Monday, July 14, 2008

किरण देवहन्स interview

कॅमेरामन से डायरेक्‍शन तक!
"कयामत से कयामत तक', "अक्‍स', "कभी खुशी कभी गम' आणि "जोधा अकबर' या परस्परभिन्न चित्रपटांचे छायादिग्दर्शक ही किरण देवहन्स यांची एक ठळक ओळख. जाहिरात क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये केलेली कामगिरी ही त्यांची दुसरी ठळक ओळख. त्यांच्या नावावर सध्या हजारहून अधिक जाहिराती जमा आहेत. चित्रपट तसेच जाहिरात क्षेत्रामधील करियरबद्दल त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
किरण देवहन्स मूळचे पुण्याचे. कॅमेरामन, ऍडफिल्ममेकर म्हणून नाव कमावणारे देवहन्स चांगले चित्रकार आहेत. शालांत अभ्यासक्रमातील "एलिमेंटरी' परीक्षेत ते तीन दशकांपूर्वी राज्यातून पहिले आले होते. मात्र, त्या काळात कला क्षेत्राकडं चांगल्या नजरेनं पाहिलं जात नसल्यामुळं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं पदवी घेतल्यानंतर "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मध्ये (एफटीआयआय) त्यांनी प्रवेश घेतला. चित्रपट माध्यमातल्या सर्व शाखांचं तिथं शिक्षण दिलं जात असलं तरी देवहन्स यांना कॅमेरा या प्रकारातच अधिक गती होती. विशेष म्हणजे शेवटच्या वर्षी ते आपल्या गटात सर्वोत्कृष्ट कॅमेरामन ठरले. मुंबईतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल ते सांगतात, ""नदीम खान यांच्याकडे मी सुरुवातीला सहाय्यक म्हणून काम केलं. "कसम पैदा करनेवालो की', "इल्जाम', "अलग अलग' यांसारखे अनेक चित्रपट मी त्या वेळी केले. त्या काळात छायादिग्दर्शकांना फारसे चांगले मानधन मिळत नसे. त्यामुळे त्यांना एका वेळी पाच-सहा चित्रपट करावे लागायचे. माझ्या नशिबानं खान यांच्याकडचे दोन सहाय्यक एकाच वेळी नोकरी सोडून गेले. त्यांचं जाणं माझ्या पथ्यावर पडून काही चित्रपटांचं मला स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाली. "तारे जमीं पर'मुळे प्रकाशात आलेले अमोल गुप्ते माझे चांगले मित्र. त्यांच्यामुळं माझी मन्सूर खान यांच्याबरोबर ओळख झाली आणि मला "कयामत से कयामत तक' हा पहिला सिनेमा मिळाला. तत्पूर्वी मी त्याच्यासोबत दोन वर्षं जाहिरात क्षेत्रासाठी काम केलं होतं. या काळात मी त्याच्याबरोबर तब्बल 500 जाहिराती केल्या.''
सर्वसाधारणपणे कोणत्याही कलाकाराचा कारकिर्दीतला पहिला सिनेमा हिट गेला की त्याच्यावर नवीन चित्रपटांचा वर्षाव होतो. देवहन्स यांच्याबाबत नेमकं तसंच घडलं. शेखर कपूर, राहुल रवैल या मान्यवरांबरोबरच अनेकांनी देवहन्स यांना आपल्या चित्रपटासाठी छायादिग्दर्शक म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण यापैकी एकही ऑफर न स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट करताना देवहन्स म्हणतात, ""काही चित्रपटांची फोटोग्राफी करूनही मला चांगले मानधन मिळाले नव्हते. चार जणांच्या खोलीतील एक अशीच माझी मुंबईतील ओळख होती. बाहेरगावहून कोणी नातेवाईक मला भेटायला आला तर त्याची व्यवस्था कुठं करायची, असा मला प्रश्‍न पडला. तेव्हा जाहिरात क्षेत्र की सिनेमा या दोन्हीपैकी एकाची निवड करणं गरजेचं होतं. कारण, जाहिरात क्षेत्रात चांगलं नाव कमाविण्यासाठी प्रथम तिथं चार-पाच वर्षं घालवावी लागतात. बऱ्याच विचारविनिमयानंतर मी जाहिरात क्षेत्राची निवड करून पुढची दहा वर्ष तरी सिनेमासाठी काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. आज जेव्हा मी तटस्थपणे विचार करतो तेव्हा माझा हा निर्णय योग्य होता, असं लक्षात येतं. कारण, जाहिरात क्षेत्रात त्या काळात फारसे चांगले कॅमेरामन नव्हते. त्यामुळं मी चित्रीत केलेल्या बहुतेक सर्व जाहिराती गाजल्या. कालांतरानं मी माझं स्वतःचं "कॅंडिड क्रिएशन्स' नावाचं "प्रॉडक्‍शन हाऊस' सुरू केलं. या कंपनीतर्फे शाहरूख खान, सचिन तेंडुलकर, जुही चावला यांच्यावर चित्रीत केलेल्या सर्व जाहिराती खूप गाजल्या.''
1988 ते 1998 या दहा वर्षांमध्ये देवहन्स यांनी जवळपास एक हजारहून अधिक जाहिराती केल्या. राकेश मेहरांच्या "अक्‍स'मुळं पुन्हा ते छायादिग्दर्शनाकडं वळले. या चित्रपटांचे "रशेस' पाहिल्यानंतर करण जोहरनं आपल्या "कभी खुशी कभी गम' चित्रपटासाठी त्यांना आमंत्रित केलं. "फाईव्ह स्टार' सोयीसुविधा पुरविणारा दिग्दर्शक असा ते करणचा उल्लेख करतात. आशुतोष गोवारीकर यांचा "स्वदेस' चित्रपट त्यांना इतर "कमिटमेंटस्‌'मुळं करता आला नाही, पण गोवारीकर "जोधा अकबर'ची तयारी करीत आहेत, हे समजल्यानंतर त्यांनी स्वतःहून आपण या चित्रपटासाठी काम करण्यास तयार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे या चित्रपटातील देवहन्स यांचं कॅमेरावर्क वाखाणलं गेलं. जाहिरात क्षेत्रामधील अत्युच्च दर्जाचं काम आणि बिगबजेट चित्रपटांमुळं देवहन्स कमी बजेटमध्ये काम करायलाच तयार नाहीत, असा एक समज या काळात त्यांच्याबद्दल झाला. तो खोटा ठरविण्यासाठी ते आता अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या नवीन चित्रपटासाठी काम करणार आहेत. या चित्रपटापाठोपाठ एखाद्या बिगबजेट चित्रपटाचं छायादिग्दर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे आणि त्यानंतर त्यांना स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करायचाय. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येकाचं एक ना एक दिवस दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न असतं. देवहन्स यांचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास अगदी अंतिम टप्प्यात आहे.

No comments: