Monday, May 16, 2011

अमोल गुप्तेंचा नवा डबा



"तारे जमीं पर'चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक अमोल गुप्ते तब्बल साडे तीन वर्षांनी "स्टॅन्ली का डब्बा' या चित्रपटाद्वारे आपला दुसरा डबा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. मनोरंजन आणि सामाजिक संदेशाचं आपलं धोरण त्यांनी या चित्रपटातही कायम ठेवलंय. या डब्यातील खाऊ आणि तो बनविताना घेतलेल्या कष्टांबद्दल अमोल गुप्ते यांच्याशी केलेली ही चर्चा.
------------
एखादा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की मुलाखतींच्या निमित्तानं निर्माता-दिग्दर्शकांच्या भेटी होतच राहतात. मात्र, चित्रपटाचं भवितव्य एकदा स्पष्ट झालं की पुढच्या कलाकृतीपर्यंत तो दिग्दर्शक पुन्हा काही भेटत नाही. परंतु, काही दिग्दर्शक पहिल्याच भेटीत आपल्या मनावर ठसतात आणि मग त्यांच्या अनौपचारिक भेटी सुरू राहतात. अशा भेटींचा आनंद ज्या काही मोजक्‍या दिग्दर्शकांनी दिलाय त्यापैकी एक म्हणजे अमोल गुप्ते. "तारे जमीं पर' प्रदर्शित झाल्यापासून अमोल गुप्ते यांच्याशी नियमित संपर्कात राहण्याची संधी मला मिळालीय. गेल्या साडे तीन वर्षांमध्ये या कलावंताला भेटल्यानंतर प्रत्येक वेळी चित्रपट माध्यमाबाबत काहीतरी वेगळी माहिती, वेगळे संदर्भ ऐकायला मिळालेत. इतर व्यावसायिक दिग्दर्शकांप्रमाणे काही हातचं राखून बोलणाऱ्यांमधला हा दिग्दर्शक नाही. त्याचा प्रत्यय यावेळच्या भेटीतही आला. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या वांद्रे इथल्या जुन्या ऑफिसमध्ये आमची भेट झाली. इथं कधी "शिफ्ट' झालात ? अशा सहज विचारलेल्या प्रश्‍नाचं त्यांनी सुभाष घई आणि करण जोहर यांची कृपा असं सहजपणे उत्तर दिलं. "करण जोहरनं काही कामानिमित्त घईंचं ऑफिस भाड्यानं घेतलं आणि आपलं काम संपल्यानंतर त्यानं मला इथं "स्टॅन्ली का डब्बा'चं काम करू दिलं. पहिल्या काही महिन्यांचं भाडं स्वतः करणनं भरलं आणि नंतरच्या महिन्यांचं भाडं घईंनी मागितलेलं नाही,' अमोल गुप्ते मनमोकळेपणे ही माहिती देतात आणि "स्टॅन्ली का डब्बा'च्या अंतरंगात डोकावण्यापूर्वी किती जणांची आपल्याला मदत मिळालीय, याचा नेमका उल्लेख करतात.

"स्टॅन्ली का डब्बा' याचा विषय आणि शीर्षकाबद्दल वेगळी माहिती देताना गुप्ते म्हणतात, ""अंधेरीतील होली फॅमिली हायस्कूलमध्ये मी दुसरी ते सातवीदरम्यान शिकायला होतो. या शाळेत मला स्टॅन्ली नावाचा मित्र भेटला. त्याच्याबरोबर माझी मैत्री होण्यामागचं कारण म्हणजे त्याचा "फोर टायर'चा टिफीन डबा. त्यात फार काही वेगळे खाद्यपदार्थ नसायचे बरं. पण साधाच बटाट्याचा रस्सा आणि काही पुऱ्यांचा स्वाद असा असायचा की अख्खा वर्ग त्याच्या प्रेमात पडायचा. चार ठिकाणी दणके खाल्लेला तो साधा ऍल्युमिनीयमचा डबा होता. त्यानं कुठल्या माळ्यावरून तो काढला, हे मलादेखील माहित नाही. तो डबा माझ्या इतकी वर्षं लक्षात राहिला आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट बनविण्यात आला. शाळेचा खाऊचा डबा हा प्रत्येक मुलगा आणि आईचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आईचं प्रेम प्रत्येक डब्यातील खाद्यपदार्थात उतरलेलं असतं. आमचा "स्टॅन्ली का डब्बा'सुद्धा असाच प्रेमाचा डबा आहे. तो प्रेक्षकांनी खाल्ला तर तो त्यांना निश्‍चितच आवडेल. मुलं एकमेकांकरीता कशी उभी राहतात, हेदेखील या चित्रपटामधून पाहायला मिळेल.''

"तारे जमीं पर'च्या यशानंतर प्रेक्षक अमोल गुप्तेंकडून लगेचच एखाद्या नवीन कलाकृतीची अपेक्षा करीत होते. परंतु, ती कलाकृती पडद्यावर येण्यामध्ये साडे तीन वर्षांचा काळ लोटला. याबद्दल गुप्ते सांगतात, ""साधारण दोन वर्षांपूर्वीच मी "सपनों को गिनते गिनते' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार होतो. या चित्रपटाची गाणीही तयार झाली होती. परंतु, मध्यंतरी अशा काही अडचणी आल्या की हा चित्रपट काही पुढेच सरकेना आणि मग स्वतःबद्दल, आपल्या आयुष्याबद्दल विचार करताना मला स्टॅन्लीचा विषय सुचला. परंतु, हा काही मी ठरवून केलेला चित्रपट नाही. सर्वप्रथम मुलांची कार्यशाळा घेण्याचं मी ठरवलं. त्यात जवळपास पाचशे मुलांनी भाग घेतला. या मुलांचा वेळ मिळवण्यासाठी मी होली फॅमिली शाळेच्या मुख्याध्यापिका आशा कपूर यांना भेटलो. दर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कार्यशाळा घेण्याचं ठरलं. खाऊचा एक डबा मुलांनी आणावा आणि एक डबा माझ्याकडून देण्याचं मी सुचवलं आणि आमची कार्यशाळा सुरू झाली. कार्यशाळेच्या चार तासांपैकी एक तास डबा वाटण्यात आणि खाण्यात जायचा. उरलेल्या वेळात जे काही चित्रीत करता येईल तेवढं आम्ही केलं. असं करता करता दीड वर्षं गेलं आणि हा डबा तयार झाला. शूटिंगच्या वेळी आम्ही कसल्याही प्रकारचा तामझाम केलेला नाही. स्पॉटबॉय, मोठमोठे लाईट्‌स आणि प्रॉडक्‍शन मॅनेजरशिवाय हा चित्रपट बनलाय. आमचा छायालेखक अमोल गोळेनं खूप चांगलं काम केलंय. सत्तरचा कॅमेरा वापरून त्यानं हा चित्रपट शूट केलाय. मालिका, जाहिराती आणि चित्रपटांमध्ये लहान मुलांना दहा-बारा तास राबविलं जातं. तसं आम्ही या चित्रपटाबाबत घडू दिलेलं नाही. चार तासांच्या वर आमची कार्यशाळा कधी चालली नाही. आमच्या या चित्रपटात 500 मुलं आहेत. परंतु, शूटिंगमुळे एकाही मुलाची कधी शाळा बुडली नाही.''

"तारे जमीं पर'मध्ये आमिर खानसारखा मोठा स्टार होता. "स्टॅन्ली...'साठी एखाद्या नामांकीत स्टारचा विचार नाही केलात का, या प्रश्‍नावर गुप्ते म्हणाले, ""काय वाट्टेल ते झालं तरी चित्रपट करायचा, या इराद्यानं हा चित्रपट बनलेला नाही. एका छोट्या कार्यशाळेच्या माध्यमातून हा चित्रपट घडलाय. सलग दीड वर्ष शनिवारचे चार तास देणारे स्टार कलाकार आज आहेत का ? याचं निश्‍चित उत्तर नाही असंच आहे. कारण, हल्ली प्रत्येक स्टार आपल्या फायद्याचा विचार करतो. मात्र, तशा फायद्याची खात्री "स्टॅन्ली का डब्बा'द्वारे देण्याच्या स्थितीत तेव्हा तरी मी नव्हतो. त्यामुळे जे काही मित्र माझ्याबरोबर आले त्यांना सोबत घेऊन मी पुढं गेलो. दिव्या दत्ता, राजेशनाथ झुत्शी, अपूर्वा लाखिया... यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. संगीताच्या आघाडीवरही मला सुखविंदर, शंकर महादेवन, विशाल दादलानी यांची मदत झाली. या सर्वांना मी फक्त एक फोन केला आणि कसल्याही मानधनाशिवाय ते माझ्याकडे गायले. शंकरनं मला मानधन म्हणून हंडीभर मटण शिजविण्यास सांगितलं. असं प्रेम पाहायला मिळालं की खरंच आपण करीत असलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं. या चित्रपटाला संगीत दिलंय ते हितेश सोनिकनं. तो पूर्वी विशाल भारद्वाजचा मदत करायचा. मी लिहिलेल्या शब्दांचं वजन अचूक ओळखून त्यानं काम केलंय.''

या चित्रपटाच्या निर्मितीत गुप्तेंना सर्वाधिक मदत मिळाली ती त्यांची पत्नी दीपा भाटिया आणि मुलगा पार्थो यांच्याकडून. "स्टॅनली'ची मुख्य व्यक्तिरेखा पार्थोनंच साकारली आहे आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळी करताहेत. हा विषय गुप्तेंकडे काढला असता ते शिताफीनं आपल्या मुलावरचा "फोकस' दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करतात आणि हसत ते म्हणतात, ""माझ्या कोणत्या मुलाबद्दल तुम्ही विचारताय ? स्टॅन्लीसारखीच आणखी 170 मुलं या चित्रपटात आहेत. "तारे जमीं पर'मधला दर्शिल सफारीसुद्धा माझाच मुलगा आहे. सगळेच माझ्याकडे खूप छान काम करतात. दीपाबद्दल विचाराल तर मी सांगेन की, ज्या वेळी मी कार्यशाळा घेत होतो, त्यावेळी ती "माय नेम इज खान' आणि "वुई आर फॅमिली'च्या संकलनात व्यस्त होती. या चित्रपटाचं काम संपल्यानंतर तिनं आम्ही केलेलं फुटेज "एडिट लाईन'वर घेतलं. तब्बल महिनाभर तिनं हे आमचं फुटेज व्यवस्थित पाहिलं आणि त्यात एक धमाल चित्रपट दडल्याचं तिलाही कळलं आणि अशाप्रकारे हा चित्रपट बनला. तो आता "फॉक्‍स स्टार'द्वारे प्रदर्शित होतोय. या संस्थेच्या पाठिंब्यामुळे आमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचेल, याची मला खात्री आहे. तरीपण या काळात विशाल भारद्वाज, करण जोहर या माझ्या मित्रांनी केलेलं सहकार्य मी विसरू शकणार नाही. करणच्या "एडिटिंग मशीन'वर हा चित्रपट संकलित झालाय. हा चित्रपट "फॉक्‍स'नं प्रदर्शित करावा यासाठी करणनंच पुढाकार घेतला. "तुझा चित्रपट कोणी नाही घेतला तर मी तुझ्या पाठीशी उभं राहीन,' असं आश्‍वासन विशालनं दिलं होतं. "तू एक छान बाळाला जन्म दिला आहेस. त्याचा आदर ठेव. कोणाचाही तू ऋणी होऊ नकोस. कारण "फॉक्‍स'ला तू जे दिलं आहेस आणि त्यांच्याकडून तुला जे मिळणार आहे, त्याच्यापेक्षा तू दिलेलं खूप मोठं आणि महत्त्वाचं आहे.''
"स्टॅन्ली का डब्बा'मध्ये अमोल गुप्तेंनी "खडूस' असं नाव असलेल्या शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारलीय. या चित्रपटापाठोपाठ "भेजा फ्राय 2' आणि संतोष सिवन दिग्दर्शित "उर्मी'मध्येही गुप्तेंच्या अभिनयातील कौशल्य पाहायला मिळणार आहे. "उर्मी' हा मल्याळम चित्रपट असून तो हिंदीत डब झाल्यानंतर प्रदर्शित होणार आहे.
- मंदार जोशी

No comments: