Saturday, June 16, 2012

‘स्टार्स’ जमीन पर...

‘पुढारी’च्या बहार पुरवणीमधील माझा ताजा लेख -------- ‘स्टार्स’ जमीन पर... ------- गेल्या आठवड्यात एक आक्रीत घडलं. दिबाकर बॅनर्जीच्या ‘शांघाय’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच समीक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अक्षरशः खिरापत वाटल्यासारखे ‘स्टार्स’ समीक्षकांकडून वाटले गेले. विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रांनी तर या चित्रपटावर अधिकच आपली कृपानजर केली. चार ‘स्टार्स’च्या खाली ‘स्टार’ देणे हा गुन्हा आहे, असं समजून सर्वांनी ‘स्टार्स’ वाटले. या चित्रपटाची परीक्षणं वाचताना अनेक वेळी दिबाकर बॅनर्जीला या मंडळींनी व्ही. शांताराम, सत्यजित रे, विजय आनंद यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रांगेतच नेऊन बसवलंय, त्याचा भास झाला. इम्रान हाश्मी या कलाकाराचा अभिनय किती ‘ग्रेट लेव्हल’ला गेलाय, अशी धक्कादायक मनोरंजक माहितीदेखील वाचायला मिळाली. सर्वसाधारणपणे समीक्षकही माणूस असल्यामुळे त्याच्याही आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे बहुतेक चित्रपटांबाबत समीक्षकांमध्ये कधीच एकमत आढळत नाही. कोण दोन स्टार देतो, तर कोण तीन... पण ‘शांघाय’बाबत अतिरेकच घडला. आता एवढ्या तार्‍यांचा मारा झाला असताना ‘शांघाय’ किमान हिट तरी होणं आवश्यक होतं. पण झालं भरलंच. हा चित्रपट प्रदर्शनानंतर जेमतेम ३० टक्के व्यवसाय करू शकला आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिसवर’ १५ टक्क्यांचीही मजल मारता आलेली नाही. ‘शांघाय’ला या मिळालेल्या ‘स्टार्स’ची पान पान भरून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही करण्यात आली. परंतु, तरीदेखील त्याचा परिणाम काही प्रेक्षकांवर झाला नाही. एकीकडे ‘शांघाय’ला नाकारणार्‍या प्रेक्षकांनी अक्षयकुमारच्या ‘रावडी राठोड’वरील प्रेमात थोडीही कुचराई केली नाही. या चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. तेव्हा प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच हवंय, अशीही ओरड काहींनी केली. थोडं तटस्थपणे या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहायला गेल्याचं ठरवल्यास काही वेगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. इंग्रजी समीक्षकांची मानसिकताच अनेकदा समजत नाही. कोणत्याही इंग्रजी वर्तमानपत्रामधील समीक्षा वाचून संबंधित चित्रपटाचा कसलाच अंदाज प्रेक्षकाला बांधता येत नाही. दिबाकर बॅनर्जीचा ‘ओये लक्की लक्की ओये’ या साधारण चित्रपटालाही समीक्षकांनी यापूर्वी डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे ‘शांघाय’ हा चित्रपट मी या इंग्रजी समीक्षकांसमवेतच पाहिला आणि बर्‍याच दृश्यांमध्ये माझ्याकडून कसलीच प्रतिक्रिया येत नसताना ही इंग्रजी समीक्षक मंडळी टाळ्या वाजवत होती, अधूनमधून ओरडत होती. याच वेळी मला ‘शांघाय’वर ‘स्टार्स’चा वर्षाव होणार असल्याचा अंदाज आला होता आणि शेवटी तो खरा ठरला. ‘शांघाय’ हा निश्‍चितच एक वेगळा चित्रपट आहे. परंतु, तो सर्वसामान्य प्रेक्षकाच्या डोक्यावरून जातो, हे सत्य नाकारता येत नाही. अलीकडच्या काळात चित्रपट समीक्षेत कोणते मुद्दे मांडलेत यापेक्षा त्याला कोणी किती ‘स्टार्स’ दिलेत, याला अधिक महत्त्व आलंय. ‘स्टार्स’चं हे महत्त्व एवढं ठसलं गेलंय की हल्ली प्रेक्षकवर्गदेखील चित्रपटाची समीक्षा वाचण्याच्या फंदात पडत नाही. चित्रपटाला मिळालेले ‘स्टार्स’ पाहून तो ते वाचायचं की नाही, याचा निर्णय घेतो. चित्रपटसृष्टीतील मंडळीदेखील या ‘स्टार्स’च्या संख्येला अधिक महत्त्व देतात. आपल्या प्रतिस्पर्धी गटातील कलावंताच्या चित्रपटाला कमी स्टार्स मिळाले की ही मंडळी आनंदतात. परंतु, आपल्याही आयुष्यात एखादा शुक्रवार येणार आहे, याची आठवण त्यांना त्यावेळी तरी होत नाही. मराठीत अजूनपर्यंत समीक्षणाच्या ‘स्टार्स’ला तेवढं महत्त्व आलेलं नाही हे खरंय. परंतु, हा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. मराठीत हल्ली वर्तमानपत्रांपेक्षा मुंबईतील एका खासगी एफ.एम. केंद्रावरील समीक्षेला अधिक महत्त्व आलंय. त्यामागचं कारण म्हणजे या एफएम वाहिनीचा ‘आरजे’ आपलं रेटिंग किमान तीन या आकड्यापासून सुरू करतो. त्यामुळे हल्ली निर्माते मंडळींचा तो एक आधारस्तंभ बनल्याचं बोलंय जातं. त्याच्या आगमनाखेरीज ‘प्रेस शो’ सुरू केला जात नाही. गेल्या दोन एक वर्षातलं सर्वसाधारण ‘ऍव्हरेज’ काढायचं झालं तर या ‘आरजे’नं बहुतेक चित्रपटांना किमान तीन ते चार स्टार्स दिले आहेत आणि बहुतांशी चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे हे खरंय. परंतु, अशा पद्धतीनं चित्रपटांना पाठिंबा मिळणं हेदेखील गैर नाही का ? थोडक्यात ‘शांघाय’च्या निमित्तानं चित्रपट समीक्षा ही गांभीर्यानं घ्यावी का, याचा विचार करण्याची वेळ आलीय. त्यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे समीक्षकांच्या लेखनाचा दर्जा आणि अनुभव. वर्तमानपत्रामधील सर्वात दुर्लक्षित अंग म्हणजे चित्रपट पत्रकारिता आहे. अशाप्रकारच्या पत्रकारितेसाठी गुणवत्ता असावी लागते, याचा विसर माध्यमांनाच पडला आहे. त्यामुळे समीक्षकाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची गुणवत्ता तपासली जात नाही आणि मग नंतर अपघात घडतात. अनेकांच्या मते चित्रपट समीक्षा ही आता कालबाह्य गोष्ट झाली आहे. आताचा प्रेक्षक हुशार आणि सुजाण आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याचा संबंधित चित्रपट पाहावा की नाही, याबद्दल निर्णय झालेला असतो. एखादा प्रेक्षक जर सलमान खान आणि आमिर खानचा चाहता असेल तर त्याच्या दृष्टीनं समीक्षकाच्या समीक्षेला फारसं महत्त्व नसतं. समीक्षा नकारात्मक असली तरी तो चित्रपटगृहात जाऊन संबंधित चित्रपट पाहतोच. तसेच चित्रपट समीक्षेबद्दल चित्रपटसृष्टीमधील मंडळींकडून येणारा कौल हा सापेक्ष असतो. ज्याच्या चित्रपटाबद्दल चांगली समीक्षा प्रसिद्ध झाली असते, तेव्हा तो सातव्या अवकाशात असतो आणि समीक्षकांकडून टीकेचा भडिमार होतो तेव्हा माध्यमांमधून चित्रपट समीक्षा हा प्रकारच रद्द केला जावा, अशी मागणीही करायला तो मागेपुढे पहात नाही. - मंदार जोशी ----------

2 comments:

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

कदाचित आज माझा बाप म्हणून गौरव केला जाईल..पण मी बाप या शब्दात दडलेले प्रेम देण्यात खरच पुरा पडलोय काय ते..पडताळून पहावे...आधीचीही पीढी वडिलांना मानत होती..पण या सा-याचा असा देखावा वा दिवस फारसे कधीच केले गेले नाहीत....( विशेष ` दिवस` या शब्दाला इथे वेगळा अर्थ नाही..हे कृपया ध्यानी घ्यावे.)

सुभाष इनामदार...culturalpune.blogspot.com said...

वर्तमानपत्रातून येणारी चित्रपटविषयक तथाकथिक समीक्षणे पुरेशी गांभीर्याने लिहली जातात काय?...
.नसेल तर ते बंद करुन त्यांनी समाजात होणा-या चांगल्या व वेगळ्या गोष्टींकडे अधिक प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे काय..?