Tuesday, July 22, 2008

किस्मत कनेक्‍शन review

"लूज' कनेक्‍शन !
दिग्दर्शक अजिज मिर्झांची ओळख म्हणजे "राजू बन गया जंटलमन', "येस बॉस', "चलते चलते' हे चित्रपट. हलकेफुलके विषय आणि त्याची तितकीच हलकीफुलकी हाताळणी, हे त्यांच्या सिनेमाचं ठळक वैशिष्ट्य. "चलते चलते'च्या यशानंतर तब्बल पाच वर्षांनी त्यांनी "किस्मत कनेक्‍शन' हा सिनेमा बनवलाय. दरम्यानच्या काळात हिंदी सिनेमा खूप बदललाय. त्यांची ही विश्रांती सिनेमातही जाणवते. यावेळी मिर्झांनी आपल्या सिनेमातून मनोरंजनाबरोबरच "सोशल मेसेज' देण्याचा प्रयत्न केलाय. पण या दोन्ही गोष्टींचं करण्यात आलेलं "कनेक्‍शन' चांगलंच "लूज' झालंय आणि इथंच हा सिनेमा गडबडलाय. काही "पॅचेस'मध्ये हा सिनेमा चांगला वाटतो. मात्र, तेवढ्यासाठी तो संपूर्ण पाहणं तापदायक ठरेल. "जब वुई मेट' आणि "लगे रहो मुन्नाभाई' असं भिन्न पद्धतीचं मनोरंजन दिग्दर्शकाच्या डोक्‍यात होतं. ते प्रत्यक्षात पडद्यावर भलत्याच रूपात उतरलंय.
हिंदी सिनेमातल्या हीरोचं चावून चोथा झालेलं नाव म्हणजे राज मल्होत्रा. मिर्झांनी आपल्या हीरोला नेमकं हेच नाव दिलंय. शिक्षणात त्यानं मोठी मजल मारलेली असते. मात्र, शिक्षण पूर्ण होऊन पाच वर्षें उलटली तरी त्याला नोकरी-व्यवसायात जम बसवता आलेला नसतो. त्याचं नशीब उघडतं ते प्रियाच्या (विद्या बालन) आगमनानंतर. दोन-चार प्रसंगात या दोघांची अपघातानं भेट होते आणि प्रत्येक वेळी ही भेट राजला फायदेशीर ठरते. प्रिया एक वृद्धाश्रम (मिर्झांनी त्याला "कम्युनिटी सेंटर' असं गोंडस नाव दिलंय) चालवीत असते. या वृद्धाश्रमाच्या जागेवर एक मॉल उभारण्यात येणार असतो. या मॉलचं काम मिळवण्यासाठी राजची धडपड सुरू असते. वृद्धाश्रम सुरू ठेवून तिथं आपण मॉल बांधण्याचा बिल्डरवर दबाव आणू, असं चित्र तो प्रियासमोर उभं करतो. प्रियाला ते खरंच वाटतं. या प्रवासादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण मॉल उभारण्याचा निर्णय होऊन तिथं वृद्धाश्रम बांधलं जाणार नसल्याचं स्पष्ट होतं तेव्हा प्रियाचे डोळे उघडतात. अखेरीस राजसुद्धा प्रियाच्या प्रेमासाठी आपला "प्रॅक्‍टिकल ऍप्रोच' दूर ठेवतो आणि एक प्रेमकहाणी यशस्वी होते.
संजय छेल या यशस्वी पटकथा लेखकानं हा सिनेमा लिहिलाय. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे मनोरंजन आणि "सोशल मेसेज' यांचा सांधा त्यांना जोडता आलेला नाही. छेल आणि मिर्झा बऱ्याच आघाड्यांवर अपयशी ठरलेत. एक तर त्यांना शाहिद कपूर आणि विद्या बालन यांच्यातली प्रेमकहाणीसुद्धा छानपणे रंगविता आलेली नाही. "जब वुई मेट'च्या "ट्रॅक'वर ही प्रेमकहाणी चालते खरी. मात्र, त्या चित्रपटातला फ्रेशनेस, त्याची ट्रीटमेंट इथं पाहायला मिळत नाही. चित्रपटाचा उत्तरार्ध "लगे रहो...'च्या वळणानं जातो. पण इथंही तीच चूक पुन्हा घडलीय. विद्या बालनचा ना वृद्धाश्रम खरा वाटतो, ना त्यातली वृद्ध मंडळी. सगळाच प्रकार अगदी बेगडी झालाय. संपूर्ण चित्रपट कॅनडामध्ये चित्रीत झालाय.
कलाकार कितीही चांगला असो, पटकथेत गडबड झाली की त्याची मात्रा चालत नाही. हा अनुभव शाहिद कपूरचा अभिनय पाहताना येतो. त्यानं अनेक दृश्‍यांमध्ये शाहरूख खान आणि दिलीपकुमार यांची नक्कल केलीय. मात्र, "जब वुई मेट'मध्ये दिसलेला खराखुरा शाहिद कपूर इथं अपवादानंच दिसतो. विद्या बालननं या सिनेमातून आपला "लूक' बदललाय. पण व्यक्तिरेखेनं तिला यावेळी हात दिलेला नाही. त्यामुळं या दोघांचं पडद्याबाहेरचं "कनेक्‍शन' सध्या गाजत असलं तरी प्रत्यक्ष चित्रपटात ते अपवादानंच पाहायला मिळतं. शाहिदच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळणाऱ्या विशाल मल्होत्रानं केलेली धमाल त्यातल्या त्यात प्रेक्षकांची करमणूक करते. ओम पुरी यांनी साकारलेली बिल्डरची भूमिकाही चांगली आहे. प्रितम यांनी संगीतबद्ध केलेली एक-दोन गाणीच जमली आहेत.

No comments: