Tuesday, March 31, 2009

review - बारह आना

वेगळ्या वाटेचा भन्नाट सिनेमा
"बारह आना' हा खूप इंटेलिजिएण्ट सिनेमा आहे. तो एकाचवेळी आपल्याला हसवतो, कोड्यात टाकतो आणि काही प्रमाणात अंतर्मुखही करायला लावतो. सध्याच्या मल्टिप्लेक्‍स कल्चरमधला एक अत्यंत प्रभावी चित्रपट म्हणून त्याची नोंद करावी लागेल. शोफर, वॉचमन आणि वेटर... या समाजातल्या तशा तीन उपेक्षित व्यक्तिरेखा. त्यांच्यावर एखादा हिंदी चित्रपट बनू शकतो, असा विचारही कधी आपल्या मनात येऊ शकणार नाही. पण दिग्दर्शक राजा मेनन यांनी या तीन व्यक्तिरेखांचा खूप सुरेख मेळ घालून एक वेगळ्या पद्धतीचं मनोरंजन दिलंय.
नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेली व्यक्तिरेखा म्हणजे शोफर. ते धनाढ्य व्यक्तीच्या गाडीवर शोफर म्हणून काम करीत असतात. मात्र, आपल्या मालकिणीकडून सतत त्यांना हिडीसफिडीस पद्धतीची वागणूक मिळत असते. विजय राज हा वॉचमन असतो. बिल्डिंगवर लक्ष ठेवण्याऐवजी त्याला तिच्यात राहणाऱ्यांचीच अधिक कामं करावी लागत असतात. उत्पन्न कमी आणि गावाकडे राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांचा खर्च या कात्रीत तो अडकलेला असतो. तिसरा असतो वेटर अर्जुन माथूर. एका चांगल्या हॉटेलमध्ये तो वेटरची नोकरी करीत असतो. तिथं येणाऱ्या एका विदेशी तरुणीलाच तो आपलं हृदय देऊन बसतो. या तिघांच्या कथानकांना एकत्र जोडणारा धागा म्हणजे त्यांचं निवासाचं स्थान. एका चाळीतल्या खोलीत हे तिघं एकत्र राहत असतात. आपापल्या परिस्थितीला दोष देत आयुष्य कंठण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. मात्र एकेदिवशी विपरीत घडतं. वॉचमनच्या हातून एका व्यक्तीला नकळत थप्पड बसते आणि सुरू होतं अपहरणाचं सत्र. त्यातून मानवी मनाचे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांसमोर येतात.
दिग्दर्शक राजा मेनन यांनी हा सगळा घटनाक्रम अतिशय छानरीत्या चित्रित केलाय. समाजातल्या उपेक्षित घटकांचं दुःख त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीला टिपलंय आणि मध्यांतरानंतर त्याला त्यांनी वेगळीच फोडणी दिलीय. छोट्या-छोट्या प्रसंगांमधून त्यांनी संपूर्ण चित्रपट खुलवलाय. हा चित्रपट विलक्षण उंचीवर गेलाय तो कलाकारांच्या अभिनयामुळे. वॉचमनची भूमिका करणाऱ्या विजय राजनं या चित्रपटातील अभिनयाद्वारे आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवलीय. वॉचमनच्या व्यक्तिरेखेतील बारीकसारीक गोष्टी त्यानं आपल्यात इतक्‍या सफाईनं मुरवल्यात की आपल्याला खरा विजय राज आठवतच नाही. नसिरुद्दीन शाह हा कलावंत एवढ्या उंचीवर का पोचलाय, हे जाणून घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. संपूर्ण चित्रपटात हा कलाकार फक्त क्‍लायमॅक्‍समध्ये काही वाक्‍य बोललाय, पण त्यांचं न बोलणंही बरंच काही बोलून गेलंय. फक्त आपल्या "स्क्रीन प्रेझन्स'द्वारे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. अशाप्रकारची अदाकारी आपल्याला नवीन आहे. वेटरची भूमिका करणाऱ्या अर्जुन माथूर यानेही छान काम केलंय. चित्रपटात एकही गाणं नाही ही सर्वात चांगली गोष्ट. हिंदी सिनेमा सध्या खूप चांगल्या वळणावर आहे. "बारह आना' हा त्याच वळणावरचा एक चित्रपट आहे.

No comments: