Wednesday, April 16, 2008

प्रेमाची करुण गोष्ट

प्रेमात पडणं अगदीच सोपं असतं, पण ते निभावणं म्हणजे कर्मकठीण गोष्ट. नातं प्रेमाचं असो की मैत्रीचं... प्रत्येक जण वेळ आली की इतर सर्व गोष्टींना डावलून "मी'लाच प्राधान्य देतो. अभिनेता अजय देवगणचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या "यू मी और हम'मध्ये हाच विचार थोड्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आलाय. हिंदी चित्रपट वर्षानुवर्षं प्रेमाची महती गातोय. अजयनं तरल प्रेमाला त्याग आणि उत्कटतेची जोड आपल्या चित्रपटातून दिलीय. दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात अजयनं खूप अवघड विषय हाताळलाय. सर्वसाधारण प्रेमपटांचा "फोकस' मनोरंजनाकडेच असला तरी हा चित्रपट बऱ्याच गोष्टी सांगण्यात यशस्वी झालाय. पण दुसरीकडे विषयातील क्‍लिष्टता सोपी करून सांगण्यात तो कमी पडलाय. चित्रपटाच्या हाताळणीवरून दिग्दर्शकाची कुवत लक्षात येते. पण, दिग्दर्शक अजयनं ती संधी प्रेक्षकाला घेऊ दिलेली नाही. "मैं डिरेक्‍टर बन गया हूँ' हे सांगण्याचा त्याचा अट्टाहास अनेक फ्रेम्समध्ये पाहायला मिळतो. वाढलेली लांबी, संथ घटनाक्रम आणि पाचकळ संवादांचाही या चित्रपटाला मोठा फटका बसलाय. पण, सरतेशेवटी काजोलची अभिनयातील कामगिरी या चित्रपटाला हात देऊन गेलीय.
अजय मेहरा (अजय देवगण) हा प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ. आपल्या मित्रांबरोबर तो एका क्रूझवर पिकनिकसाठी जातो. तिथं वेट्रेसचं काम करणाऱ्या काजोलच्या तो प्रेमात पडतो. तिला आपली खोटी ओळख सांगून तो तिचं मन जिंकण्यात यशस्वी होतो. पण, त्याचं खरं रूप उघड झाल्यानंतर दिया त्याच्याबरोबरचं नातं तोडते. पण, अजयपासून दूर गेल्यानंतर तिला त्याच्याबद्दल आकर्षण वाटू लागतं. हे आकर्षण पुन्हा दोघांना एकत्र आणतं आणि त्यांचा विवाह होतो. याचवेळी कथानकात खरा ट्विस्ट येतो. दियाला अल्झामायझरचा विकार जडतो. अजयला विसरण्यापर्यंतही तिची मजल जाते. या आजारामुळे अजय-दियाच्या काही महिन्यांच्या बाळापुढंही संकट उभं राहतं. त्यामुळं, दियाला खासगी रुग्णालयात दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय अजयपुढं उरत नाही. पण, तेवढ्यामुळं प्रश्‍न काही सुटत नाही. या दोघांच्यामधला प्रेमाचा धागा एवढा घट्ट असतो की, 25 वर्षांनंतरही ते एकत्र राहतात.
चित्रपटाची कथा कल्पना खुद्द अजयची आहे. त्याच्या या कल्पनेचं पटकथेत रुपांतर केलंय ते रॉबीन भट आणि आकाश खुराना या जोडीनं. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी कागदावरची कथा पडद्यावर उतरविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य अजयनं केलं होतं. दुर्दैवानं प्रत्यक्ष चित्रपटात तसं घडलेलं नाही. कागदावर ही कथा खूप प्रभावी वाटते. पण, ती पडद्यावर परावर्तित होताना त्यात बऱ्याच त्रुटी राहून गेल्यात. चित्रपटाची सुरुवात अगदीच "रुटीन' आहे. दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न असूनही अजयनं "फ्लॅशबॅक"द्वारे चित्रपटाची कथा सांगण्याची जोखीम पत्करलीय आणि ती बऱ्याचअंशी त्याच्या अंगाशीही आलीय. अजय आणि काजोलमध्ये प्रेमाचा धागा बांधण्यात बराच वेळ वाया गेलाय. चित्रपटाची गाडी रुळावर आलीय ती मध्यांतरानंतर. काजोलला अल्झामायझरचा विकार जडल्याचं निदान झाल्यानंतर या चित्रपटानं वेग घेतलाय. या विकारानं दोघांच्या मनाची झालेली घुसमट खूप छान पद्धतीनं चित्रीत करण्यात आलीय. हा आजार पराकोटीला गेल्याचं दाखविण्यासाठी या दोघांच्या मुलावर बेतलेला प्राणघातक प्रसंग चटका लावणारा आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असूनही दिग्दर्शकानं बऱ्याच ठिकाणी पाचकळ संवादांची पेरणी केलीय. ती चित्रपटाच्या "मूड'ला मोठा धक्का देऊन गेलीय. हा चित्रपट सावरलाय तो काजोलच्या कामगिरीवर. तिनं आपल्या अभिनयाद्वारे दियाची व्यक्तिरेखा परिपूर्ण वाटेल, याची पूर्ण काळजी घेतलीय. अजय देवगणनं आपल्या चौकटीत राहून तिला साथ दिलीय. सुमीत राघवनला हिंदीत प्रथमच मोठी संधी मिळाली असून तो काही दृश्‍यांमध्ये लक्षात राहतो. "दिल धकडा' हे गाणं वगळता विशाल भारद्वाजचं संगीत फार मोठी करामत करू शकलेलं नाही.

No comments: