Monday, July 4, 2011

कधी जात्यात; कधी सुपात

कधी जात्यात; कधी सुपात

यशाच्या कैफात धुंद होऊन विजेत्यांना डोक्‍यावर घेण्याची आणि अपयशाचं चक्र आलं की पराभूतांचं खच्चीकरण करण्याची मानसिकता आजही आपल्याकडे कायम आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरांशी अनौपचारिक चर्चा करण्याचा योग आला. यावेळी बहुतेकांनी मराठी चित्रपटांच्या वाट्याला सातत्यानं मिळणाऱ्या अपयशाबद्दल चिंता व्यक्त केली. एवढ्यावरच न थांबता मराठी चित्रपटसृष्टीचं आता काही खरं नाही, असा टोकाचा सूरही लावला. काही दिवस जातायत न्‌ जातायत तोच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारल्याची बातमी आली आणि याच मंडळींचा बोलण्याचा सूर पुन्हा बदलला. मराठी चित्रपटसृष्टीची ही सर्वाधिक चांगली "फेज' असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लगोलग कलाकारांचे सत्कार होऊ लागले. मराठी चित्रपटसृष्टीच्या भरभराटीबद्दल चर्चासत्रंही आयोजित होऊ लागली. त्यापुढे मजल मारत काही बालकलाकारांना घरं मिळवून देण्यासाठी "मीडिया'नं पुढाकार घेतला आणि काही नगरपालिकांनी कागदोपत्री घोडे नाचवत, तशी घरं मंजूर झाल्याच्या बातम्याही वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या. थोडक्‍यात, मराठी चित्रपटसृष्टी कधी जात्यात; तर कधी सुपात असते. एवढ्या टोकाचा भाबडेपणा आपल्याकडे सातत्यानं पाहायला मिळतोय आणि तोच आपल्या प्रगतीला मारक ठरतोय.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी मिळविलेलं यश हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे; परंतु त्या यशाचं कौतुक करताना इतर गोष्टींचं अवमूल्यन होता कामा नये, याची काळजी आपण सध्या घेताना दिसत नाही. मल्याळी, कानडी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांमधील मक्तेदारी आपण मोडून काढल्याचा आपल्याला अभिमान वाटतो; मात्र सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या मल्याळी चित्रपटात कोणता विषय मांडलाय, हे जाणून घेण्यासही आपण इच्छुक नसतो. चित्रपट माध्यमावर मनापासून प्रेम करणारी मंडळीदेखील राष्ट्रीय पुरस्कारांवर आपल्या भाषेव्यतिरिक्त इतरांनी काम चमक दाखविलीय, याकडे लक्ष देत नाहीत. अर्थात, सरकारी यंत्रणाही त्याला तेवढीच जबाबदार आहे. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रपट आपल्याकडे चित्रपटगृहांमधून क्वचितच प्रदर्शित केले जातात. "टीआरपी'च्या मागं लागलेल्या वाहिन्यादेखील अशा चित्रपटांना भीक घालत नाहीत. त्यामुळेच आपल्या आजूबाजूला नेमकं काय चाललंय, हे आपल्याला समजतच नाही.

मराठी चित्रपटांपुढची आता सर्वात मोठी समस्या आहे ती वितरणाची आणि प्रसिद्धीची. अजूनही आपल्या चित्रपटांना मल्टिप्लेक्‍स आणि "सिंगल स्क्रीन' चित्रपटागृहांमध्ये चांगला वेळांचे "शोज' मिळत नाहीत; परंतु या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्याचे आघाडीचे मराठीमधील अभिनेते आपला चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असला की राजकीय पक्षांना हाताशी धरतात. आपल्या चित्रपटाला कसे चांगले "शोज' मिळाले नाहीत, याबद्दल ते वातावरण गरम करतात. परंतु प्रदर्शनानंतर दोन-तीन दिवसांमध्ये आपला चित्रपट "बॉक्‍स ऑफिस'वर नरम पडला की पुढचा चित्रपट येईपर्यंत हे कलाकार-निर्माते-दिग्दर्शक शांत बसतात. अशानं मराठी चित्रपट कसा काय पुढं जाणार? मराठी चित्रपटांच्या योग्य प्रदर्शन आणि वितरणासाठी ना राज्य सरकारवर दबाव टाकला जातो ना वितरक, प्रदर्शकांवर. त्यामुळे चांगला चित्रपट असूनही त्याला योग्य वेळेचे "शोज' मिळत नसल्याची खंत आपल्याला प्रत्येक वेळी ऐकायला मिळते. काही राजकीय पक्षांनी मराठी चित्रपटांच्या प्रगतीसाठी वेगळे प्रयत्न सुरू केले आहेत, असं म्हणतात; परंतु या प्रयत्नांचा वरील समस्यांचं निराकरण होण्यासाठी काही उपयोग झाल्याचं अजून तरी पाहायला मिळालेलं नाही.

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेले काही मराठी चित्रपट अजूनही प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची वाट पाहताहेत. अशा चित्रपटांवर पुरस्कारांबरोबरच प्रेक्षकांच्या उड्या पडल्या तर त्या अधिक योग्य ठरतील. त्या दिवसाची आता आपण वाट पाहायला हवी.

No comments: