Saturday, August 23, 2008

review-"मान गये मुघल-ए-आझम'

"शोले' आणि "जाने भी दो यारो...' या दोन अशा कलाकृती आहेत की, ज्या वारंवार तरुण निर्माता-दिग्दर्शकांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना नको ते करायला भाग पाडतात. लेखक-दिग्दर्शक संजय छेल यांचा "मान गये मुघल-ए-आझम' हा सिनेमासुद्धा अशाच एका भंगलेल्या स्वप्नाची कहाणी आहे.
"मान गये मुघल-ए-आझम' या "टायटल'वरून या सिनेमाचा के. आसिफ यांच्या "मुघल-ए-आझम'शी अगदी जवळचा संबंध असेल, असं वाटण्याची शक्‍यता आहे; मात्र हा सिनेमा "मुघल-ए-आझम'शी नव्हे, तर "जाने भी दो यारो'शी संबंधित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चटपटीत लिखाणात छेल यांनी चांगलं यश मिळवलं आहे, पण दहा-पंधरा चांगले संवाद आणि प्रसंगांमुळं सिनेमा बनत नाही, हे छेल यांना ठाऊक नसावं. एकाच कथानकातून त्यांनी देशभक्ती, प्रेम, रहस्य मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि अपेक्षेप्रमाणे एक ना धड... असा "फील' या सिनेमाला आलाय. परेश रावल, के. के. मेनन, राहुल बोस, मल्लिका शेरावत अशी चांगली "कास्ट' असूनही वेगळेपणाच्या हव्यासामुळं ती "वेस्ट' गेलीय.
या चित्रपटालाही बॉम्बस्फोटाचीच पार्श्‍वभूमी आहे. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांची तयारी फेब्रुवारीत झाली. लेखकानं त्याचा संबंध आपल्या कथानकाशी जोडलाय. गोव्यातील एका नाटक कंपनीचा परेश रावल हा मुख्य अभिनेता. मल्लिका शेरावत ही त्याची पत्नी. "मान गये मुघल-ए-आझम' या नाटकात परेश अकबर बादशहाचा, तर मल्लिका अनारकलीची व्यक्तिरेखा साकारीत असते. राहुल बोस हा "रॉ'चा एक अधिकारी. तो गुन्हेगारांच्या शोधासाठी गोव्यात येतो आणि मल्लिकाच्या प्रेमात पडतो. तो आणि मल्लिका देशप्रेमाच्या नावाखाली परेश रावलचा वापर करून घेतात. चित्रपटाचा व्हिलन झालाय तो के. के. मेनननं साकारलेला एका गझल गायक. त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध असतात. मल्लिका आणि परेश रावळच्या मदतीनं राहुल बोस हे संबंध उघडकीस आणतो.
"जाने भी दो यारो'द्वारे दिग्दर्शक कुंदन शहा यांनी एक छान सामाजिक-राजकीय प्रहसन सादर केलं होतं. संजय छेल यांना या सिनेमातून असंच काहीतरी अपेक्षित होतं, पण कच्च्या लिखाणामुळं त्यांची ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. छेल यांच्यातील लेखक एवढा कमी पडला आहे की, या चित्रपटाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत "ग्रीप' घेता आलेली नाही. दहा पाच-दहा मिनिटांनी एखाद-दुसरा चांगला संवाद, या गतीनं हा सिनेमा सुरू राहतो. परेश-मल्लिकाच्या व्यक्तिरेखा चांगल्या उभ्या राहिल्यात, पण राहुल बोस आणि के. के. मेनन यांच्याबद्दल तसं म्हणता येत नाही. या सिनेमात "मान गये...' हे नाटक बऱ्याचदा पाहायला मिळतं. या नाटकातली कलाकार मंडळी वारंवार आपले संवाद बदलतात, नको ती "ऍडिशन्स' घेतात, त्यांच्या अभिनयात कोणतंही गांभीर्य दिसत नाही... तरीसुद्धा हे नाटक पाहायला अनेकांनी गर्दी केल्याचं दिसतं.
मल्लिका आणि राहुल बोस यांचं खरोखरीच "अफेअर' असतं की राहुलच्या देशप्रेमाचा तो एक भाग असतो, याचा सिनेमा संपला तरी पत्ता लागत नाही. परेश रावल हे "सीझन्ड ऍक्‍टर' असल्यामुळे त्यांनी आपला भाग तयारीनं सादर केलाय. मल्लिकानंही आपल्या मर्यादा सांभाळून त्यांना चांगली साथ दिलीय. राहुल बोसची "इमेज' या सिनेमाद्वारे तोडण्यात आलीय. के. के. मेनन त्याच्या भूमिकेत अगदीच "मिसफिट' वाटलाय. अन्नू मलिक यांचं संगीत ऐकताना या चौघांचा गोंधळ बरा म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा सिनेमा संपल्यानंतर छेल यांना एखादं नवीन स्वप्न पडो, एवढीच काय ती शुभेच्छा द्यावीशी वाटते.

review-मुंबई मेरी जान

मुंबई... जी कधी थकत नाही आणि जी कधीही दमत नाही... असा मुंबईनगरीचा गौरव केला जातो. कधी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कधी दहशतवादानं मांडलेला क्रूर खेळ असो... अनेक संकटं कोसळूनही हे शहर काहीच घडलं नसल्याप्रमाणे आजवर कार्यरत राहिलेलं आहे. हिंदी चित्रपटांमधून ही मुंबई अनेक वेळा प्रेक्षकांसमोर आली आहे, पण या मुंबईला जिवंत ठेवणारा सर्वसामान्य मुंबईकर सेल्युलॉईडद्वारे प्रभावीपणे अपवादानेच आपल्यासमोर आलाय. ही कसर निशिकांत कामत यांच्या "मुंबई मेरी जान' या सिनेमानं भरून काढलीय. मुंबईत 2006 च्या जुलैत लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्‍वभूमी निवडत कामत यांनी मुंबईच्या "स्पिरिट'ला एक आगळावेगळा सलाम ठोकलाय. तो आपण स्वीकारलाच पाहिजे. बॉम्बस्फोट का घडला, कोणी घडविला, त्याचे धागेदोरे कसे मिळाले... या "रिसर्च'मध्ये गुंतून न पडता दिग्दर्शकानं आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य मुंबईकरांवर ठेवलाय. त्यामुळेच हा सिनेमा पाहणाऱ्याच्या हृदयाला भिडतो, त्याला अनेकदा अस्वस्थ करतो आणि मुंबईकरांच्या उपजत "ह्युमर'ला दाद देण्यास भाग पाडतो. "युटीव्ही'ची दर्जेदार निर्मिती, कसदार लेखन, संजय जाधव यांचं अप्रतिम कॅमेरावर्क आणि कामत यांच्या "पॉलिश्‍ड' दिग्दर्शनामुळं हा सिनेमा वेगळ्या वाटेचा असूनही अत्यंत परिणामकारक ठरलाय.
बॉम्बस्फोट होण्याआधी; तसेच तो झाल्यानंतर सहा व्यक्तींच्या आयुष्यावर दिग्दर्शकानं आपला "फोकस' ठेवलाय. परेश रावल हे पोलिस दलातील एक वरिष्ठ कॉन्स्टेबल दाखवलेत. अवघ्या दहा दिवसांनंतर ते पोलिस सेवेतून निवृत्त होणार असतात. विजय मौर्या हा त्यांचा तरुण सहकारी. या दोन व्यक्तिरेखांमधील संवादांद्वारे दिग्दर्शकानं अख्ख्या पोलिस दलाचं "आरपार' चित्र उभं केलंय. हिंदी चित्रपटांमधील पोलिस हा नेहमीच विनोदाचा विषय झालाय. हा सिनेमा त्याला छेद देऊन गेलाय. सोहा अली खान ही एका चॅनेलमधील तरुण, तडफदार पत्रकार. लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर तिच्यातली पत्रकार जागी होते, मात्र आपला पती बॉम्बस्फोटात मरण पावल्याचं तिला समजतं. या वेळी बातमी शोधायला गेलेली सोहा आपल्याच चॅनेलची एक "ब्रेकिंग न्यूज' ठरते आणि तिचा "बाईट' घेण्यापर्यंत मजल जाते.
या सिनेमातलं चौथं व्यक्तिमत्त्व आहे ते इरफान खान. दक्षिणेतल्या कोणत्यातरी खेडेगावातून आलेली ही व्यक्ती मुंबईत सायकलवरून चहा-कॉफी विकत असते. बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच त्याची भेट परेश रावल आणि विजय मौर्याशी होते आणि त्याच्या आयुष्याला वळण मिळतं. आपला काही गुन्हा नसताना पोलिस त्रास देत असल्यामुळे इरफान त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीनं सूड उगवतो. कधी मॉलमध्ये खोटा बॉम्ब ठेवल्याचा फोन कर; तर कधी रेल्वेस्थानकामध्ये, मात्र त्याच्या एका खोट्या फोनमुळं एका व्यक्तीला "हार्टऍटॅक' येतो. या वेळी इरफानचं झालेलं परिवर्तन आणि त्यानंतर त्याची कृती या सिनेमाला हळूहळू उंचीवर नेऊ लागते. माधवन हा कट्टर देशभक्त. प्रदूषणाचं प्रमाण रोखण्यासाठी तो स्वतः ऐपत असूनही चारचाकीमधून न फिरता लोकलमधूनच प्रवास करीत असतो, मात्र बॉम्बस्फोटाचा "आँखो देखा हाल' पाहिल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं. के. के. मेनन हा सुशिक्षित बेरोजगार. कॉम्प्युटर इंजिनियर असूनही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. मग काय, रिकाम्या मनात सैतानाचं भूत अवतरणारच. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व मुस्लिमांकडे तो ते दहशतवादीच आहेत, या नजरेतून बघत असतो आणि आपल्या मित्रांचेही कान भरत असतो, मात्र बॉम्बस्फोटानंतर अशा काही घटना घडतात, की त्याचे डोळे उघडतात.
योगेश विनायक जोशी आणि उपेंद्र सिधये यांनी या सिनेमाची कथा-पटकथा लिहिलीय. या सहा व्यक्तींचे पाच "ट्रॅक' परस्परांमध्ये मिसळणं हे खूप अवघड काम होतं, पण लोकलचा एका "ट्रॅक'वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाताना जो खडखडाट होतो, तसा खडखडाट लेखक-दिग्दर्शकानं होऊ दिलेला नाही. हे त्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. परेश रावल आणि विजय मौर्याचा "ट्रॅक' सर्वाधिक परिणामकारक आहे. सोहा आणि माधवनचा "ट्रॅक' ठीकठाक असून, इरफानचा खूप वेगळा वाटतो. तुकाराम पाटील या व्यक्तिरेखेत परेश रावल यांनी कमाल केलीय. या कलाकाराला कोणताही "रोल' द्या, त्यात त्याचं भिडणं विलक्षण असतं. रावल यांच्या कारकिर्दीतील काही भन्नाट भूमिकांपैकी ही भूमिका एक ठरावी. विजय मौर्या यांनी रावल यांना खूप छान साथ दिलीय. चांगला दिग्दर्शक असेल; तर सोहा अली खानचा प्रभाव जाणवतो, हे यापूर्वीही दिसून आलं होतं. या सिनेमात नेमकं तेच पाहायला मिळतं. इरफान खान, माधवन आणि के. के. मेनन हे तिघेही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना अगदी "टॉप फॉर्म'मध्ये वाटतात. सिनेमाच्या शेवटी "ये दिल है मुश्‍किल...' हे गाणं "बॅकग्राऊंड'वर ऐकविण्याची कल्पनाही भन्नाट आहे. "डोंबिवली फास्ट'मुळे वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कामत यांना यश आलंय. हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करण्यासाठी आणखी एक मराठी दिग्दर्शक सज्ज होतोय. त्याच्या या प्रयत्नांचं कौतुक करायला हवं.