Monday, May 26, 2008

review - दे धक्का

धक्के खात गाडी मुक्कामाला
विनोदाच्या माध्यमातून नातेसंबंधांची उलगड करणं, ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे या दिग्दर्शक जोडीनं ही अवघड कामगिरी "दे धक्का'द्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला पूर्ण यश मिळालेलं नाही. झोकदार सुरुवात करणारा हा चित्रपट तासाभरानंतर चांगलाच गळपटलाय. नातेसंबंधांचे धागे कच्चे राहिले असून, केवळ विनोदाच्या जोरावर हा सिनेमा बऱ्यापैकी मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलाय. चित्रपटाच्या प्रारंभीच त्याचा शेवट पाहणाऱ्यास माहीत असतो. त्यामुळे वेगवान प्रारंभानंतर या सिनेमाची गाडी रटाळ धक्के खात खात अखेरीस मुक्कामाला पोहोचते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि शिवाजी साटम या तिघांच्या जबरदस्त "स्क्रीन प्रेझन्स'मुळं ही काहीशी बिघडलेली भट्टी सुसह्य वाटते.
मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे) हा पट्टणकोडोलीत राहणारा साधा गरीब मोटर मेकॅनिक. पेट्रोल-डिझेलची बचत करणारा एक "पार्ट' बनविण्याचं त्याचं स्वप्न असतं. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तो आपल्या वडिलांची (शिवाजी साटम) सहा एकरची जमीन फुंकून टाकतो. ते दुःख विसरण्यासाठी मकरंदचे वडील स्वतःला दारूच्या बाटलीत बुडवून टाकतात. त्यावरून या दोघांमध्ये सतत शिवराळ खटके उडत असतात. मकरंदला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी असते. मुलगा (कृष्णा) पैलवान बनणार असतो; तर मुलगी सायलीला नाचात गती असते. भुरट्या चोऱ्या करण्यात मकरंदच्या मेहुण्याचा (सिद्धार्थ जाधव) हात धरणारा दुसरा कोणी नसतो. चित्रपटाचा हा भाग अतिशय उत्तम जमलाय. मकरंद आणि शिवाजी साटम यांच्यातली शिवराळ बडबड सुरुवातीला छान मनोरंजन करते, पण कालांतरानं तिचा अतिरेक झालाय. चित्रपटाच्या कथानकाला धक्का बसलाय तो सायलीला मुंबईला नाचाचं आमंत्रण आल्यानंतर. खरं तर लेखक-दिग्दर्शकाला जाधव कुटुंबाच्या टमटममधून होणाऱ्या मुंबई-पट्टणकोडोली प्रवासात खूप धमाल करणं शक्‍य होतं, पण प्रत्यक्षात हा प्रवास अगदीच रटाळ आणि कंटाळवाणा झालाय. या प्रवासात मकरंदच्या वडिलांचं आणि मुलाचं अचानक उद्‌भवलेलं आजारपण चित्रपटाच्या कथानकाला रस्ता सोडायला भाग पाडतं. सायलीचा नृत्यस्पर्धेतील "परफॉर्मन्स' हा या सिनेमाचा परमोच्च क्षण आहे, पण इथंच हा चित्रपट कमी पडलाय. आरती अंकलीकर यांनी गायलेली "उगवली शुक्राची चांदणी' ही लावणी पाहण्यापेक्षा फक्त ऐकायलाच बरी वाटते.
"मातीच्या चुली' ही सरस कलाकृती देणाऱ्या अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांचा हा दुसरा चित्रपट. महेश मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांच्या सैरभैर पटकथेमुळं दिग्दर्शकांची चांगलीच पळापळ झालीय. मुळात चित्रपटाच्या कथानकाचा पायाच कमकुवत आहे. पेट्रोल-डिझेलची बचत करणारा एक छोटासा "पार्ट' बनविण्यासाठी मकरंदला सहा एकर जमीन आणि बायकोचं मंगळसूत्र खर्च करायला लागण्याची गोष्ट पटणारी नाही. वडील-मुलाच्या नात्यामध्ये उडणारे खटके कालांतरानं त्रासदायक ठरतात. शिवाजी साटम यांना ऑक्‍सिजनचा "मास्क' हातात घेऊन सातारा ते मुंबई हा प्रवास करायला लावण्याची कल्पकता सर्वात धक्कादायक आहे. एवढ्या त्रुटींची मालिका असूनही हा चित्रपट पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो तो त्यातल्या हृषिकेश जोशी यांच्या चुरचुरीत संवादांमुळं. दर तीन-चार मिनिटांनी कानावर पडणारे गावरान खुसखुशीत संवाद कथानकातील धक्के जाणवणार नाहीत, याची काळजी घेतात.
ग्रामीण ढंगाच्या व्यक्तिरेखा साकारणे मकरंद अनासपुरेचा हातखंडा आहे. "होम पीच'वर खेळताना एखाद्या बॅटस्‌मनची फलंदाजी जशी खुलावी, तसा मकरंद या चित्रपटात खुललाय. त्याला तेवढीच तोलामोलाची साथ सिद्धार्थ जाधवनं दिलीय. भुरट्या चोऱ्या करण्यातली आपली सफाई त्यानं अतिशय छान दाखवलीय. शिवाजी साटम यांची व्यक्तिरेखा थोडी एकसुरी असली तरी त्यांनी तिचा तोल आणखी बिघडवू दिलेला नाही. बालकलाकारांची कामं चांगली आहेत. अजय-अतुल यांचं संगीत चित्रपटाच्या "मूड'ला साजेसं असलं तरी त्यात नवीन काही नाही.

No comments: