Monday, April 7, 2008

राहुल बोस, के. के. "बेस्ट'


"शौर्य' या शीर्षकावरून हा युद्धपट वाटण्याची शक्‍यता आहे, पण तसं प्रत्यक्षात काही नाही. हा युद्धपट नाही की सीमेवरील एखाद्या सैनिकाची वीरोगाथा नाही. हा चित्रपट आपल्या समाज यंत्रणेतील बिघाडावर प्रभावी भाष्य करतो. एकीकडे आपला देश धर्मनिरपेक्ष प्रतिमेसाठी गौरविला जात असताना दुसरीकडे काही कट्टरपंथीय मंडळी या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिग्दर्शक समर खान यांनी लष्करी पार्श्‍वभूमीवर हा विषय अतिशय संवेदनशीलपणे हाताळला आहे. "कोर्टमार्शल' प्रक्रियेला सामोरा जाणारा एक लष्करी अधिकारी आणि त्याच्या चौकशीतून बाहेर आलेलं एक धक्कादायक सत्य या चित्रपटाला इतरांहून वेगळं ठरवतं. सुरुवातीला संथ गतीनं जाणारा हा चित्रपट शेवटच्या वीस मिनिटांमध्ये उंची गाठण्यात यशस्वी ठरलाय. राहुल बोस आणि के. के. मेनन यांची अभिनयातील सरस कामगिरी या चित्रपटाला तारक ठरलीय.
चित्रपटाची सुरुवात होते ती एका हत्येपासून. जावेद खान (दीपक डोब्रियाल) नावाचा एक कॅप्टन आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या करतो. त्यामुळं त्याच्यावर "कोर्टमार्शल'ची कारवाई सुरू होते. त्यासाठी लष्कराचा वकील म्हणून आकाशला (जावेद जाफरी) पाचारण करण्यात येते. सिद्धू (राहुल बोस) हा आकाशचा अगदी जवळचा मित्र. तोसुद्धा लष्करातच वकील असतो. आकाशबरोबर राहण्यासाठी तो जावेद खानचं वकीलपत्र घेण्यास तयार होतो; मात्र आकाश त्याला या खटल्याच्या सुनावणीदरम्यान कसलीही ढवळाढवळ न करण्याची तसेच निकाल आपल्याच बाजूनं लागेल, अशी अट घालतो. ही अट सिद्धूला मान्य असते. कारण आयुष्याकडं त्यानं कधीच गांभीर्यानं पाहिलेलं नसतं. सुनावणीच्या निमित्तानं तो जावेद खानला भेटतो तेव्हा हा अधिकारी त्याच्याकडं एक शब्दही काढत नाही. दरम्यान श्रीनगरमध्ये एका वर्तमानपत्रात काम करणारी दिव्या (मीनिषा लांबा) सिद्धूला भेटते. तिनं जावेद खान प्रकरणात विशेष रस घेतलेला असतो. हे दोघं जावेदच्या आईला भेटतात. तसेच जावेदच्या हातून ठार मारला गेल्याचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीलाही भेटतात. या भेटीनंतर जावेदचा खटला गांभीर्यानं लढविण्याचा सिद्धू निर्णय घेतो. त्याचा परिणाम सिद्धू आणि आकाशच्या मैत्रीवर होतो. चित्रपटाच्या "क्‍लायमॅक्‍स'मध्ये सिद्धू ब्रिगेडियर प्रताप (के. के. मेनन) यांना साक्षीसाठी बोलावतात. या साक्षीतून या खटल्याला वळण मिळतं आणि जावेद खानची निर्दोष मुक्तता होते.
परकीयांविरुद्धची लढाई हिंदी चित्रपटाला काही नवीन नाही. त्या तुलनेत स्वकीयांविरुद्धचा लढा आणि त्याला धर्मांधतेची मिळालेली पार्श्‍वभूमी आतापर्यंत हिंदी चित्रपटात खूप कमी वेळा पाहायला मिळालीय. प्रसिद्ध दिग्दर्शक जॉन मॅथ्यू माथन यांच्या "सरफरोश' चित्रपटात हा मुद्दा त्रोटक स्वरूपात पाहायला मिळाला होता. "शौर्य'ची पटकथा जयदीप सरकार, अपर्णा मल्होत्रा आणि समर खान या तिघांनी लिहिलीय. कथानकातलं वेगळेपण पटकथेतून मांडताना या त्रिकुटाची बरीच त्रेधातिरपीट उडालीय. चित्रपटाच्या "क्‍लायमॅक्‍स'मधून बाहेर आलेलं जळजळीत सत्य हा खरं तर या चित्रपटाचा मूळ विषय असायला हवा होता, पण लेखक-दिग्दर्शकांनी या मूळ विषयाला "क्‍लायमॅक्‍स'पर्यंत झाकून ठेवलंय. त्यामुळे आकाश आणि सिद्धूमधील मैत्री आणि सिद्धू-काव्याच्या प्रेमकहाणीवर पटकथेचा बराच वेळ वाया गेलाय; मात्र शेवटची वीस मिनिटं खूप प्रभावी ठरल्यानं ही चूक माफ करायला हरकत नाही.
राहुल बोसनं सिद्धूची व्यक्तिरेखा साकारताना कमाल केलीय. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरावी. त्यामानानं जावेद जाफरीला फारसा "स्कोप' मिळालेला नाही. जावेद खानची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दीपक डोब्रियालच्या वाट्याला फारसे संवाद आलेले नाहीत, पण तो आपल्या चेहऱ्यातूनच सर्व काही सांगून गेलाय. भूमिका छोटी असो वा मोठी, के. के. मेननचा अभिनय सर्वोत्तमच असतो. "शौर्य'मध्येही त्यानं नेमकं असंच केलंय. मीनिषा लांबा, अमृता राव, सीमा विश्‍वास या तीन नायिकांची कामगिरीही चांगली आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये संगीताला फारसा वाव नसतो. तरीदेखील दिग्दर्शकानं अदनान सामीकडून दोन गाणी अट्टाहासानं घेतलीयत. म्हणूनच ती लक्षात राहत नाहीत.

No comments: