Monday, April 28, 2008

कशाला घेताय ठसन !


यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांच्या "टेस्ट'ला नेमकं झालंय तरी काय ? "धूम' आणि "चक दे इंडिया'चा अपवाद वगळता या निर्माता पिता-पुत्रानं अलीकडच्या काळात साफ निराशा केलीय. त्याचीच पुनरावृत्ती "टशन'मध्ये झालीय. या चित्रपटाचं कथानक आणि त्याची हाताळणी अगदी "एटीज-नाईंटीज'मधल्या चित्रपटांना शोभणारी आहे.
वडिलांच्या खुनाचा बदला घेणारी नायिका, ही या चित्रपटाची अगदी सरधोपट मध्यवर्ती कल्पना. ही कल्पना मांडतानाही नवोदित दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी फारशी कल्पकता दाखविलेली नाही. नवीन दिग्दर्शकांना पदार्पणाची संधी देण्याची कल्पना चांगली आहे. परंतु ती प्रत्येक वेळीच व्यवहार्य नसते, ही गोष्ट आता चोप्रांना सांगण्याची वेळ आलीय. अक्षय कुमार, सैफ अली खान, करिना कपूर आणि अनिल कपूर अशी सणसणीत "स्टारकास्ट' या चित्रपटासाठी एकत्र आली होती. पण त्यांचा व्यवस्थित उपयोग न झाल्यानं या चित्रपटाशी "ठसन' न घेतलेलीच बरी.
भैय्याजी (अनिल कपूर) हा उत्तर प्रदेशातला कुख्यात गुंड. मुंबईत येऊन तो आपलं बस्तान बसवतो. पूजा सिंग (करिना कपूर) ही त्याची सहाय्यक. आपला व्यवसाय वाढविण्यासाठी भैय्याजीला इंग्रजी संभाषणाची गरज भासू लागते. त्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या जिमी क्‍लिफची (सैफ अली खान) मदत घेतो. मात्र, भैय्याजीला इंग्रजी शिकवता शिकवता तो पूजाच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या दीड कोटींवरही हात मारतो. तेव्हा भैय्याजी त्याचा निकाल लावण्यासाठी बच्चन पांडेला (अक्षयकुमार) आमंत्रित करतो. तेव्हा या पांडेचीच मदत घेऊन भैय्याजीला शह देण्याची पूजा-जिमीची योजना असते. पण लहानपणीच्या पांडे-पूजाच्या प्रेमकहाणीचा "ट्रॅक' आणखीनच गोंधळ वाढवतो. सरतेशेवटी हेच प्रेम सरस ठरतं.
"टशन'ची अगदी सुरुवातीपासूनच गडबड झालीय. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा सर्व डोलारा उभा राहिलाय तो कच्च्या कथानकाच्या पायावर. चांगली "स्टार कास्ट' मिळालीय. मग लिहा त्यावर कथानक, यापद्धतीनं हा चित्रपट बनलाय. अनिल कपूरनं रंगविलेली "डॉन'ची व्यक्तिरेखा लिखाणात फसल्यानं पुढं सगळीच गडबड झालीय. अनिल कपूरला इंग्रजी संभाषणाचं ट्रेनिंग देणं आणि त्याचं हिंग्लिश बोलणं, यातून थोडीफार विनोदी निर्मिती झालीय. पण विनोदाचा तोच धागा पुढंही ताणल्यानं तो शेवटी तुटण्यापर्यंत मजल गेलीय. करिनाच्या व्यक्तिरेखेबद्दल सुरुवातीला चांगलं रहस्य निर्माण केलंय. अनिल कपूरनंच तिच्या वडिलांचा खून केल्याचं स्पष्ट झाल्यानंतर हा चित्रपट अगदीच "प्रेडिक्‍टेबल' झालाय. अक्षय कुमारनं साकारलेल्या व्यक्तिरेखेलाही कसलाही शेंडाबुडखा नाही. तो अचानक एका रामलीलेत घुसून काहीतरी वेडेवाकडे चाळे करायला लागतो. अक्षयला असलेल्या ग्लॅमरच्या जोरावर ही व्यक्तिरेखा पुढं तग धरून राहिलीय. त्याचा वापर करून अनिल कपूरवर मात करण्याची कल्पना चांगली होती. पण लेखक-दिग्दर्शकानं अचानक अक्षय आणि करिनाच्या बालपणीच्या प्रेमकहाणीचा "ट्रॅक' सुरू केलाय. तो अत्यंत कंटाळवाणा आहे. या "ट्रॅक'मुळे सैफ आणि करिनामधल्या नात्यामधली गंमत निघून गेलीय. अशा जीव हरवलेल्या अवस्थेत या चित्रपटाचा शेवटही उरकण्यात आलाय. अधेमधे लडाखमध्ये चित्रीत झालेली तीन-चार गाणी आहेत, पण तीसुद्धा प्रेक्षकाला पाय मोकळे करण्याचं स्वातंत्र्य देतात!
सैफ अली खानचा बदललेला "लूक' आणि त्याचा वावर छान वाटतो, पण अक्षयकुमारला झुकतं माप देण्याच्या नादात सैफच्या व्यक्तिरेखेची हत्या झालीय. अक्षयनं आपल्या अदाकारीनं भूमिका छान खुलवलीय. करिना कपूरचा अभिनयापेक्षा अंगप्रदर्शनावरच अधिक भर आहे. अनिल कपूरचा भय्याजी सुरुवातीला छान वाटतो. पण या व्यक्तिरेखेतील तोचतोपणा त्याला घातक ठरलाय. विशाल-शेखर जोडीचं संगीत फार काही मजल मारू शकलेलं नाही. यश चोप्रांची निर्मिती असल्यानं तंत्राच्या आघाडीवर काहीच त्रुटी दिसत नाहीत. या त्रुटी लेखनाच्या पातळीवर टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.

No comments: