Monday, April 28, 2008

कशाला घेताय ठसन !


यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्या "टेस्ट'ला नेमकं झालंय तरी काय ? "धूम' आणि "चक दे इंडिया'चा अपवाद वगळता या निर्माता पिता-पुत्रानं अलीकडच्या काळात साफ निराशा केलीय. त्याचीच पुनरावृत्ती "टशन'मध्ये झालीय. या चित्रपटाचं कथानक आणि त्याची हाताळणी अगदी "एटीज-नाईंटीज'मधल्या चित्रपटांना शोभणारी आहे.
वडिलांच्या खुनाचा बदला घेणारी नायिका, ही या चित्रपटाची अगदी सरधोपट मध्यवर्ती कल्पना. ही कल्पना मांडतानाही नवोदित दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी फारशी कल्पकता दाखविलेली नाही. नवीन दिग्दर्शकांना पदार्पणाची संधी देण्याची कल्पना चांगली आहे. परंतु ती प्रत्येक वेळीच व्यवहार्य नसते, ही गोष्ट आता चोप्रांना सांगण्याची वेळ आलीय. अक्षय कुमार, सैफ अली खान, करिना कपूर आणि अनिल कपूर अशी सणसणीत "स्टारकास्ट' या चित्रपटासाठी एकत्र आली होती. पण त्यांचा व्यवस्थित उपयोग न झाल्यानं या चित्रपटाशी "ठसन' न घेतलेलीच बरी.
भैय्याजी (अनिल कपूर) हा उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड. मुंबईत येऊन तो आपलं बस्तान बसवतो. पूजा सिंग (करिना कपूर) ही त्याची सहाय्यक. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी भैय्याजीला इंग्रजी संभाषणाची गरज भासू लागते. त्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या जिमी क्‍लिफची (सैफ अली खान) मदत घेतो. मात्र, भैय्याजीला इंग्रजी शिकवता शिकवता तो पूजाच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या दीड कोटींवरही हात मारतो. तेव्हा भैय्याजी त्याचा निकाल लावण्यासाठी बच्चन पांडेला (अक्षयकुमार) आमंत्रित करतो. तेव्हा या पांडेचीच मदत घेऊन भैय्याजीला शह देण्याची पूजा-जिमीची योजना असते. पण लहानपणीच्या पांडे-पूजाच्या प्रेमकहाणीचा "ट्रॅक' आणखीनच गोंधळ वाढवतो. सरतेशेवटी हेच प्रेम सरस ठरतं.
"टशन'ची अगदी सुरुवातीपासूनच गडबड झालीय. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा सर्व डोलारा उभा राहिलाय तो कच्च्या कथानकाच्या पायावर. चांगली "स्टार कास्ट' मिळालीय. मग लिहा त्यावर कथानक, यापद्धतीनं हा चित्रपट बनलाय. अनिल कपूरनं रंगविलेली "डॉन'ची व्यक्तिरेखा लिखाणात फसल्यानं पुढं सगळीच गडबड झालीय. अनिल कपूरला इंग्रजी संभाषणाचं ट्रेनिंग देणं आणि त्याचं हिंग्लिश बोलणं, यातून थोडीफार विनोदी निर्मिती झालीय. पण विनोदाचा तोच धागा पुढंही ताणल्यानं तो शेवटी तुटण्यापर्यंत मजल गेलीय. करिनाच्या व्यक्तिरेखेबद्दल सुरुवातीला चांगलं रहस्य निर्माण केलंय. अनिल कपूरनंच तिच्या वडिलांचा खून केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हा चित्रपट अगदीच "प्रेडिक्‍टेबल' झालाय. अक्षय कुमारनं साकारलेल्या व्यक्तिरेखेलाही कसलाही शेंडाबुडखा नाही. तो अचानक एका रामलीलेत घुसून काहीतरी वेडेवाकडे चाळे करायला लागतो. अक्षयला असलेल्या ग्लॅमरच्या जोरावर ही व्यक्तिरेखा पुढं तग धरून राहिलीय. त्याचा वापर करून अनिल कपूरवर मात करण्याची कल्पना चांगली होती. पण लेखक-दिग्दर्शकानं अचानक अक्षय आणि करिनाच्या बालपणीच्या प्रेमकहाणीचा "ट्रॅक' सुरू केलाय. तो अत्यंत कंटाळवाणा आहे. या "ट्रॅक'मुळे सैफ आणि करिनामधल्या नात्यामधली गंमत निघून गेलीय. अशा जीव हरवलेल्या अवस्थेत या चित्रपटाचा शेवटही उरकण्यात आलाय. अधेमधे लडाखमध्ये चित्रीत झालेली तीन-चार गाणी आहेत, पण तीसुद्धा प्रेक्षकाला पाय मोकळे करण्याचं स्वातंत्र्य देतात!
सैफ अली खानचा बदललेला "लूक' आणि त्याचा वावर छान वाटतो, पण अक्षयकुमारला झुकतं माप देण्याच्या नादात सैफच्या व्यक्तिरेखेची हत्या झालीय. अक्षयनं आपल्या अदाकारीनं भूमिका छान खुलवलीय. करिना कपूरचा अभिनयापेक्षा अंगप्रदर्शनावरच अधिक भर आहे. अनिल कपूरचा भय्याजी सुरुवातीला छान वाटतो. पण या व्यक्तिरेखेतील तोचतोपणा त्याला घातक ठरलाय. विशाल-शेखर जोडीचं संगीत फार काही मजल मारू शकलेलं नाही. यश चोप्रांची निर्मिती असल्यानं तंत्राच्या आघाडीवर काहीच त्रुटी दिसत नाहीत. या त्रुटी लेखनाच्या पातळीवर टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.

Saturday, April 26, 2008

हिंदीत "व्हिलन' साकारायचाय...


मराठी चित्रपट, रंगभूमी आणि मालिका या तीनही क्षेत्रांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे अशोक शिंदे. सध्या एकीकडे या कलाकाराचे गावरान मराठी चित्रपट जत्रे-यात्रेत जोरदार व्यवसाय करताहेत, तर दुसरीकडे तो "एवढंसं आभाळ'सारखा चित्रपट आणि "असंभव'सारख्या मालिकेमधून "क्‍लास' प्रेक्षकवर्गालाही पसंत पडतोय. वयाची चाळिशी पार केल्यानंतर तो आता हिंदी चित्रपटात "मेन व्हिलन' साकारण्याचं स्वप्न पाहतोय.
--------------
"स्ट्रगल' या शब्दाचा अर्थ माहिती करून घ्यायचा असेल तर अशोक शिंदेची "करियर' त्यासाठी "बेस्ट' ठरावी. गेल्या दोन दशकांमध्ये या कलाकारानं अनेकदा पुनरागमन केलंय. शिक्षणानं बी. ई. इलेक्‍ट्रॉनिक्‍स असलेल्या या कलाकाराची अभिनयातील पहिली कामगिरी म्हणजे "अपराध मीच केला' हे नाटक. स्मिता तळवलकर आणि बाळ धुरी यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या. अविनाश खर्शीकर याचीही या नाटकात प्रमुख भूमिका होती; मात्र ऐन प्रयोगावेळी तो आजारी पडल्यानं हा "रोल' अशोकच्या वाट्याला आला. अंगभूत गुणवत्तेच्या आधारावर अक्षरशः प्रयोगावेळच्या बस प्रवासात अशोकनं आपले संवाद पाठ केले आणि या नाटकाचे दहा प्रयोग यशस्वी करून दाखविले.
वास्तविक या क्षणी अशोक शिंदेच्या "करियर'नं भरारी घ्यायला हवी होती, परंतु प्रत्यक्षात तसं घडलं नाही. याबद्दल तो म्हणतो, ""या नाटकामधलं माझं काम पाहून राम कदमांनी एका नवीन चित्रपटाची मला "ऑफर' दिली. या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आणि काही काळानं हा चित्रपट रखडला. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची एके दिवशी भेट झाली. ते मला म्हणाले, "अशोक, सध्या किती चित्रपट करतोयस?' मी म्हटलं, "फक्त रामभाऊंचा चित्रपट करतोय!' त्यावर ते पुन्हा म्हणाले, "मग लगेच दुसरा चित्रपट कर. कारण रामभाऊंची ख्याती अशी आहे की, ज्यांना त्यांनी पदार्पणाची संधी दिली, त्यांचे चित्रपट अद्यापपर्यंत पडद्यावर आलेले नाहीत.' (यशवंत दत्त-"मीठ भाकर', नाना पाटेकर-"गड जेजुरी जेजुरी'). पाटेकरांचं बोलणं खरं ठरलं आणि रामभाऊंचा चित्रपट रखडला. त्यामुळे चित्रपटसृष्टीतल्या पदार्पणासाठी मला "रेशीमगाठी' चित्रपटाची वाट पाहावी लागली. हा प्रेमपट अपयशी ठरल्यानं माझी निराशा झाली. त्यानंतर "एकापेक्षा एक'मध्ये मला छोटासा "रोल' मिळाला. हा चित्रपट अपयशी ठरला, पण या चित्रपटात बरीच कलाकार मंडळी असल्यामुळं यशाचं "शेअरिंग' झालं.''
कधी कधी कलाकाराच्या दृष्टीनं त्याची "इमेज' बनणंही आवश्‍यक असतं, पण आपली कधी कसलीच "इमेज' न बनल्याची खंत अशोक व्यक्त करतो. याबद्दल तो सांगतो, ""माझा "स्ट्रगल' इतर कलाकारांसारखा नव्हता. काम मिळण्याचं मला कधीच "टेन्शन' नव्हतं. मला माझ्या मनाजोगतं काम मिळत नव्हतं. एका चित्रपटात मी "हीरो' असायचो, तर दुसऱ्यात "व्हिलन'. मला अजूनही आठवतं, पुण्यात "प्रभात' चित्रपटगृहात मी "हीरो' असलेला "सुखी संसाराची बारा सूत्रं' हा चित्रपट लागला होता. या चित्रपटात अशोक सराफ यांनी माझ्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली होती. "प्रभात'पासून काहीच अंतरावर असलेल्या "विजय' चित्रपटगृहात अशोक सराफ "हीरो', तर मी "व्हिलन'च्या भूमिकेत होतो. देवाच्या कृपेनं मला चांगले पैसे मिळत होते. पण काही केल्या माझं काम "रजिस्टर' होत नव्हतं. अशा मनस्थितीत काम करणं खूप अवघड असतं. विश्‍वास बसणार नाही, तब्बल 17-18 वर्षं मी कार्यरत होतो. फक्त एकाच आशेवर, एक दिवस माझा येईल.''
अशोक शिंदेच्या आयुष्यात तो दिवस अगदी अलीकडे आला. "एवढंसं आभाळ' हा चित्रपट आणि "असंभव' मालिकेमुळं या कलाकाराला चोखंदळ प्रेक्षकांकडून जी पसंती हवी होती, ती मिळाली. ""काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका खूप नाव असलेल्या हॉस्पिटलमध्ये माझं जाणं झालं. एक प्रथितयश डॉक्‍टर माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "तुमचा भालचंद्र राव मला खूप आवडतो.' त्यांची ही प्रतिक्रिया मला क्षणभर खरीच वाटली नाही. या व्यक्तिरेखेमुळं मला जगभरातील प्रेक्षक मिळाला,' अशोक सांगतो. "" "एवढंसं आभाळ'मध्ये तर माझं मध्यांतरानंतर आगमन झालं. तरीदेखील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली. या दोन कलाकृतींनी माझं आयुष्यच बदलून गेलंय. मानसिंग पवारांनी मधे मला एका चित्रपटाची "ऑफर' दिली. त्यामध्ये एक 21 वर्षांची नायिका काम करीत आहे. तेव्हा तिच्यासोबत माझी जोडी पडद्यावर शोभेल का, असा प्रश्‍न मी त्यांना विचारला. त्यावर ते मला म्हणाले, की 44 वर्षांच्या शाहरूख खानबरोबर 21 वर्षांची दीपिका पदुकोण शोभून दिसते, मग तुला 21 वर्षांची नायिका "सूट' का नाही होणार? धंद्याच्या गणितात तू पडू नकोस. तेव्हापासून मी फक्त माझ्या व्यक्तिरेखेकडे लक्ष देतोय.''
गेल्या वर्षभरात अशोक शिंदेला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा "ऑफर' होत आहेत. याबद्दल तो म्हणतो, ""सुमित्रा भावे, "श्‍वास'फेम मोहन परब, महेश मांजरेकर माझ्यासोबत चित्रपट करण्यास इच्छुक आहेत. वर्षभरापूर्वी कोणी मला असं सांगितलं असतं, तर त्यावर माझा विश्‍वासच बसला नसता. एका मित्रानं तर मला थेट सांगूनच टाकलं की, अशोक, आता जत्रेत चालणारे चित्रपट करूच नकोस, पण खरं सांगू, मला आता वेगळं काम करायचं असलं तरी या चित्रपटांना मी नकार देऊ शकणार नाही. कारण "भक्ती हीच खरी शक्ती' या चित्रपटानं 90 लाखांचा व्यवसाय केला. "जय अठरा भुजा सप्तशृंगी माता' हा चित्रपट नाशिकमध्ये चार "शोज'मध्ये तब्बल 14 आठवडे चालला. "भाऊ माझा पाठीराखा' या चित्रपटानंही चांगली कमाई केलीय. मला आता काहीतरी वेगळं करायला मिळतंय म्हणून मी अशा प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांना परत पाठवणं अयोग्य ठरेल. मराठी चित्रपट, मालिकांमध्ये मला चांगलं यश मिळालंय. मला आता वेध लागलेत ते हिंदी चित्रपटाचे. यापूर्वी मी "यशवंत' या एकमेव हिंदी चित्रपटात अवघ्या एका दृश्‍यामध्ये पाहायला मिळालो होतो. पुढील काळात हिंदी चित्रपट मिळवण्याकडे माझा कल राहील. सध्या नामांकित हीरोंपुढं ताकदीनं उभा राहील असा "व्हिलन' दिसत नाही. ती "गॅप' मला भरून काढायचीय.''

Friday, April 25, 2008

प्रिय सचिन,

प्रिय सचिन,

सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
मी काही क्रिकेटचा अभ्यासक नाही. गल्ली-क्रिकेटच्या वरदेखील माझी मजल गेलेली नाही! पण गेली 20 वर्षं टीव्हीवर क्रिकेट पाहून जे काही उमगलंय, ते तुझ्या करियरशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतोय.
दीड-दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट. ऑस्ट्रेलियातील तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तू "बॅक टू बॅक' दोन इनिंग्ज छान खेळला होतास. तेव्हा मला काही मित्रांचे "एसएमएस' आले होते. "इफ क्रिकेट इज ए रिलिजन, देन सचिन इज अवर गॉड...', "आता तरी कळलं का तुला सचिनचं मोठेपण?...', "मराठी माणसानंच सचिनला पाठिंबा देऊ नये, यासारखं दुसरं दुर्दैव नाही...' या आशयाचे ते "एसएमएस' होते. ते वाचून मला धक्काच बसला. सगळं जग एकीकडं तुझं कौतुक करीत असतानाच माझ्यासारखे काही मोजकेच लोक तुझे कसे आणि केव्हापासनं एवढे कट्टर विरोधक बनले? थोडा खोलात जाऊन विचार केला तेव्हा काही गोष्टींचा उलगडा व्हायला लागला.
"युवा सकाळ'मध्ये सहा-सात वर्षांपूर्वी मी तुझ्यावर "आहे महान तरीही...' या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तुझ्या दशकभराच्या करियरचा आढावा घेताना मी महत्त्वाचे सामने आणि अंतिम स्पर्धांमधील तुझ्या कामगिरीचा ताळेबंद मांडला होता. आकडे कधीही खोटं बोलत नसतात. त्याप्रमाणे या सामन्यांमधली तुझी कामगिरी निश्‍चितच तुझ्या "स्टॅंडर्ड'च्या जवळ जाणारी नव्हती. पण, हे वास्तव पचविणं जड होतं. तुझ्या अनेक चाहत्यांकडून तेव्हा मला हा लेख आवडला नसल्याची पत्रं आली होती. पण काही मोजक्‍या रसिकांनी, ही माहिती डोळे उघडायला लावणारी असल्याचंही म्हटलं होतं. तेव्हापासून मी तुझ्या कामगिरीवर बारकाईनं लक्ष ठेवून होतो. पण, याचा अर्थ असा नव्हे की, मी कधीच तुझ्या फलंदाजीवर प्रेम केलं नाही. इतरांप्रमाणेच मीसुद्धा तुझा विलक्षण फॅन आहे. तू आऊट झालास की, इतरांप्रमाणे मीसुद्धा चॅनेल बदलतो. पण, माझं तुझ्यावरील प्रेम आंधळं नाही. ते डोळस प्रकारात मोडणारं आहे.
अजूनही आठवतंय, पाकिस्तानच्या पहिल्याच दौऱ्यात तू ज्या धैर्यानं वासीम अक्रम, वकार युनूस या तोफखान्याला सामोरा गेलास, त्याला तोड नव्हती! "स्ट्रेट ड्राईव्ह' पाहावा तर तुझाच! ऑफ साईडला फ्रंट फूटवर जात तू मारलेले फटके कोणी विसरूच शकणार नाही. क्रीज सोडून पुढं नाचत येत तू लगावलेले सिक्‍सर डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. क्रिकेटच्या पुस्तकात असलेल्या प्रत्येक फटक्‍याला तू आपलंसं तर केलंस; पण पॅडल स्वीपसारखे काही नवीन "इनोव्हशन' तुझ्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. तुझ्या फलंदाजीत अशी काही नजाकत होती की, तू एखादी ओव्हर खेळून काढली तरी चॅनेल बदलण्याचा मोह व्हायचा नाही. 1998च्या मार्चमध्ये शारजाच्या वाळवंटात तुझ्या बॅटनं जे वादळ निर्माण केलं, ते आजही कोणी विसरू शकलेलं नाही. एवढं सगळं चांगलं असूनही नंतर काहीतरी बिनसत गेलं. तुझा "डिफेन्स' सहज भेदला जाऊ लागला. तू बोलरला वाजवीपेक्षा अधिक सन्मान देऊन स्वतःची विकेट बहाल करू लागलास. "क्‍लीन बोल्ड' झाल्यानंतरही तू उगाचच चेंडू खाली राहिल्यानं मी चकलो, अशी ऍक्‍शन करून आपल्या चाहत्यांची सहानुभूती मिळवू लागलास. तुझ्यात दडलेल्या एका श्रेष्ठ स्पिनरला तू कधीच "सिरीयसली' घेतलं नाहीस. वॉर्न, मुरलीधरनप्रमाणे तूसुद्धा अगदी हातभर चेंडू वळवू शकतोस. पण... तुझ्या फलंदाजीतील श्रेष्ठत्वापुढं तुझ्यातला गोलंदाज झाकोळला गेला.
अनेक जण म्हणतात की, तू सचिनकडून खूप अपेक्षा ठेवतोस. त्यामुळे, या अपेक्षांची पूर्ती न झाल्यास तुझी निराशा होते. काही जण सांगतात, की दर वेळी सचिननंच खेळायला पाहिजे, ही जबरदस्ती का? टीममधले इतर दहा जण झोपा काढतात काय? प्रश्‍न रास्त आहेत. पण, या सवालांची सरबत्ती करणाऱ्यांनीच तुला देवाच्या जागी नेऊन बसवलंय, ही गोष्ट कशी नाकारता येईल? आणि जर तू देव असशील तर संकटाच्या वेळी तुझा तूच धावून यायला नकोस का?
आकडे तरी असे सांगतात की संकटसमयी तुझी फलंदाजी दबावाची शिकार झालीय. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावातल्या फलंदाजीला खूप महत्त्व असतं. दुर्दैवानं तुझी चौथ्या डावातील कामगिरी तुझ्या लौकिकाला साजेशी नाही. तंत्राच्या दृष्टीनं तुझ्या फलंदाजीत कोणताही दोष नाही, तुझ्याजवळ पर्वताएवढा अनुभव आहे, कोणत्याही गियरमध्ये बॅटिंग करण्याची तुझी ताकद आहे, कोणताही बोलर तुला फार काळ "बॅक फूट'वर ठेवू शकलेला नाही. मग प्रश्‍न असा उपस्थित होतो की, तुझ्याकडून अपेक्षा नाही ठेवायच्या तर त्या कोणाकडून ठेवायच्या? अपेक्षांच्या ओझ्याखाली दीर्घ काळ आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणं सोपं नाही, हे मी समजू शकतो. पण, याचीही तुला आता सवय झाली असावी.
कसोटी असो, वन डे असो की ट्‌वेंट्‌वी ट्‌वेंटी... क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात तू "फिट' आहेस. फलंदाजीतली तुझी गुणवत्ता पाहिली की कधी कधी वाटतं तू जर ठरवलंस तर कोणत्याच गोलंदाजाला तुझी विकेट जाणार नाही. क्रिकेटमधले बहुतेक सर्व विक्रम आता तुझ्या नावावर जमा आहेत. कसोटीमधील सर्वाधिक धावांचाही विक्रम लवकरच तुझ्या नावावर जमा होईल. तेव्हा माझ्यासारख्या चाहत्याला प्रश्‍न असा पडतो की, असं कोणतं "मोटिव्हेशन' आहे की, जे तुला अजूनही खेळायला भाग पाडतंय.
अलीकडच्या काळात तू अनेकदा झटपट बाद झाला असलास तरी तुझ्या विश्‍वासार्हतेला कधीच धक्का बसलेला नाही. आपली टीम बॅटिंग करीत असली की प्रत्येकाचा पहिला प्रश्‍न असतो, सचिन खेळायला आला का किंवा सचिननं किती रन्स काढले. आपली टीम संकटात असेल आणि तू क्रीजवर असलास तर "सचिन है ना!' असं प्रत्येकाचं उत्तर असतं. तुझी ही विश्‍वासार्हताच तुझं सर्वाधिक योगदान आहे. या योगदानाच्या बळावर तू आणखी काही यशोशिखरं गाठावीस अशी अपेक्षा आहे. पण, ते गाठताना तुझ्या लौकिकाला धक्का बसू नये, हीच अपेक्षा. तुझ्या फलंदाजीबाबत काही खटकलेल्या गोष्टी उपस्थित केल्या, त्याबद्दल क्षमस्व.
पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझा चाहता,
मंदार जोशी

Wednesday, April 23, 2008

भरभराट बॉलीवुडची

भारतामधील प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन उद्योगाची सध्या अतिशय वेगानं भरभराट होतेय. "फिकी'च्या मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाचं सूत्र या भरभराटीभोवतीच केंद्रीत होतं. भारतात तसेच जगभरात या दोन्ही क्षेत्रात काम करणारी तज्ज्ञ मंडळी या अधिवेशनास उपस्थित होती. यावेळी झालेल्या चर्चासत्रांमध्ये या दोन्ही क्षेत्रांची भविष्यातील प्रगती आणि त्या ओघानं येणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकण्यात आला. त्याचा घेतलेला हा आढावा.
------------
"जब वुई मेट' हा गेल्या वर्षीचा एक उत्कृष्ट सिनेमा. त्यानं "बॉक्‍स ऑफिस'वर चांगला व्यवसाय केला. पण, या यशामागं दडलेली सोनेरी किनार सर्वांच्या नजरेस आणून दिली ती "सोनी'च्या कुणाल दासगुप्ता यांनी. गेल्या काही महिन्यांमध्ये या चित्रपटाच्या 80 लाख अधिकृत डीव्हीडींची विक्री झालीय. हिंदी चित्रपटांच्या सीडी तसेच डीव्हीडी विक्रीचा हा नवीन विक्रम मानला जातोय. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीव्हीवरील आपल्या चित्रपटाच्या प्रक्षेपणाचे हक्क विकतानाही चतुराई दाखविली. त्यांनी एकाच वाहिनीला आपल्या चित्रपटाचे हक्क न विकता वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळ्या वाहिन्यांना हे हक्क विकले. त्यामुळेच, फक्त टीव्हीवरील प्रक्षेपणाचे हक्क आणि डीव्हीडी विक्रीतूनच या चित्रपटानं निर्मितीखर्चाच्या तिप्पट रक्कम वसूल केली. नियोजनबद्ध निर्मिती केल्यास चित्रपटनिर्मितीचं क्षेत्र किती लाभदायक ठरू शकतं, याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
हल्लीच्या प्रेक्षकवर्गाची आवड खूप बदललीय, असं सगळीकडे बोललं जातं. या विषयावरच "चक दे इंडिया'फेम शिमीत अमीन, विधू विनोद चोप्रा, सुधीर मिश्रा यांनी प्रकाश टाकला. "चक दे...'सारखा विषय दोन वर्षांपूर्वी निर्मिलं जाणं शक्‍यच नव्हतं, असं अमीन यांनी सांगून टाकलं. सुधीर मिश्रा यांनी आपण प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून कधीच चित्रपटनिर्मिती करीत नसल्याचं स्पष्ट केलं. दिग्दर्शकानं आपल्याला जे काही सांगायचंय, ते ठामपणे सांगितलं तर वेगळ्या वाटेवरचा चित्रपटही चांगली होऊ शकतो. हा चित्रपट लोकप्रिय ठरला की मग प्रेक्षकाची आवड बदललीय, असं बोललं जाणं साहजिक असल्याचाही त्यांनी मुद्दा मांडला. विधू विनोद चोप्रांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील अनिश्‍चिततेवर भर दिला. "मुन्नाभाई एमबीबीएस' हा चित्रपट तयार झाला तेव्हा त्याला एकही वितरक हात लावण्यास तयार नव्हता. काहींनी तर आपणास असल्या चित्रपटाची निर्मिती करून कशाला हात पोळून घेताय ? असा प्रश्‍नही विचारल्याचं चोप्रांनी सांगितलं. अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला "एकलव्य-अ रॉयल गार्ड' हा चित्रपट भारतात अपयशी ठरला तर विदेशात त्यानं अतिशय चांगला व्यवसाय केला. प्रेक्षकांची आवड अशी भिन्न असताना दिग्दर्शकानं स्वतःला काय सांगायचंय, यावरच भर देणं आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले.
मनोरंजन उद्योगातील सर्वाधिक "हॅपनिंग' क्षेत्र म्हणून टीव्ही माध्यमाकडंच पाहिलं जातंय. सध्या भारतात एकूण 313 वाहिन्यांचं प्रक्षेपण सुरू असून 80 वाहिन्यांचे अर्ज केंद्र सरकारकडं पडून आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये आणखी सहाशे वाहिन्या पदार्पणाच्या तयारीत आहेत. केबलजोडणी असलेल्या घरांमधल्या सुमारे शंभर वाहिन्यांचं "सर्फिंग' करतानाच अनेकांना सध्या नाकीनऊ येतंय. तेव्हा या एक हजार वाहिन्या कोण पाहणार आणि त्यांचं भवितव्य काय ? हा एक मोठा प्रश्‍न आहे. मात्र, "आयएनएक्‍स मिडीया'च्या पीटर मुखर्जी यांच्या मतानुसार या सर्व वाहिन्या आपल्या पोटात रिचवण्याची क्षमता सध्या भारतीय दूरचित्रवाहिनी क्षेत्रात आहेत. "कॅस'च्या (कंडिशनल ऍक्‍सेस सिस्टीम) अंमलबजावणीस सुरुवात झाली असली तरी अजूनही देशभरात केबलयंत्रणेचाच प्रभाव आहे. या "ऍनॉलॉग' यंत्रणेला हद्दपार करून "डिजिटल' यंत्रणेची स्थापना केल्यास प्रत्येकाला आपणास हवी ती वाहिनी पाहण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळेच सर्व प्रकारच्या "निश' (एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या) वाहिन्यांनाही चांगला प्रेक्षकवर्ग आणि पर्यायानं उत्पन्न मिळण्याची शक्‍यता आहे. प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्राची व्याप्ती बघून केंद्र सरकारनं त्याबाबत एक कायमस्वरूपी धोरण निश्‍चित करण्याचा मुद्दा "रेडिओ मिर्ची'चे प्रमुख परिघी यांनी मांडला.
सध्या वृत्तवाहिन्यांची संख्या झपाट्यानं वाढतीय. भारतामधल्या टीव्हीचा चेहरामोहरा बदलण्यास वृत्तवाहिन्या जबाबदार असल्याचंही बोललं जातंय. "टीव्ही नेटवर्क टुडे'चे जी. व्ही. कृष्णन हे त्यास दुजेरा देतात. क्रिकेट, सिनेमा, कॉमेडी आणि क्राईम हे चार "सी' सध्या वृत्तवाहिन्यांवर राज्य करीत आहेत. "ट्‌वेंट्‌वी ट्‌वेंटी' स्पर्धेत भारतानं मारलेली बाजी, अभिषेक बच्चन-ऐश्‍वर्या रायचा विवाह आणि बेनझीर भुट्टो यांची हत्या... या तीन बातम्यांनी गेल्या वर्षभरात सर्वाधिक "टीआरपी' मिळविला. विशेष म्हणजे या तीनही बातम्या वेगवेगळ्या क्षेत्रांचं प्रतिनिधीत्व करतात. सर्वसामान्यांच्या हातात भरपूर पैसा खुळखुळत असल्यानं त्यांच्या आवडीनिवडीत प्रचंड फरक पडला असल्याचे मत "सहारा समय'च्या राजीव बजाज यांनी व्यक्त केलं. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखा ज्वलंत प्रश्‍न टीव्हीवर पाहण्यात प्रेक्षकांना आता रस उरलेला नाही. या विषयावरील बातम्या दाखविल्यास त्याला प्रेक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. म्हणूनच लोकांना जे हवंय, ते दाखविण्याशिवाय वाहिन्यांना पर्याय उरला नसल्याचंही तो सांगून टाकतात. मात्र, त्याविरुद्धचं मत "एनडीटीव्ही'च्या संजय अहिरराव यांनी व्यक्त केलं. "टीआरपी'च्या आकड्यांवर लक्ष ठेवून कार्यक्रम करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांशी निगडीत असलेले विषयच भविष्यात आपल्या वाहिनीवरून सादर केले जातील, असं ते म्हणाले.
मालिका, मुलांसाठीचे कार्यक्रम, बातम्या, स्पोर्टस्‌... हा आतापर्यंतचा आपल्या टीव्हीचा पॅटर्न. मात्र, "आयएनएक्‍स'च्या संगीतविषयक वाहिनीनं मोठं यश मिळवून हा "पॅटर्न' मोडून काढला. बहुतेक सर्व वाहिन्या सध्या गाजलेल्या गाण्यांचं काही सेकंदापुरते प्रक्षेपण करतात. त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन या वाहिनीवर सर्व गाणी पूर्ण रूपात दाखविली गेली. संगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी अर्थातच या वाहिनीला आपला कौल दिला. "आमची वाहिनी म्हणजे टीव्हीवरचा रेडिओ आहे. मार्केटिंगवर एक पैसाही खर्च न करता यशस्वी झालेली ही एकमेव वाहिनी !' अशा शब्दांमध्ये मुखर्जी यांनी आपल्या यशामागचं गमक उलगडून दाखविलं. दूरचित्रवाहिन्या, चित्रपट, रेडिओबरोबरच सध्या "ऑनलाईन मिडीया'चाही बोलबाला आहे. भारतात सध्या वर्तमानपत्रं आणि टीव्हीचं वर्चस्व असलं तरी भविष्यकाळ हा "ऑनलाईन' माध्यमाचा असल्याचं भाकीत "एनडीटीव्ही नेटवर्क'च्या विक्रम चंद्रा यांनी वर्तविलं. भारतातल्या प्रसिद्धीमाध्यमांनी आता वेबसाईट हे माध्यम लोकाभिमुख करण्यावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. समाजात घडणाऱ्या घटनांचं केवळ वृत्तांकन करण्याऐवजी काही समस्यांची "कॅंपेन्स' राबविणं आता आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. सर्वसामान्यांना आपला आवाज इतरांपर्यंत पोचविण्याचा "प्लॅटफॉर्म' वेब माध्यमानं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
मनोरंजन क्षेत्राची एकीकडे भरभराट सुरू असताना दुसरीकडे या क्षेत्राला "टॅलेण्टेड' लोकांची उणीव भासत आहे. ती दूर करण्यासाठी शासकीय तसेच खासगी पातळीवरही प्रयत्न होणं आवश्‍यक असल्याचं मत "व्हिसलिंग वूडस्‌ इंटरनॅशनल'च्या मेघना घई यांनी व्यक्त केलं. चित्रपट-टीव्ही माध्यमातलं परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी आपली संस्था प्रसिद्ध असली तरी ही संस्था संपूर्ण भारतामधल्या तरुणाईची गरज भागविण्यास अपुरी आहे. अमेरिकेत कलाक्षेत्राचं प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे दोन हजारहून अधिक संस्था कार्यरत आहे. भारतात असं काम करणाऱ्या संस्थांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतकी आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या घटनांचं "कव्हरेज' करताना माध्यमांनी दाखविलेला उतावीळपणा अनेकांच्या टीकेस पात्र ठरला होता. त्यामुळेच माध्यमं आणि त्यांना सामाजिक भान आहे की नाही ? यासारखे प्रश्‍न उपस्थित झाले होते. खरं तर या विषयावर चर्चा करण्यासाठी शर्मिला टागोर, श्‍याम बेनेगल, महेश भट, प्रितीश नंदी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या सचिव जोहरा चटर्जी अशी दिग्गज मंडळी एकत्र आली होती. परंतु, यापैकी बहुतेकांनी मूळ मुद्दा सोडून सेन्सॉर बोर्डाची कार्यपद्धती आणि समाजातल्या काही घटकांनी चित्रपटांचे बंद पाडलेले प्रदर्शन यालाच "टार्गेट' केलं. "ब्रेकिंग न्यूज' हा हल्ली खेळ झालाय, हे बेनेगलांचं वक्तव्य सर्वांचा हशा घेऊन गेले.

भोजपुरीची भरारी
या अधिवेशनात प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांबद्दलचं चर्चासत्र विलक्षण रंगलं. महेश कोठारे यांनी हिरीरीनं मराठी चित्रपटसृष्टीची बाजू मांडली. भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार मनोज तिवारीनं आपल्या चित्रपटसृष्टीच्या यशाचं केलेलं विश्‍लेषण उपस्थितांना थक्क करून टाकणारं ठरलं. या कलाकाराची प्रमुख भूमिका ?सलेल्या "ससुरा बडे पैसेवाला' या चित्रपटाचं बजेट होतं 29 लाख रुपये. पण, त्यानं व्यवसाय केला 40 कोटींचा. मनोजनं षटकार मारला तो "बिना स्क्रीप्ट के यहॉं काम चलता है ।' असं वक्तव्य करून. कोणत्याही भोजपुरी चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं की तब्बल 10-12 दिवसांनी कलाकारांना पटकथा मिळते. पटकथा हातात नसताना आम्ही कसं काम करतो, ते देव जाणं, असं मनोजनं सांगितलं.

सेन्सॉरची कैची
महेश भट यांची दिग्दर्शन क्षेत्रातील शेवटची कलाकृती म्हणजे जख्म. पण, हा चित्रपट पूर्ण करताना भटना सेन्सॉर बोर्डाशी मोठी टक्कर द्यावी लागली होती. चित्रपट पूर्ण होऊनही तो सेन्सॉर बोर्डामुळे तो रखडला होता. या चित्रपटातील "क्‍लायमॅक्‍स'बाबत सेन्सॉरचा आक्षेप होता. तेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. क्‍लायमॅक्‍समधील कार्यकर्त्यांची वेशभूषा बदलण्याचा अट्टाहास सेन्सॉरने धरला होता. तेव्हा तब्बल 40 लाख रुपये खर्च करून भटनी हा पाच मिनिटांचा भाग "एडिट' केला होता. विशेष म्हणजे चित्रपटाचे एकूण बजेट होतं 3 कोटी. यावरची कडी म्हणजे त्या वर्षीचा राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार म्हणून "जख्म'ची निवड झाली. अशा परिस्थितीत आपण मनोरंजनपर चित्रपट करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असा टोला भट यांनी मारला.

Monday, April 21, 2008

पट्टी चुकली अन्‌ भट्टी बिघडली!
शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या सुरुवातीलाच गायक-गायिकेचा सूर लागणं फार महत्त्वाचं असतं. तो लागला नाही की, संपूर्ण मैफलच फसण्याची भीती असते. सचिन पिळगावकर दिग्दर्शित "आम्ही सातपुते'बाबत असंच काहीसं घडलंय. "सत्ते पे सत्ता'चा "रीमेक' अशी त्याची प्रदर्शनपूर्व ओळख. हा चित्रपट "सेव्हन ब्राईडस्‌ फॉर सेव्हन ब्रदर्स' या हॉलीवुडपटावरून ढापला होता. वास्तविक मूळ चित्रपट आणि त्याच्या "रीमेक'पटात चांगलीच गंमत होती. या दोन्हींचं मिश्रण करून सचिन यांना तिसरीच एक धमाल डिश सादर करणं शक्‍य होतं; पण या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा पहिल्यापासून सुराशी प्रामाणिक न राहता वरच्या पट्टीत बोलायला लागते. परिणामी हा सिनेमा आपली पट्टी चुकलाय आणि भट्टीही बिघडवून बसलाय. दोन-चार धमाल प्रसंग, तांत्रिक सफाई आणि एक-दोन गाणी वगळता या सिनेमातून फारसं काही हाताला लागत नाही. दिग्दर्शक सचिन यांनी गेल्या काही काळात मिळविलेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही कामगिरी खूपच खटकणारी आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे ही सात भावांची कथा आहे. सातपुते कुटुंबीय भाज्यांचे व्यापारी असल्यानं त्यांची नावंही कांद्या, बटाट्या, दोडक्‍या अशी मजेशीर असतात. अशोक सराफ यांनी चालविलेली खानावळ म्हणजे या चित्रपटाचा दुसरा "ट्रॅक'. सुप्रिया पिळगावकर या मानलेल्या मुलीसह त्यांना एकूण सात मुली असतात. या सात भावांबरोबर सात बहिणींची प्रेमकहाणी जुळविताना घडलेल्या गमतीजमती म्हणजे हा चित्रपट.
प्रेक्षकांच्या आवडीची नाडी सापडलेला दिग्दर्शक अशी सचिन यांची ओळख करून दिली जाते; पण या ओळखीला ते या वेळी जागलेले नाहीत. चित्रपटाची सुरुवातच खूप कंटाळवाणी आहे. सचिनशी लग्न झाल्यानंतर बिघडलेल्या सात भावांना वठणीवर आणण्याच्या दृश्‍यक्रमात खरं तर प्रचंड हशाची ताकद होती. पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. सुप्रिया पिळगावकरनं जादूची कांडी फिरवावी आणि हे सहा भाऊ नीट व्हावेत, हा चमत्कार चित्रपटात घडला आहे. सहा भावांसाठी सहा बहिणींना पळवून आणण्याची "आयडिया'ही चांगल्या पटकथेअभावी फसली आहे. या सहा बहिणी आपल्या घरात आल्यानंतर त्यांच्याशी सूत जमवितानाही विनोदनिर्मिती अपेक्षित होती; पण या मोक्‍याच्या क्षणीही हा चित्रपट ढेपाळलाय. सचिन आणि अशोक सराफ यांना काही काळासाठी जेलमध्ये पाठविण्याचं "लॉजिक' काही केल्या पटणारं नाही. एकंदरीत चित्रपटाचा सर्व जामानिमा ओढूनताणून या प्रकारात मोडणारा आहे.
सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, स्वप्नील जोशी या सर्व कलाकारांनी सिनेमाच्या सुरुवातीपासूनच वरची पट्टी लावली आहे. त्यामुळे कोणतीच व्यक्तिरेखा खरी वाटत नाही. विशेषतः हा दोष अशोक सराफ यांच्या व्यक्तिरेखेबाबत प्रकर्षानं जाणवतो. सचिन आणि स्वप्नील जोशी यांचा गावरान "टच' आपलासा वाटत नाही. सुप्रिया यांची भूमिका वाजवीपेक्षा "डॉमिनेटिंग' आहे. या सर्व मातब्बरांचीच अवस्था वाईट झाल्यानं नवोदितांच्या कामगिरीकडं लक्षच जात नाही. जितेंद्र कुलकर्णी यांची काही गाणी श्रवणीय आहेत. ती चांगली चित्रित झाली आहेत. सचिन यांनी या चित्रपटात प्रथमच "बॅक टू बॅक' गाणं वापरण्याची कल्पकता दाखवलीय. या दोन गाण्यांपैकी पहिलं गाणं छान जमलंय. पण दुसऱ्याचा म्हणावा तितका प्रभाव पडत नाही. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणजे तंत्रातली सफाई. सचिन-सुप्रिया जोडीचं नृत्यकौशल्य इथं चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं.

Saturday, April 19, 2008

आणखी एक कोठारेपट


फुल थ्री धमाल

अलीकडच्या काळात चित्रपटाच्या चौकटीपेक्षा काही दिग्दर्शक मोठे झालेत. महेश कोठारे हे त्यापैकीच एक. चित्रपटाचा विषय काहीही असो, त्याचं रूपांतर कोठारेपटातच झालं पाहिजे, अशी पक्की "लाईन' त्यांनी ठरवून घेतलीय. "फुल थ्री धमाल' हा त्यांचा नवीन चित्रपट याच वाटेनं गेलाय. कोठारेंच्या चित्रपटात यापूर्वी पाहायला मिळालेला "डॅम इट' या संवादासह इतर सर्व मालमसाला या चित्रपटात अगदी ठासून भरलाय. मुख्य म्हणजे यावेळी ते सूत्रधार म्हणूनही या चित्रपटात वावरले आहेत. "फुल थ्री धमाल' असं या सिनेमाचं शीर्षक असलं तरी प्रत्यक्षात अर्ध्या कच्च्या मनोरंजनापर्यंतच त्याची मजल गेलीय. त्यातले काही प्रसंग छान जमलेत. पण त्यात सलगता नसल्यामुळं तसंच शेवट ढेपाळल्यामुळं हा चित्रपट हास्याचं कारंजं फुलवू शकला नाही.
तीन लग्न झालेल्या मैत्रिणींची ही कथा आहे. आयुष्यात आपण काहीच धमाल केली नाही, असं त्यांचं एकमत होतं. मग काय, "थर्टी फर्स्ट'ची रात्र बाहेरगावी जाऊन साजरी करण्याचा त्यांचा "प्लॅन' असतो. आपल्या नवरे मंडळींना अंधारात ठेवून त्यांनी हा "प्लॅन' आखला असतो. पण हा "प्लॅन' फसतो आणि या तीन बायका आणि त्यांचे नवरे एकाच हॉटेलमध्ये गोळा होतात. याच हॉटेलमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला खलनायक प्रवेश करतो आणि एका धमालनाट्याला सुरुवात होते.
दिग्दर्शकानं स्वतः पडद्यावर येऊन घटनाक्रम उलगडून दाखविण्याची कल्पना चांगली आहे. तीन मैत्रिणींचा "थर्टी फर्स्ट'ला धमाल करण्याचा "प्लॅन' आणि त्या घरात नसताना त्यांच्या नवऱ्यांनी आखलेल्या दुसऱ्या "प्लॅन'चे प्रसंग चांगले जमलेत. आपल्या जागी दुसऱ्याच बायकांना देवदर्शनाला पाठविण्याची कल्पना मस्त आहे. हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर या तिघी मैत्रिणींनी केलेली धमाल पाहणाऱ्याची करमणूक करते. इथंपर्यंत अगदी वेगानं धावणाऱ्या या चित्रपटानं नंतर खाडकन्‌ स्वतःला "ब्रेक' लावलाय. इथून पुढं लेखक-दिग्दर्शकाची गती आणि मतीही खुंटलीय. त्यामुळेच हा चित्रपट तुकड्यातुकड्यांमध्ये बरा वाटतो. पण नेमकं शेवटाचं चढण चढतानाच लेखक अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक महेश कोठारेंची दमछाक झालीय. दिलीप प्रभावळकरांच्या रूपातला एक सर्वसाधारण खलनायक पाहायला मिळतो. चित्रपटाचा शेवटचा हा अर्धा तास अगदीच ढिसाळ आहे. कोठारेंनी त्यावर अधिक मेहनत घेतली असती तर हा चित्रपट आणखी मनोरंजक बनला असता. मकरंद अनासपुरेनं स्वतःला ग्रामीण बाजाच्या व्यक्तिरेखांमध्ये चांगलंच बांधून ठेवलंय. पण जोपर्यंत तो अशा व्यक्तिरेखांमध्ये धमाल करतोय, तोपर्यंत त्याची ही "इमेज' आपण "एन्जॉय' करायला काही हरकत नाही. प्रिया बेर्डेनंही त्याला चांगली साथ दिलीय. या दोघांच्या तुलनेत प्रसाद ओक, सुचित्रा बांदेकर, दिलीप प्रभावळकर, सुनील तावडे हे बाकीचे कलाकार आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. लिखाणाच्या बाबतीत अगदीच कच्ची असलेली व्यक्तिरेखा प्रभावळकरांनी स्वीकारणं आश्‍चर्यकारक आहे. श्रीरंग गोडबोले-अशोक पत्की या जोडीची कामगिरी कामचलाऊ आहे. या चित्रपटातील आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे विविध वस्तूंच्या जाहिराती. अशा प्रकारचं "ब्रॅण्डिंग' करताना अधिक कल्पकतेची गरज आहे.

Friday, April 18, 2008

सचिनची सप्तरंगी कॉमेडी

"नवरा माझा नवसाचा' या सुपरहिट चित्रपटानंतर दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी बराच काळ मराठी चित्रपट केला नव्हता. मात्र प्रतीक्षेचा काळ आता संपला असून येत्या शुक्रवारी सचिन दिग्दर्शित "आम्ही सातपुते' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या "मेकिंग'बद्दल तसेच "करियर'बद्दल त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
------------
ः "सत्ते पे सत्ता'चा "रीमेक' अशी सध्या "आम्ही सातपुते'ची ओळख करून दिली जातेय. मराठीत चांगली कथानकं असताना तुम्हाला "रीमेक' का करावासा वाटला?
ः सात भावांचं कथानक आणि त्यात माझा समावेश असल्यामुळं प्रेक्षकांना "सत्ते पे सत्ता'ची आठवण होणं साहजिक आहे; पण एखाद्या चित्रपटावरून प्रेरणा घेऊन चित्रपट बनविणं आणि एखाद्याचा "रीमेक' बनविणं, यात खूप अंतर असतं. "सत्ते पे सत्ता' हा चित्रपट "सेव्हन ब्राईड सेव्हन ब्रदर्स' या हॉलीवुडपटाचा रीमेक होता. "सेव्हन ब्राईड...' हा माझं प्रेरणास्थान आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी मला या चित्रपटावर मराठी सिनेमा करण्यास सांगितलं. "हा चित्रपट समजा तू केला नाहीस तर मी करीन आणि त्यात मोठ्या भावाची भूमिका तुला साकारावी लागेल,' हेसुद्धा सांगायला ते विसरले नाहीत. तेव्हा हा चित्रपट करण्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्याय नव्हता.
ः "सेव्हन ब्राईड...'मधली कोणती गोष्ट तुम्हाला खूप आवडली होती?
ः "सेव्हन ब्राईड...' हा एक संगीतमय चित्रपट होता. मात्र आपल्याकडं "पिंजरा' वगळता आजपर्यंत एकही संगीतमय चित्रपट बनलेला नाही. माझ्या तसेच इतर अनेकांच्या चित्रपटात चारपेक्षा जास्त गाणी नसतात. ही गोष्ट बराच काळ माझ्या डोक्‍यात घोळत होती. सध्याचा जमाना संगीत, नृत्य आणि रंगांचा आहे. तेव्हा "सेव्हन ब्राईड'चं कथानक मराठीतून सांगण्यासाठी हा काळ सर्वोत्कृष्ट आहे, असं मला वाटलं. सप्तरंगी कॉमेडी असं त्याचं स्वरूप आहे. "सेव्हन ब्राईड' चित्रपट विदेशी परंपरेतला होता. तेव्हा या कथानकाचा मूळ धागा कायम ठेवून आम्ही तो मराठी मातीतला वाटेल याची काळजी घेतलीय. तसेच हा चित्रपट बनविण्यामागची आणखी दोन कारणं म्हणजे "नच बलिये'तून प्रेक्षकांनी माझं तसेच सुप्रियाचं स्वीकारलेलं नृत्यकौशल्य. या चित्रपटाद्वारे आम्ही पुन्हा एकदा आमचं नृत्यकौशल्य प्रेक्षकांसमोर सादर केलंय. तसेच सात नायक आणि त्यांच्यासोबत झळकलेल्या सात नायिका. यापूर्वी एकाही मराठी चित्रपटात सात जोड्या एकत्र पाहायला मिळालेल्या नाहीत.
ः या चित्रपटात तुम्ही "बॅक टू बॅक' गाणं वापरलं आहे. त्याबद्दल काय सांगाल?
ः गाण्यावर गाणं टाकणं हा प्रकार प्रसिद्ध दिग्दर्शक विजय आनंदनी "गाईड' चित्रपटातून यशस्वी करून दाखविला होता. या चित्रपटात "मोसे छल...' आणि "क्‍या से क्‍या हो गया...' ही दोन गाणी एकापाठोपाठ आली होती. हा प्रकार मला बऱ्याच वर्षांपासून करायचा होता. तो या चित्रपटातून मी केलाय. पाहूया आता प्रेक्षक त्याला कसा प्रतिसाद देतात ते.
ः या चित्रपटात सोनू निगमनं गायलेलं गाणंही खूप वैशिष्ट्यपूर्ण असल्याची चर्चा आहे...
ः खरंय ते. सोनूनं या चित्रपटात अभिनय केला नसला तरी तो एकच गाणं खूप छान गायलाय. कुमार शानू, नितीन मुकेश, शब्बीर कुमार, अदनान सामी या चौघांचा आवाज त्यानं या गाण्यातून काढलाय.
ः या चित्रपटासाठी कलाकारांची निवड कशी केलीत?
ः "एकापेक्षा एक' या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करताना मला कलाकारांमधलं "टॅलेण्ट' पाहायला मिळालं. त्यातल्या बऱ्याच कलाकारांना मी या चित्रपटातून संधी दिलीय. अशोक सराफ तर माझा उजवा हातच आहेत. या चित्रपटात त्यांनी खानावळ चालविणाऱ्या एका वृद्ध माणसाची व्यक्तिरेखा साकारलीय. या सिनेमातला त्यांचा "गेटअप' खूप छान आहे. विशेष म्हणजे "सेव्हन ब्राईड...'मध्ये ही व्यक्तिरेखा नव्हती.
ः "नवरा माझा नवसाचा'ला मोठं यश मिळूनही पुढील चित्रपट करायला एवढा वेळ का घेतलात?
ः लवकर चित्रपट बनवला आणि चित्रपटगृहातूनही तो लवकर उतरला तर काहीच उपयोग नाही. तेव्हा फास्ट चित्रपट कशाला बनवायचा?
ः इतर कामांमध्ये व्यस्त असल्यानं चित्रपट करायला वेळ मिळाला नाही का?
ः मी एक "फिल्ममेकर' असून चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठीच आपला जन्म झालाय, असं मला वाटतं. "फिल्ममेकिंग' सोडून वेळ मिळाला तरच मी इतर गोष्टी करतो. "एकापेक्षा एक' या कार्यक्रमासाठी मी महिन्यातून फक्त दोन दिवस देतो.
ः मराठी चित्रपट सध्या तंत्र आणि बजेटच्या बाबतीतही मोठी उडी घेतोय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
ः हिंदी चित्रपटात मराठी कलाकार फक्त घरगड्याची किंवा मोलकरणीचीच भूमिका करताना पाहायला मिळतो. यावर माझा बऱ्याच वर्षांपासून आक्षेप होता. पण मराठी माणूस, मराठी कलाकार कोठेही कमी नाही, हे मला दाखवून द्यायचं होतं. म्हणूनच "आम्ही सातपुते' हा चित्रपट मी "435' या कॅमेऱ्यानं चित्रीत केलाय. तसंच या चित्रपटात हेलिकॅम हे तंत्रज्ञानही मी वापरलंय. या दोन्ही गोष्टींचा यापूर्वी मराठी चित्रपटात उपयोग झालेला नाही.
ः पुढं काय?
ः आणखी एखादा चित्रपट. लवकरच मी एका दुसऱ्या निर्मात्यासाठी हिंदी चित्रपट करणार आहे. पण त्याबाबतचे "डिटेल्स'साठी अजून थोडं थांबावं लागेल. कारण कोणतीही बाई गरोदर राहते तेव्हा तीन महिने ही बातमी बाहेर जाऊ दिली जात नाही. चित्रपटाबाबतही थोडं असंच आहे.

Wednesday, April 16, 2008

प्रेमाची करुण गोष्ट

प्रेमात पडणं अगदीच सोपं असतं, पण ते निभावणं म्हणजे कर्मकठीण गोष्ट. नातं प्रेमाचं असो की मैत्रीचं... प्रत्येक जण वेळ आली की इतर सर्व गोष्टींना डावलून "मी'लाच प्राधान्य देतो. अभिनेता अजय देवगणचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या "यू मी और हम'मध्ये हाच विचार थोड्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आलाय. हिंदी चित्रपट वर्षानुवर्षं प्रेमाची महती गातोय. अजयनं तरल प्रेमाला त्याग आणि उत्कटतेची जोड आपल्या चित्रपटातून दिलीय. दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात अजयनं खूप अवघड विषय हाताळलाय. सर्वसाधारण प्रेमपटांचा "फोकस' मनोरंजनाकडेच असला तरी हा चित्रपट बऱ्याच गोष्टी सांगण्यात यशस्वी झालाय. पण दुसरीकडे विषयातील क्‍लिष्टता सोपी करून सांगण्यात तो कमी पडलाय. चित्रपटाच्या हाताळणीवरून दिग्दर्शकाची कुवत लक्षात येते. पण, दिग्दर्शक अजयनं ती संधी प्रेक्षकाला घेऊ दिलेली नाही. "मैं डिरेक्‍टर बन गया हूँ' हे सांगण्याचा त्याचा अट्टाहास अनेक फ्रेम्समध्ये पाहायला मिळतो. वाढलेली लांबी, संथ घटनाक्रम आणि पाचकळ संवादांचाही या चित्रपटाला मोठा फटका बसलाय. पण, सरतेशेवटी काजोलची अभिनयातील कामगिरी या चित्रपटाला हात देऊन गेलीय.
अजय मेहरा (अजय देवगण) हा प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ. आपल्या मित्रांबरोबर तो एका क्रूझवर पिकनिकसाठी जातो. तिथं वेट्रेसचं काम करणाऱ्या काजोलच्या तो प्रेमात पडतो. तिला आपली खोटी ओळख सांगून तो तिचं मन जिंकण्यात यशस्वी होतो. पण, त्याचं खरं रूप उघड झाल्यानंतर दिया त्याच्याबरोबरचं नातं तोडते. पण, अजयपासून दूर गेल्यानंतर तिला त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागतं. हे आकर्षण पुन्हा दोघांना एकत्र आणतं आणि त्यांचा विवाह होतो. याचवेळी कथानकात खरा ट्विस्ट येतो. दियाला अल्झामायझरचा विकार जडतो. अजयला विसरण्यापर्यंतही तिची मजल जाते. या आजारामुळे अजय-दियाच्या काही महिन्यांच्या बाळापुढंही संकट उभं राहतं. त्यामुळं, दियाला खासगी रुग्णालयात दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय अजयपुढं उरत नाही. पण, तेवढ्यामुळं प्रश्‍न काही सुटत नाही. या दोघांच्यामधला प्रेमाचा धागा एवढा घट्ट असतो की, 25 वर्षांनंतरही ते एकत्र राहतात.
चित्रपटाची कथा कल्पना खुद्द अजयची आहे. त्याच्या या कल्पनेचं पटकथेत रुपांतर केलंय ते रॉबीन भट आणि आकाश खुराना या जोडीनं. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कागदावरची कथा पडद्यावर उतरविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य अजयनं केलं होतं. दुर्दैवानं प्रत्यक्ष चित्रपटात तसं घडलेलं नाही. कागदावर ही कथा खूप प्रभावी वाटते. पण, ती पडद्यावर परावर्तित होताना त्यात बऱ्याच त्रुटी राहून गेल्यात. चित्रपटाची सुरुवात अगदीच "रुटीन' आहे. दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न असूनही अजयनं "फ्लॅशबॅक"द्वारे चित्रपटाची कथा सांगण्याची जोखीम पत्करलीय आणि ती बऱ्याचअंशी त्याच्या अंगाशीही आलीय. अजय आणि काजोलमध्ये प्रेमाचा धागा बांधण्यात बराच वेळ वाया गेलाय. चित्रपटाची गाडी रुळावर आलीय ती मध्यांतरानंतर. काजोलला अल्झामायझरचा विकार जडल्याचं निदान झाल्यानंतर या चित्रपटानं वेग घेतलाय. या विकारानं दोघांच्या मनाची झालेली घुसमट खूप छान पद्धतीनं चित्रीत करण्यात आलीय. हा आजार पराकोटीला गेल्याचं दाखविण्यासाठी या दोघांच्या मुलावर बेतलेला प्राणघातक प्रसंग चटका लावणारा आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असूनही दिग्दर्शकानं बऱ्याच ठिकाणी पाचकळ संवादांची पेरणी केलीय. ती चित्रपटाच्या "मूड'ला मोठा धक्का देऊन गेलीय. हा चित्रपट सावरलाय तो काजोलच्या कामगिरीवर. तिनं आपल्या अभिनयाद्वारे दियाची व्यक्तिरेखा परिपूर्ण वाटेल, याची पूर्ण काळजी घेतलीय. अजय देवगणनं आपल्या चौकटीत राहून तिला साथ दिलीय. सुमीत राघवनला हिंदीत प्रथमच मोठी संधी मिळाली असून तो काही दृश्‍यांमध्ये लक्षात राहतो. "दिल धकडा' हे गाणं वगळता विशाल भारद्वाजचं संगीत फार मोठी करामत करू शकलेलं नाही.

Tuesday, April 15, 2008

आरपार भिडणारा टिंग्या...तमाम प्रेक्षकवर्ग "वळू'च्या जादूतून अजून पुरता बाहेर येण्याच्या अगोदरच "टिंग्या' हा चित्रपट प्रेक्षकांना आरपार भिडण्यासाठी मंगेश हाडवळे नावाचा तरुण दिग्दर्शक आपल्या "टिंग्या' या कलाकृतीद्वारे प्रेक्षकांवर गारूड घालण्यासाठी सज्ज झालाय. हा चित्रपट पाहिल्यानंतर सर्वप्रथम मनात येणारी गोष्ट म्हणजे बैलांना खरंच सध्या चांगले दिवस आलेत. "वळू' चित्रपटातला बैल हा मुक्त स्वातंत्र्यावर भाष्य करून गेला. या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या "टिंग्या'तला बैल हा त्याउलट आहे. सध्याच्या असंवेदनशील आणि "प्रॅक्‍टिकल' समाजाचा तो बळी ठरतो. दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी टिंग्या या सात-आठ वर्षांच्या मुलाच्या नजरेतून या बैलाचं बळी जाणं अत्यंत संवेदनशीलपणे चित्रीत केलंय. त्यातून उभं राहतं ते सध्याचं वास्तव. हा चित्रपट पाहणाऱ्याच्या अगदी आरपार भिडतो. त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे विषयातला सच्चेपणा, हाताळणीतला साधेपणा आणि मराठी भाषेचा ग्राम्य गोडवा. हा चित्रपट सुरू झाल्यानंतर पाहणाऱ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये एका अद्‌भूत दुनियेत घेऊन जातो. तिथलं जीवन कधी हसवतं, कधी डोळ्यातून पाणी आणतं तर कधी आपल्या बोथट संवेदनांवर मार्मिक भाष्य करून जातं. चित्रपट माध्यमाची विलक्षण ताकद अधोरेखित करण्याचं काम या चित्रपटानं केलंय.
ही कहाणी आहे टिंग्या आणि चितंग्याची. टिंग्या म्हणजे आठ वर्षांचा एक निरागस चुणचुणीत मुलगा आणि चितंग्या म्हणजे त्याच्यासोबतीनं जन्मानं आलेला एक बैल. टिंग्याचे वडील एक कष्टकरी शेतकरी. सावकाराचं वाढत जाणारं कर्ज, त्यावर व्याजाचा बोजा आणि लहरी हवामानामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली असते. त्यातच चितंग्या एका अपघातामुळं आपली शक्ती हरवून बसतो. तेव्हा आपलं कुटुंब चालविण्यासाठी या चितंग्याला
विकण्याशिवाय टिंग्याच्या वडिलांकडं दुसरा पर्याय नसतो. ही गोष्ट कळल्यानंतर टिंग्या संपूर्ण घर डोक्‍यावर घेतो. एवढ्यावरच न थांबता तो चितंग्यावर उपचार करण्यासाठी एका डॉक्‍टरला गावातून पाचारण करतो. पण परिस्थितीच अशी उद्‌भवते की, चितंग्याचा बळी जातो.
पदार्पणाच्या चित्रपटातच मंगेश हाडवळे यांनी कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी केलीय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय गेली काही वर्षं नुसता गाजतोय. दिग्दर्शकानं या विषयावर थेट भाष्य न करता एका शेतकरी कुटुंबाची ससेहोलपट दाखवलीय. या चित्रपटाचा मूळ विषय एक मुलगा आणि बैलातल्या नातेसंबंधाशी निगडीत आहे. हा विषय तर या चित्रपटात प्रभावीपणे उतरलाच आहे. त्याशिवाय ग्रामीण जीवनातल्या विविध रंगांची इथं उधळण झालीय. टिंग्याच्या शेजारी राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाचं केलेलं चित्रीकरणही खूप मार्मिक आहे. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी असूनही काही त्रुटी राहून गेल्या आहेत. टिंग्या आणि त्याच्या मैत्रिणीबरोबरचं नातं दिग्दर्शकानं उगीचच तुटेल एवढं ताणलंय. टिंग्याला मोठं करण्याच्या प्रयत्नात त्याच्याहून काही वर्षंच मोठा असणारा त्याचा भाऊ अगदीच दुर्लक्षित राहून गेलाय. टिंग्याच्या व्यक्तिरेखेतलं महत्त्व लक्षात आल्यानं दिग्दर्शकानं त्याला काही दृश्‍यांमधून आणखी मोठं करण्याचा प्रयत्न केलाय. फ्लॅशबॅकच्या तंत्रात नसलेली सफाई प्रकर्षानं जाणवते. पण, चित्रपटाच्या एकंदरीत परिणामच्या तुलनेत या त्रुटी अगदी क्षुल्लक आहेत.
शरद गोयेकर हा बालकलाकार आपल्या करियरच्या सुरुवातीलाच थोर कामगिरी करून गेलाय. कॅमेऱ्यासमोरची त्याची एवढी सफाईदार कामगिरी बुचकळ्यात टाकणारी आहे. सचिन देव (वडील), माधवी जुवेकर (आई), तरन्नुम पठाण (रशिदा), चित्रा नवाथे (नानी), विठ्ठल उमप (नानीचा पती) या सर्व कलाकारांनी टिंग्याला चांगली साथ दिलीय. जो आशय चार-पाच गाण्यांमधून सापडणार नाही, तो आशय "मांझं आभाळ तुला दे... तुझं आभाळ मला...' या ओळीतून सांगण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. तेव्हा या सुट्टीचं पहिलं काम म्हणजे "टिंग्या' पाहणे.

Saturday, April 12, 2008

काजोल मुलाखतबॉलिवुड सम्राज्ञी होण्याची गुणवत्ता आणि संधी असूनही काजोलनं दशकभरापूर्वी या क्षेत्रातून काही काळासाठी दूर होण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी "फना'द्वारे तिनं केलेलं पुनरागमन चांगलंच यशस्वी ठरलं होतं. आता ती आपला पती अजय देवगणचं दिग्दर्शन पदार्पण असलेल्या "यू मी और हम' चित्रपटाद्वारे रसिकांसमोर येतेय. त्यानिमित्तानं तिची ही दिलखुलास मुलाखत.
----------------
ग्लॅमर जगतामधली मुलाखत द्यायला न आवडणारी एकमेव अभिनेत्री म्हणजे काजोल ! कारकिर्दीच्या सुरुवातीला तिचा "मिडीया'शी बऱ्यापैकी "रॅपो' होता. पण, कालांतरानं विविध घटनांमुळं तिनं "मिडीया'ला आपल्यापासून दूरच ठेवलं. "फना'च्या प्रदर्शनावेळीही तिनं गप्प राहणंच पसंत केलं होतं. पण, अजयच्या दिग्दर्शकीय पदार्पणामुळं तिला आपलं मौनव्रत सोडावं लागलं. याबद्दल ती म्हणते, ""खरंच मला मुलाखती द्यायला आवडत नाहीत. त्याच त्याच प्रश्‍नांना काय उत्तरं द्यायची ? आपल्याजवळ काही सांगायला असेल तर बोलायला हरकत नाही. एक तर मी खूप कमी चित्रपट करते. तेव्हा उगीचच काही तरी बडबड करायला मला आवडत नाही. त्यापेक्षा मी गप्प राहणेच पसंत करते.''
अजयमध्ये लपलेल्या दिग्दर्शकाची जाणीव काजोलला पहिल्यांदा झाली. एके दिवशी अजयनं सहजच तिला गप्पा मारता मारता एक कथानक ऐकवलं. त्यावर दोघांनी भरपूर चर्चा केली आणि काही क्षणात काजोलनं त्याला आपण या चित्रपटात काम करणार असल्याचं सांगितलं. अजयच्या दिग्दर्शनाबद्दल ती सांगते, ""वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यानं दिग्दर्शक व्हायचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आता पुरं झालंय, याचा त्याच्याबरोबर मलाही खूप आनंद वाटतो. अजयच्या दिग्दर्शनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या विचारांमध्ये खूप स्पष्टता आहे. चित्रपट निर्मितीमधल्या प्रत्येक घटकाकडून नेमकं काय घ्यायला हवं, याची त्याला जाणीव आहे. एका चांगल्या दिग्दर्शकाची ही निशाणी आहे. "यू मी और हम' स्वीकारण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अजयनं स्वीकारलेली दिग्दर्शनाची धुरा. अजयमध्ये चांगला दिग्दर्शक दडलाय, हे मला ठाऊक होतं. पण, तो "ग्रेट डिरेक्‍टर' असल्याची खात्री मला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आली. माझ्या अपेक्षांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्यानं दिग्दर्शक म्हणून छान काम केलंय. आतापर्यंत मी अनेक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. पण, प्रत्येक वेळी मला माझ्या भूमिकेबद्दल प्रश्‍न पडायचे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे अजयनं मला माझी व्यक्तिरेखा अशापद्धतीनं ऐकविली की मला काम करताना एकही प्रश्‍न त्याला विचारावा लागला नाही.''
प्रेम या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत. त्यामुळे, अजयनं "यू मी और हम'मधून प्रेमाबद्दल वेगळं काय भाष्य केलंय, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या विषयाबद्दल ती सांगते, "" "प्यार करने के लिए एक जुनून होता है । लेकिन प्यार निभाने के लिए भी एक जुनून जरूरी है ।' हीच गोष्ट आम्ही या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपण बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टींचा उगीचच बाऊ करतो. योग्य मार्गानं समस्य सोडविण्याचा प्रयत्न केल्यास त्यात नक्की यश येतं. हा विचार या चित्रपटातून मांडण्यात आलाय.''
हिंदी चित्रपटसृष्टीत एखाद्या नायिकेचा विवाह झाला की, तिच्या "करियर'कडं कोणी गांभीर्यानं पाहत नाही. काजोलनं विवाहानंतर "दिल क्‍या करे', "कभी खुशी कभी गम', "राजू चाचा', "फना' आणि "यू मी और हम' हे पाच चित्रपट केले. दहा वर्षांमध्ये अवघे पाच चित्रपट करण्याच्या आपल्या निर्णयाचं समर्थन करताना ती सांगते, ""मी स्वतःला खूप "लकी' मानते. गेल्या दोन दशकांमध्ये मला खूप वेगवेगळे "रोल्स' करण्याची संधी मिळाली. अशी संधी यापूर्वी खूप थोड्या नायिकांच्या वाट्याला आलीय. मी माझ्या भूमिकांबाबत खूप "चुजी' आहे. तसेच माझ्या चित्रपट निर्मितीमधल्या प्रत्येक विभागाबद्दलच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. एक तर मला कथानक खूप वेगळं लागतं, दिग्दर्शकही खूप चांगला लागतो. माझ्याशी "कम्फर्टेबल' असतील अशा कलाकारांबरोबर मला काम करायचं असते. तेव्हा एवढ्या सगळ्या अटींमुळं माझा नवीन चित्रपट यायला तीन वर्षं लागतात. मात्र, त्याची मला खंत नाही. काहीतरी सुमार भूमिका करण्यापेक्षा तीन वर्षांनी एखादी मस्त भूमिका साकारायलाच मला अधिक आवडेल. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे चित्रपट मला आवडतात. याचा अर्थ असा नाही की, समस्याप्रधान चित्रपट वाईटच असतात. पण, मी माझा स्वतःचा मार्ग निश्‍चित केलाय.''
गेल्या दोन दशकांमध्ये आपला अभिनय प्रगल्भ झाल्याचं काजोल अगदी ठामपणे सांगते. त्यासाठी ती शाहरुख खानचं उदाहरण देते. ती म्हणते, ""शाहरुखनं काही काळापूर्वी दिलेली एक मुलाखत माझ्या चांगली लक्षात आहे. यात तो म्हणाला होता, माझ्यासमोर एखादी गाय जरी उभी केली तरी मी तिला माझं तिच्यावर प्रेम आहे, हे पटवून देऊ शकेन. शाहरुख आणि आमिर खानच्या कामावरील निष्ठेला तोड नाही. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालंय. पण, जर कोणी मला अजय, शाहरुख आणि आमीर या तिघांपैकी एकाची सहकलाकार म्हणून निवड करायला सांगितलं तर मी तिघांनाही नकार देईन. कारण, माझ्यादृष्टीनं कथानक सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून तर करण जोहरचा नवीन चित्रपट मी अजूनपर्यंत स्वीकारलेला नाही. मी त्याला तोंडी होकार दिलाय. पण, कथानक ऐकल्यानंतरच त्याचा चित्रपट स्वीकारायचा की नाही, हे मी ठरवीन. सध्या मी आमच्या "होम प्रॉडक्‍शन'चा "टुनपूर का सुपरहीरो' हा एकमेव चित्रपट करतेय.''
गेल्या पाच वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत कमालीचा बदल झालाय. याची काजोलला कल्पना आहे. हा बदल धक्कादायक असल्याचं स्पष्ट करून ती सांगते, ""खरं तर मला हिंदी चित्रपटांमध्ये कामच करायचं नव्हतं. कारण, हे क्षेत्र खूप अस्थिर आहे. मला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पगाराचा चेक हवा होता. पण, कुटुंबियांनी मला या क्षेत्रात अक्षरशः ढकलून दिलं. पण, इथं काम करायला लागल्यानंतर हे क्षेत्र आपल्याला जेवढं वाईट वाटत होतं, तेवढं वाईट नाही, याची मला खात्री पटली.''

Thursday, April 10, 2008

कागदावरचा चित्रपट पडद्यावर उतरवायचाय...


अजय देवगण मुलाखत

"स्टार' कलाकारांनी दिग्दर्शक बनण्याचा "ट्रेण्ड' सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतोय. अभिनेता आमीर खानपाठोपाठ आता अजय देवगणही "यू मी और हम'द्वारे दिग्दर्शक बनलाय. त्यानिमित्तानं त्याच्याशी मारलेल्या गप्पा.
---------------
ः अभिनयात तब्बल 17 वर्षं घालविल्यानंतर एकदम अचानक दिग्दर्शक बनण्याचा निर्णय का घेतलास ?
ः "चलो अभी मैं एक फिल्म डिरेक्‍ट करता हूँ' असा टिपीकल डायलॉग टाकण्यासाठी मी हा चित्रपट बनवलेला नाही. माझ्या मते कोणताही चित्रपट बनण्यासाठी एका चांगल्या कल्पनेची गरज असते. ही कल्पना मी तीन वर्षांपूर्वी सुचली. तिच्यावर मग मी थोडं काम केलं आणि माझ्या लक्षात आलं की आता आपण त्यावर चित्रपट करू शकतो. त्यामुळं मी अगदी ठरवून दिग्दर्शक बनलेलो नाही.
ः पण, अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत करियर करण्यापूर्वी तुला दिग्दर्शकच व्हायचं होतं ना ?
ः हो, निश्‍चितच. दिग्दर्शनाकडंच माझा अधिक कल होता. अभिनयाची सुरुवात होण्यापूर्वी मी काही व्हिडीओपटही केले होते. माझे वडिल आणि प्रसिद्ध ऍक्‍शन दिग्दर्शक वीरू देवगण यांच्याबरोबर मी अनेक चित्रपटांच्या शूटिंगला जायचो. मला अजूनही आठवतंय अवघ्या अकरा-बाराव्या वर्षी मी संकलन करायला शिकलो होतो. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हाताखाली काही काळ दिग्दर्शनाचेही धडे मी गिरवले होते. पण, त्यानंतरही मी अभिनेता व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. तेव्हा त्या दृष्टीनं प्रयत्न केला आणि थोडा फार यशस्वीही झालो.
ः "रफटफ ऍक्‍टर' अशी तुझी इमेज आहे. तरीदेखील दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करताना प्रेमाचा विषय तू का निवडलास ?
ः खरं तर मी गेल्या पंधरा वर्षांमध्ये एवढे वेगवेगळे "रोल्स' केले आहेत की, माझ्यावर "रफटफ इमेज'चा शिक्का मारणं योग्य नाही. पण, ते वास्तव आहे, हेसुद्धा मी नाकारीत नाही. दिग्दर्शक बनताना आपण "लव्हस्टोरी'च बनवायची असं मी ठरवलं नव्हतं. तो विषय मनात आला आणि मी दिग्दर्शक बनलो, एवढंच त्यामागचं सत्य आहे.
ः आजवर अनेक प्रेमकहाण्या प्रेक्षकांपर्यंत आल्यात. "यू मी और हम'मधली प्रेमकहाणी तू कशापद्धतीनं सांगितली आहेस ?
ः प्रेमाबाबत आपल्याकडे अनेक समज-गैरसमज आहे. आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो आणि समोरचीही व्यक्ती आपल्यासोबत नातं जोडते. मात्र कालांतरानं आपण आपल्या जोडीदाराला आपल्या पद्धतीनं बनविण्याचा प्रयत्न सुरू करतो. तेव्हा माझा प्रश्‍न असा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडीच तुम्हांला सुरुवातीलाच आवडत नव्हत्या तर तुम्ही तिच्याशी नातं का जोडलंत ? हा विचार मी या चित्रपटातून हलक्‍याफुलक्‍या, मनोरंजक पद्धतीतून मांडलाय.
ः काजोलची निवड कशी केलीस ?
ः तिनं मला तिची निवड करण्याची संधीच दिली नाही.
ः म्हणजे ?
ः मी तिला या चित्रपटाची "कॉन्सेप्ट' ऐकविली. तेव्हा तिनं मला हा चित्रपट करायचा असल्याचं सांगितलं. त्यामुळं, हा सिनेमा "प्लॅन' करायच्या आधीच ती माझ्या चित्रपटाची नायिका बनली होती.
ः आतापर्यंत तुम्ही दोघांनी एकूण सहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तिच्या अभिनयाबाबत तू काय सांगशील ?ः काजोल ही पहिल्यापासूनच "ग्रेट ऍक्‍ट्रेस' आहे. पण, अनुभवानं ती अधिक प्रगल्भ झालीय. सिनेमा माध्यमाची तिला आता आणखी चांगली जाण आलीय.
ः काजोलचंही तुझ्याबद्दलचं मत फारसं वेगळं नाहीय. "यू मी और हम' प्रदर्शित होण्यापूर्वीच तिनं तुझी गणना श्रेष्ठ दिग्दर्शकांमध्ये केलीय. याबद्दल तुला काय म्हणायचंय ?
ः हे खरंय की आम्हा दोघांना आमचं परस्परांचं काम खूपच चांगलं वाटतंय. पण, असं व्हायला नको की आमच्यातल्या नात्यामुळं उगाचच आम्ही एकमेकांचं स्तुती करावी. येत्या शुक्रवारपर्यंत थांबा. काय ते कळेलच.
ः तू आतापर्यंत अनेक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंस. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना तुझ्यावर कोणाचा प्रभाव होता ?
ः विजय आनंद यांना मी आदर्श मानतो. पण, दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना मी कोणालाही नजरेसमोर ठेवलं नाही. कारण, प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची एक स्टाईल असते. कथा सांगण्याची एक विशिष्ट पद्धत असते. माझ्या मते, चित्रपट हे फक्त "स्टोरी टेलिंग'चं माध्यम आहे. तुम्ही एखादं कथानक पडद्यावर किती आत्मियतेनं सांगता, यावर सर्व काही अवलंबून असतं. मला पटकथा लेखकानं जे कागदावर लिहिलंय ते पडद्यावर मांडायचं होतं. ही खूप कठीण गोष्ट असते. कारण, जगात एकही दिग्दर्शक असा नाही की जो कागदावर लिहिलेली कथा जशीच्या तशी पडद्यावर सांगू शकलाय. कागदावरचा चित्रपट पडद्यावर उतरताना काही टक्‍क्‍यांमध्ये कथानकाचं "रिसोल्युशन' कमी होतं. त्याची टक्केवारी फार घसरू न देण्याचं कसब एखाद्याला साधलं तर तो चांगला दिग्दर्शक म्हणून गणला जातो. मला हीच गोष्ट साध्य करायचीय.
ः "हल्लाबोल' का अपयशी ठरला असं तुला वाटतं ?
ः या चित्रपटाचा विषय खूप जुना झाला होता. एक तर या सिनेमाच्या चित्रीकरणास तब्बल चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. ज्यावेळी मी "ओंकारा' सुरू केला तेव्हा "हल्लाबोल'चं शूटिंग संपलं होतं. यावरून हा चित्रपट किती रेंगाळला होता, याची कल्पना येते. त्याशिवाय हल्लीचा प्रेक्षकवर्ग खूप जागरूक झालाय. तो "आऊटडेटेड' चित्रपट स्वीकारीत नाही.
ः गेल्या सतरा वर्षांमध्ये एक कलाकार म्हणून तुझी किती प्रगती झालीय ?
ः अनुभव ही अशी गोष्ट आहे की सर्वच माध्यमांमध्ये ती उपयोगाला येते. माझ्या करियरला सुरुवात झाली तेव्हा मी छायाचित्रकाराच्या खुर्चीवर बसून अप्रतिम दृश्‍यं टिपायचो. त्यावेळी तिथं हजर असणाऱ्यांना याबाबत आश्‍चर्य वाटायचं. त्यावेळी फक्त उत्कृष्ट "शॉट' घेण्याकडं माझा कल असायचा. पण, आता दिग्दर्शक बनल्यानंतर कथानक चांगलं वाटण्यासाठी उत्कृष्ट "शॉट' कोणता असेल यावर मी विचार करू लागलोय. माझ्या मते ही एका कलाकारामधली प्रगती आहे.
ः भविष्यात अभिनयावर अधिक लक्ष केंद्रीत करणार की दिग्दर्शनावर ?
ः या प्रश्‍नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण, एखादी खूप चांगला कल्पना मला स्वतःला सुचली तरच मी पुढचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ही कल्पना मला अगदी उद्याही सुचू शकते किंवा पुढील तीन वर्षंही सुचणार नाही. मात्र, दरम्यानच्या काळात माझा अभिनय सुरूच राहील. सध्या मी तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतोय. राजकुमार संतोषींच्या "लंडन ड्रीम्स'च्या चित्रीकरणास जूनमध्ये सुरुवात होईल.

Monday, April 7, 2008

राहुल बोस, के. के. "बेस्ट'


"शौर्य' या शीर्षकावरून हा युद्धपट वाटण्याची शक्‍यता आहे, पण तसं प्रत्यक्षात काही नाही. हा युद्धपट नाही की सीमेवरील एखाद्या सैनिकाची वीरोगाथा नाही. हा चित्रपट आपल्या समाज यंत्रणेतील बिघाडावर प्रभावी भाष्य करतो. एकीकडे आपला देश धर्मनिरपेक्ष प्रतिमेसाठी गौरविला जात असताना दुसरीकडे काही कट्टरपंथीय मंडळी या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिग्दर्शक समर खान यांनी लष्करी पार्श्‍वभूमीवर हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला आहे. "कोर्टमार्शल' प्रक्रियेला सामोरा जाणारा एक लष्करी अधिकारी आणि त्याच्या चौकशीतून बाहेर आलेलं एक धक्कादायक सत्य या चित्रपटाला इतरांहून वेगळं ठरवतं. सुरुवातीला संथ गतीनं जाणारा हा चित्रपट शेवटच्या वीस मिनिटांमध्ये उंची गाठण्यात यशस्वी ठरलाय. राहुल बोस आणि के. के. मेनन यांची अभिनयातील सरस कामगिरी या चित्रपटाला तारक ठरलीय.
चित्रपटाची सुरुवात होते ती एका हत्येपासून. जावेद खान (दीपक डोब्रियाल) नावाचा एक कॅप्टन आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करतो. त्यामुळं त्याच्यावर "कोर्टमार्शल'ची कारवाई सुरू होते. त्यासाठी लष्कराचा वकील म्हणून आकाशला (जावेद जाफरी) पाचारण करण्यात येते. सिद्धू (राहुल बोस) हा आकाशचा अगदी जवळचा मित्र. तोसुद्धा लष्करातच वकील असतो. आकाशबरोबर राहण्यासाठी तो जावेद खानचं वकीलपत्र घेण्यास तयार होतो; मात्र आकाश त्याला या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कसलीही ढवळाढवळ न करण्याची तसेच निकाल आपल्याच बाजूनं लागेल, अशी अट घालतो. ही अट सिद्धूला मान्य असते. कारण आयुष्याकडं त्यानं कधीच गांभीर्यानं पाहिलेलं नसतं. सुनावणीच्या निमित्तानं तो जावेद खानला भेटतो तेव्हा हा अधिकारी त्याच्याकडं एक शब्दही काढत नाही. दरम्यान श्रीनगरमध्ये एका वर्तमानपत्रात काम करणारी दिव्या (मीनिषा लांबा) सिद्धूला भेटते. तिनं जावेद खान प्रकरणात विशेष रस घेतलेला असतो. हे दोघं जावेदच्या आईला भेटतात. तसेच जावेदच्या हातून ठार मारला गेल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीलाही भेटतात. या भेटीनंतर जावेदचा खटला गांभीर्यानं लढविण्याचा सिद्धू निर्णय घेतो. त्याचा परिणाम सिद्धू आणि आकाशच्या मैत्रीवर होतो. चित्रपटाच्या "क्‍लायमॅक्‍स'मध्ये सिद्धू ब्रिगेडियर प्रताप (के. के. मेनन) यांना साक्षीसाठी बोलावतात. या साक्षीतून या खटल्याला वळण मिळतं आणि जावेद खानची निर्दोष मुक्तता होते.
परकीयांविरुद्धची लढाई हिंदी चित्रपटाला काही नवीन नाही. त्या तुलनेत स्वकीयांविरुद्धचा लढा आणि त्याला धर्मांधतेची मिळालेली पार्श्‍वभूमी आतापर्यंत हिंदी चित्रपटात खूप कमी वेळा पाहायला मिळालीय. प्रसिद्ध दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन यांच्या "सरफरोश' चित्रपटात हा मुद्दा त्रोटक स्वरूपात पाहायला मिळाला होता. "शौर्य'ची पटकथा जयदीप सरकार, अपर्णा मल्होत्रा आणि समर खान या तिघांनी लिहिलीय. कथानकातलं वेगळेपण पटकथेतून मांडताना या त्रिकुटाची बरीच त्रेधातिरपीट उडालीय. चित्रपटाच्या "क्‍लायमॅक्‍स'मधून बाहेर आलेलं जळजळीत सत्य हा खरं तर या चित्रपटाचा मूळ विषय असायला हवा होता, पण लेखक-दिग्दर्शकांनी या मूळ विषयाला "क्‍लायमॅक्‍स'पर्यंत झाकून ठेवलंय. त्यामुळे आकाश आणि सिद्धूमधील मैत्री आणि सिद्धू-काव्याच्या प्रेमकहाणीवर पटकथेचा बराच वेळ वाया गेलाय; मात्र शेवटची वीस मिनिटं खूप प्रभावी ठरल्यानं ही चूक माफ करायला हरकत नाही.
राहुल बोसनं सिद्धूची व्यक्तिरेखा साकारताना कमाल केलीय. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरावी. त्यामानानं जावेद जाफरीला फारसा "स्कोप' मिळालेला नाही. जावेद खानची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दीपक डोब्रियालच्या वाट्याला फारसे संवाद आलेले नाहीत, पण तो आपल्या चेहऱ्यातूनच सर्व काही सांगून गेलाय. भूमिका छोटी असो वा मोठी, के. के. मेननचा अभिनय सर्वोत्तमच असतो. "शौर्य'मध्येही त्यानं नेमकं असंच केलंय. मीनिषा लांबा, अमृता राव, सीमा विश्‍वास या तीन नायिकांची कामगिरीही चांगली आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये संगीताला फारसा वाव नसतो. तरीदेखील दिग्दर्शकानं अदनान सामीकडून दोन गाणी अट्टाहासानं घेतलीयत. म्हणूनच ती लक्षात राहत नाहीत.

Saturday, April 5, 2008

एस. पी. बालसुब्रह्मण्यम


मी अजूनही "रेस'मध्ये आहे...
तब्बल 13 भाषांमध्ये पार्श्‍वगायन करणाऱ्या बालसुब्रह्मण्यम यांनी सोमवारी दुपारी मराठी भाषेत गाऊन 14 भाषांत गाण्याचा सन्मान मिळविला. पट्टम वीरूनिर्मित आणि सुभाष फडके दिग्दर्शित "बंड्या आणि बेबी' या चित्रपटासाठी त्यांनी एक मराठी गाणे गायले. संदीप खरे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. गेल्या 42 वर्षांत बालसुब्रह्मण्यम यांनी सुमारे 49 हजार गाणी गायली आहेत. स्वतःची "स्टाईल' असूनही काही पार्श्‍वगायक हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी "इनिंग' खेळू शकले नाहीत. त्यांच्याशी केलेली चर्चा.
---------------
ः मी मराठीत का गायलो नाही, हा खरोखरीच एक "मिलियन डॉलर' प्रश्‍न आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही मला त्याबद्दल अनेकदा विचारलंय. महम्मद रफी, किशोरकुमार, मन्नाडे यांची नावं घेऊन हा प्रश्‍न मला विचारला जातो. एक गोष्ट मी नम्रपणे सांगेन की, रफी-किशोर कुमार यांच्याबरोबर माझी तुलना करणं योग्य नाही. ते माझ्यापेक्षा हजारो मैल पुढं आहेत.

ः मराठी भाषेत गाताना शब्दांच्या उच्चारणावर खूप लक्ष द्यावं लागतं. मला ते जमेल की नाही, अशी अनेकांना शंका आहे; पण गंमत म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये जेव्हा मी गायला सुरुवात केली, तेव्हा माझ्याबद्दल अशीच शंका घेतली जायची. सुदैवानं आतापर्यंत माझ्या हिंदी उच्चारांमध्ये कोणाला काही खटकलेलं नाही. यापुढेही खटकणार नाही, अशी मी आशा करतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये मी यशस्वी होण्यामागचं कारण म्हणजे माझा आत्मविश्‍वास. ज्या भाषेतलं गाणं गायचंय, त्या भाषेचा प्रथम मी "फील' घेतो. तेलगू, तमीळ या दोन भाषा सोडून माझ्याकडे कोणी संगीत दिग्दर्शक आला तर मी त्यांना सांगतो, "केवळ बालू गाणाराय म्हणून तुम्ही भाषेचं विद्रूपीकरण करू नका;' परंतु ते माझं काही ऐकत नाहीत.

ः माझी मातृभाषा तेलगू आहे. शाळा-कॉलेजमधील नाटकात मी भाग घ्यायचो. ही सर्व नाटकं भक्‍तिरसप्रधान असायची. एका कानडी भाषेतील वाहिनीसाठी सध्या मी मुलांसाठी कार्यक्रम करतोय. या कार्यक्रमात धारवाड, गुलबर्गा या भागातल्या लहान मुलांचा भरणा आहे. ही मुलं अनेकदा मराठी गाणी गातात. त्यांच्या तोंडून मी बरीच गाणी ऐकलीत. मला जाणवलेली गोष्ट म्हणजे तेलगू संगीत दिग्दर्शकांनी जाणीवपूर्वक मराठीतल्या मेलडीचा आपल्या भाषेत उपयोग केला.

ः एक काळ असा होता, की मी हिंदी चित्रपटात चांगलाच "पॉप्युलर' होतो. 1990 च्या दशकात मी दररोज सकाळी मुंबईत यायचो आणि रात्री चेन्नईला परतायचो. एका दिवशी तर माझी तब्बल 16 गाणी रेकॉर्ड झाली होती. या सर्व गाण्यांना आनंद-मिलिंद या संगीतकार जोडीनं संगीत दिलं होतं. त्या दिवशी सकाळी माझं मुंबई विमानतळावर आगमन झालं. कोणत्याही हॉटेलात न जाता मी थेट रेकॉर्डिंग सुरू असलेल्या स्टुडिओत गेलो. तिथून मग मी दिवसभर अनेक स्टुडिओ फिरत राहिलो. रात्री उशिरा चेन्नईला जाणारं परतीचं विमान पकडलं.

ः पूर्वीच्या इतका मी आता हिंदीत कार्यरत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण त्याचं मला वाईट वाटत नाही. कारण हिंदी चित्रपटसृष्टीत एखादा कलाकार ठराविक काळात यशस्वी का असतो आणि एखादा स्पर्धेतून बाहेर का फेकला जातो, या प्रश्‍नांची उत्तरं देणं कठीण आहे; परंतु गेल्या 42 वर्षांमध्ये मी जे काही मिळवलं, त्याबद्दल मी आनंदी आहे. आजही मला चाहत्यांचे ई-मेल्स, पत्रं आणि फोन येतात. दाक्षिणात्य चित्रपटात आजही मी दिवसाला दोन गाणी रेकॉर्ड करतो. अजूनही मी "रेस'मध्ये आहे. हिंदीत मी वरचेवर का गात नाही, असा प्रश्‍न मला नेहमी विचारला जातो. हा प्रश्‍न मी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या संगीत दिग्दर्शकांना विचारीन. गेल्या दशकभरात खूप चांगले गायक हिंदीत आल्यामुळं त्यांना मला चेन्नईहून मुंबईत बोलाविण्याची गरज वाटली नसावी.

ः "बंड्या आणि बेबी' या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांचा मी विशेष आभारी आहे. कारण अलीकडच्या काळातील हा एकमेव संगीतकार असा आहे, की ज्यानं मी कोणत्या "रेंज'शी "कम्फर्टेबल' आहे, याबद्दल विचारणा केली. हल्लीचे इतर संगीतदिग्दर्शक स्वतःच गात असल्यामुळं ते स्वतःच गाण्याचा "पीच' ठरवतात. जो पार्श्‍वगायक या "पीच'वर गाणार आहे, त्याला ते "सूट' होईल की नाही, याचा ते विचारच करीत नाहीत.

Friday, April 4, 2008

रंगतदार भाऊबंदकी


रंगतदार भाऊबंदकी

नात्यांमधली फसवणूक, खुनांची मालिका व लैंगिकतेकडे झुकणारा मालमसाला असला, की अब्बास-मस्तान ही दिग्दर्शकांची जोडी खुलते. या दिग्दर्शकद्वयीचा नवीन "रेस' चित्रपट पाहताना नेमका हाच अनुभव येतो. प्रेक्षकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरण्याचा आणि त्याला अडीच तास खिळवून ठेवण्याचा सगळा मालमसाला या चित्रपटात भरलाय. म्हणूनच हा चित्रपट डोक्‍याला फारसा ताप न देता पाहणाऱ्यांचं छान मनोरंजन करतो;
पण दिग्दर्शकद्वयीनं काही गोष्टींबाबत अधिक काळजी घेतली असती, तर ही शर्यत आणखी रोमहर्षक ठरली असती. एक तर या चित्रपटामधल्या सर्वच व्यक्तिरेखा खूपच चलाख दाखविल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक हालचाल संशयास्पद वाटते. रहस्याचं जाळं अधिक गडद करण्यासाठी वापरलेल्या क्‍लृप्त्यांचा शेवटी शेवटी प्रचंड कंटाळा येतो. मध्यंतरालाच मुख्य हीरोचा खून दाखवून दिग्दर्शकानं धक्का देण्याचा प्रयत्न केलाय; पण हा धक्का थोडा "धीरे से'च लागतो. कारण- हा हीरो पुन्हा परतणार, याची पाहणाऱ्याला खात्री असते. प्रेक्षकांना असं वाटणं हाच रहस्यपटांमध्ये "मास्टरी' असणाऱ्या अब्बास-मस्तान यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
रणवीर (सैफ अली खान) व राजीव (अक्षय खन्ना) या दोन सावत्र भावांमधल्या भाऊबंदकीवर हा चित्रपट आधारलाय. वडिलांनी मृत्युपत्रात आपली सगळी संपत्ती रणवीरच्या नावानं केलेली असते. रणवीरचं राजीववर मनापासून प्रेम असतं; परंतु त्याचं प्रेम राजीव ओळखू शकत नाही. प्रेमाचा हा धागा त्याच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. म्हणूनच हा धागा तोडण्याचा तो निर्णय घेतो आणि एका रंगतदार खेळाला सुरुवात होते. सोफिया (कतरिना कैफ), सोनिया (बिपाशा बसू), आरडी (अनिल कपूर) हे तिघे जण या खेळातले महत्त्वाचे खेळाडू. सोफिया ही रणवीरची सेक्रेटरी. तिचं त्याच्यावर एकतर्फी प्रेम असतं. सोनिया ही प्रसिद्ध मॉडेल. पहिल्याच भेटीत ती रणवीरच्या नजरेत भरते; पण राजीवसाठी तो तिच्या आयुष्यातून दूर जातो. इकडे सोनियाशी विवाह करून रणवीरचा पत्ता कापण्यासाठी राजीव सज्ज होतो. या खेळात मग कोणाला कशाचंच भान उरत नाही. नाती, मूल्यं पायदळी तुडवायलाही ही मंडळी कमी करीत नाहीत.
"रेस'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचंड वेग. या चित्रपटात एकापाठोपाठ घडणाऱ्या घटना पाहणाऱ्याला विचार करायलाच अवधी देत नाहीत. चित्रपटाची गोष्ट रंगतदारपणे सांगण्यात अब्बास-मस्तान यांचा हातखंडा आहे. या चित्रपटातही त्यांनी कथानकाला मोठ्या प्रेमानं फुलवलंय. रणवीर, राजीव, सोनिया व सोफिया या चारही व्यक्तिरेखांची उभारणी लक्षणीय आहे. सोनियाचा उलगडलेला भूतकाळ रंजक आहे. रणवीर व राजीव यांच्यातील शह-काटशहाचा खेळ सुरुवातीला खूप छान होतो; पण कोणत्याही गोष्टीला एक शेवट असतो याचं दिग्दर्शकाला भान राहिलेलं नाही. रणवीर-राजीवनी एकमेकांवर केलेल्या कुरघोडीचा खेळ जास्त लांबल्यानं त्यातली गंमत हरवलीय.
रणवीर ही चित्रपटामधली सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा. त्याची मध्यंतराला हत्या झाल्याचं दाखविण्यात आलंय; पण नायकाचीच मध्यांतराला "एक्‍झिट' होणं शक्‍य नाही, याची पाहणाऱ्याला खात्री असते. दिग्दर्शकानं या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं, तर हा चित्रपट अधिक परिणामकारक ठरला असता.
सैफ अली खान, अक्षय खन्ना, बिपाशा बसू, अनिल कपूर ही कलाकार मंडळी अभिनयात निष्णात आहेत. त्यामुळेच त्यांनी आपापल्या व्यक्तिरेखा अगदी सहजतेनं साकारल्यात. सुरुवातीच्या दृश्‍यांमध्ये प्रभाव पाडू न शकणारी कतरिना मध्यंतरानंतर चांगलं "फूटेज' घेऊन गेलीय. समीरा रेड्डीला काहीच वाव नाही. "रेस'ला मारक ठरलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गाण्यांची संख्या. प्रीतमनं संगीतबद्ध केलेली फक्त दोनच गाणी चांगली आहेत. चित्रपटाचा "लूक' जबरदस्त आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात कधी पाहिलेलं नसेल एवढं थरारक "कार-रेसिंग' या चित्रपटात पाहायला मिळेल.

Tuesday, April 1, 2008

अमोल गुप्तेंच्या मराठी चित्रपटात शाहरूख खान

अमोल गुप्तेंच्या मराठी चित्रपटात शाहरूख खान

मुंबई ः "तारे जमीं पर'मध्ये मुलांच्या गतिमंदतेविषयी भाष्य करणारे प्रसिद्ध पटकथा लेखक अमोल गुप्ते आता आणखी एक सामाजिकपट हाताळण्यास सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीत बनणार असून त्यात शाहरूख खान पाहुण्या कलाकाराची व्यक्तिरेखा साकारणार आहे. "सोडी सोन्याचा पिंजरा' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे.

मुले सध्या शिक्षण आणि नोकरीसाठी विदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. विदेशी गेलेली मुले गलेलठ्ठ पगार आणि तिथे मिळणाऱ्या सोयी-सुविधांमुळे तिकडेच स्थायिक झाल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र, त्यामुळे दोन प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतामधील वृद्ध पालकांचे अंधःकारमय भविष्य आणि विदेशात जन्मलेल्या आपल्या मुलांना पाश्‍चात्त्य संस्कृती गिळणार तर नाही ना? यामुळे तरुण पिढी सध्या ग्रासली आहे. गुप्ते यांच्या चित्रपटात या समस्येवर प्रकाश टाकण्यात आलाय.

"तारे जमीं पर' चित्रपट पाहून शाहरूख प्रचंड भारावला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्याने गुप्तेंची तातडीने भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याची उत्सुकता दाखविली होती. शाहरूखच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाकडे प्रेक्षक गांभीर्याने पाहतील, या हेतूने गुप्तेंनी त्याला या चित्रपटात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा दिली आहे.


"शोले'चा रिमेक आता रमेश सिप्पी करणार

ंमुंबई ः प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी "शोले'च्या केलेल्या भज्याची चव अजून ताजी असतानाच आता आणखी एक "शोले' येतोय. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे "ओरिजनल शोले' दिग्दर्शित करणारे रमेश सिप्पीच "डुप्लिकेट शोले'चे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे "बजेट' आहे तब्बल ऐंशी कोटी.

गेल्या ऑगस्टमध्ये "रामगोपाल वर्मा के शोले' हा चित्रपट पाहिल्यानंतर रमेश सिप्पी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना अनेकदा "शोले'चा "रिमेक' बनविण्याची "ऑफर' देण्यात आली होती. परंतु प्रत्येक वेळी त्यांनी ती नम्रपणे नाकारली होती. "शोले दुबारा नहीं बन सकती' असे यावर त्यांचे उत्तर असे. परंतु वर्मांचा "शोले' पाहिल्यानंतर त्यांनी इतर सर्व "प्रोजेक्‍ट'वरचे काम थांबविले. हा चित्रपट आपल्या "रिमेक'ची प्रेरणा असल्याचे त्यांनी आज प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह गब्बरची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. इतर व्यक्तिरेखांची नावे व कलाकार पुढीलप्रमाणे ः- शाहरूख खान (जय), आमीर खान (वीरू), बसंती (कतरिना कैफ), सांबा (परेश रावल). पुढील महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.


सेहवाग इन, रणबीर आऊट!

ंमुंबई ः प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोनला आता मानायलाच हवं. कधीही आणि कोणत्याही क्षणी विकेट काढण्यात ती आता मुरलीधरनलाही मागं टाकू शकेल. अगदी परवा परवा तिनं रणबीर कपूरच आपला साता जन्माचा सोबती असल्याचा "बाईट' दूरचित्रवाहिन्यांना दिला होता; पण हा "बाईट' देऊन सात दिवस होण्याच्या आतच तिनं आपली मोहिनी वीरेंद्र सेहवागवर घातलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चेन्नई कसोटीत त्रिशतक ठोकणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या सन्मानार्थ रविवारी रात्री प्रीतिभोजन आयोजित करण्यात आले होते. तडाखेबंद त्रिशतकी खेळी करणाऱ्या सेहवागवर उपस्थितांच्या नजरा खिळल्या होत्या. पण वीरूची नजर एका व्यक्तीचा शोध घेत होती. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून दीपिका पदुकोनच आहे, याचा प्रत्यय वीरूनेच करून दिला. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक "ओम शांती ओम'मधलं "आँखो में तेरी...' या गाण्याच्या तालावर दीपिकानं "एन्ट्री' घेतली. तिनं सेहवागला "शेकहॅंड' करीत त्याचं अभिनंदन केलं. यावेळी उपस्थित छायाचित्रकार या दोघांची छबी कॅमेऱ्यात टिपताना त्यांना "पोज'साठी खुणावीत होते. पण वीरूचं कोणाकडेच लक्ष नव्हतं. दीपिकाशी काय बोलू आणि काय नको, असं त्याला झालं होतं. फोटोसेशनचा कार्यक्रम संपल्यानंतर या जोडीनं मागच्या दारानं "एक्‍झिट' घेतली.

("एप्रिल फूल्स डे'च्या निमित्ताने केलेली ही एक छोटीशी, निर्विष गंमत. गंमती-गंमतीनेच ती घ्यायची... कसं?)