Monday, April 21, 2008

पट्टी चुकली अन्‌ भट्टी बिघडली!




शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या सुरुवातीलाच गायक-गायिकेचा सूर लागणं फार महत्त्वाचं असतं. तो लागला नाही की, संपूर्ण मैफलच फसण्याची भीती असते. सचिन पिळगावकर दिग्दर्शित "आम्ही सातपुते'बाबत असंच काहीसं घडलंय. "सत्ते पे सत्ता'चा "रीमेक' अशी त्याची प्रदर्शनपूर्व ओळख. हा चित्रपट "सेव्हन ब्राईडस्‌ फॉर सेव्हन ब्रदर्स' या हॉलीवुडपटावरून ढापला होता. वास्तविक मूळ चित्रपट आणि त्याच्या "रीमेक'पटात चांगलीच गंमत होती. या दोन्हींचं मिश्रण करून सचिन यांना तिसरीच एक धमाल डिश सादर करणं शक्‍य होतं; पण या सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखा पहिल्यापासून सुराशी प्रामाणिक न राहता वरच्या पट्टीत बोलायला लागते. परिणामी हा सिनेमा आपली पट्टी चुकलाय आणि भट्टीही बिघडवून बसलाय. दोन-चार धमाल प्रसंग, तांत्रिक सफाई आणि एक-दोन गाणी वगळता या सिनेमातून फारसं काही हाताला लागत नाही. दिग्दर्शक सचिन यांनी गेल्या काही काळात मिळविलेल्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांची ही कामगिरी खूपच खटकणारी आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणे ही सात भावांची कथा आहे. सातपुते कुटुंबीय भाज्यांचे व्यापारी असल्यानं त्यांची नावंही कांद्या, बटाट्या, दोडक्‍या अशी मजेशीर असतात. अशोक सराफ यांनी चालविलेली खानावळ म्हणजे या चित्रपटाचा दुसरा "ट्रॅक'. सुप्रिया पिळगावकर या मानलेल्या मुलीसह त्यांना एकूण सात मुली असतात. या सात भावांबरोबर सात बहिणींची प्रेमकहाणी जुळविताना घडलेल्या गमतीजमती म्हणजे हा चित्रपट.
प्रेक्षकांच्या आवडीची नाडी सापडलेला दिग्दर्शक अशी सचिन यांची ओळख करून दिली जाते; पण या ओळखीला ते या वेळी जागलेले नाहीत. चित्रपटाची सुरुवातच खूप कंटाळवाणी आहे. सचिनशी लग्न झाल्यानंतर बिघडलेल्या सात भावांना वठणीवर आणण्याच्या दृश्‍यक्रमात खरं तर प्रचंड हशाची ताकद होती. पण प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. सुप्रिया पिळगावकरनं जादूची कांडी फिरवावी आणि हे सहा भाऊ नीट व्हावेत, हा चमत्कार चित्रपटात घडला आहे. सहा भावांसाठी सहा बहिणींना पळवून आणण्याची "आयडिया'ही चांगल्या पटकथेअभावी फसली आहे. या सहा बहिणी आपल्या घरात आल्यानंतर त्यांच्याशी सूत जमवितानाही विनोदनिर्मिती अपेक्षित होती; पण या मोक्‍याच्या क्षणीही हा चित्रपट ढेपाळलाय. सचिन आणि अशोक सराफ यांना काही काळासाठी जेलमध्ये पाठविण्याचं "लॉजिक' काही केल्या पटणारं नाही. एकंदरीत चित्रपटाचा सर्व जामानिमा ओढूनताणून या प्रकारात मोडणारा आहे.
सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, स्वप्नील जोशी या सर्व कलाकारांनी सिनेमाच्या सुरुवातीपासूनच वरची पट्टी लावली आहे. त्यामुळे कोणतीच व्यक्तिरेखा खरी वाटत नाही. विशेषतः हा दोष अशोक सराफ यांच्या व्यक्तिरेखेबाबत प्रकर्षानं जाणवतो. सचिन आणि स्वप्नील जोशी यांचा गावरान "टच' आपलासा वाटत नाही. सुप्रिया यांची भूमिका वाजवीपेक्षा "डॉमिनेटिंग' आहे. या सर्व मातब्बरांचीच अवस्था वाईट झाल्यानं नवोदितांच्या कामगिरीकडं लक्षच जात नाही. जितेंद्र कुलकर्णी यांची काही गाणी श्रवणीय आहेत. ती चांगली चित्रित झाली आहेत. सचिन यांनी या चित्रपटात प्रथमच "बॅक टू बॅक' गाणं वापरण्याची कल्पकता दाखवलीय. या दोन गाण्यांपैकी पहिलं गाणं छान जमलंय. पण दुसऱ्याचा म्हणावा तितका प्रभाव पडत नाही. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणजे तंत्रातली सफाई. सचिन-सुप्रिया जोडीचं नृत्यकौशल्य इथं चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं.

No comments: