Monday, May 23, 2011

लालफितीत अडकला "शो मन'


लालफितीत अडकला "शो मन'
---------
तब्बल 35 वर्षांची निर्माता-दिग्दर्शक म्हणून यशस्वी कारकीर्द आणि "व्हिसलिंग वूडस्‌'नं जागतिक स्तरावर मिळवलेली ख्याती या दोन गोष्टी सुभाष घईंचं मनोरंजन क्षेत्रामधील मोठेपण सिद्ध करणारी आहेत. "क्‍लास'-"मास'च्या आवडीची नाडी जाणणारा आणि राज कपूर यांच्यानंतर "शो मन' ही पदवी मिळविणारा हा दिग्गज दिग्दर्शक सध्या मात्र काही कारणांमुळे अडचणीत सापडलाय. ही कारणं आणि आपल्या कारकिर्दीबद्दल घई यांनी प्रथमच परखडपणे केलेली ही चर्चा.
-------------
मुलाखतीचा पहिलाच प्रश्‍न ऐकून समोरच्याची कळी खुलावी, असं खूप कमी वेळा घडतं. पण ज्यावेळी असं घडतं तेव्हा मग मुलाखतकाराच्या वाट्याला जबरदस्त असं काहीसं येतं. सुभाष घईंशी संवाद साधताना असंच काहीसं घडलं आणि घईंच्या मनात ठसठसत असलेलं दुःख पहिल्यांदाच तीव्र स्वरूपात बाहेर पडलं. "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बॉलीवूडमध्ये मिळालेल्या चांगल्या संधी आणि या संस्थेत विदेशी विद्यार्थ्यांचा वाढत असलेला ओघ याबाबत घईंना बोलतं करायचं होतं. त्यानिमित्तानं सात वर्षांपूर्वी या संस्थेच्या पायाभरणीच्या वेळी मनात असलेल्या योजना आणि प्रत्यक्षात साकारलेलं या योजनांचं रूप आशादायी आहे का ? हा प्रश्‍न ऐकून सुभाषजी खुलले आणि त्यांच्या मनातील दुःख "नॉनस्टॉप' बाहेर पडायला सुरुवात झाली.
"" "व्हिसलिंग वूडस्‌'मध्ये राज्य सरकारची जमीन लाटून सुभाष घईंनी स्टुडिओद्वारे फक्त आपलं हित साधलं, अशाप्रकारचं जे काही जनमत तयार केलं गेलं, ते मला प्रचंड खुपणारं आहे. असे आरोप ऐकले की माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण, कोणाची जमीन लाटून पैसे कमवावे, ही माझी वृत्ती नाही. मी आजवर अनेक नवोदितांना माझ्या चित्रपटातून संधी दिली. पण, मुंबईत कामासाठी येणाऱ्यांचा ओघ खूप मोठा आहे. इथं येणाऱ्या प्रत्येकाची अशी तक्रार असायची की आम्ही फिल्मवाल्यांची मुलं नसल्यामुळे आम्हांला इथं संधी मिळत नाही. ही गोष्ट मला बोचली. कलाक्षेत्रात काहीतरी करण्याच्या इच्छेनं अनेक जण मुंबईत येतात आणि त्यानंतर ते "गुमराह' होतात. त्यांना योग्य रस्ता दाखविण्यासाठी आंतरराष्ट्रीय तोडीची संस्था मला उभारायची होती. त्यामुळे 1993 मध्ये चित्रपट माध्यमाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचं मी स्वप्न पाहिलं. परंतु, सरकारच्या पातळीवर त्याची दखल घेण्यासाठी पुढं आणखी दहा एक वर्षं गेली आणि या संस्थेची पायाभरणी झाली ती 2004मध्ये. ही संस्था उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोरेगावच्या फाळके चित्रनगरीचे तेव्हाचे संचालक गोविंद स्वरूप यांनी पुढाकार घेतला. सरकारशी मैत्री करणंही अनेकदा धोक्‍याचं असतं, हे मला ठाऊक होतं. परंतु, स्वरूप यांच्या आग्रहामुळे चित्रनगरीत चित्रपट प्रशिक्षण संस्था उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. यावेळी सरकारच्या जमिनीवर शैक्षणिक संस्था उभारणे आणि या संस्थेच्या विकासासाठी स्टुडिओ चालवण्याचा आम्ही करार केला. या मध्ये ही जमीन आमच्या संस्थेला विकण्यात आली, हा कुठेही उल्लेख नव्हता किंवा तसा विचारही कधी माझ्या मनात आला नव्हता. प्रारंभीच्या करारानुसार एकूण 20 कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. त्यापैकी 17 कोटी माझ्या संस्थेतर्फे भरले गेले आण
ि उरलेले तीन कोटी राज्य सरकारने भरावेत, असं ठरलं. अर्थात ती रक्कमही नंतर आमच्याच संस्थेनं भरली. सर्व काही ठरलं. भूमिपूजन झालं आणि इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच त्याविरुद्ध न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. या याचिकेतील मुद्यांवर सरकारतर्फे व्यवस्थित उत्तरे द्यायला हवी होती. राज्य सरकारच्या जमिनीचा वापर एका चांगल्या शैक्षणिक संस्थेसाठी होणार आहे, हे न्यायालयासमोर आणायला हवं होतं. मात्र तसं घडलं नाही आणि तब्बल सात वर्षं या शैक्षणिक संस्थेची प्रगती रोखली गेली. ही संस्था प्रत्यक्षात आणण्यापूर्वी मी देश-विदेशातील तब्बल 42 संस्थांना भेटी देऊन तेथील कार्यभार पाहिला आणि प्रत्येकातील चांगल्या गोष्टी हेरून त्यांचा अंतर्भाव आमच्या संस्थेत केला.''
गेल्या काही वर्षांपासून घईंचा राज्य सरकारबरोबर सातत्यानं विविध माध्यमांद्वारे संवाद सुरू आहे. परंतु, त्यातून काहीच मार्ग निघालेला नाही. मंत्री, शासकीय अधिकारी फकत गोड गोड बोलतात आणि नवनवीन आश्‍वासनं देतात. परंतु, कृतीची वेळ आली की पाठ फिरवतात असा विदारक अनुभवही घई व्यक्त करतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीची वेळ मागून आता बरेच महिने झाले आहेत; परंतु त्यांनाही याबाबत मला भेटावंसं वाटत नाही, यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही, हे स्पष्ट करून घई पुढं म्हणतात, ""या संस्थेच्या उभारणीसाठी आता जवळपास 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. मुलांच्या "फी'मधून उत्पन्न मिळत असले तरी ते एवढ्या मोठ्या "स्केल'वरची संस्था चालविण्यास अपुरे आहे. सुरुवातीला 20 एकर जमिनीवर ही संस्था विकसित करायची असं ठरलं असतानाही अवघ्या चार एकर जागेवरच आम्हांला समाधान मानावं लागलं आहे. दरवर्षी आमच्या "बॅलन्स शीट'मध्ये सहा कोटींचा तोटा आढळत आहे. "मुक्ता आर्टस्‌'द्वारे चित्रपट निर्मिती करून तेथून मिळालेला पैसा या संस्थेच्या उभारण्यासाठी आम्ही वापरत आहोत. परंतु राज्य सरकारनं एकंदरीत आम्हांला पांढऱ्या हत्तीवर बसवून आता या प्रकरणात हात वर करण्याची भूमिका घेतली आहे. एवढी मोठी गुंतवणूक केल्यामुळे मला आता दुसरीकडे जाणंही शक्‍य नाही. परंतु, आणखी किती काळ वाट पाहायची यालाही काही मर्यादा आहेत. आता आमच्या अगदी नाकातोंडाशी पाणी आलंय. जीव गुदरमला जातोय. सरकारची कागदपत्रे व्यवस्थित नाहीत, त्याला आम्ही कसे काय जबाबदार असू शकतो ? या प्रकल्पामध्ये राज्य सरकार आमचे भागीदार असल्यामुळे मी इतकी वर्षं गप्प राहिलो होतो. परंतु, त्याचा गैरफायदा घेण्यात आला. त्यामुळेच पुढील काही महिन्यांमध्ये याचा निर्णय न लागल्यास नाईलाजास्तव मला राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागावी लागेल. एक
ीकडे मनोरंजन विश्‍वासाठी बरंच काही करण्याच्या वल्गना केल्या जातात आणि दुसरीकडे आशियातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक मनोरंजन शिक्षण संस्थेच्या कामात अडथळे आणले जातात, हे काही योग्य नाही.''
एवढ्या सगळ्या विपरीत गोष्टी घडत असतानाही संस्थेच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही, याची काळजी घईंनी या काळात घेतली. या संस्थेत सध्या 400 मुलं प्रशिक्षण घेत असून त्यापैकी 70 मुलं ही युरोपीय देशांमधील आहेत. इथून बाहेर पडलेल्या 70 टक्के विद्यार्थ्यांना ग्लॅमर जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं मिळाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी या संस्थेत अध्यापनाचं काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये घईंनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना फारसं यश मिळालेलं नाही. या अपयशाचं विश्‍लेषण करताना घई म्हणतात, ""आपलं मन स्थिर असेल तर आपल्या हातून चांगलं काम घडतं. एवढ्या विचित्र मनोवस्थेत चित्रपट दिग्दर्शित करणं खरोखरच शक्‍य नाही. "व्हिसलिंग वूडस्‌'च्या उभारणी प्रक्रियेत जे अडथळे आले त्याचा निश्‍चितच माझ्या "क्रिएटिव्हिटी'वर परिणाम झालाय. परंतु, एवढ्या सहजासहजी हार मानणाऱ्यांमधला मी नाही. काहींना वाटतंय की, दिग्दर्शनाचा माझा फॉर्मच हरवलाय. परंतु, मला त्यात काही तथ्य वाटत नाही. दिवसातले 16 तास मी कार्यरत आहे. गेल्या चार दशकांमध्ये मी निर्मिलेल्या 18पैकी 14 चित्रपटांना यश आलंय. हा "रेशो' नक्कीच चांगला आहे. अपयशाला मी घाबरत नाही. कारण, कोणत्याही दिग्दर्शकाला प्रयोग हे करावेच लागतात. काही लोकांना असं वाटतंय की, घईंच्या स्टाईलचा सिनेमा आता "आऊटडेटेड' झालाय. परंतु, त्याच्याशीही मी सहमत नाही. कारण हे जर खरं मानायचं ठरवलं तर "दबंग'सारखा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला नसता. हा सिनेमा माझ्या "स्टाईल'शी अगदी मिळताजुळता आहे. खुद्द सलमाननं मला या चित्रपटाच्या "मेकिंग'दरम्यान ""हम "राम लखन' पॅटर्न की फिल्म बना रहे है ।' असं सांगितलं होतं. या चित्रपटाच्या यशामुळे माझा विश्‍वास वाढलाय. लवकरच माझं दिग्दर्शन असलेल्या नवीन चित्रपटाची मी घोषणा करीन. एकीकडे निव्वळ मनोरंज
न चित्रपटांची निर्मिती सुरू असताना काही वेगळ्या आशयघन चित्रपटांनाही आम्ही प्राधान्य दिलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150व्या जन्मतिथीचं निमित्त साधून आम्ही एक बंगाली चित्रपट "कश्‍मकश' या नावानं हिंदीत डब केलाय. मराठीतही खूप चांगलं साहित्य आहे, ज्याचा सिनेमा होऊ शकतो. त्यावरदेखील आमचं काम सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आमच्यासोबत पुढील कलाकृती करणार आहेत. ज्या लेखक-दिग्दर्शकांकडे खूप चांगल्या कल्पना आहेत, तेदेखील आमच्याशी संपर्क साधू शकतात.
- मंदार जोशी

Monday, May 16, 2011

अमोल गुप्तेंचा नवा डबा"तारे जमीं पर'चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक अमोल गुप्ते तब्बल साडे तीन वर्षांनी "स्टॅन्ली का डब्बा' या चित्रपटाद्वारे आपला दुसरा डबा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. मनोरंजन आणि सामाजिक संदेशाचं आपलं धोरण त्यांनी या चित्रपटातही कायम ठेवलंय. या डब्यातील खाऊ आणि तो बनविताना घेतलेल्या कष्टांबद्दल अमोल गुप्ते यांच्याशी केलेली ही चर्चा.
------------
एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की मुलाखतींच्या निमित्तानं निर्माता-दिग्दर्शकांच्या भेटी होतच राहतात. मात्र, चित्रपटाचं भवितव्य एकदा स्पष्ट झालं की पुढच्या कलाकृतीपर्यंत तो दिग्दर्शक पुन्हा काही भेटत नाही. परंतु, काही दिग्दर्शक पहिल्याच भेटीत आपल्या मनावर ठसतात आणि मग त्यांच्या अनौपचारिक भेटी सुरू राहतात. अशा भेटींचा आनंद ज्या काही मोजक्‍या दिग्दर्शकांनी दिलाय त्यापैकी एक म्हणजे अमोल गुप्ते. "तारे जमीं पर' प्रदर्शित झाल्यापासून अमोल गुप्ते यांच्याशी नियमित संपर्कात राहण्याची संधी मला मिळालीय. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये या कलावंताला भेटल्यानंतर प्रत्येक वेळी चित्रपट माध्यमाबाबत काहीतरी वेगळी माहिती, वेगळे संदर्भ ऐकायला मिळालेत. इतर व्यावसायिक दिग्दर्शकांप्रमाणे काही हातचं राखून बोलणाऱ्यांमधला हा दिग्दर्शक नाही. त्याचा प्रत्यय यावेळच्या भेटीतही आला. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वांद्रे इथल्या जुन्या ऑफिसमध्ये आमची भेट झाली. इथं कधी "शिफ्ट' झालात ? अशा सहज विचारलेल्या प्रश्‍नाचं त्यांनी सुभाष घई आणि करण जोहर यांची कृपा असं सहजपणे उत्तर दिलं. "करण जोहरनं काही कामानिमित्त घईंचं ऑफिस भाड्यानं घेतलं आणि आपलं काम संपल्यानंतर त्यानं मला इथं "स्टॅन्ली का डब्बा'चं काम करू दिलं. पहिल्या काही महिन्यांचं भाडं स्वतः करणनं भरलं आणि नंतरच्या महिन्यांचं भाडं घईंनी मागितलेलं नाही,' अमोल गुप्ते मनमोकळेपणे ही माहिती देतात आणि "स्टॅन्ली का डब्बा'च्या अंतरंगात डोकावण्यापूर्वी किती जणांची आपल्याला मदत मिळालीय, याचा नेमका उल्लेख करतात.

"स्टॅन्ली का डब्बा' याचा विषय आणि शीर्षकाबद्दल वेगळी माहिती देताना गुप्ते म्हणतात, ""अंधेरीतील होली फॅमिली हायस्कूलमध्ये मी दुसरी ते सातवीदरम्यान शिकायला होतो. या शाळेत मला स्टॅन्ली नावाचा मित्र भेटला. त्याच्याबरोबर माझी मैत्री होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा "फोर टायर'चा टिफीन डबा. त्यात फार काही वेगळे खाद्यपदार्थ नसायचे बरं. पण साधाच बटाट्याचा रस्सा आणि काही पुऱ्यांचा स्वाद असा असायचा की अख्खा वर्ग त्याच्या प्रेमात पडायचा. चार ठिकाणी दणके खाल्लेला तो साधा ऍल्युमिनीयमचा डबा होता. त्यानं कुठल्या माळ्यावरून तो काढला, हे मलादेखील माहित नाही. तो डबा माझ्या इतकी वर्षं लक्षात राहिला आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट बनविण्यात आला. शाळेचा खाऊचा डबा हा प्रत्येक मुलगा आणि आईचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आईचं प्रेम प्रत्येक डब्यातील खाद्यपदार्थात उतरलेलं असतं. आमचा "स्टॅन्ली का डब्बा'सुद्धा असाच प्रेमाचा डबा आहे. तो प्रेक्षकांनी खाल्ला तर तो त्यांना निश्‍चितच आवडेल. मुलं एकमेकांकरीता कशी उभी राहतात, हेदेखील या चित्रपटामधून पाहायला मिळेल.''

"तारे जमीं पर'च्या यशानंतर प्रेक्षक अमोल गुप्तेंकडून लगेचच एखाद्या नवीन कलाकृतीची अपेक्षा करीत होते. परंतु, ती कलाकृती पडद्यावर येण्यामध्ये साडे तीन वर्षांचा काळ लोटला. याबद्दल गुप्ते सांगतात, ""साधारण दोन वर्षांपूर्वीच मी "सपनों को गिनते गिनते' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार होतो. या चित्रपटाची गाणीही तयार झाली होती. परंतु, मध्यंतरी अशा काही अडचणी आल्या की हा चित्रपट काही पुढेच सरकेना आणि मग स्वतःबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल विचार करताना मला स्टॅन्लीचा विषय सुचला. परंतु, हा काही मी ठरवून केलेला चित्रपट नाही. सर्वप्रथम मुलांची कार्यशाळा घेण्याचं मी ठरवलं. त्यात जवळपास पाचशे मुलांनी भाग घेतला. या मुलांचा वेळ मिळवण्यासाठी मी होली फॅमिली शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कपूर यांना भेटलो. दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कार्यशाळा घेण्याचं ठरलं. खाऊचा एक डबा मुलांनी आणावा आणि एक डबा माझ्याकडून देण्याचं मी सुचवलं आणि आमची कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळेच्या चार तासांपैकी एक तास डबा वाटण्यात आणि खाण्यात जायचा. उरलेल्या वेळात जे काही चित्रीत करता येईल तेवढं आम्ही केलं. असं करता करता दीड वर्षं गेलं आणि हा डबा तयार झाला. शूटिंगच्या वेळी आम्ही कसल्याही प्रकारचा तामझाम केलेला नाही. स्पॉटबॉय, मोठमोठे लाईट्‌स आणि प्रॉडक्‍शन मॅनेजरशिवाय हा चित्रपट बनलाय. आमचा छायालेखक अमोल गोळेनं खूप चांगलं काम केलंय. सत्तरचा कॅमेरा वापरून त्यानं हा चित्रपट शूट केलाय. मालिका, जाहिराती आणि चित्रपटांमध्ये लहान मुलांना दहा-बारा तास राबविलं जातं. तसं आम्ही या चित्रपटाबाबत घडू दिलेलं नाही. चार तासांच्या वर आमची कार्यशाळा कधी चालली नाही. आमच्या या चित्रपटात 500 मुलं आहेत. परंतु, शूटिंगमुळे एकाही मुलाची कधी शाळा बुडली नाही.''

"तारे जमीं पर'मध्ये आमिर खानसारखा मोठा स्टार होता. "स्टॅन्ली...'साठी एखाद्या नामांकीत स्टारचा विचार नाही केलात का, या प्रश्‍नावर गुप्ते म्हणाले, ""काय वाट्टेल ते झालं तरी चित्रपट करायचा, या इराद्यानं हा चित्रपट बनलेला नाही. एका छोट्या कार्यशाळेच्या माध्यमातून हा चित्रपट घडलाय. सलग दीड वर्ष शनिवारचे चार तास देणारे स्टार कलाकार आज आहेत का ? याचं निश्‍चित उत्तर नाही असंच आहे. कारण, हल्ली प्रत्येक स्टार आपल्या फायद्याचा विचार करतो. मात्र, तशा फायद्याची खात्री "स्टॅन्ली का डब्बा'द्वारे देण्याच्या स्थितीत तेव्हा तरी मी नव्हतो. त्यामुळे जे काही मित्र माझ्याबरोबर आले त्यांना सोबत घेऊन मी पुढं गेलो. दिव्या दत्ता, राजेशनाथ झुत्शी, अपूर्वा लाखिया... यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. संगीताच्या आघाडीवरही मला सुखविंदर, शंकर महादेवन, विशाल दादलानी यांची मदत झाली. या सर्वांना मी फक्त एक फोन केला आणि कसल्याही मानधनाशिवाय ते माझ्याकडे गायले. शंकरनं मला मानधन म्हणून हंडीभर मटण शिजविण्यास सांगितलं. असं प्रेम पाहायला मिळालं की खरंच आपण करीत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं. या चित्रपटाला संगीत दिलंय ते हितेश सोनिकनं. तो पूर्वी विशाल भारद्वाजचा मदत करायचा. मी लिहिलेल्या शब्दांचं वजन अचूक ओळखून त्यानं काम केलंय.''

या चित्रपटाच्या निर्मितीत गुप्तेंना सर्वाधिक मदत मिळाली ती त्यांची पत्नी दीपा भाटिया आणि मुलगा पार्थो यांच्याकडून. "स्टॅनली'ची मुख्य व्यक्तिरेखा पार्थोनंच साकारली आहे आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी करताहेत. हा विषय गुप्तेंकडे काढला असता ते शिताफीनं आपल्या मुलावरचा "फोकस' दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात आणि हसत ते म्हणतात, ""माझ्या कोणत्या मुलाबद्दल तुम्ही विचारताय ? स्टॅन्लीसारखीच आणखी 170 मुलं या चित्रपटात आहेत. "तारे जमीं पर'मधला दर्शिल सफारीसुद्धा माझाच मुलगा आहे. सगळेच माझ्याकडे खूप छान काम करतात. दीपाबद्दल विचाराल तर मी सांगेन की, ज्या वेळी मी कार्यशाळा घेत होतो, त्यावेळी ती "माय नेम इज खान' आणि "वुई आर फॅमिली'च्या संकलनात व्यस्त होती. या चित्रपटाचं काम संपल्यानंतर तिनं आम्ही केलेलं फुटेज "एडिट लाईन'वर घेतलं. तब्बल महिनाभर तिनं हे आमचं फुटेज व्यवस्थित पाहिलं आणि त्यात एक धमाल चित्रपट दडल्याचं तिलाही कळलं आणि अशाप्रकारे हा चित्रपट बनला. तो आता "फॉक्‍स स्टार'द्वारे प्रदर्शित होतोय. या संस्थेच्या पाठिंब्यामुळे आमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचेल, याची मला खात्री आहे. तरीपण या काळात विशाल भारद्वाज, करण जोहर या माझ्या मित्रांनी केलेलं सहकार्य मी विसरू शकणार नाही. करणच्या "एडिटिंग मशीन'वर हा चित्रपट संकलित झालाय. हा चित्रपट "फॉक्‍स'नं प्रदर्शित करावा यासाठी करणनंच पुढाकार घेतला. "तुझा चित्रपट कोणी नाही घेतला तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन,' असं आश्‍वासन विशालनं दिलं होतं. "तू एक छान बाळाला जन्म दिला आहेस. त्याचा आदर ठेव. कोणाचाही तू ऋणी होऊ नकोस. कारण "फॉक्‍स'ला तू जे दिलं आहेस आणि त्यांच्याकडून तुला जे मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू दिलेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे.''
"स्टॅन्ली का डब्बा'मध्ये अमोल गुप्तेंनी "खडूस' असं नाव असलेल्या शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारलीय. या चित्रपटापाठोपाठ "भेजा फ्राय 2' आणि संतोष सिवन दिग्दर्शित "उर्मी'मध्येही गुप्तेंच्या अभिनयातील कौशल्य पाहायला मिळणार आहे. "उर्मी' हा मल्याळम चित्रपट असून तो हिंदीत डब झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.
- मंदार जोशी

Monday, May 9, 2011

एका ध्यासाचा प्रवास...


एका ध्यासाचा प्रवास...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक, प्रॉडक्‍शन डिझायनर आणि निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांनी "बालगंधर्व' या भव्यदिव्य चित्रपटाचं नऊ महिन्यांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात साकारलं जातंय. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट भारतात आणि त्यानंतर विदेशातही प्रदर्शित होतोय. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला हा सर्वाधिक "बजेट' असलेला चित्रपट. तब्बल सहा कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाशी नितीन देसाईंव्यतिरिक्त नीता लुल्ला, विक्रम गायकवाड, रवी दिवाण, महेश लिमये, रवी जाधव, सुबोध भावे, कौशल इनामदार, राहुल देशपांडे, आनंद भाटे अशी मोठी नावं जोडली आहेत. मराठी चित्रपट निर्मितीच्या साऱ्या चौकटी भेदून एक विलक्षण जिद्द, ध्यास, तळमळ आणि प्रचंड मेहनतीनं हा चित्रपट बनविला गेलाय. त्याचीच ही कहाणी.
-----------
विख्यात गायक-नायक बालगंधर्वांची महती सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, हे व्यक्तिमत्त्व ज्या "स्केल'द्वारे चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे, ते अपूर्व
म्हणावं लागेल. मराठी चित्रपट म्हटलं की काही निश्‍चित ठोकताळे आपल्या डोळ्यांसमोर येतात. परंतु, हा चित्रपट साकारताना देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व "बाऊंड्रीज' पार केल्या आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट बनवायचाय, या हेतूनं झपाटून जात चित्रपट पूर्ण केला. सर्वसाधारणपणे निर्मात्याला कथा ऐकविली की एक तर निर्मितीचा निर्णय त्वरीत घेतला जात नाही किंवा निर्मितीचं "बजेट' अधिकाधिक कमी कसं करता येईल, यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु, हा चित्रपट सुरूच झाला एका ध्यासानं. आजचा जमाना आहे एमटीव्ही, पॉप म्युझिकचा. या जमान्यातील तरुण पिढीच्या गळी शंभर वर्षांपूर्वीचं गाणं आणि घटनाक्रम उतरवणं, हे खरं तर सर्वात मोठं "चॅलेंज' होतं. परंतु, ते "चॅलेंज' अभिनेता सुबोध भावे आणि पटकथा लेखक अभिराम भडकमकर यांनी ठेवलं आणि ते काही मिनिटांमध्ये नितीन देसाईंनी स्वीकारलं आणि सुरू झालं एका विलक्षण चित्रपटनिर्मितीचं ध्यासपर्व !

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांची संख्या वाढली; परंतु गुणवत्तेचा विचार करायचा झाल्यास अगदी मोजक्‍या चित्रपटांचीच नावं घेता येतील. त्यामागचं कारण म्हणजे नियोजन, कल्पकतेचा अभाव. "बालगंधर्व'ची निर्मिती सुरू होण्यापूर्वी नियोजनावर मोठा भर दिला गेला आणि त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी येत गेलं. आपल्याकडे असे अजूनही अनेक चित्रपट प्रदर्शित होतात की, प्रेक्षकांना प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं नाव ठाऊक होतं. परंतु, "बालगंधर्व' मुहूर्ताच्या आधीपासून ते त्याच्या संगीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित होईपर्यंतच्या काळात विलक्षण चर्चेत राहिला. करायचं ते दणक्‍यात, हा नितीन देसाईंचा खाक्‍या. तो या चित्रपटाच्या मुहूर्तापासून पाहायला मिळाला. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात या चित्रपटाच्या "लॉंचिंग'चा जो भव्यदिव्य कार्यक्रम झाला, तो कायम लक्षात राहणारा ठरला. ऐतिहासिक चित्रपट साकारताना लेखक-निर्माता-दिग्दर्शकांनं केलेल्या अभ्यासाला, आपल्या कलाकृतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या संदर्भांना, संशोधनाला खूप महत्त्व असतं. हे संदर्भ सहजासहजी मिळत नाहीत. त्यासाठी अनेकांच्या भेटी घ्याव्या लागतात. अशा वेळी थोडी पूर्वपुण्याईदेखील कामाला यावी लागते. ते सर्व या चित्रपटाबाबत जुळून आलं.

या चित्रपटाच्या संशोधनासाठी अविरत प्रयत्न झाले. लेखक, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, वेशभूषाकारापासून ते चित्रपटामधील सर्व कलावंतांनी आपापल्या परीनं बालगंधर्व आणि त्यांच्या काळाबद्दल जी काही माहिती मिळाली, तिचा चित्रपटासाठी काही उपयोग होईल का, याचा विचार केला. बालगंधर्वांना पाहिलेल्या आणि त्यांचा सहवास लाभलेली जी काही मोजकी व्यक्तिमत्त्वं आहेत, त्यांचा शोध घेतला गेला. त्यांच्या दीर्घमुलाखती ध्वनिमुद्रित झाल्या. त्यांच्याकडील बालगंधर्वांचा ठेवा चित्रपटासाठी विनम्रपणे मागण्यात आला आणि शूटिंग झाल्यानंतर तो आस्थेपूर्वक परतही करण्यात आला. ज्याच्याकडे जे जे चांगलं मिळेल, ते ते घेऊन पटकथेची एक सुंदर लड गुंफण्यात आली. शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्यापासून ते थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना लाभलेला बालगंधर्वांचा सहवास जाणून घेत त्यानुसार कथानकातील नाट्यनिर्मिती आणखी टोकदार करण्यात आली. रंगभूमीवर अदाकारी साकारीत असताना आपल्या रुपाकडे थोडंही दुर्लक्ष होऊ न देण्यासाठी बालगंधर्वांनी विंगेत आरशांची केलेली व्यवस्था, ही बाबासाहेबांनी सांगितलेली खास आठवण. या आठवणीला चित्रपटात नुसतंच स्थान मिळालेलं नाहीय तर कथानक त्यामुळे आणखी रंगतदार होईल, याची काळजी घेतली गेलीय. असे बरेच प्रसंग या चित्रपटात आहेत.

अवघ्या 33 दिवसांमध्ये हा चित्रपट पूर्ण झाला. तो काळ मंतरलेला होता, अशी प्रतिक्रिया या चित्रपटाच्या "टीम'शी जोडलेला प्रत्येक कलावंत-तंत्रज्ञ सांगतो. पुणे, भोर, कोल्हापूर या भागात हा चित्रपट चित्रीत झालाय. सकाळी सात ते मध्यरात्री 1-2 वाजेपर्यंतही बऱ्याचदा शूटिंग चालायचं. पण कोणाकडूनही कधी या काळात आपण थकल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली नाही. नितीन देसाईंना या 33 दिवसांमध्ये ज्यांनी कोणी पाहिलं असेल, त्यांना निश्‍चितच या माणसाची "पॅशन' भावली असणार. एखाद्या युद्धात राजाची मैदानावरील थेट उपस्थिती सैनिकांसाठी उत्साहवर्धक असते. इथं तर नितीन देसाईंच्या रुपातला राजा अक्षरशः चौफेर चढाई करीत होता. या चित्रपटामध्ये लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिरेखेला खूप महत्त्व आहे. या व्यक्तिरेखेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाल्यानंतर कोणीतरी नितीन देसाईंनाच ही भूमिका करण्याचा सल्ला दिला. वास्तविक तेच या चित्रपटाचे निर्माते असल्यानं ही भूमिका साकारण्याचा निर्णय त्यांना क्षणभरात घेता आला असता. परंतु, तसं न करता त्यांनी या मिनिटभराच्या भूमिकेसाठी आधी "स्क्रीन टेस्ट' दिली. त्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून टक्कल केलं. एखाद्या कलाकृतीसाठी सर्वस्व देणं म्हणजे नेमकं काय असतं, हे नितीन देसाईंशी या चित्रपटाबद्दल चर्चा केल्यानंतर अगदी छान समजतं.

बालगंधर्वांचं व्यक्तिमत्त्व एवढं जबरदस्त आहे की, त्यातलं काय पडद्यावर दाखवावं आणि काय नाही, असा प्रश्‍न "बालगंधर्व टीम'ला पडला होता. सर्वच गोष्टी दाखवायच्या म्हटलं तरी चित्रपटाची लांबी साडे तीन-चार तासांपर्यंत गेली असती. परंतु, आजच्या काळातील प्रेक्षकाची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन चित्रपटाची लांबी कोणत्याही स्थितीत दोन तासांच्या वर जाऊ न देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही दृश्‍यांना कात्री लावावी लागली. बालगंधर्वांचे मायबाप म्हणजे रसिकप्रेक्षक. त्याच्या सेवेत खंड पडू न देण्याचा त्यांचा विडा शंभर वर्षांनी नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'नं उचलला आणि निर्मितीबाबत कसलीही तडजोड करण्यात आली नाही. तंत्रज्ञांनी ज्या काही गोष्टींची मागणी केली, त्याची पूर्तता झाली. या चित्रपटातील भव्यदिव्य सेट्‌स पाहताना एखादा "ऑपेरा' आपण पाहतोय की काय, असं वाटतं.

मराठी चित्रपट निर्मात्यांची "कॉमन' समस्या म्हणजे चित्रपट ऐन प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की त्यांच्याकडची पैशाची पुंजी संपते आणि प्रदर्शनापूर्वी आपला चित्रपट प्रसिद्धीबाबत "हाईप' करण्यात ते कमी पडतात. सुदैवानं या चित्रपटाबाबत तसं घडलेलं नाही. या चित्रपटाच्या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळाही अत्यंत देखणा आणि भव्यदिव्य प्रमाणातच करण्यात आला. इथं एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. अलीकडच्या काळात "मिडीया'चं महत्त्व ओळखून त्याचा आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी खूप चांगला उपयोग करण्यात अभिनेता आमिर खाननं यश मिळवलंय. त्याच्या यशावरून प्रेरणा घेत नितीन देसाईंनी या चित्रपटाचं "मिडीया कॅंपेन' थोडं वेगळ्या पद्धतीनं आखलं आणि त्याचा खूप चांगला "रिझल्ट' त्यांना आला. या चित्रपटाच्या मुहूर्तापासून ते प्रदर्शनापर्यंत त्यांनी एवढे काही "इव्हेंट्‌स' आयोजित केले की, त्याचं वाहिन्यांना मिळालेलं "सॉफ्टवेअर'च काही तासाचं होतं.

नितीन देसाईंनी गेल्या 25 वर्षांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज निर्माते-दिग्दर्शकांबरोबर खूप काम केल्यानं त्यांच्या "व्हिजन'ला आकार आला. परंतु, "बालगंधर्व' चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी दाखविलेल्या "पॅशन'शी जुळवून घेताना काही अडचणीदेखील आल्या. रुळ बदलताना जसा खडखडाट व्हावा, तसा खडखडाटही झाला. परंतु, त्याचा "रिझल्ट' चांगला आलाय. सर्व आघाड्यांवरचं "टॅलेण्ट' एकत्र येणं, हे जेवढं चांगलं, तेवढंच या "टॅलेण्ट'ला पुरेपूर न्याय मिळणंही महत्त्वाचं असतं. तो न्याय या चित्रपटाला मिळालाय. "बालगंधर्व'च्या "बजेट'चा आकडा समजताच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांचे डोळे पांढरे झाले. "इतनी रिकव्हरी कहॉं से होगी?' असा प्रश्‍नही काहींनी विचारला. काहींनी एवढी "रिकव्हरी' होणं कठीण असल्याचं मत ताबडतोब व्यक्त करून "ये फिल्म नितीनने पैसे के लिए नहीं पॅशन के लिए बनाई है ।' असं "सेफ' ÷तरही दिल. त्यामुळे आता खरी परीक्षा नितीन देसाई आणि त्यांच्या "टीम'बरोबरच प्रेक्षकांचीही आहे. महाराष्ट्राचा अभिमान आणि मानबिंदू असलेल्या बालगंधर्वांवर प्रचंड कष्ट आणि सहा कोटी रुपये खर्चून बनलेला चित्रपट ते कसे स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
- मंदार जोशी