Tuesday, June 28, 2011


पौर्णिमेतलं शीतल चंद्रबिंब
----------
दिवंगत चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांडरे यांचं आयुष्य म्हणजे पौर्णिमेतल्या शीतल चंद्रासारखं होतं. आपल्या चित्रकला-अभिनय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीच्या शीतल छायेनं तब्बल आठ दशकं रसिकांना न्हाऊ घातलं. अर्थात चंद्राप्रमाणे ते परप्रकाशी नव्हते. आपल्या कर्तृत्वानं त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी आणि कलासृष्टी तर उजळवून टाकलीत. त्याशिवाय त्यांच्या सान्निध्यात जी जी माणसं आली, त्यांचं आयुष्यही उजवळून टाकण्यात ते यशस्वी ठरले.

काय योगायोग आहे पाहा. कोल्हापुरातल्या शनिवार पेठेतल्या ज्या मातीच्या घरात चंद्रकांत यांचा जन्म झाला, ते घरदेखील चंद्रमौळी होतं. त्यांचं मूळ नाव गोपाळ मांडरे. चित्रकला आणि अभिनय त्याच्या रक्तातच होता. शाळेच्या दिवसांमध्ये हा गोपाळ खेडूत, वैदू, वासुदेवाच्या नकला करायचा. घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे मॅट्रिकच्या पुढे काही त्याला जाता आलं नाही. हे दिवस प्रेमात पडण्याचे. गोपाळ या काळात प्रेमात पडला तो तालमीतल्या लाल मातीच्या. व्यायाम करून त्यानं शरीर कमावलं. तेच पुढं आयुष्यभर त्याच्या कामी आलं. गोपाळच्या वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त गोपाळचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या "गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. गोपाळच्या वडिलांमुळेच त्याला बाबूराव पेंटर आणि बाबा गजबर या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या सान्निध्यात येण्याची संधी मिळाली. बाबा गजबरांकडे गोपाळनं सुरुवातीला चित्रकलेचे धडे घेतले. 1931-32मध्ये सांगलीत "बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम गोपाळला मिळालं. पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे गोपाळची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या मा. दीनानाथांनी गोपाळचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं.

विसाव्या वर्षी गोपाळला पोस्टर विभागातून बाहेर आणलं ते बाबूराव पेंटरांनी. त्याच्या डोक्‍यावरचा भरगच्च केशसंभार त्यांनी उतरवला आणि झिरो कट मारला. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील गोपाळ यांचा अभिनय. गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.

"जयमल्हार' चित्रपटातल्या भूमिकेसाठी बैलाच्या देखभालीपासून गाडी जुंपण्यापर्यंत सगळं काही ते शिकले. "थोरांताची कमळा' या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही. शांताराम यांनी "शेजारी' चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्‍टिस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. "छत्रपती शिवाजी' चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौड करायला लावली. त्यामुळे या चित्रपटातील चंद्रकांत यांचा शिवाजी ताठ कण्याचा आणि रूबाबदार वाटतो. डमी वापरण्यात कमीपणा वाटत असल्यामुळे धाडसाची कामं त्यांनी स्वतःच केली.

व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. "रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्‍यावर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगडवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट

चंद्रकांत नुसता अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. "भरतभेट' चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता. मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. दादा गुंजाळ, दादासाहेब तोरणे, मा. विनायक, अंबपकर, शोभना समर्थ, लीलाबाई, रत्नमाला, सुलोचना, उषा मंत्री, कमला कोटणीस... अशा विविध मान्यवर कलावंतांचा सहवास त्यांना लाभला. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही. निसर्ग हाच श्‍वास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली.

चंद्रकांत नेहमी म्हणायचे, "आपण जन्माला येताना काही घेऊन येत नाही, मरताना काही घेऊन जात नाही. जगताना लोकांसाठी, समाजासाठी करतो तीच आपली कमाई.' हे तत्त्वज्ञान चंद्रकांत अक्षरशः जगले. स्वतः चित्रीत केलेली 350 ते 400 चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी 1984 मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत 30 लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे "चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया'ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो. चित्रकलेल्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्‍मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला. कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं.

आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी "राम-लक्ष्मण' नावानं ओळखली जायची. सूर्यकांत यांचं आपल्या आधी निधन झाल्याचा चंद्रकांतना खूप मोठा धक्का बसला होता. "आयुष्यभर आम्ही राम-लक्ष्मणाप्रमाणे राहिलो. मला कमीपणा येईल, असे तो आयुष्यात कधी वागला नाही. पण रामाच्या आधी लक्ष्मणाने निघून जावे, हा कुठल्या नशिबाचा खेळ म्हणायचा?' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत यांनी व्यक्त केली होती. आयुष्यभर पैशाचा विचार न करता चांगल्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. त्या वेळी न मिळालेले पैसे त्यांना पुढे विविध पुरस्कारांच्या रुपाने मिळाले. स्वच्छ मनानं, निष्ठेनं केलेल्या कामाचं फळ निश्‍चित मिळतं, यावर त्यांचा विश्वास होता. हाच विश्वास या कलावंताला सदैव रसिकांच्या हृदयात घर करून देण्यास कारणीभूत ठरला.

-----------------
चंद्रकांत मांडरे जीवनपट...
जन्म ः 13 ऑगस्ट 1913
मृत्यू ः 17 फेब्रुवारी 2001
कलाक्षेत्रातील पदार्पणाचं वर्ष ः 1936
उल्लेखनीय चित्रपट ः युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
भाग्योदय ठरलेला चित्रपट ः सावकारी पाश
अभिनयाव्यतिरिक्त इतर छंद ः चित्रकला
आवडता खाद्यपदार्थ ः कोल्हापुरी मटण
आवडता चित्रपट ः सावकारी पाश
अभिनयाव्यतिरिक्त इतर कार्य ः चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाची उभारणी.


- मंदार जोशी

No comments: