Sunday, July 29, 2012

पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू...

-------- पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू... ------- संत रामदासांच्या ‘दासबोधा’त एक सुंदर श्‍लोक आहे... ...मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे... या श्‍लोकाची आता आठवण होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईतल्या पहिल्या मल्टिप्लेक्सनं गेल्या आठवड्यात मान टाकली. अंधेरी भागामधील ‘सिटी मॉल’मधल्या फेम-ऍडलॅब्स मल्टिप्लेक्सची सेवा आता खंडित झाली आहे. या मल्टिप्लेक्सच्या चालकांनी काही महिन्यांनी पुन्हा आपण सेवेत रुजू होऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. परंतु, चित्रपटसृष्टीतील सूत्रांच्या माहितीनुसार हे मल्टिप्लेक्स आता इतिहासजमा झालं आहे. एक काळ असा होता की देशभरातील ‘सिंगल स्क्रीन थिएटर्स’ एकापाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड जात होती आणि त्यांच्या जागी आलिशान मल्टिप्लेक्स उदयाला येत होती. ‘सिंगल स्क्रीन’चा र्‍हास काही पाहवत नव्हता. मल्टिप्लेक्सचं चकचकीत वातावरण, त्यातल्या आरामदायी खुर्च्या, वातानुकूलित सेवा, स्वच्छ खाद्यपदार्थ... ही सेवा पाहून मल्टिप्लेक्स इथं दीर्घ काळ राज्य करतील असं वाटलं होतं. परंतु तसं घडलं नाही. ‘सिंगल स्क्रीन’ना श्रद्धांजली वाहणार्‍यांना एवढ्या लवकर मल्टिप्लेक्सलाही श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. ‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू काही साधासुधा नाही. त्याला अनेक पदर आहेत. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली. ‘फेम’चे श्रॉफ बंधू आणि ‘ऍडलॅब्स’च्या मनमोहन शेट्टींनी एकत्र येऊन मल्टिप्लेक्सच्या क्रांतीला सुरुवात केली. मॉलमध्ये मल्टिप्लेक्स ही कल्पना तेव्हापासून यशस्वीपणे राबविली गेली. या मल्टिप्लेक्सच्या उदयानंतर काही काळात देशभरात मल्टिप्लेक्सचं पेव फुटलं. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. विपुल शहा दिग्दर्शित ‘आँखे’ चित्रपटापासून हे मल्टिप्लेक्स कार्यरत झालं होतं. या मल्टिप्लेक्सचा तेव्हाचा थाट पाहून अनेक जण चक्रावले होते. आपण विदेशात तर नाही ना, अशीही शंका अनेकांना आली होती. कारण तत्पूर्वी अशापद्धतीचा थाटमाट ‘सिंगल स्क्रीन’मध्ये पाहायला मिळाला नव्हता. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या उपस्थितीत या मल्टिप्लेक्सचा शुभारंभ झाला होता. यावेळी श्री. बच्चन यांनी आपल्या भाषणामध्ये ‘फेम’चा गौरव केला होता. परंतु, अवघ्या दशकभरात या मल्टिप्लेक्सच्या वाट्याला मरण आलं. त्यामागच्या काही घडामोडींवर नजर टाकल्यास बर्‍याच गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतं. जानेवारी २०१२ मध्ये ‘फेम इंडिया’चं ‘आयनॉक्स लिजर लि.’मध्ये विलीनीकरण झालं. तेव्हापासून ‘आयनॉक्स’ आणि ‘फेम’च्या मालकांमध्ये खटके उडायला लागले. ‘आयनॉक्स’नं ‘लिव्ह अँड लायसन्स’चं नूतनीकरण न करण्यामागे आपल्याला भाडे परवडत नसल्याचं कारण पुढं केलंय. गेल्या काही वर्षांपासून या मल्टिप्लेक्सचा कारभार रडतखडतच चालला होता. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली तेव्हा अंधेरीच्या पश्‍चिम भागामध्ये एकही चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे या मल्टिप्लेक्सवर सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. मात्र नंतर या भागात ‘सिनेमॅक्स’ आणि ‘फन रिपब्लिक’ ही आणखी दोन आलिशान मल्टिप्लेक्सेस सुरू झाली. अवघ्या शंभर मीटरच्या अंतरात सुमारे १५ ‘स्क्रीन्स’ सुरू झाले. एवढ्या ‘स्क्रीन्स’ना सामावण्याइतकी लोकसंख्या अंधेरी भागात नाही. त्यामुळे आसनखुर्च्या अधिक आणि प्रेक्षकांची वानवा हा मोठा प्रश्‍न उभा राहिला. ‘फेम’चं काळाबरोबर न राहणंही त्यांना महागात पडलं. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांमध्ये अनेक बिगबजेट चित्रपटांचे ‘प्रीमियर शोज’ फेम-ऍडलॅब्जझाले झाले. परंतु, ‘सिनेमॅक्स’च्या आगमनानंतर सगळा लाईमलाईट त्यांच्यावर स्थिरावला. प्रीमियर शोज, पार्ट्या, सीडी प्रकाशन सोहळे यांचा ‘फेम’मधील ओघ आटला आणि सगळं ग्लॅमर ‘सिनेमॅक्स’वर स्थिरावलं. अलीकडच्या काळात एकही मोठा इव्हेंट ‘फेम-ऍडलॅब्स’मध्ये झाला नाही. त्याचा विपरीत परिणाम या मल्टिप्लेक्समधील तिकीटविक्रीवर झाला. ‘फेम-ऍडलॅब्स’ची जी वाताहत झाली, तशी वाताहत देशभरातील आणखी अनेक मल्टिप्लेक्सची नजिकच्या काळात होणार आहे. अनेक शहरांमध्ये गरज नसतानाही भरपूर ‘स्क्रीन्स’ची मल्टिप्लेक्सेस उभारली गेली आहेत. प्रेक्षकांअभावी चित्रपटांचे ‘शोज’ रद्द करण्याचे प्रकारही वरचेवर वाढताहेत. मल्टिप्लेकमधील तिकीट दर आणि खाद्यपदार्थांचे दर हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवाक्यातले नाहीत. सर्वसाधारणपणे सिनेमाचा मुख्य प्रेक्षकवर्ग हा मध्यमवर्गीय असतो. चार जणांच्या एका कुटुंबानं मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर किमान एक हजार रुपयांची नोट खर्चावी लागते. म्हणूनच बहुतेक सर्व मल्टिप्लेक्सचा कारभार हा तोट्यात आहे आणि आज ना उद्या त्यांच्यावर ‘फेम-ऍडलॅब्स’सारखी वेळ येणार आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असला की मल्टिप्लेक्सचे दर वाढवले जातात. प्रेक्षकांना ही नाडण्याची कृती अखेर मल्टिप्लेक्सचालकांच्या अंगाशी येऊ लागली आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यानेही मल्टिप्लेक्सचालकांनी तिकीट दरात कपात करणं आवश्यक असल्याचं सुचवलंय. मात्र अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. ‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू हा इतर मल्टिप्लेक्सचालकांसाठी धोक्याची सूचना आहे. त्यातून धडा घेत तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. अन्यथा आणखी काही मल्टिप्लेक्सेस बंद झाली तर आश्‍चर्य वाटू नये. - मंदार जोशी --------------

No comments: