसम्राट

नटसम्राट
---------
"नटसम्राट' हे नाटक साकारण्याची प्रत्येक प्रतिभावंत कलावंताची इच्छा असते. परंतु, "नटसम्राट' न साकारताही नीळकंठ कृष्णाजी फुले नावाचा एक कलाकार "नटसम्राट' बनला. प्रेक्षकांनी त्यांच्यावर उदंड प्रेम केलं. एवढं की खलनायकी व्यक्तिरेखांमुळे स्त्रियांचा अनेकदा रोषही त्यांना पत्करावा लागला. भूमिका कोणतीही द्या, तिचं सोनं करण्याची खात्री देणारा हा कलावंत होता. पुढारी, पाटील, सावकार, बॅंक-साखर कारखाना चेअरमन... या भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. एका कलावंतामध्ये किती वेगवेगळी रूपं दडलेली असतात, याचं ते सर्वोत्तम उदाहरण होते.
निळूभाऊंचा जन्म म्हटला तर एका सामान्य कुटुंबातला आणि म्हटला तर एका असामान्य कुटुंबातला. कारण, त्यांच्या घराण्याचं मूळ थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी निगडीत. निळूभाऊंचं एकत्र कुटुंब. घरात सख्खी अकरा भावंडं. त्यांचं बालपण गेलं ते मध्यप्रदेश आणि विदर्भात. घरचं वातावरण स्वातंत्र्य चळवळीला अनुकूल होतं. निळूभाऊंचे वडील भाजीपाला विक्रीच्या व्यवसायात होते. त्यांचे थोरले बंधू स्वातंत्र्यसैनिक होते. चित्रपटाशी निळूभाऊंचा संबंध आला तो खामगावमध्ये. इथंच त्यांनी आपल्या आयुष्यातला पहिला चित्रपट पाहिला. परंतु, त्यावेळी त्यांना या क्षेत्रामध्ये आपली मोठी कारकीर्द घडेल, असं काही वाटलं नव्हतं. 1945 मध्ये निळूभाऊ पुण्यात आले. सेवादलाशी संलग्न असलेल्या बाबूराव जगताप यांचं मार्गदर्शन यावेळी त्यांना लाभलं आणि तिथून ते सेवादलाच्या कार्याशी निगडीत झाले. सुरुवात केली ती कलापथकापासून. कालांतरानं या पथकाचे ते प्रमुखही झाले. सेवादलातल्या भाऊसाहेब रानडे यांच्याकडून ते बरंच काही शिकले. ग. प्र. प्रधान यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. इथं काम करत असताना निळूभाऊंना पहिल्यांदा नट होण्याची इच्छा झाली. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुढं शिकण्याची इच्छाच झाली नाही आणि त्यांनी आर्मड् फोर्सेस वैद्यकीय महाविद्यालयात माळ्याची नोकरी स्वीकारली. ही नोकरी त्यांनी अवघ्या 80 रुपये मासिक पगारावर तब्बल दहा वर्षं केली. आपल्या कारकिर्दीची सुरुवात निळूभाऊंनी "येरा गबाळ्याचे काम नोहे' या वगलेखनापासून केली. पु. ल. देशपांडे यांच्या "पुढारी पाहिजे'मधील त्यांनी साकारलेली रोंग्याची भूमिका खूप गाजली. या नाटकाचे सहा वर्षांत तब्बल सहाशे प्रयोग झाले. याचवेळी त्यांनी "बिनबियांचे झाड', "कुणाचा कुणाला मेळ नाही' यासारख्या नाटकांमधूनही कामं केली. मा
त्र, त्यांच्यात दडलेल्या उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडलं ते "कथा अकलेल्या कांद्याची' या वगनाट्यामधून. यातील भजनवल्ली अविचतरावांच्या भूमिकेचं त्यांनी सोनं केलं. निळूभाऊंच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणास हेच वगनाट्य कारणीभूत ठरलं.
निळूभाऊंच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलेलं वर्ष म्हणजे 1964. या काळात समाजवादी पक्षात दुफळी माजली. वाराणशीमधील अधिवेशनात बडबड झाल्यामुळे निळूभाऊ प्रचंड नाराज झाले. या अस्वस्थ मानसिकतेमधून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्याचं ठरविलं. पक्षाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेली चौकट त्यांना परिस्थितीमुळे मोडावी लागली. पुढे विख्यात दिग्दर्शक अनंत माने यांनी ही भूमिका पाहून "एक गाव बारा भानगडी'मधील झेलेअण्णांची व्यक्तिरेखा निळूभाऊंना दिली. या भूमिकेनं पुढं इतिहास घडविला आणि निळूभाऊंच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर पसरली. अर्थात, ही भूमिका यशस्वी करण्यासाठी निळूभाऊंनी तेवढेच कष्ट घेतले. भूमिकेत घुसण्याचं कसब त्यांना पहिल्यापासूनच साधलं होतं. "एक गाव...'चे लेखक शंकर पाटील यांची मदत घेत निळूभाऊंनी या व्यक्तिरेखेची तब्बल आठ-दहा वर्षं रंगीत तालीम केली. भूमिकेमधील इब्लिसपणा, संवादांमधील मोक्याच्या जागा, अचूक संवादफेक, चेहऱ्यावर सतत बदलत जाणाऱ्या हावभावांमुळे निळूभाऊ प्रत्येक भूमिकेवर स्वार झाले आणि प्रेक्षकांचं तब्बल चार दशके त्यांनी मनोरंजन केलं. या चार दशकांच्या प्रवासात त्यांनी जवळपास 140 चित्रपटांमध्ये अभिनय केला. 1970 ते 1990 ही दोन दशकं निळूभाऊंनी साकारलेल्या पाटीलकीनं गाजवली. "सामना', "सिंहासन', "चोरीचा मामला', "शापीत', "पुढचं पाऊल' या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. "सामना'मधील हिंदुराव धोंडो पाटील या भूमिकेनं त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलं. "सूनबाई घर तुझंच आहे' हे नाटक करीत असताना निळूभाऊंची भेट रजनी मुथा यांच्याशी झाली आणि कालांतरानं त्या त्यांच्या जीवनसाथी झाल्या.
निळूभाऊंनी नाट्यसृष्टीसाठी दिलेलं योगदानही तेवढंच महत्त्वाचं आहे. "सखाराम बाईंडर', "सूर्यास्त', "बेबी' ही नाटकं त्यांनी गाजवली. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले. त्या काळात आलिशान गाड्या नव्हत्या. साध्या बसमधून प्रवास करावा लागायचा. निळूभाऊ असा प्रवास नेहमी करायचे. एवढा मोठा कलावंत असूनही बसमध्येच ते झोपायचे. बऱ्याचदा प्रवासात बस बंद पडे. मग त्यातून उतरून दुसऱ्या ट्रक-टेम्पोमधून प्रवास करण्यासही त्यांची तयारी असे. कधीकधी बंद पडलेल्या बसला धक्का देण्याचंही काम त्यांनी केलं आहे. "डाऊन टू अर्थ' प्रकारात मोडणारा हा अभिनेता होता. जेवणा-खाण्याचे कसलेही चोचले नसत. एखाद्या गावात शूटिंग असलं की कोणत्याही घरातली मीठभाकरी त्यांना चाले.
अभिनयाबरोबर निळूभाऊ रमले ते समाजकारणात. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी पक्षाचं त्यांनी मनापासून काम केलं. राजकारणात त्यांची स्वतःची अगदी ठाम मतं होती. राजकारणात गेलं की माणूस निगरगट्ट होतो, हे त्यांच्या मनावर अगदी पक्कं कोरलं गेलं होतं. म्हणूनच कोणतंही पद न घेता ते आनंदानं तिसऱ्या फळीत राहायचे. निवडणुकांदरम्यान ते गावोगाव फिरायचे. उत्तम भाषणं करून सभा जिंकण्यात तर त्यांना खूपच आनंद मिळायचा. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली. परंतु, बोफोर्स प्रकरणात अमिताभचं नाव गोवलं गेल्यानंतर त्याच्याविरूद्ध निवडणुकीत प्रचार करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलं नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक समाज, हमाल पंचायत चळवळ, शेतमजूर, देवदासी आदींसाठी त्यांनी मदत केली. नाटकांच्या प्रयोगामधून मिळणारं उत्पन्न ते सामाजिक कृतज्ञता निधीत जमा करायचे आणि पुढे त्याचा उपयोग त्यांनी समाजपयोगी कामांसाठीच केला.
निळूभाऊंनी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर हिंदी चित्रपटांमधूनही काही भूमिका केल्या. बहुसंख्य कलाकार आपल्यातल्या त्रुटी झाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु, निळूभाऊ त्यालाही अपवाद ठरले. "मला हिंदी नीट बोलता येत नाही,' असं प्रांजळ कथन त्यांनी केलं होतं. तरीदेखील त्यांना भरपूर हिंदी चित्रपट मिळाले. परंतु, या ग्लॅमर दुनियेत ते फारसे रमले नाहीत. मुंबईतल्या जुहू किंवा लोखंडवालासारख्या आलिशान वस्तीत त्यांना राहणं सहज शक्य होतं. परंतु, त्यांनी शहरातला आपला बाडबिस्तारा आवरून निसर्गरम्य अशा ठिकाणी आपलं वास्तव्य केलं. ज्या माळीकामापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ते माळीकाम आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सुरू ठेवलं. लोकप्रियतेच्या शिखरावर राहूनही त्यांच्या डोक्यात कधी हवा गेली नाही. त्यांचे पाय कायम जमिनीवरच होते. एखाद्या कार्यक्रमाला गेले की रिक्षातून उतरल्यानंतर स्वतः ते सहजतेनं पैसे देत. निळूभाऊ नट म्हणून मोठे होते की माणूस म्हणून हा प्रश्न अनेकांना पडला. अर्थात त्याचं उत्तर कधीच मिळालं नाही.
- मंदार जोशी
-----------------
निळू फुले जीवनपट...
जन्म ः 1930
मृत्यू ः 13 जुलै 2009
उल्लेखनीय चित्रपट ः एक गाव बारा भानगडी, सामना, सोबती, चोरीचा मामला, सहकार सम्राट, सासुरवाशीण, पिंजरा, शापीत
उल्लेखनीय नाटके ः सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबूतर, बेबी
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः बागकाम
आवडते कलाकार ः नसिरुद्दीन शाह, ओमपुरी
Monday, July 4, 2011
कधी जात्यात; कधी सुपात
कधी जात्यात; कधी सुपात
यशाच्या कैफात धुंद होऊन विजेत्यांना डोक्यावर घेण्याची आणि अपयशाचं चक्र आलं की पराभूतांचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आजही आपल्याकडे कायम आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग आला. यावेळी बहुतेकांनी मराठी चित्रपटांच्या वाट्याला सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मराठी चित्रपटसृष्टीचं आता काही खरं नाही, असा टोकाचा सूरही लावला. काही दिवस जातायत न् जातायत तोच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याची बातमी आली आणि याच मंडळींचा बोलण्याचा सूर पुन्हा बदलला. मराठी चित्रपटसृष्टीची ही सर्वाधिक चांगली "फेज' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लगोलग कलाकारांचे सत्कार होऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीबद्दल चर्चासत्रंही आयोजित होऊ लागली. त्यापुढे मजल मारत काही बालकलाकारांना घरं मिळवून देण्यासाठी "मीडिया'नं पुढाकार घेतला आणि काही नगरपालिकांनी कागदोपत्री घोडे नाचवत, तशी घरं मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. थोडक्यात, मराठी चित्रपटसृष्टी कधी जात्यात; तर कधी सुपात असते. एवढ्या टोकाचा भाबडेपणा आपल्याकडे सातत्यानं पाहायला मिळतोय आणि तोच आपल्या प्रगतीला मारक ठरतोय.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मिळविलेलं यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे; परंतु त्या यशाचं कौतुक करताना इतर गोष्टींचं अवमूल्यन होता कामा नये, याची काळजी आपण सध्या घेताना दिसत नाही. मल्याळी, कानडी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांमधील मक्तेदारी आपण मोडून काढल्याचा आपल्याला अभिमान वाटतो; मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मल्याळी चित्रपटात कोणता विषय मांडलाय, हे जाणून घेण्यासही आपण इच्छुक नसतो. चित्रपट माध्यमावर मनापासून प्रेम करणारी मंडळीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतरांनी काम चमक दाखविलीय, याकडे लक्ष देत नाहीत. अर्थात, सरकारी यंत्रणाही त्याला तेवढीच जबाबदार आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट आपल्याकडे चित्रपटगृहांमधून क्वचितच प्रदर्शित केले जातात. "टीआरपी'च्या मागं लागलेल्या वाहिन्यादेखील अशा चित्रपटांना भीक घालत नाहीत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे आपल्याला समजतच नाही.
मराठी चित्रपटांपुढची आता सर्वात मोठी समस्या आहे ती वितरणाची आणि प्रसिद्धीची. अजूनही आपल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्स आणि "सिंगल स्क्रीन' चित्रपटागृहांमध्ये चांगला वेळांचे "शोज' मिळत नाहीत; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्याचे आघाडीचे मराठीमधील अभिनेते आपला चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की राजकीय पक्षांना हाताशी धरतात. आपल्या चित्रपटाला कसे चांगले "शोज' मिळाले नाहीत, याबद्दल ते वातावरण गरम करतात. परंतु प्रदर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्ये आपला चित्रपट "बॉक्स ऑफिस'वर नरम पडला की पुढचा चित्रपट येईपर्यंत हे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक शांत बसतात. अशानं मराठी चित्रपट कसा काय पुढं जाणार? मराठी चित्रपटांच्या योग्य प्रदर्शन आणि वितरणासाठी ना राज्य सरकारवर दबाव टाकला जातो ना वितरक, प्रदर्शकांवर. त्यामुळे चांगला चित्रपट असूनही त्याला योग्य वेळेचे "शोज' मिळत नसल्याची खंत आपल्याला प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. काही राजकीय पक्षांनी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत, असं म्हणतात; परंतु या प्रयत्नांचा वरील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपयोग झाल्याचं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले काही मराठी चित्रपट अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची वाट पाहताहेत. अशा चित्रपटांवर पुरस्कारांबरोबरच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्या दिवसाची आता आपण वाट पाहायला हवी.
यशाच्या कैफात धुंद होऊन विजेत्यांना डोक्यावर घेण्याची आणि अपयशाचं चक्र आलं की पराभूतांचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आजही आपल्याकडे कायम आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग आला. यावेळी बहुतेकांनी मराठी चित्रपटांच्या वाट्याला सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मराठी चित्रपटसृष्टीचं आता काही खरं नाही, असा टोकाचा सूरही लावला. काही दिवस जातायत न् जातायत तोच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याची बातमी आली आणि याच मंडळींचा बोलण्याचा सूर पुन्हा बदलला. मराठी चित्रपटसृष्टीची ही सर्वाधिक चांगली "फेज' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लगोलग कलाकारांचे सत्कार होऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीबद्दल चर्चासत्रंही आयोजित होऊ लागली. त्यापुढे मजल मारत काही बालकलाकारांना घरं मिळवून देण्यासाठी "मीडिया'नं पुढाकार घेतला आणि काही नगरपालिकांनी कागदोपत्री घोडे नाचवत, तशी घरं मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. थोडक्यात, मराठी चित्रपटसृष्टी कधी जात्यात; तर कधी सुपात असते. एवढ्या टोकाचा भाबडेपणा आपल्याकडे सातत्यानं पाहायला मिळतोय आणि तोच आपल्या प्रगतीला मारक ठरतोय.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मिळविलेलं यश हे निश्चितच कौतुकास्पद आहे; परंतु त्या यशाचं कौतुक करताना इतर गोष्टींचं अवमूल्यन होता कामा नये, याची काळजी आपण सध्या घेताना दिसत नाही. मल्याळी, कानडी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांमधील मक्तेदारी आपण मोडून काढल्याचा आपल्याला अभिमान वाटतो; मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मल्याळी चित्रपटात कोणता विषय मांडलाय, हे जाणून घेण्यासही आपण इच्छुक नसतो. चित्रपट माध्यमावर मनापासून प्रेम करणारी मंडळीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतरांनी काम चमक दाखविलीय, याकडे लक्ष देत नाहीत. अर्थात, सरकारी यंत्रणाही त्याला तेवढीच जबाबदार आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट आपल्याकडे चित्रपटगृहांमधून क्वचितच प्रदर्शित केले जातात. "टीआरपी'च्या मागं लागलेल्या वाहिन्यादेखील अशा चित्रपटांना भीक घालत नाहीत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे आपल्याला समजतच नाही.
मराठी चित्रपटांपुढची आता सर्वात मोठी समस्या आहे ती वितरणाची आणि प्रसिद्धीची. अजूनही आपल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्स आणि "सिंगल स्क्रीन' चित्रपटागृहांमध्ये चांगला वेळांचे "शोज' मिळत नाहीत; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्याचे आघाडीचे मराठीमधील अभिनेते आपला चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की राजकीय पक्षांना हाताशी धरतात. आपल्या चित्रपटाला कसे चांगले "शोज' मिळाले नाहीत, याबद्दल ते वातावरण गरम करतात. परंतु प्रदर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्ये आपला चित्रपट "बॉक्स ऑफिस'वर नरम पडला की पुढचा चित्रपट येईपर्यंत हे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक शांत बसतात. अशानं मराठी चित्रपट कसा काय पुढं जाणार? मराठी चित्रपटांच्या योग्य प्रदर्शन आणि वितरणासाठी ना राज्य सरकारवर दबाव टाकला जातो ना वितरक, प्रदर्शकांवर. त्यामुळे चांगला चित्रपट असूनही त्याला योग्य वेळेचे "शोज' मिळत नसल्याची खंत आपल्याला प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. काही राजकीय पक्षांनी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत, असं म्हणतात; परंतु या प्रयत्नांचा वरील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपयोग झाल्याचं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले काही मराठी चित्रपट अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची वाट पाहताहेत. अशा चित्रपटांवर पुरस्कारांबरोबरच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्या दिवसाची आता आपण वाट पाहायला हवी.
Tuesday, June 28, 2011

पौर्णिमेतलं शीतल चंद्रबिंब
----------
दिवंगत चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचं आयुष्य म्हणजे पौर्णिमेतल्या शीतल चंद्रासारखं होतं. आपल्या चित्रकला-अभिनय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीच्या शीतल छायेनं तब्बल आठ दशकं रसिकांना न्हाऊ घातलं. अर्थात चंद्राप्रमाणे ते परप्रकाशी नव्हते. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि कलासृष्टी तर उजळवून टाकलीत. त्याशिवाय त्यांच्या सान्निध्यात जी जी माणसं आली, त्यांचं आयुष्यही उजवळून टाकण्यात ते यशस्वी ठरले.
काय योगायोग आहे पाहा. कोल्हापुरातल्या शनिवार पेठेतल्या ज्या मातीच्या घरात चंद्रकांत यांचा जन्म झाला, ते घरदेखील चंद्रमौळी होतं. त्यांचं मूळ नाव गोपाळ मांडरे. चित्रकला आणि अभिनय त्याच्या रक्तातच होता. शाळेच्या दिवसांमध्ये हा गोपाळ खेडूत, वैदू, वासुदेवाच्या नकला करायचा. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे मॅट्रिकच्या पुढे काही त्याला जाता आलं नाही. हे दिवस प्रेमात पडण्याचे. गोपाळ या काळात प्रेमात पडला तो तालमीतल्या लाल मातीच्या. व्यायाम करून त्यानं शरीर कमावलं. तेच पुढं आयुष्यभर त्याच्या कामी आलं. गोपाळच्या वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त गोपाळचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या "गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. गोपाळच्या वडिलांमुळेच त्याला बाबूराव पेंटर आणि बाबा गजबर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली. बाबा गजबरांकडे गोपाळनं सुरुवातीला चित्रकलेचे धडे घेतले. 1931-32मध्ये सांगलीत "बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम गोपाळला मिळालं. पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे गोपाळची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या मा. दीनानाथांनी गोपाळचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं.
विसाव्या वर्षी गोपाळला पोस्टर विभागातून बाहेर आणलं ते बाबूराव पेंटरांनी. त्याच्या डोक्यावरचा भरगच्च केशसंभार त्यांनी उतरवला आणि झिरो कट मारला. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील गोपाळ यांचा अभिनय. गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.
"जयमल्हार' चित्रपटातल्या भूमिकेसाठी बैलाच्या देखभालीपासून गाडी जुंपण्यापर्यंत सगळं काही ते शिकले. "थोरांताची कमळा' या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही. शांताराम यांनी "शेजारी' चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टिस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. "छत्रपती शिवाजी' चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौड करायला लावली. त्यामुळे या चित्रपटातील चंद्रकांत यांचा शिवाजी ताठ कण्याचा आणि रूबाबदार वाटतो. डमी वापरण्यात कमीपणा वाटत असल्यामुळे धाडसाची कामं त्यांनी स्वतःच केली.
व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्यावर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगडवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट
चंद्रकांत नुसता अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. "भरतभेट' चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता. मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. दादा गुंजाळ, दादासाहेब तोरणे, मा. विनायक, अंबपकर, शोभना समर्थ, लीलाबाई, रत्नमाला, सुलोचना, उषा मंत्री, कमला कोटणीस... अशा विविध मान्यवर कलावंतांचा सहवास त्यांना लाभला. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही. निसर्ग हाच श्वास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली.
चंद्रकांत नेहमी म्हणायचे, "आपण जन्माला येताना काही घेऊन येत नाही, मरताना काही घेऊन जात नाही. जगताना लोकांसाठी, समाजासाठी करतो तीच आपली कमाई.' हे तत्त्वज्ञान चंद्रकांत अक्षरशः जगले. स्वतः चित्रीत केलेली 350 ते 400 चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी 1984 मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत 30 लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे "चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया'ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो. चित्रकलेल्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला. कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं.
आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी "राम-लक्ष्मण' नावानं ओळखली जायची. सूर्यकांत यांचं आपल्या आधी निधन झाल्याचा चंद्रकांतना खूप मोठा धक्का बसला होता. "आयुष्यभर आम्ही राम-लक्ष्मणाप्रमाणे राहिलो. मला कमीपणा येईल, असे तो आयुष्यात कधी वागला नाही. पण रामाच्या आधी लक्ष्मणाने निघून जावे, हा कुठल्या नशिबाचा खेळ म्हणायचा?' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत यांनी व्यक्त केली होती. आयुष्यभर पैशाचा विचार न करता चांगल्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. त्या वेळी न मिळालेले पैसे त्यांना पुढे विविध पुरस्कारांच्या रुपाने मिळाले. स्वच्छ मनानं, निष्ठेनं केलेल्या कामाचं फळ निश्चित मिळतं, यावर त्यांचा विश्वास होता. हाच विश्वास या कलावंताला सदैव रसिकांच्या हृदयात घर करून देण्यास कारणीभूत ठरला.
-----------------
चंद्रकांत मांडरे जीवनपट...
जन्म ः 13 ऑगस्ट 1913
मृत्यू ः 17 फेब्रुवारी 2001
कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1936
उल्लेखनीय चित्रपट ः युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
भाग्योदय ठरलेला चित्रपट ः सावकारी पाश
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः चित्रकला
आवडता खाद्यपदार्थ ः कोल्हापुरी मटण
आवडता चित्रपट ः सावकारी पाश
अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाची उभारणी.
- मंदार जोशी
Saturday, June 18, 2011
रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय...

रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय...
----------
चित्रपटसृष्टी ही अस्सल कलावंतांची खाण असल्याचं म्हटलं जातं. बहुतांशी ते खरंही आहे. परंतु, या खाणीतील हिऱ्यांचा देखणेपणा आणि रुबाबदारपणाबद्दल आपल्याकडे बऱ्याचदा चर्चा होते. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे आपल्याकडे रुबाबदार नायक अपवादानेच उदयास आले, असा टीकेचा सूरही आळविला जातो. या टीकेवर उत्तर म्हणजे अरुण शंकरराव सरनाईक हे नाव. एका परिपूर्ण अभिनेत्याकडे ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्वांचा अंतर्भाव सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पाहायला मिळाला होता.
लहान अरुणच्या घरातच कला होती. अरुणचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते तर त्याचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक. गाण्याचं हे अंग अरुणला या जोडीकडूनच मिळालं. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच अरुणनं पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. संगीताची हीच आवड अरुणला कलाक्षेत्रातील दारं उघडण्यास उपयोगी ठरली. तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यानं पदवीही मिळवली. तसेच थेट कलाक्षेत्रात उडी न मारता इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणूनही काही काळ काम पाहिलं. परंतु, तिथं त्याचा जीव काही रमला नाही. याच सुमारास मो. ग. रांगणेकर हे "भटाला दिली ओसरी' हे नाटक बसवीत होते. या नाटकात अरुणनं काम केलं. याच वेळी एक उत्कृष्ट संधी अरुणपुढे चालून आली. विख्यात दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या डोक्यात "शाहीर प्रभाकर' हा चित्रपट करण्याचं घोळत होतं. यातील शीर्षक व्यक्तिरेखा अरुणनं साकारावी, असं त्यांच्या मनात होतं. परंतु, हा चित्रपट काही कारणांमुळे बनला नाही आणि अरुणचं चित्रपटसृष्टीतील पदार्पण काही काळ लांबलं. परंतु, मातीत पडलेलं सोनं फार काळ दृष्टीभेद करू शकत नाही. या सोन्यावर प्रख्यात लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांची नजर गेली आणि त्यांनी "शाहीर परशुराम' चित्रपटात अरुणला एक दुय्यम भूमिका मिळाली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा "वरदक्षिणा' आणि दत्ता धर्माधिकारी यांचा "विठू माझा लेकुरवाळा' हा चित्रपटही अरुणला मिळाला. परंतु, हे तिन्ही चित्रपट फार काही मोठं यश मिळवू शकले नाहीत. एक देखणा, रुबाबदार नायक चांगल्या संधीविना उपेक्षित राहणार, अशी भीतीही निर्माण झाली. परंतु, त्यानंतर आलेल्या "रंगल्या रात्री अशा' या चित्रपटानं किमया केली आणि अरुणचा अरुणोदय झाला. या चित्रपटानं सरनाईकांना मोठा "फॅन फॉलो
अर' मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे या काळातले मोठे चाहते ठरले. या चित्रपटासाठी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांनी तबलावादन केलं होतं. प्रत्यक्ष चित्रपटात तबल्यावरील सरनाईकांची सफाई पाहून अल्लारखॉंनी त्यांचं कौतुक केलं होतं. त्यापुढं जात शिवसेनाप्रमुखांनी या कलावंताचा भविष्यकाळ उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं आणि नंतर ते खरं ठरलं.
प्रतिभा असूनही नवीन कलाकाराला आपला जम बसविणं सहजासहजी शक्य नसतं. कारण, त्याच्यापुढे त्या काळातील मोठमोठी आव्हानं उभी असतात. सरनाईकांचा अरुणोदय झाला तेव्हा चंद्रकांत, सूर्यकांत, विवेक, रमेश देव यासारख्या अभिनेत्यांची कारकीर्द विशेष फॉर्मात होती. त्यामुळे सरनाईकांची डाळ शिजणं हे थोडं कठीण काम होतं. परंतु, बुलंद आवाज, अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर हा कलावंत बघताबघता इतरांच्या पुढं गेला. त्या काळातला चित्रपट हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या कथानकांच्या उंबरठ्यावर होता. सरनाईकांनी या दोन्ही प्रकारांमध्ये मातब्बरी मिळवली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी भूमिकांची प्रयोगशीलता जपली. राजा ठाकूर दिग्दर्शित "पाहू रे किती वाट' या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झलकले तर "सुभद्राहरण' या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. सरनाईकांची कारकीर्द उंचावली जाण्यास कारणीभूत ठरलेले चित्रपट म्हणजे "एक गाव बारा भानगडी', "केला इशारा जाता जाता', "सवाल माझा ऐका', "सिंहासन' आदी चित्रपट. "सवाल माझा ऐका'मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी "केला इशारा जाता जाता' या चित्रपटातही साकारला होता. "पाच नाजूक बोटे' या चित्रपटात सरनाईकांनी सज्जन आणि दुर्जन भावांची दुहेरी भूमिका मोठ्या ताकदीनं सादर केली. "मुंबईचा जावई'मधील सरनाईकांचा नाट्यवेडा अविनाश लक्षणीय ठरला. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित "सिंहासन'मधील जयाजीराव शिंदे ही मुख्यमंत्र्यांची व्यक्तिरेखा सरनाईकांच्या कारकीर्दीमध्ये सरताज ठरली. मुख्यमंत्र्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक असलेले भावदर्शन सरनाईकांनी या व्यक्तिरेखेत एकवटले होते. सरनाईकांमधील संगीताचा आविष्कार पडद्यावर आणण्यास कारणीभूत ठरले ते संगीतकार राम कद
म. "डोंगरची मैना' आणि "गणगौळण' या दोन चित्रपटात कदम यांनी सरनाईकांना पार्श्वगायनाची संधी दिली. "घरकुल' या चित्रपटासाठी सी. रामचंद्र यांनी त्यांच्याकडून "पप्पा सांगा कुणाचे' हे अजरामर गीत गाऊन घेतलं. त्यानंतर काही वर्षांनी आलेल्या "चंदनाची चोळी अंग अंग जाळी' या चित्रपटामधील "एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं...' हे गाणंही सरनाईकांमधील श्रेष्ठ गायकावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. सरनाईकांचं अभिनयातील कर्तृत्व पाहता ते हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांना ताकदीच्या भूमिका मिळायल्या हव्या होत्या. परंतु, मराठी चित्रपट आणि नाटकांमधील व्यस्ततेमुळे ही संधी काही त्यांना मिळाली नाही. अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचं देणं लागतो, या भावनेला छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या "आनंदग्राम'मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथं खऱ्या अर्थानं ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळं, खाऊ देताना त्यांचा चेहरा आनंदानं ओसंडून वाहायचा.
सुमारे साडे तीन दशकांच्या कारकीर्दीत सर्व काही मिळवल्यानंतर सरनाईकांना वेध लागले होते ते निवृत्तीचे. शक्यतो कलाकार कधीच निवृत्त होत नसतो. मात्र, इतरांपासून वेगळा असणारा हा कलाकार गावी जाऊन शेती करण्याचे मनसुबे बांधत होता. आयुष्यभर धावपळ, दगदग झाल्यानंतर गावी घर बांधून तिथं थोडी विश्रांती घेण्याचाही त्यांचा विचार होता. परंतु, तो नियतीला काही मंजूर नव्हता. 21 जून 1984च्या पहाटे "पंढरीची वारी' या चित्रपटाचं चित्रीकरण आटोपून कोल्हापूर-पुणे असा आपल्या कुटुंबियांसमवेत प्रवास करीत असताना त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि हा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. त्यावेळी सरनाईकांचं वय पन्नाशीच्या आसपास होतं. वयानं आणखी काही वर्षं साथ दिली असती तर कदाचित या कलावंताकडून आणखी काही उत्कृष्ट कलाकृती आपल्याला पाहायल्या मिळाल्या असत्या.
----------
अरुण सरनाईक जीवनपट...
जन्म ः 4 ऑक्टोबर 1935
ृत्यू ः 21 जून 1984
कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1956
उल्लेखनीय चित्रपट ः रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, सिंहासन, मुंबईचा जावई, घरकुल
उल्लेखनीय नाटके ः अपराध मीच केला, तरुण तुर्क म्हातारे अर्क, गोष्ट जन्मांतरीची, गुडबाय डॉक्टर, लवंगी मिरची कोल्हापूरची
भाग्योदय ठरलेला चित्रपट ः रंगल्या रात्री अशा
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः तबलावादन, पेटीवादन, गायन.
अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः "आनंदग्राम' या संस्थेत कुष्ठरुग्णांची सेवा.
-----------
- मंदार जोशी
Subscribe to:
Posts (Atom)