Saturday, March 2, 2013

सुन्न करणारं मृत्यूकांड....

१९९५ ते २०१० अशी तब्बल १५ वर्ष मराठी, हिंदी तसेच अधूनमधून इंग्रजी तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर ‘नॉनस्टॉप’ भाष्य केलं. शेवटचं चित्रपट परीक्षण मी साधारण अडीच वर्षांपूर्वी लिहिलं होतं. ‘तारांगण’ मासिकाच्या उभारणीसाठी काही काळ मी चित्रपट परीक्षण लिखाणातून ‘ब्रेक’ घेतला होता. रामगोपाल वर्मांचा ‘द ऍटॅक्स ऑफ २६/११’ हा चित्रपट पाहिला आणि पुन्हा एकदा लिहावंसं वाटलं. --------- ‘द ऍटॅक्स ऑफ’ २६/११’ हा चित्रपट पाहताना माझ्या मनात दोन गोष्टींची धाकधूक होती. एक तर या विषयासंबंधीचा तपशील सर्वांनाच ठाऊक आहे आणि प्रेक्षकांनी तो अनेक वेळा टीव्हीवरही पाहिलाय. त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये चित्रपटामध्ये नेमकं काय आणि कसं मांडलं जातं याचा अंदाज बांधणं कठीण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक रामगोपाल वर्मांवरील माझा विश्‍वास उडत चालला होता. ‘मोस्ट अनप्रेडिक्टेबल’ दिग्दर्शक म्हणून मी त्यांचं नाव घेईन. अलीकडच्या काळात हा दिग्दर्शक विश्‍वासार्हतेपासून स्वतःला लांब नेत चालला होता. अर्थात वर्मांच्या गुणवत्तेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. एवढा मोठा आवाका असलेला विषय प्रभावीपणे मांडण्याची वर्मांची इच्छाशक्ती नेमकी आहे का, एवढीच शंका माझ्या मनात होती. ‘द ऍटॅक्स...’ पाहिला आणि वर्मांबद्दलच्या सर्व शंकांना पूर्णविराम मिळाला. ‘द ऍटॅक्स’मधील सर्व घटनाक्रम आपल्या अंगावर येतो, आपल्याला हादरवून टाकतो, क्रौर्यानं गाठलेली परिसीमा पाहून आपण उद्ध्वस्त होतो. थँक्स टू रामू... रामगोपाल वर्मांचे असे आभार मानण्याची संधी १५ वर्षांपूर्वी ‘सत्या’च्या निमित्तानं मिळाली होती. अर्थात या चित्रपटातील काही गोष्टी खटकतात. काही गोष्टींची अपूर्णता अस्वस्थ करते. काही घटनांच्या अभ्यासात वर्मांनी ढिलाई दाखविलीय. तरीदेखील रामगोपाल वर्मांमधल्या दिग्दर्शकाला फॉर्म गवसलाय हेदेखील काही कमी नाही. २६ नोव्हेंबर २००८ला मुंबईत दहशतवादानं जे थैमान घातलं त्या रात्री चार तासांमध्ये नेमकं काय घडलं, याचं थरारक चित्रीकरण या चित्रपटातून पाहायला मिळतं. हा नेहमीच्या पद्धतीचा चित्रपट नाही. दिग्दर्शक वर्मांनी ‘डॉक्युड्रामा’ पद्धतीनं चित्रपटातील आशय मांडलाय. चित्रपटाच्या सुरुवातीलाच या हल्ल्याची पार्श्‍वभूमी आणि त्यामागची कारणमीमांसा आपल्याला पाहायला मिळते. हा हल्ला अनेक तास चालला. त्यमुुळे त्याचे जसेच्या तसे चित्रीकरण दाखविण्याऐवजी वर्मांनी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतलीय. या हल्ल्याचा तपास करणारे पोलिस अधिकारी राकेश मारिया यांच्या नजरेतून त्या दिवशी रात्री नेमकं काय आणि कसं घडलं, याची निरीक्षणवजा कहाणी त्यांनी सांगितलीय. ‘स्टोरी टेलिंग’चा हा फॉर्म चांगलाच जमलाय. दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबई समुद्रकिनार्‍यावरील बोटीचा घेतलेला ताबा, लिओपोल्ड कॅफेवरील हल्ला, मुबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील हत्याकांड, कामा रुग्णालयातील थरार, अजमल कसाबचा पोलिसांनी घेतलेला ताबा, त्याच्या मनातील व्यक्त होणारी खदखद, त्याच्या बाष्कळ बडबडीला पोलिस यंत्रणेकडून मिळालेलं उत्तर आणि शेवटी त्याचं फासावर लटकणं या चित्रपटात पाहायला मिळतं. प्र्रेक्षकांना माहित असलेला घटनाक्रम आणि त्याबरोबरच माहित नसलेला घटनाक्रम याचा अभ्यास करून दिग्दर्शक वर्मांनी ‘बीटवीन द लाईन्स’ भरल्यात. म्हणून माहित नसलेल्या गोष्टींवर अधिक भर दिलाय. त्यामुळेच अतिरेक्यांनी समुद्रमार्गे येऊन भारतीय बोटीचा ताबा घेताना नेमकं काय केलं, हे या चित्रपटात सविस्तर पाहायला मिळतं. वर्मांच्या चित्रपटामधील कॅमेरा थोडा अधिकच हालचाल करतो अशी अनेकांची ओरड असते. परंतु, या चित्रपटात वर्मांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलंय. किंबहुना कॅमेर्‍याच्या काही जागा पाहणार्‍याची दाद घेतात. उदा. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यातील दोन बोटी एकमेकींच्या जवळ येताना त्यांचं टायर एकमेंकांवर घासलं जाणं. लिओपोल्ड कॅफे, ताजमहाल हॉटेल आणि मुबई सीएसटीवरचं दहशतवादाचं थैमान अंगावर येतं. परंतु, काही ठिकाणी त्याचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. त्यामुळेच कदाचित या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेलं असावं. चित्रपटाची लांबी दोन तासांपुरती मर्यादित ठेवण्याच्या खटाटोपात वर्मांचं बर्‍याच गोष्टींकडे दुर्लक्षही झालं आहे. चित्रपटाचा संपूर्ण फोकस अजमल कसाबभोवती असून इतर आठ दहशतवाद्यांबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मुख्य म्हणजे कसाबव्यतिरिक्त अतिरेक्यांचा खातमा करण्यात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीवरही हा चित्रपट भाष्य करीत नाही. प्रेक्षकांच्या दृष्टीनं हा भाग नवीन होता. संशोधनावर अधिक भर दिला असता तर हा दृश्यभागही दाखविण्यात काहीच अडचण आली नसती. वर्मांनी या गोष्टींवरही लक्ष केंद्रीत केलं असतं तर चित्रपटाचा परिणाम आणखी वाढला असता. कदाचित वर्मांना चित्रपट लवकर प्रदर्शित करण्याची घाई झाली असावी. असो. ‘द ऍटॅक्स’ लक्षणीय ठरलाय तो नाना पाटेकरांमुळे. राकेश मारियांची व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी कमालीचं बेअरिंग दाखवलंय. या दुर्घटनेचे पदर उलगडताना आपल्या मनातील घालमेल त्यांनी विलक्षणरीत्या सादर केलीय आणि चित्रपटाच्या शेवटी शवागारातील त्यांचे अजमल कसाबबरोबरचे प्रसंग उत्कृष्ट आहेत. चित्रपटामधील इतर कलाकारांचीही कामं चांगली आहेत. चित्रपटाचं पार्श्‍वसंगीत, कॅमेरा, ऍक्शन उत्कृष्ट. कलादिग्दर्शकाचंही कौतुक करायला हवं. एकुणात काही त्रुटी असूनही ‘द ऍटॅक्स..’ एकदा तरी पाहण्यासारखा आहे. - मंदार जोशी दर्जा - ***

No comments: