गिरीश कुलकर्णी मुलाखत
चित्रपटातील सहकलाकाराची व्यक्तिरेखा दीर्घकाळ लक्षात राहणं ही अलीकडे खूप दुर्मिळ गोष्ट झालीय. म्हणूनच "वळू'त जीवन्याची व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेनं साकारणारे गिरीश कुलकर्णी सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. लेखन आणि अभिनयाच्या पातळीवर चमक दाखविणाऱ्या या कलाकाराकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा ठेवता येतील.
-------------------
"वळू'मधला जीवन्या म्हणजे मूर्तिमंत चैतन्य आहे. चित्रपट संपला तरी तो चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपली सोबत करतो. लांबलचक संवाद नाहीत की छाप पाडणारं व्यक्तिमत्त्व नाही. तरीदेखील तो आपल्या हृदयात घर करतो. हे यश आहे, गिरीश कुलकर्णींचं- एका लेखकाचं आणि अभिनेत्याचं. ते मूळचे मेकॅनिकल इंजिनीयर; पण कलेच्या आवडीनं त्यांनी आपली वाट बदलली. सध्या पुण्यात "रेडिओ मिर्ची'चे "क्लस्टर प्रोग्रॅमिंग हेड' म्हणून ते काम पाहताहेत. रेडिओसाठी काम करता करता लिखाण आणि अभिनयाची आवडही त्यांनी जोपासलीय. "वळू'च्या निर्मिती प्रवासाबद्दल ते सांगतात, ""अनिरुद्ध बेलसरे हा आमचा एक डॉक्टर मित्र आहे. बैल पकडायला त्याला नेहमीच बोलावलं जातं. एकदा आम्ही त्याच्याबरोबर ही गंमत पाहण्यासाठी गेलो आणि तिथंच "वळू'च्या कथानकाचा जन्म झाला. वेसण न घातलेला, दावं न बांधलेला बैल म्हणजे वळू. तो मुक्ततेचं आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. मनोरंजनाबरोबरच चित्रपटातून हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला.''
आपल्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल ते म्हणतात, ""शालेय जीवनापासून मी स्टेजशी सरावलोय. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये मी भाग घेतला होता. एका कलाकारासाठी जे जे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असतात, त्या सर्वांवर वावरलोय. त्यामुळे मला हे माध्यम काही नवीन नाही. उमेश कुलकर्णीबरोबर मी अनेक वर्षांपासून काम करतोय. नाटक करण्यासाठी आम्ही "आंतरिक' नावाचा आमचा स्वतःचा ग्रुप स्थापन केला होता. या वेळी माझी नोकरी सुरूच होती. या काळात सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर उमेशनं पुण्याच्या "फिल्म इन्स्टिट्यूट'मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच्या प्रोजेक्टस्ना मदत करायला लागलो. आमच्या सर्वांच्या मेहनतीमधून साकारलेला "गिरणी' लघुपट तब्बल 40 आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून दाखवला गेला. त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. या यशामुळे नवीन काही तरी करण्याचं बळ आम्हाला मिळालं.''
"वळू' प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं प्रेक्षकांनी जोरदार स्वागत केलं. त्याचा ग्रामीण बाज रसिकांनी उचलून धरला. अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर अशा कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं; पण बाजी मारली ती जीवन्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गिरीशनी. या व्यक्तिरेखेबद्दल, तसेच तिच्या लोकप्रियतेबद्दल ते म्हणतात, "" "वळू'मधली माझी व्यक्तिरेखा आणि माझा अभिनय ही बऱ्याच लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरलीय. माझं काम बघून अनेक जण चकीत झालेत. हा कोण कलाकार आहे? याला पूर्वी आपण कधी पाहिलेलं कसं नाही? असा प्रश्नही अनेकांना पडलाय. अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांपासून ते आमीर खान, विजय तेंडुलकर, अमोल पालेकर... या दिग्गजांकडून माझ्या वाट्याला कौतुकाचे चार शब्द आलेत. डॉ. जब्बार पटेल तर हा चित्रपट पाहिल्यानंतर मला म्हणाले, ""गिरीश, अरे तुझ्यासाठी मला आता एक नवीन सिनेमा करायला हवा!' मोठ्या लोकांच्या या कौतुकामुळे आता माझ्यावर सुप्त दडपण आलंय.''
जीवन्याची व्यक्तिरेखा लिखाणातच झक्क जमल्यामुळे ती साकारायचा मोह झाला का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात, ""जीवन्याची व्यक्तिरेखा लिखाणाच्या पातळीवर खूपच छान जमली होती. तो खूप मोकळा आहे. प्रामाणिक आहे, अगदी पाण्यासारखा आरपार नितळ आहे. त्याला कशाचंही भय नाही. समोर मोठी व्यक्ती असली तरी तो स्पष्ट बोलणं पसंत करतो. त्याची निरागसता, त्याचं मुक्त होणं मला खूप आवडलं. माझं व्यक्तिमत्त्व या व्यक्तिरेखेच्या खूप जवळ जाणारं होतं. ही व्यक्तिरेखा मी लिहिली असल्यानं तिला आपणच चांगला न्याय देऊ, याची मला खात्री होती.''
"वळू'चं सध्या भरपूर कौतुक होतंय. या कौतुकाच्या वर्षावात लेखक-कलाकार वाहवत जाण्याची भीती असते; पण गिरीश यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. "वळू'तल्या कमतरतेबद्दल ते म्हणतात, ""हा चित्रपट लिखाणाच्या पातळीवर खूपच छान जमला होता; पण काही कारणांमुळे आम्हाला तो हवा तसा "शूट' करता आला नाही. पण, आमची ही सुरुवात आहे. पुढच्या कलाकृतींमध्ये "वळू'मध्ये राहिलेल्या त्रुटी आम्ही जरूर दूर करू.
1 comment:
बॉग मस्त
Post a Comment