Thursday, May 22, 2008

नागेश कुकनूरचा "आशाएँ'

तरुण पिढीतला अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शक ही नागेश कुकनूरची ओळख. "हैदराबाद ब्ल्यूज', "इक्‍बाल', "डोर' अशा चढत्या भाजणीनं त्याचा प्रवास सुरू होता. या प्रवासाला धक्का बसला तो या वर्षीच्या सुरुवातीला आलेल्या "बॉम्बे टू बॅंकॉक' या चित्रपटानं. या चित्रपटामुळं नागेश काही अंशी प्रेक्षकांच्या दृष्टीनं "व्हिलन' बनला. मात्र, त्याचा फटका त्यानं आपल्या करियरला बसू दिलेला नाही. यश, अपयश तसंच आपल्या काही नवीन प्रोजेक्‍टस्‌बद्दल त्याची ही मनमोकळी मुलाखत.
----------------

नागेश कुकनूरचा "आशाएँ' चित्रपट लवकरच येतोय. त्यानिमित्तानं त्याच्याशी संवाद साधण्याचा योग आला. खरं तर "बॉम्बे टू बॅंकॉक' पाहिल्यानंतर लगेचच मला त्याला भेटायचं होतं. कारण हा चित्रपट पाहून त्याच्या इतर काही चाहत्यांप्रमाणे मलाही मोठा धक्का बसला होता. एवढा साधारण दर्जाचा चित्रपट नागेश कसा काय करू शकतो? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घ्यायचं होतं. "इक्‍बाल', "डोर'सारख्या कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकाचा "फॉर्म' असा एकाएकी कसा काय हरवू शकतो? या प्रश्‍नाचंही उत्तर सापडलं नव्हतं. म्हणूनच नागेशची भेट घेतल्यानंतर त्याच्यावर माझ्याकडून या प्रश्‍नांचा भडिमार होणं साहजिक होतं. पण या पठ्ठ्यानं दिलेल्या पहिल्याच उत्तरानं माझ्यावर गारद होण्याची वेळ आली. "" "बॉम्बे टू बॅंकॉक' हा चांगलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून माझं नाव नसतं तर तो चाललाही असता. "इक्‍बाल', "डोर'वर मी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मी "बॉम्बे टू बॅंकॉक'वर घेतली. त्यामुळे, या चित्रपटाचा मला अभिमान वाटतो.''
आपल्या फसलेल्या कलाकृतीचं एवढ्या ठामपणे समर्थन करणारा पहिलाच दिग्दर्शक माझ्या पाहण्यात आला होता. अर्थात, नागेशसाठी "बॉम्बे टू बॅंकॉक' हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याचे निर्माते सुभाष घई यांना वेगळा अनुभव आला होता. या चित्रपटाच्या अपयशानंतर त्यांनी नागेशच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. "बॉम्बे टू बॅंकॉक'च्या "मेकिंग'मध्ये नागेश पुरेसा "इन्व्हॉल्व्ह' नव्हता, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत नागेशला थेट विचारलं असता तो म्हणतो, ""कोणताही सिनेमा यशस्वी ठरला की, त्याचं कौतुक झेलण्यासाठी शंभर लोकं तुमच्या आजूबाजूला असतात आणि एखादी कलाकृती फसली की त्यावर बोटं दाखविणारे शंभर हात वर उठतात. ही गोष्ट आताची नाही. त्यामुळे घईंनी केलेल्या वक्तव्याचा मला धक्का बसला नाही. गेल्या वर्षी मी एकूण तीन चित्रपट केले. पहिल्यांदा "बॉम्बे टू बॅंकॉक' शूट केला. तो बाजूला ठेवून मग मी "आशाएँ'चं चित्रीकरण सुरू केलं. ते संपल्यानंतर लगेचच "तस्वीर'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. हे शूटिंग संपल्यानंतर मग मी एकापाठोपाठ एक या पद्धतीनं या तीन चित्रपटांचं "पोस्ट प्रॉडक्‍शन' केलं. त्यामुळे "बॉम्बे टू बॅंकॉक' हा चित्रपट काही अपघातानं बनला नव्हता, हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो. "व्हॅकी कॉमेडी'चा प्रकार या चित्रपटात मी हाताळला होता. आपण जे यापूर्वी केलेलं नाही, ते मला माझ्या प्रत्येक नवीन कलाकृतीमधून करायचं असतं. त्याचं प्रेक्षक कितपत स्वागत करतात, याची खात्री मी देऊ शकत नाही. गंमत म्हणजे, नवीन चित्रपट करताना याची स्पष्ट कल्पना मी माझ्या निर्मात्यांना करून देतो. माझं हे मत पटलं तरच आम्ही पुढं काम करतो. चित्रपट यशस्वी ठरला तरी फार हुरळून न जाता माझं उत्तर "थॅंक यू' एवढंच असतं आणि एखादा सिनेमा फसला तर मी त्यातल्या चुका काढत बसत नाही.''
"बॉम्बे टू बॅंकॉक'च्या अपयशावरून नागेशची गाडी "आशाएँ'वर आणायला थोडा वेळ गेला. "आशाएँ' हे "टायटल' उच्चारलं तरी पटकन नागेशच्या "इक्‍बाल'मधील "टायटल सॉंग'ची आठवण येते. त्या गाण्यावरूनच हा चित्रपट सुचला का ? असं विचारलं असता नागेश तत्काळ "हो' असं उत्तर देऊन जातो. आपणास "लकी' असणाऱ्या श्रेयस तळपदेऐवजी जॉन अब्राहमला "हीरो' म्हणून का निवडलंस ? या प्रश्‍नावर तो म्हणतो, ""प्रेक्षक काही कलाकारांकडं एका विशिष्ट नजरेनं पाहत असतो. मी नेमका त्याच्या विरुद्ध नजरेतून त्या कलाकाराकडं पाहून त्याला माझ्या चित्रपटात स्थान देतो. "डोर' साकारण्यापूर्वी आयेशा टाकियाची "इमेज' ग्लॅमर डॉल अशी होती. "डोर'मध्ये मी तिच्या इमेजच्या विरुद्ध जाणारा रोल तिला दिला. "आशाएँ'साठी श्रेयसचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. या चित्रपटातील "रोल'साठी एखादा तिशीतला कलाकार मला अपेक्षित होता. एकानं मला जॉनचं नाव सुचवलं तेव्हा मी त्याचा चित्रपट काय, अगदी "प्रोमो'सुद्धा पाहिला नव्हता. पण, त्याच्या चेहऱ्यातील प्रामाणिकपणा मला विलक्षण भावला. जॉनबरोबरच मला या चित्रपटासाठी आयेशा टाकिया हवी होती. पण या चित्रपटातील एक "किसींग सीन' करण्यास तिनं विरोध दर्शविल्यानं मला तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करावी लागली. एखाद्या चित्रपटाची पटकथा जेव्हा मी लिहितो, तेव्हा कलाकारानं त्यात काहीही बदल करू नये, अशी माझी अपेक्षा असते. म्हणूनच केवळ या एका गोष्टीसाठी आयेशा हा चित्रपट करू शकली नाही, याचा मलाही खेद वाटतो. पण, शेवटी पटकथेला माझ्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्व आहे.''
या चित्रपटाचा "हीरो' म्हणजे त्याचं कथानक. आपल्या मध्यमवर्गीय माणसांना एक वाईट खोड जडलीय. आपल्याला लहानपणापासून आयुष्यात स्थिर व्हायचे धडे दिले जातात. अभ्यास करा, नोकरी मिळवा, घर घ्या... पण, या चक्करमध्ये आयुष्याचा आनंद उपभोगण्याची गोष्टच आपण विसरून जातो. माझंच उदाहरण घ्या ना. केमिकल इंजिनियर बनून मी दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो. मला चांगल्या पगाराची नोकरी होती. राहायला आलिशान बंगला होता. स्पोर्टस्‌ कार होती. तरीही मी आयुष्यात सुखी नव्हतो. मला, "फिल्ममेकर' व्हायचं होतं. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मी अमेरिका सोडून भारतात आलो. अर्थात, पहिल्या काही वर्षांमध्ये मला खूप संघर्ष करावा लागला. पण आता मी इथं "सेटल' झालोय. सांगायचा मुद्दा हा की, एखादी गोष्ट करायची असेल तर ती लगेच करा. आपली स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी फार काळ वाट बघू नका. "लिव्ह लाईफ नाऊ', हा या चित्रपटाचा संदेश आहे.''
"आशाएँ'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. नागेशच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये गाणी होती. पण ती सर्व चित्रपटाच्या कथानकाच्या पार्श्‍वभूमीवर ऐकायला मिळाली होती. "आशाएँ'मधली गाणी या चित्रपटाचं कथानक पुढं नेण्यास कारणीभूत ठरतात, असा त्याचा दावा आहे. याबद्दल तो म्हणतो, ""पूर्वीच्या काळात असं घडायचं. लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक एकत्र बसून गीत-संगीताद्वारे कथानक पुढं न्यायचे. "आशाएँ'मधून मला नेमकं तेच साधायचंय. यापूर्वी गाण्यातून कथानक पुढं नेण्याचा मी प्रयत्न केला नव्हता.''
"आशाएँ'पाठोपाठ नागेशचा "एट बाय टेन' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य व्यक्तिरेखा साकारतोय. बॉलीवुडमधल्या एखाद्या सुपरस्टारनं त्याच्याबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाचं आतापर्यंत 75 टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे. त्यापुढचा चित्रपट कोणता? असं विचारलं असता तो "छे-सात स्क्रीप्ट तो तैय्यार है ।' असं उत्तर देऊन टाकतो.

No comments: