
आमीर खान "वळू'च्या प्रेमात...
"वळू'ची टीम सध्या यशाच्या शिखरावर आहे. एक तर हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात अतिशय जोरात चालतोय आणि दुसरीकडे मान्यवरांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. "वळू'च्या प्रेमात पडलेलं अगदी "लेटेस्ट' नाव म्हणजे आमीर खान. हा चित्रपट त्यानं नुकताच अंधेरीतल्या "सिनेमॅक्स' चित्रपटगृहात पाहिला आणि तो अक्षरशः भारावला. लेखक गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि प्रमुख कलावंत अतुल कुलकर्णी यांचं त्यानं तोंडभरून कौतुक केलं. "वळू'च्या टीमचं अभिनंदन करण्यासाठी आमीर खानसोबत त्याची पत्नी किरण राव, दिग्दर्शक राकेश मेहरा, सचिन पिळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. "वळू'बद्दल बरेच काही ऐकायला मिळाल्यानं हा चित्रपट आपण पाहण्यास आल्याचे आमीरनं या वेळी सांगितलं. एवढ्यावरच न थांबता त्यानं दिग्दर्शक उमेश कुलकर्णीला आपल्या ऑफिसमध्ये येऊन भेटण्यास सांगितलं. आमीर तसा मराठी वर्तुळात क्वचितच दिसतो. अलीकडच्या काळात त्यानं अपवादानेच मराठी चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे, "मिनिंगफुल सिनेमा'च्या कायम शोधात असणाऱ्या या कलाकारानं "वळू'च्या प्रेमात पडणं ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
ता. क.
"वळू'चं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. तुमचं "वळू'बद्दलचं मत मला जाणून घ्यायला निश्चितच आवडेल. तेव्हा केवळ ब्लॉग न वाचता प्रतिक्रियाही देत राहा. म्हणजे आणखी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोचविण्यासाठी बळ येईल.
No comments:
Post a Comment