Friday, June 6, 2008

"शोले'चा "रिमेक' पुन्हा करेन...


रामगोपाल वर्मा हे नाव उच्चारलं तरी दचकावं अशी सध्या स्थिती आहे. "आग'च्या माध्यमातून वर्मांनी "शोले'च्या "रिमेक'बाबत जो काही खेळ केला, तो विसरावा म्हटलं तरी विसरणं कठीण आहे. खुद्द वर्मांनाही त्याची कल्पना आहे. म्हणूनच आपल्या अपयशाबद्दल ते सहजपणे मन मोकळं करून टाकतात. "आग'चं अपयश आणि उद्या रिलीज होणाऱ्या "सरकार राज'बद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.
----
ः शिवसेनेतील घडामोडींवर "सरकार राज' आधारलाय का?
ः राजकारणात मला फारसा रस नाही. राजकारणापेक्षा मला रस असतो तो राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये. "सरकार' हा सिनेमा जिथं संपलाय, तिथून "सरकार राज' सुरू झालाय. "सरकार'चा शेवट केल्यानंतर त्यातल्या व्यक्तिरेखा पुढं कशा पद्धतीनं वागतील, या विचारातून "सरकार राज' बनलाय.

ः "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी तुम्ही "सरकार राज' बनवलात, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे. त्याबद्दल काय सांगाल?
ः "आग'च्या अपयशावर प्रेक्षकांच्या एवढ्या तीव्र प्रतिक्रिया आल्या, की मला स्वतःलाच आपण गब्बर झालो असं वाटलं. "आग'च्या अपयशाचं उट्टं काढण्यासाठी मी "सरकार राज' बनविलेला नाही किंवा माझा एखादा चित्रपट "फ्लॉप' ठरला तर त्याचं अपयश धुऊन काढावं, असं मला वाटत नाही. माझ्यात जेवढी गुणवत्ता आहे, त्याच दर्जाचा मी सिनेमा बनवू शकतो.

ः "आग' चित्रपट आवडला नाही असं सांगणारे हजारो प्रेक्षक सापडतील, पण हा चित्रपट आवडला अशा काही प्रतिक्रिया तुमच्याकडं आल्या का?
ः (हसत) एकही नाही. कदाचित कोणाला हा चित्रपट आवडला असेल तर ते मला सांगण्याची हिंमत झाली नसावी. माझी आई माझ्या चित्रपटांची "फॅन' आहे. "आग'पूर्वी मी बनविलेले सर्व चित्रपट तिला आवडले होते, परंतु "आग' पाहिल्यानंतर तिनं मला साधा एक फोनसुद्धा केला नाही.

ः या सिनेमाच्या अपयशाचं "डिसेक्‍शन' केलंयत का?
ः मी माझ्या कोणत्याही सिनेमाच्या यश-अपयशात रमत नाही. माझ्या दृष्टीनं सतत कार्यरत राहणं महत्त्वाचं असतं. कोणीही "चलो, एक फ्लॉप फिल्म बनाते हैं।' या उद्देशानं सिनेमा करीत नाहीत. अर्थात, "आग'चं चित्रीकरण झाल्यानंतर मला तो जमला नसल्याची कल्पना आली होती.

ः "आग'च्या पटकथेवर आपण अधिक मेहनत घ्यायला हवी होती, असं तुम्हाला आता वाटतं का?
ः फक्त "आग'च का, आतापर्यंत मी स्वतः दिग्दर्शित केलेल्या एकाही चित्रपटाच्या पटकथेवर मेहनत केलेली नाही. "सत्या' हा एक "कल्ट' सिनेमा मानला जातो, पण त्या सिनेमाचीसुद्धा पटकथा लिहिली गेली नव्हती. माझ्या मते कोणताही सिनेमा हा "आयडिया'वर बनतो. "स्क्रीप्ट इज अ किंग' असं म्हटलं जातं; मात्र पटकथेवर तीनचार वर्षं मेहनत घेऊनही ते सिनेमे रद्दड निघाल्याची अनेक उदाहरणं सापडतील. "सरकार', "रंगीला', "कंपनी' या चित्रपटांच्या पटकथेवर मी दोनतीन दिवसांपेक्षा अधिक काम केलेलं नव्हतं.

ः "आग' नेमका कुठं फसला असं वाटतं?
ः "शोले'चा "रिमेक' हा मूळ चित्रपटापेक्षा चांगला करायचा, या उद्धटपणातून मी हा चित्रपट बनविला आणि तिथंच मी फसलो. कोणताही "रिमेक' करताना तुमचा हेतू चांगला असावा लागतो. त्यात गडबड असता कामा नये. "कितने आदमी थे...' असं "शोले'तील गब्बर म्हणतो, तर "आग'मधला बब्बन फक्त "कितने...' म्हणतो. प्रत्येक व्यक्तिरेखेचं मी "इंटरप्रिटेशन' करीत गेलो, पण त्यांच्यात भावनिक नातं जोडण्यात मात्र मला अपयश आलं. म्हणूनच प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला असावा.

ः "रिमेक'वरच तुमचा नेहमी भर का असतो?
ः कारण कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' आहे असं मला वाटत नाही. प्रभावित होण्याची गोष्ट फक्त सिनेमापुरतीच मर्यादित नाही. एखादी घडलेली घटना, कोणाचा तरी वास्तवातील अनुभव, वर्तमानपत्रातील "कव्हरेज'... यावरून जर एखादा सिनेमा बनला असेल तर त्याला "रिमेक'च म्हणावं लागेल. म्हणूनच माझी कोणतीही कलाकृती "ओरिजिनल' नाही, असं मी म्हणू शकतो.

ः "आग' प्रदर्शित झाल्यानंतर "शोले'फेम रमेश सिप्पी यांनीही बरीच नाराजी व्यक्त केली होती...
ः (हसत) "आग' खूप वाईट बनल्यानं खरं तर सिप्पींना आनंद व्हायला हवा.

ः संधी मिळाली तर "शोले'चा रिमेक पुन्हा करायला आवडेल का?
ः का नाही? जरूर करीन. फक्त प्रेक्षकांची हा "रिमेक' पाहण्याची तयारी असावी.

ः नवीन कोणते सिनेमे करताय?
ः "कॉन्ट्रॅक्‍ट' नावाचा सिनेमा मी दिग्दर्शित केलाय. मुंबईतल्या गुन्हेगारीवर हा सिनेमा आधारलाय. येत्या जुलैमध्ये तो प्रदर्शित होईल. त्याचबरोबर चंदनतस्कर वीरप्पनवरही मी एका सिनेमाची निर्मिती करतोय.

Wednesday, June 4, 2008

तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा

"आयपीएल' स्पर्धेला मिळालेल्या घवघवीत यशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतेय, पण या स्पर्धेच्या आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. "सेट मॅक्‍स' वाहिनीने उत्कृष्ट प्रक्षेपण करून या स्पर्धेच्या यशात मोठा वाटा उचलला. "सोनी' वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल दासगुप्ता यांच्याशी या स्पर्धेने मिळविलेले यश; तसेच पुढील आव्हानांबद्दल केलेली चर्चा.
......................
: "आयपीएल'च्या आयोजनामध्ये एक प्रक्षेपक या नात्यानं तुमचा नेमका सहभाग कसा होता?
: "आयपीएल'च्या आयोजनामागची "बीसीसीआय'ची भूमिका मला खूप आवडली. क्रिकेटवर आधारलेला तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा, अशी "थीम' घेऊन ते आमच्याकडे आले होते. "सेट मॅक्‍स' ही एक सिनेमाविषयक वाहिनी असल्यानं या "थीम'वर काम करायला मला आवडले. "बीसीसीआय'नं 2007 च्या मध्यावधीत या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी निविदा मागविल्या होत्या. "निम्बस', "इएसपीएन' तसेच "सेट मॅक्‍स' हे तीनच स्पर्धक या शर्यतीमध्ये उतरले होते. जागतिक स्तरावरील प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेला कसे "प्रमोट' कराल? यावर त्यांचा अधिक भर होता. यावर आम्ही केलेले सादरीकरण त्यांना खूप आवडले आणि आमच्या वाहिनीला पाच वर्षांच्या प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले. सामन्यांचं नियोजन करताना ते "प्राईम टाईम' या वेळेत होतील याची आम्ही काळजी घेतली. शाळकरी मुलं हा आमचा "टार्गेट' प्रेक्षक असल्यानं आम्ही देशभरातील सर्व शाळांच्या परीक्षा संपल्याची खात्री करूनच या स्पर्धेला सुरुवात केली.
: "आयपीएल'ला एवढं मोठं यश मिळेल, असं तुम्हाला वाटलं होतं का?
: आता ज्याप्रमाणावर या स्पर्धेला यश मिळालंय, त्यापेक्षा अधिक यशाची आम्ही अपेक्षा करीत होतो. आतापर्यंत मिळालेल्या यशावर आम्ही आनंदी आहोत, पण आपण कुठं कमी पडलो, याचीही आम्हाला जाणीव आहे. "टीआरपी'च्या आकड्यांनुसार छोट्या शहरांमध्ये आम्हाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा यशस्वी करण्याचं आव्हान आता आमच्यापुढं आहे.
: "आयपीएल'च्या यशात सर्वाधिक वाटा कोणाचा आहे, असं तुम्हाला वाटतं?
: अर्थातच "बीसीसीआय'चे ललित मोदी आणि पर्यायानं या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचा. "बीसीसीआय'नं अत्यंत काळजीपूर्वकपणे या स्पर्धेचं खासगीकरण केलं. कलावंत, उद्योजक; तसेच समाजातील इतर दिग्गजांना एकत्र आणण्याची त्यांनी किमया केली. एकमेकांसमोर उभं राहूनही त्यांचे "इगो' दुखावले जाणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. "आयपीएल'चं आयोजन करताना पवारांनी खूप मोठा धोका पत्करला होता, कारण ही स्पर्धा अपयशी ठरली असती; तर पवार त्याचे धनी ठरले असते. धोका हा शब्द मी अशासाठी वापरलाय, की "झी नेटवर्क'ने काही महिन्यांपूर्वीच आयोजित केलेल्या "आयसीएल' स्पर्धेकडे रसिकांनी पाठ फिरविली होती. खुद्द "बीसीसीआय'मधील काही वरिष्ठ मंडळींना "आयपीएल'च्या यशाची खात्री नव्हती. "टीम इंडिया' जोपर्यंत खेळत नाही, तोपर्यंत प्रेक्षक हा "फॉर्म्यट' स्वीकारणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं होतं. हा विरोध डावलून पवारांनी "आयपीएल'चं आयोजन केलं. फक्त त्यापुरतंच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला त्यांची मदत झाली. योग्य जागी योग्य माणसांची त्यांनी निवड केली.
: "आयपीएल'चं वर्षातून दोन वेळा आयोजन करणं शक्‍य आहे, असं तुम्हाला वाटतं?
: पुढील काही वर्षे तरी "आयपीएल'चं आयोजन वर्षातून एक वेळाच व्हावं, असं मला वाटतं, कारण यश मिळालंय म्हणून अधिक पदरात पाडण्याची हाव बाळगणं चुकीचं ठरेल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी तयारी करावी लागते. या वेळच्या स्पर्धेतला प्रत्येक सामना वेळेत सुरू झाला. अनेक शहरांमध्ये सामने खेळले जाऊनही खेळाडू "प्रॅक्‍टिस'साठी किंवा प्रत्यक्ष सामन्याच्या स्थळी उशिरा पोहोचल्याची तक्रार आली नाही. कोणत्याही संघातल्या खेळाडूंचं विमान चुकलं नाही. नियोजन उत्तम असल्यानं असे प्रकार घडले नाहीत. एकाच वर्षी दोन वेळा ही स्पर्धा आयोजित करायची असेल; तर संघांची संख्या वाढवावी लागेल. या स्पर्धेत रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, मॅकलमसारखे खेळाडू स्पर्धेच्या पूर्वार्धात; तर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फक्त उत्तरार्धातच खेळले. प्रचंड गुणवत्ता असलेले विदेशी खेळाडू आम्हाला पूर्ण स्पर्धेत खेळवायचे आहेत. त्यामुळे सध्या तरी वर्षातून एकदाच ही स्पर्धा आयोजित करणं योग्य ठरेल.
: "आयपीएल'च्या यशामुळं "सेट मॅक्‍स'चा नेमका किती फायदा झालाय, असं तुम्हाला वाटतं?
: गेले चार आठवडे "सेट मॅक्‍स' वाहिनी लोकप्रियतेच्या तक्‍त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोणत्याही "नेटवर्क'चा कारभार पाहिल्यास त्यांच्याकडे एक अत्यंत यशस्वी वाहिनी आणि त्याच्या छायेखाली असणाऱ्या इतर वाहिन्या असल्याचं आढळते, पण "आयपीएल'च्या यशामुळं "सोनी' आणि "सेट मॅक्‍स' या एकाच समूहाच्या दोन प्रबळ वाहिन्या उभ्या करण्यात आम्हाला यश आलंय.

Saturday, May 31, 2008

जेनेलिया

अभिनेता रितेश देशमुखच्या "तुझे मेरी कसम' या पहिल्या चित्रपटातील नायिका, एवढीच जेनेलियाची आतापर्यंतची हिंदी प्रेक्षकांना असलेली ओळख. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुपरस्टार बनण्यापर्यंत मजल मारलीय. "जाने तू या जाने ना' आणि "मेरे बाप पहले आप' या दोन चित्रपटांमधून ती हिंदी चित्रपटसृष्टीत परततेय.
---------------
ः मला कसलीही "फिल्मी बॅकग्राऊंड' नाही. लहानपणी फुटबॉलमध्ये मला खूप गती होती. आपण अभिनेत्री होऊ, असं मला कधीच वाटलं नव्हतं. या क्षेत्रात मी अगदी योगायोगानं आले. एका "फॅमिली फंक्‍शन'मध्ये आमच्या एका नातेवाईकानं माझ्याकडे माझे फोटो मागितले. मी त्याला माझे वाढदिवसाचे फोटो दिले. त्यानं मला अक्षरशः वेड्यात काढलं आणि माझा "पोर्टफोलिओ' बनवायला सांगितला. तो बनविल्यानंतर मी त्याच्या "कॉपीज' पाच एजन्सीकडे पाठविल्या. आश्‍चर्य म्हणजे पाचपैकी पाच जणांनी मला जाहिरातीसाठी मॉडेलिंग करण्याची "ऑफर' दिली. जाहिरातीत काम केल्यानंतर मग आपोआपच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अभिनयाचं मी कसलंही शिक्षण घेतलेलं नाही. कॅमेरा माझ्यावर थोडा जास्तच मेहरबान आहे, असं मी म्हणेन. या क्षेत्रात पाच वर्षं झाली असूनही मला अजून "न्यू कमर'च मानलं जातं.
ः हिंदी चित्रपटापासून माझी सुरुवात झाली असली तरी दक्षिणेनं मला स्टार बनविलं. गेल्या पाच वर्षांमध्ये मी एकूण 15 चित्रपटांमध्ये काम केलं असून बहुतेक सर्व सिनेमे हिट आहेत. दक्षिणेत जाण्याचा निर्णय मी काही ठरवून घेतला नव्हता. चांगली संधी मिळाली आणि मी तिकडेच रमले. आता हिंदीत माझं पुनरागमन होतंय. भविष्यात दोन्ही चित्रपटसृष्टीत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.
ः प्रियदर्शन यांच्याबरोबर गेल्या दोन वर्षांपासून काम करण्यासाठी माझी चर्चा सुरू होती. अखेर "मेरे बाप पहले आप'द्वारे एकत्र काम करण्याचा पहिल्यांदा योग येतोय. प्रियन सरांनी "ऑफर' दिली की ती नाकारण्याचा प्रश्‍नच नसतो. दक्षिणेत भरपूर काम केलं असल्यामुळं केरळला भेट देण्याची संधी मला अनेकदा मिळाली. पण प्रियन सरांनी केरळ बॅकवॉटर्सवर केलेलं शूटिंग अफलातून म्हणावं लागेल. शूटिंगचे ते 40 दिवस मी कधीही विसरू शकणार नाही.
ः नसिरुद्दीन शाह, परेश रावल, प्रियन सर, अक्षय खन्ना... अशा दिग्गजांबरोबर एवढ्या कमी वयात काम करायला मिळण्यासारखं दुसरं नशीब नाही. अशी संधी अनेक वर्षं इथं काढल्यानंतरही इतरांना मिळत नाही. या कलाकारांचा अभिनय जवळून पाहणं, यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. अर्थात, मध्यमवर्गीय आणि ग्लॅमर नसलेल्या कुटुंबातून न आल्याचा मला चांगलाच फायदा झाला. कसलंही दडपण, तसंच "इमेज' नसल्यामुळे मी कोणताही "रोल' करू शकते.
ः "जाने तू या जाने ना' या चित्रपटासाठी तब्बल दीड वर्षापूर्वी माझी "स्क्रीन टेस्ट' घेण्यात आली होती. दिग्दर्शक अब्बास टायरवाला आणि झामू सुगंध यांनी मला "कळवतो' एवढंच सांगितलं होतं. त्यानंतर पुढे काहीच हालचाल न झाल्यानं मी हा चित्रपट विसरूनही गेले होते; पण काही महिन्यांपूर्वी अचानक मला "आमीर खान प्रॉडक्‍शन'कडून बोलावणं आलं आणि या चित्रपटासाठी माझं शूटिंग सुरू झालं. मी स्वतःला खूप "लकी' मानते. कारण, पाच वर्षांनंतर मला दोन प्रतिष्ठित बॅनर्सबरोबर काम करायला मिळतंय. दक्षिणेतील लोकांमध्ये प्रचंड व्यावसायिकता असल्याचं बोललं जातं. ते खरंही आहे; पण या दोन चित्रपटांचा माझा अनुभव फारसा वेगळा नव्हता. दोन्ही बॅनर्सचा "सेटअप' खूपच "प्रोफेशनल' वाटला.
ः काजोल आणि माधुरी दीक्षित या दोघींची मी जबरदस्त "फॅन' आहे. त्यांचे सर्व चित्रपट मी पाहिलेत. भविष्यात त्यांच्या निम्म्याएवढी जरी कामगिरी केली तरी माझं "टार्गेट' साध्य होईल. सध्या चित्रपटसृष्टीत खूप नवनवीन "हिरोईन्स' येताहेत; पण स्पर्धेची मला तयारी ठेवायलाच हवी. "वेलकम' आणि "नो एन्ट्री'फेम अनीस बज्मी यांचा एक नवीन चित्रपट मी स्वीकारलाय. हरमन बावेजा हा त्यात माझा "हीरो' आहे.

Monday, May 26, 2008

review - दे धक्का

धक्के खात गाडी मुक्कामाला
विनोदाच्या माध्यमातून नातेसंबंधांची उलगड करणं, ही खरंच खूप कठीण गोष्ट आहे. सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे या दिग्दर्शक जोडीनं ही अवघड कामगिरी "दे धक्का'द्वारे साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु त्यांच्या या प्रयत्नाला पूर्ण यश मिळालेलं नाही. झोकदार सुरुवात करणारा हा चित्रपट तासाभरानंतर चांगलाच गळपटलाय. नातेसंबंधांचे धागे कच्चे राहिले असून, केवळ विनोदाच्या जोरावर हा सिनेमा बऱ्यापैकी मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलाय. चित्रपटाच्या प्रारंभीच त्याचा शेवट पाहणाऱ्यास माहीत असतो. त्यामुळे वेगवान प्रारंभानंतर या सिनेमाची गाडी रटाळ धक्के खात खात अखेरीस मुक्कामाला पोहोचते. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि शिवाजी साटम या तिघांच्या जबरदस्त "स्क्रीन प्रेझन्स'मुळं ही काहीशी बिघडलेली भट्टी सुसह्य वाटते.
मकरंद जाधव (मकरंद अनासपुरे) हा पट्टणकोडोलीत राहणारा साधा गरीब मोटर मेकॅनिक. पेट्रोल-डिझेलची बचत करणारा एक "पार्ट' बनविण्याचं त्याचं स्वप्न असतं. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी तो आपल्या वडिलांची (शिवाजी साटम) सहा एकरची जमीन फुंकून टाकतो. ते दुःख विसरण्यासाठी मकरंदचे वडील स्वतःला दारूच्या बाटलीत बुडवून टाकतात. त्यावरून या दोघांमध्ये सतत शिवराळ खटके उडत असतात. मकरंदला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी असते. मुलगा (कृष्णा) पैलवान बनणार असतो; तर मुलगी सायलीला नाचात गती असते. भुरट्या चोऱ्या करण्यात मकरंदच्या मेहुण्याचा (सिद्धार्थ जाधव) हात धरणारा दुसरा कोणी नसतो. चित्रपटाचा हा भाग अतिशय उत्तम जमलाय. मकरंद आणि शिवाजी साटम यांच्यातली शिवराळ बडबड सुरुवातीला छान मनोरंजन करते, पण कालांतरानं तिचा अतिरेक झालाय. चित्रपटाच्या कथानकाला धक्का बसलाय तो सायलीला मुंबईला नाचाचं आमंत्रण आल्यानंतर. खरं तर लेखक-दिग्दर्शकाला जाधव कुटुंबाच्या टमटममधून होणाऱ्या मुंबई-पट्टणकोडोली प्रवासात खूप धमाल करणं शक्‍य होतं, पण प्रत्यक्षात हा प्रवास अगदीच रटाळ आणि कंटाळवाणा झालाय. या प्रवासात मकरंदच्या वडिलांचं आणि मुलाचं अचानक उद्‌भवलेलं आजारपण चित्रपटाच्या कथानकाला रस्ता सोडायला भाग पाडतं. सायलीचा नृत्यस्पर्धेतील "परफॉर्मन्स' हा या सिनेमाचा परमोच्च क्षण आहे, पण इथंच हा चित्रपट कमी पडलाय. आरती अंकलीकर यांनी गायलेली "उगवली शुक्राची चांदणी' ही लावणी पाहण्यापेक्षा फक्त ऐकायलाच बरी वाटते.
"मातीच्या चुली' ही सरस कलाकृती देणाऱ्या अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांचा हा दुसरा चित्रपट. महेश मांजरेकर आणि अभिजित देशपांडे यांच्या सैरभैर पटकथेमुळं दिग्दर्शकांची चांगलीच पळापळ झालीय. मुळात चित्रपटाच्या कथानकाचा पायाच कमकुवत आहे. पेट्रोल-डिझेलची बचत करणारा एक छोटासा "पार्ट' बनविण्यासाठी मकरंदला सहा एकर जमीन आणि बायकोचं मंगळसूत्र खर्च करायला लागण्याची गोष्ट पटणारी नाही. वडील-मुलाच्या नात्यामध्ये उडणारे खटके कालांतरानं त्रासदायक ठरतात. शिवाजी साटम यांना ऑक्‍सिजनचा "मास्क' हातात घेऊन सातारा ते मुंबई हा प्रवास करायला लावण्याची कल्पकता सर्वात धक्कादायक आहे. एवढ्या त्रुटींची मालिका असूनही हा चित्रपट पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो तो त्यातल्या हृषिकेश जोशी यांच्या चुरचुरीत संवादांमुळं. दर तीन-चार मिनिटांनी कानावर पडणारे गावरान खुसखुशीत संवाद कथानकातील धक्के जाणवणार नाहीत, याची काळजी घेतात.
ग्रामीण ढंगाच्या व्यक्तिरेखा साकारणे मकरंद अनासपुरेचा हातखंडा आहे. "होम पीच'वर खेळताना एखाद्या बॅटस्‌मनची फलंदाजी जशी खुलावी, तसा मकरंद या चित्रपटात खुललाय. त्याला तेवढीच तोलामोलाची साथ सिद्धार्थ जाधवनं दिलीय. भुरट्या चोऱ्या करण्यातली आपली सफाई त्यानं अतिशय छान दाखवलीय. शिवाजी साटम यांची व्यक्तिरेखा थोडी एकसुरी असली तरी त्यांनी तिचा तोल आणखी बिघडवू दिलेला नाही. बालकलाकारांची कामं चांगली आहेत. अजय-अतुल यांचं संगीत चित्रपटाच्या "मूड'ला साजेसं असलं तरी त्यात नवीन काही नाही.

Thursday, May 22, 2008

नागेश कुकनूरचा "आशाएँ'

तरुण पिढीतला अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शक ही नागेश कुकनूरची ओळख. "हैदराबाद ब्ल्यूज', "इक्‍बाल', "डोर' अशा चढत्या भाजणीनं त्याचा प्रवास सुरू होता. या प्रवासाला धक्का बसला तो या वर्षीच्या सुरुवातीला आलेल्या "बॉम्बे टू बॅंकॉक' या चित्रपटानं. या चित्रपटामुळं नागेश काही अंशी प्रेक्षकांच्या दृष्टीनं "व्हिलन' बनला. मात्र, त्याचा फटका त्यानं आपल्या करियरला बसू दिलेला नाही. यश, अपयश तसंच आपल्या काही नवीन प्रोजेक्‍टस्‌बद्दल त्याची ही मनमोकळी मुलाखत.
----------------

नागेश कुकनूरचा "आशाएँ' चित्रपट लवकरच येतोय. त्यानिमित्तानं त्याच्याशी संवाद साधण्याचा योग आला. खरं तर "बॉम्बे टू बॅंकॉक' पाहिल्यानंतर लगेचच मला त्याला भेटायचं होतं. कारण हा चित्रपट पाहून त्याच्या इतर काही चाहत्यांप्रमाणे मलाही मोठा धक्का बसला होता. एवढा साधारण दर्जाचा चित्रपट नागेश कसा काय करू शकतो? या प्रश्‍नाचं उत्तर जाणून घ्यायचं होतं. "इक्‍बाल', "डोर'सारख्या कलाकृती देणाऱ्या दिग्दर्शकाचा "फॉर्म' असा एकाएकी कसा काय हरवू शकतो? या प्रश्‍नाचंही उत्तर सापडलं नव्हतं. म्हणूनच नागेशची भेट घेतल्यानंतर त्याच्यावर माझ्याकडून या प्रश्‍नांचा भडिमार होणं साहजिक होतं. पण या पठ्ठ्यानं दिलेल्या पहिल्याच उत्तरानं माझ्यावर गारद होण्याची वेळ आली. "" "बॉम्बे टू बॅंकॉक' हा चांगलाच चित्रपट होता. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दिग्दर्शक म्हणून माझं नाव नसतं तर तो चाललाही असता. "इक्‍बाल', "डोर'वर मी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मी "बॉम्बे टू बॅंकॉक'वर घेतली. त्यामुळे, या चित्रपटाचा मला अभिमान वाटतो.''
आपल्या फसलेल्या कलाकृतीचं एवढ्या ठामपणे समर्थन करणारा पहिलाच दिग्दर्शक माझ्या पाहण्यात आला होता. अर्थात, नागेशसाठी "बॉम्बे टू बॅंकॉक' हा जिव्हाळ्याचा विषय असला तरी त्याचे निर्माते सुभाष घई यांना वेगळा अनुभव आला होता. या चित्रपटाच्या अपयशानंतर त्यांनी नागेशच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. "बॉम्बे टू बॅंकॉक'च्या "मेकिंग'मध्ये नागेश पुरेसा "इन्व्हॉल्व्ह' नव्हता, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. याबाबत नागेशला थेट विचारलं असता तो म्हणतो, ""कोणताही सिनेमा यशस्वी ठरला की, त्याचं कौतुक झेलण्यासाठी शंभर लोकं तुमच्या आजूबाजूला असतात आणि एखादी कलाकृती फसली की त्यावर बोटं दाखविणारे शंभर हात वर उठतात. ही गोष्ट आताची नाही. त्यामुळे घईंनी केलेल्या वक्तव्याचा मला धक्का बसला नाही. गेल्या वर्षी मी एकूण तीन चित्रपट केले. पहिल्यांदा "बॉम्बे टू बॅंकॉक' शूट केला. तो बाजूला ठेवून मग मी "आशाएँ'चं चित्रीकरण सुरू केलं. ते संपल्यानंतर लगेचच "तस्वीर'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली. हे शूटिंग संपल्यानंतर मग मी एकापाठोपाठ एक या पद्धतीनं या तीन चित्रपटांचं "पोस्ट प्रॉडक्‍शन' केलं. त्यामुळे "बॉम्बे टू बॅंकॉक' हा चित्रपट काही अपघातानं बनला नव्हता, हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो. "व्हॅकी कॉमेडी'चा प्रकार या चित्रपटात मी हाताळला होता. आपण जे यापूर्वी केलेलं नाही, ते मला माझ्या प्रत्येक नवीन कलाकृतीमधून करायचं असतं. त्याचं प्रेक्षक कितपत स्वागत करतात, याची खात्री मी देऊ शकत नाही. गंमत म्हणजे, नवीन चित्रपट करताना याची स्पष्ट कल्पना मी माझ्या निर्मात्यांना करून देतो. माझं हे मत पटलं तरच आम्ही पुढं काम करतो. चित्रपट यशस्वी ठरला तरी फार हुरळून न जाता माझं उत्तर "थॅंक यू' एवढंच असतं आणि एखादा सिनेमा फसला तर मी त्यातल्या चुका काढत बसत नाही.''
"बॉम्बे टू बॅंकॉक'च्या अपयशावरून नागेशची गाडी "आशाएँ'वर आणायला थोडा वेळ गेला. "आशाएँ' हे "टायटल' उच्चारलं तरी पटकन नागेशच्या "इक्‍बाल'मधील "टायटल सॉंग'ची आठवण येते. त्या गाण्यावरूनच हा चित्रपट सुचला का ? असं विचारलं असता नागेश तत्काळ "हो' असं उत्तर देऊन जातो. आपणास "लकी' असणाऱ्या श्रेयस तळपदेऐवजी जॉन अब्राहमला "हीरो' म्हणून का निवडलंस ? या प्रश्‍नावर तो म्हणतो, ""प्रेक्षक काही कलाकारांकडं एका विशिष्ट नजरेनं पाहत असतो. मी नेमका त्याच्या विरुद्ध नजरेतून त्या कलाकाराकडं पाहून त्याला माझ्या चित्रपटात स्थान देतो. "डोर' साकारण्यापूर्वी आयेशा टाकियाची "इमेज' ग्लॅमर डॉल अशी होती. "डोर'मध्ये मी तिच्या इमेजच्या विरुद्ध जाणारा रोल तिला दिला. "आशाएँ'साठी श्रेयसचा विचारही माझ्या मनात आला नव्हता. या चित्रपटातील "रोल'साठी एखादा तिशीतला कलाकार मला अपेक्षित होता. एकानं मला जॉनचं नाव सुचवलं तेव्हा मी त्याचा चित्रपट काय, अगदी "प्रोमो'सुद्धा पाहिला नव्हता. पण, त्याच्या चेहऱ्यातील प्रामाणिकपणा मला विलक्षण भावला. जॉनबरोबरच मला या चित्रपटासाठी आयेशा टाकिया हवी होती. पण या चित्रपटातील एक "किसींग सीन' करण्यास तिनं विरोध दर्शविल्यानं मला तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करावी लागली. एखाद्या चित्रपटाची पटकथा जेव्हा मी लिहितो, तेव्हा कलाकारानं त्यात काहीही बदल करू नये, अशी माझी अपेक्षा असते. म्हणूनच केवळ या एका गोष्टीसाठी आयेशा हा चित्रपट करू शकली नाही, याचा मलाही खेद वाटतो. पण, शेवटी पटकथेला माझ्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्व आहे.''
या चित्रपटाचा "हीरो' म्हणजे त्याचं कथानक. आपल्या मध्यमवर्गीय माणसांना एक वाईट खोड जडलीय. आपल्याला लहानपणापासून आयुष्यात स्थिर व्हायचे धडे दिले जातात. अभ्यास करा, नोकरी मिळवा, घर घ्या... पण, या चक्करमध्ये आयुष्याचा आनंद उपभोगण्याची गोष्टच आपण विसरून जातो. माझंच उदाहरण घ्या ना. केमिकल इंजिनियर बनून मी दहा वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलो होतो. मला चांगल्या पगाराची नोकरी होती. राहायला आलिशान बंगला होता. स्पोर्टस्‌ कार होती. तरीही मी आयुष्यात सुखी नव्हतो. मला, "फिल्ममेकर' व्हायचं होतं. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मी अमेरिका सोडून भारतात आलो. अर्थात, पहिल्या काही वर्षांमध्ये मला खूप संघर्ष करावा लागला. पण आता मी इथं "सेटल' झालोय. सांगायचा मुद्दा हा की, एखादी गोष्ट करायची असेल तर ती लगेच करा. आपली स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी फार काळ वाट बघू नका. "लिव्ह लाईफ नाऊ', हा या चित्रपटाचा संदेश आहे.''
"आशाएँ'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं संगीत. नागेशच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये गाणी होती. पण ती सर्व चित्रपटाच्या कथानकाच्या पार्श्‍वभूमीवर ऐकायला मिळाली होती. "आशाएँ'मधली गाणी या चित्रपटाचं कथानक पुढं नेण्यास कारणीभूत ठरतात, असा त्याचा दावा आहे. याबद्दल तो म्हणतो, ""पूर्वीच्या काळात असं घडायचं. लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक एकत्र बसून गीत-संगीताद्वारे कथानक पुढं न्यायचे. "आशाएँ'मधून मला नेमकं तेच साधायचंय. यापूर्वी गाण्यातून कथानक पुढं नेण्याचा मी प्रयत्न केला नव्हता.''
"आशाएँ'पाठोपाठ नागेशचा "एट बाय टेन' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार मुख्य व्यक्तिरेखा साकारतोय. बॉलीवुडमधल्या एखाद्या सुपरस्टारनं त्याच्याबरोबर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाचं आतापर्यंत 75 टक्के शूटिंग पूर्ण झालं आहे. त्यापुढचा चित्रपट कोणता? असं विचारलं असता तो "छे-सात स्क्रीप्ट तो तैय्यार है ।' असं उत्तर देऊन टाकतो.

Monday, May 19, 2008

ंएक डाव भूतनाथचा


"भूतनाथ' हा हॉररपट नाही की तो पूर्णतः बालपटही नाही. निर्माते रवी चोप्रा आणि दिग्दर्शक विवेक शर्मा यांनी या चित्रपटाद्वारे मनोरंजनाचा एक छान डाव मांडलाय आणि तो मस्त जमलाय. सात-आठ वर्षांचा एक निरागस मुलगा आणि एका भुताच्या मैत्रीवर हा चित्रपट आधारलाय. एखाद्या बऱ्यापैकी कल्पनेला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची जोड लाभल्याचा परिणाम म्हणजे "भूतनाथ'. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची आणखी एक दमदार अदाकारी आणि छोट्या अमन सिद्दिकीनं त्यांच्या तोडीस तोड केलेली कामगिरी, हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक आशय ही "बी. आर. फिल्म्स'ची खासियत. हा सिनेमा या चौकटीत अगदी "फिट' बसणारा आहे. मात्र सामाजिक आशय शोधताना लेखक मंडळींनी विनाकारण "बागबान' आणि "बाबुल'ची पुन्हा एकदा री ओढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे शेवटच्या काही रिळांमध्ये हा सिनेमा अगदी ढेपाळलाय. शेवटी रडा सूर लावण्याऐवजी भुताच्या आणखी काही गमतीजमती दाखविल्या असत्या तर धमाल आली असती. तरीदेखील तत्पूर्वीच्या चांगल्या कामगिरीसाठी हा चित्रपट पाहायलाच हवा.चित्रपटाचं कथानक गोव्यातील एका भूतबंगल्यात घडतं. हा बंगला कैलाशनाथांच्या (अमिताभ बच्चन) मालकीचा असतो. या बंगल्यात त्यांचा अतृप्त आत्मा वावरत असतो. मुलाची विदेशी स्थायिक होण्याची गोष्ट त्यांना पचलेली नसते. म्हणूनच या घरात राहायला येणाऱ्यांना सळो की पळो करून सोडणं एवढंच त्यांचं काम असतं, पण बंकू (अमन सिद्दिकी) हा आठ वर्षांचा मुलगा त्यांचं मन जिंकतो. मैत्रीचं नवं नातं फुलवून तो या भुताला आपल्या गतायुष्यात डोकवायला लावतो. पदार्पणाचा चित्रपट असूनही दिग्दर्शक विवेक शर्मा यांची कामगिरी उत्कृष्ट आहे. मुख्य म्हणजे सुरुवातीपासून हा चित्रपट आपली घट्ट पकड निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय. कैलाशनाथ या भुत
ाभोवती पहिल्या काही रिळांमध्ये छान रहस्य निर्माण केलंय. त्यानंतर आपल्याला सारं जग घाबरतं आणि हा बंकू घाबरत नाही, म्हणजे काय? असा या भुताचा आविर्भाव चित्रपटात विनोदाचे रंग भरतो. त्यानंतर या भुतानं बंकूबरोबर शाळेत जाऊन केलेली धमाल मस्त जमलीय. दिग्दर्शकानं हाच "ट्रॅक' आणखी काही वेळ पुढं सुरू ठेवायला हरकत नव्हती, पण बहुधा याच वेळी निर्माते रवी चोप्रा यांना आपल्या बॅनरची परंपरा आठवली असावी. म्हणूनच सगळं काही छान सुरू असताना हा चित्रपट भुताच्या भूतकाळात डोकावतो. "बागबान'प्रमाणेच या सिनेमातही चोप्रांनी अमिताभच्या व्यक्तिरेखेला झुकतं माप देताना त्याच्या मुलांना काळ्या रंगात रंगवलंय. परंपरा, संस्कृतीला प्राधान्य देण्याच्या नादात श्राद्धासारखा प्रकारही चित्रपटात थोडा अधिकच विस्तारानं आलाय.पटकथा चांगली असली की अमिताभ बच्चन खुलतात असा आजवरचा अनुभव आहे. या चित्रपटात नेमकं हेच घडलंय. लेखकानं लावलेला "सा' जमल्यानं पुढची सरगम प्रभावीपणे पूर्ण करण्याचं काम या कलाकारानं केलंय. त्याला तेवढीच साथ छोट्या अमन सिद्दिकीनं केलीय. तो अत्यंत सफाईनं कॅमेऱ्याला सामोरा गेलाय. त्याची उत्स्फूर्तता आणि डोळ्यातील गहिरे भाव पाहण्यासारखे आहेत. या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे जुही चावला. विनोदी बाजाची भूमिका म्हणजे जुहीच्या हातचा मळ. यातली बंकूची आई तिनं छान रेखाटलीय. शाहरूख खानच्या वाट्यालाही चांगली 20-25 मिनिटं आलीत. फक्त राजपाल यादवच्या वाट्याला अगदीच दुय्यम भूमिका आलीय. या जमलेल्या मैफलीला धक्का लागलाय तो विशाल-शेखर यांच्यामुळं. अमिताभच्या आवाजातली दोन्ही गाणी फसली आहेत.

Saturday, May 3, 2008

"तुझ्या-माझ्यात' review


लिखाणातली ढिलाई भोवली
पडद्यावरचा घटस्फोट म्हटलं की, नजरेसमोर पहिल्यांदा येतात ती पती-पत्नीमधील भांडणं आणि नंतर ओघानं आलेली मुलांची फरपट. हा विषय अनेकदा येऊन गेल्यानं त्याचा अगदी चोथा झालाय. निर्माते शिवाजीराव चमकिरे आणि दिग्दर्शक प्रमोद जोशी यांनी "तुझ्या-माझ्यात' या चित्रपटाद्वारे घटस्फोटानंतरही काही चांगलं घडू शकतं, असा आशावाद जागविण्याचा प्रयत्न केलाय; पण या प्रयत्नाला धक्का बसलाय तो अत्यंत संथ पटकथा, लांबलचक संवाद आणि "रूटीन' पद्धतीच्या धक्‍क्‍यांमुळं. तंत्र आणि दिग्दर्शनात अत्यंत उजवा असूनही या त्रुटी "तुझ्या-माझ्यात'चा परिणाम हरविण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. एक चांगला विषय कल्पक लिखाणाअभावी फसलाय.
अस्मिता (मृणाल कुलकर्णी) आणि शशांकचा (सचिन खेडेकर) संसार मोडतो तो परस्परांतील विसंवादामुळं. दोन मुलं असूनही अस्मिताची शंकेखोर वृत्ती या दोघांना घटस्फोटापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरते. तेव्हा शशांक पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी राधिकाशी (सुलेखा तळवलकर) विवाहबद्ध होतो. अस्मिताशी घटस्फोट घेताना शशांकने आठवड्यातून दोनदा मुलांचा सांभाळ करण्याचं ठरलं असतं; पण आपल्या कामाच्या व्यापात शशांककडून मुलांच्या देखभालीबाबत हेळसांड होते. शशांकच्या दुसऱ्या विवाहामुळं दुखावलेली अस्मिता नेमक्‍या याच मुद्द्याचा "इश्‍यू' करते. चित्रपटाचा इथपर्यंतचा भाग आचके खात प्रवास करतो. प्रमोद जोशी यांच्या कथानकात नावीन्य असलं तरी शेखर ढवळीकर यांच्यासमवेत पटकथा लिहिताना ते कमी पडले आहेत. काही दृश्‍यं चांगली जमली आहेत; तर काही एकदम सपाट झालीत. प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवण्याची ताकद त्यात निश्‍चितच नाही. चित्रपटाची सुरुवात अत्यंत चांगली असेल; तर ते पुढील घटनाक्रमासाठी फायदेशीर ठरतं. परंतु दिग्दर्शकाने एक अपरिणामकारक बालगीत सुरुवातीलाच टाकून संकट ओढवून घेतलंय.
अस्मिताने आपल्या "करिअर'साठी शशांककडे मुलांना जास्त वेळ सोपविण्याचा प्रसंग जमलाय; तसेच आपण मुंबईबाहेर आहोत असं तिचं सांगणं आणि नेमक्‍या त्याच वेळी शशांकच्या पत्नीनं तिला परपुरुषाबरोबर पाहणं, यातूनही कथानक थोडं वेगळ्या वाटेकडे चाललंय याची कल्पना येते; पण याच वेळी अस्मिताला कर्करोग झाल्याचं निदान दाखवून दिग्दर्शकानं घोटाळा केलाय. हे रहस्य मध्यंतरालाच उघड केल्यानं पुढं काय डाव मांडला जाणारेय, याची साधारण कल्पना येते. अर्थात, या कल्पनेसारखं जरी घडलं असतं तरी हा चित्रपट रस्ता चुकला नसता; पण मध्यंतरानंतर लिखाणाच्या बाबतीत चित्रपट आणखीनच घसरलाय. आपल्याला कर्करोग झाल्याचं निदान झाल्यानंतर खरं तर अस्मिताच्या वागण्यात कमालीचा बदल अपेक्षित आहे. शशांक आणि राधिकाबरोबरची तिची "तू तू मैं मैं' अखेरपर्यंत सुरूच राहते. अस्मिता-शशांकच्या मुलीतील आत्मविश्‍वास जागविण्यासाठी एका नृत्यस्पर्धेचा दृश्‍यक्रम दाखविण्यात आलाय. तो खूपच लांबल्यानं कंटाळवाणा झालाय. अस्मितानं मुलांच्या आयुष्यातली आपली जागा हसत खेळत पद्धतीने राधिकाला दिली असती; तर हा चित्रपट वेगळ्या पातळीवर गेला असता, पण शेवटच्या काही प्रसंगांमधील अस्मिताचा उद्वेग पटणारा नाही. चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये राधिकासह आपल्या सर्वांचा "ग्रुप' फोटो काढून घेण्याची अस्मिताची इच्छा चांगली आहे, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला आहे. प्रमोद जोशी यांची दिग्दर्शनातील कामगिरी चांगली आहे. "राजकारण' या चित्रपटाच्या प्रभावी हाताळणीमुळं त्यांच्याबाबतच्या आशा वाढल्या होत्या. परंतु लिखाणातील दोषांमुळं ते दोन पावलं मागे गेलेत. निर्माते शिवाजीराव चमकिरे यांनी तंत्राच्याबाबतीत चित्रपट चांगला दिसावा, याची पुरेपूर काळजी घेतलीय.
नातेसंबंधांवरील चित्रपटांमध्ये कलाकारांचा मोठा कस लागतो. त्या आघाडीवर हा चित्रपट चांगला जमलाय. मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर यांनी बाजी मारलीय. दोघांनीही आपापल्या भूमिका खूप समरसून केल्यात. सुलेखा तळवलकरच्या वाट्याला बऱ्यापैकी मोठी भूमिका आलीय आणि ती त्यात छान रमून गेलीय. मोहन जोशी यांच्यासारख्या मुरब्बी कलाकाराच्या वाट्याला अगदीच क्षुल्लक भूमिका आलीय. दोन मुलांमध्ये श्रेयस परांजपेचा अभिनय नैसर्गिक आहे, पण निशाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कौमुदी वालोकरच्या कपाळावरील कायमच्या आठ्या खटकतात. आशा भोसले यांनी गायलेलं आणि प्रवीण जोशी यांनी संगीतबद्ध केलेलं "पाणी का डोळ्यात येते...' हे गाणं चांगलं जमलंय. त्याचा पार्श्‍वसंगीतासाठी उपयोग करण्याची कल्पना चांगली आहे.