Saturday, August 23, 2008

review-मुंबई मेरी जान

मुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे अपवादानेच आपल्यासमोर आलाय. ही कसर निशिकांत कामत यांच्या "मुंबई मेरी जान' या सिनेमानं भरून काढलीय. मुंबईत 2006 च्या जुलैत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्‍वभूमी निवडत कामत यांनी मुंबईच्या "स्पिरिट'ला एक आगळावेगळा सलाम ठोकलाय. तो आपण स्वीकारलाच पाहिजे. बॉम्बस्फोट का घडला, कोणी घडविला, त्याचे धागेदोरे कसे मिळाले... या "रिसर्च'मध्ये गुंतून न पडता दिग्दर्शकानं आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य मुंबईकरांवर ठेवलाय. त्यामुळेच हा सिनेमा पाहणाऱ्याच्या हृदयाला भिडतो, त्याला अनेकदा अस्वस्थ करतो आणि मुंबईकरांच्या उपजत "ह्युमर'ला दाद देण्यास भाग पाडतो. "युटीव्ही'ची दर्जेदार निर्मिती, कसदार लेखन, संजय जाधव यांचं अप्रतिम कॅमेरावर्क आणि कामत यांच्या "पॉलिश्‍ड' दिग्दर्शनामुळं हा सिनेमा वेगळ्या वाटेचा असूनही अत्यंत परिणामकारक ठरलाय.
बॉम्बस्फोट होण्याआधी; तसेच तो झाल्यानंतर सहा व्यक्तींच्या आयुष्यावर दिग्दर्शकानं आपला "फोकस' ठेवलाय. परेश रावल हे पोलिस दलातील एक वरिष्ठ कॉन्स्टेबल दाखवलेत. अवघ्या दहा दिवसांनंतर ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार असतात. विजय मौर्या हा त्यांचा तरुण सहकारी. या दोन व्यक्तिरेखांमधील संवादांद्वारे दिग्दर्शकानं अख्ख्या पोलिस दलाचं "आरपार' चित्र उभं केलंय. हिंदी चित्रपटांमधील पोलिस हा नेहमीच विनोदाचा विषय झालाय. हा सिनेमा त्याला छेद देऊन गेलाय. सोहा अली खान ही एका चॅनेलमधील तरुण, तडफदार पत्रकार. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिच्यातली पत्रकार जागी होते, मात्र आपला पती बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं तिला समजतं. या वेळी बातमी शोधायला गेलेली सोहा आपल्याच चॅनेलची एक "ब्रेकिंग न्यूज' ठरते आणि तिचा "बाईट' घेण्यापर्यंत मजल जाते.
या सिनेमातलं चौथं व्यक्तिमत्त्व आहे ते इरफान खान. दक्षिणेतल्या कोणत्यातरी खेडेगावातून आलेली ही व्यक्ती मुंबईत सायकलवरून चहा-कॉफी विकत असते. बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच त्याची भेट परेश रावल आणि विजय मौर्याशी होते आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळतं. आपला काही गुन्हा नसताना पोलिस त्रास देत असल्यामुळे इरफान त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं सूड उगवतो. कधी मॉलमध्ये खोटा बॉम्ब ठेवल्याचा फोन कर; तर कधी रेल्वेस्थानकामध्ये, मात्र त्याच्या एका खोट्या फोनमुळं एका व्यक्तीला "हार्टऍटॅक' येतो. या वेळी इरफानचं झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर त्याची कृती या सिनेमाला हळूहळू उंचीवर नेऊ लागते. माधवन हा कट्टर देशभक्त. प्रदूषणाचं प्रमाण रोखण्यासाठी तो स्वतः ऐपत असूनही चारचाकीमधून न फिरता लोकलमधूनच प्रवास करीत असतो, मात्र बॉम्बस्फोटाचा "आँखो देखा हाल' पाहिल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं. के. के. मेनन हा सुशिक्षित बेरोजगार. कॉम्प्युटर इंजिनियर असूनही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग काय, रिकाम्या मनात सैतानाचं भूत अवतरणारच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मुस्लिमांकडे तो ते दहशतवादीच आहेत, या नजरेतून बघत असतो आणि आपल्या मित्रांचेही कान भरत असतो, मात्र बॉम्बस्फोटानंतर अशा काही घटना घडतात, की त्याचे डोळे उघडतात.
योगेश विनायक जोशी आणि उपेंद्र सिधये यांनी या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलीय. या सहा व्यक्तींचे पाच "ट्रॅक' परस्परांमध्ये मिसळणं हे खूप अवघड काम होतं, पण लोकलचा एका "ट्रॅक'वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना जो खडखडाट होतो, तसा खडखडाट लेखक-दिग्दर्शकानं होऊ दिलेला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. परेश रावल आणि विजय मौर्याचा "ट्रॅक' सर्वाधिक परिणामकारक आहे. सोहा आणि माधवनचा "ट्रॅक' ठीकठाक असून, इरफानचा खूप वेगळा वाटतो. तुकाराम पाटील या व्यक्तिरेखेत परेश रावल यांनी कमाल केलीय. या कलाकाराला कोणताही "रोल' द्या, त्यात त्याचं भिडणं विलक्षण असतं. रावल यांच्या कारकिर्दीतील काही भन्नाट भूमिकांपैकी ही भूमिका एक ठरावी. विजय मौर्या यांनी रावल यांना खूप छान साथ दिलीय. चांगला दिग्दर्शक असेल; तर सोहा अली खानचा प्रभाव जाणवतो, हे यापूर्वीही दिसून आलं होतं. या सिनेमात नेमकं तेच पाहायला मिळतं. इरफान खान, माधवन आणि के. के. मेनन हे तिघेही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना अगदी "टॉप फॉर्म'मध्ये वाटतात. सिनेमाच्या शेवटी "ये दिल है मुश्‍किल...' हे गाणं "बॅकग्राऊंड'वर ऐकविण्याची कल्पनाही भन्नाट आहे. "डोंबिवली फास्ट'मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कामत यांना यश आलंय. हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी आणखी एक मराठी दिग्दर्शक सज्ज होतोय. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.

No comments: