Saturday, May 3, 2008

"तुझ्या-माझ्यात' review


लिखाणातली ढिलाई भोवली
पडद्यावरचा घटस्फोट म्हटलं की, नजरेसमोर पहिल्यांदा येतात ती पती-पत्नीमधील भांडणं आणि नंतर ओघानं आलेली मुलांची फरपट. हा विषय अनेकदा येऊन गेल्यानं त्याचा अगदी चोथा झालाय. निर्माते शिवाजीराव चमकिरे आणि दिग्दर्शक प्रमोद जोशी यांनी "तुझ्या-माझ्यात' या चित्रपटाद्वारे घटस्फोटानंतरही काही चांगलं घडू शकतं, असा आशावाद जागविण्याचा प्रयत्न केलाय; पण या प्रयत्नाला धक्का बसलाय तो अत्यंत संथ पटकथा, लांबलचक संवाद आणि "रूटीन' पद्धतीच्या धक्‍क्‍यांमुळं. तंत्र आणि दिग्दर्शनात अत्यंत उजवा असूनही या त्रुटी "तुझ्या-माझ्यात'चा परिणाम हरविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. एक चांगला विषय कल्पक लिखाणाअभावी फसलाय.
अस्मिता (मृणाल कुलकर्णी) आणि शशांकचा (सचिन खेडेकर) संसार मोडतो तो परस्परांतील विसंवादामुळं. दोन मुलं असूनही अस्मिताची शंकेखोर वृत्ती या दोघांना घटस्फोटापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा शशांक पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी राधिकाशी (सुलेखा तळवलकर) विवाहबद्ध होतो. अस्मिताशी घटस्फोट घेताना शशांकने आठवड्यातून दोनदा मुलांचा सांभाळ करण्याचं ठरलं असतं; पण आपल्या कामाच्या व्यापात शशांककडून मुलांच्या देखभालीबाबत हेळसांड होते. शशांकच्या दुसऱ्या विवाहामुळं दुखावलेली अस्मिता नेमक्‍या याच मुद्द्याचा "इश्‍यू' करते. चित्रपटाचा इथपर्यंतचा भाग आचके खात प्रवास करतो. प्रमोद जोशी यांच्या कथानकात नावीन्य असलं तरी शेखर ढवळीकर यांच्यासमवेत पटकथा लिहिताना ते कमी पडले आहेत. काही दृश्‍यं चांगली जमली आहेत; तर काही एकदम सपाट झालीत. प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवण्याची ताकद त्यात निश्‍चितच नाही. चित्रपटाची सुरुवात अत्यंत चांगली असेल; तर ते पुढील घटनाक्रमासाठी फायदेशीर ठरतं. परंतु दिग्दर्शकाने एक अपरिणामकारक बालगीत सुरुवातीलाच टाकून संकट ओढवून घेतलंय.
अस्मिताने आपल्या "करिअर'साठी शशांककडे मुलांना जास्त वेळ सोपविण्याचा प्रसंग जमलाय; तसेच आपण मुंबईबाहेर आहोत असं तिचं सांगणं आणि नेमक्‍या त्याच वेळी शशांकच्या पत्नीनं तिला परपुरुषाबरोबर पाहणं, यातूनही कथानक थोडं वेगळ्या वाटेकडे चाललंय याची कल्पना येते; पण याच वेळी अस्मिताला कर्करोग झाल्याचं निदान दाखवून दिग्दर्शकानं घोटाळा केलाय. हे रहस्य मध्यंतरालाच उघड केल्यानं पुढं काय डाव मांडला जाणारेय, याची साधारण कल्पना येते. अर्थात, या कल्पनेसारखं जरी घडलं असतं तरी हा चित्रपट रस्ता चुकला नसता; पण मध्यंतरानंतर लिखाणाच्या बाबतीत चित्रपट आणखीनच घसरलाय. आपल्याला कर्करोग झाल्याचं निदान झाल्यानंतर खरं तर अस्मिताच्या वागण्यात कमालीचा बदल अपेक्षित आहे. शशांक आणि राधिकाबरोबरची तिची "तू तू मैं मैं' अखेरपर्यंत सुरूच राहते. अस्मिता-शशांकच्या मुलीतील आत्मविश्‍वास जागविण्यासाठी एका नृत्यस्पर्धेचा दृश्‍यक्रम दाखविण्यात आलाय. तो खूपच लांबल्यानं कंटाळवाणा झालाय. अस्मितानं मुलांच्या आयुष्यातली आपली जागा हसत खेळत पद्धतीने राधिकाला दिली असती; तर हा चित्रपट वेगळ्या पातळीवर गेला असता, पण शेवटच्या काही प्रसंगांमधील अस्मिताचा उद्वेग पटणारा नाही. चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये राधिकासह आपल्या सर्वांचा "ग्रुप' फोटो काढून घेण्याची अस्मिताची इच्छा चांगली आहे, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला आहे. प्रमोद जोशी यांची दिग्दर्शनातील कामगिरी चांगली आहे. "राजकारण' या चित्रपटाच्या प्रभावी हाताळणीमुळं त्यांच्याबाबतच्या आशा वाढल्या होत्या. परंतु लिखाणातील दोषांमुळं ते दोन पावलं मागे गेलेत. निर्माते शिवाजीराव चमकिरे यांनी तंत्राच्याबाबतीत चित्रपट चांगला दिसावा, याची पुरेपूर काळजी घेतलीय.
नातेसंबंधांवरील चित्रपटांमध्ये कलाकारांचा मोठा कस लागतो. त्या आघाडीवर हा चित्रपट चांगला जमलाय. मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर यांनी बाजी मारलीय. दोघांनीही आपापल्या भूमिका खूप समरसून केल्यात. सुलेखा तळवलकरच्या वाट्याला बऱ्यापैकी मोठी भूमिका आलीय आणि ती त्यात छान रमून गेलीय. मोहन जोशी यांच्यासारख्या मुरब्बी कलाकाराच्या वाट्याला अगदीच क्षुल्लक भूमिका आलीय. दोन मुलांमध्ये श्रेयस परांजपेचा अभिनय नैसर्गिक आहे, पण निशाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कौमुदी वालोकरच्या कपाळावरील कायमच्या आठ्या खटकतात. आशा भोसले यांनी गायलेलं आणि प्रवीण जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं "पाणी का डोळ्यात येते...' हे गाणं चांगलं जमलंय. त्याचा पार्श्‍वसंगीतासाठी उपयोग करण्याची कल्पना चांगली आहे.

No comments: