Saturday, April 19, 2008

आणखी एक कोठारेपट


फुल थ्री धमाल

अलीकडच्या काळात चित्रपटाच्या चौकटीपेक्षा काही दिग्दर्शक मोठे झालेत. महेश कोठारे हे त्यापैकीच एक. चित्रपटाचा विषय काहीही असो, त्याचं रूपांतर कोठारेपटातच झालं पाहिजे, अशी पक्की "लाईन' त्यांनी ठरवून घेतलीय. "फुल थ्री धमाल' हा त्यांचा नवीन चित्रपट याच वाटेनं गेलाय. कोठारेंच्या चित्रपटात यापूर्वी पाहायला मिळालेला "डॅम इट' या संवादासह इतर सर्व मालमसाला या चित्रपटात अगदी ठासून भरलाय. मुख्य म्हणजे यावेळी ते सूत्रधार म्हणूनही या चित्रपटात वावरले आहेत. "फुल थ्री धमाल' असं या सिनेमाचं शीर्षक असलं तरी प्रत्यक्षात अर्ध्या कच्च्या मनोरंजनापर्यंतच त्याची मजल गेलीय. त्यातले काही प्रसंग छान जमलेत. पण त्यात सलगता नसल्यामुळं तसंच शेवट ढेपाळल्यामुळं हा चित्रपट हास्याचं कारंजं फुलवू शकला नाही.
तीन लग्न झालेल्या मैत्रिणींची ही कथा आहे. आयुष्यात आपण काहीच धमाल केली नाही, असं त्यांचं एकमत होतं. मग काय, "थर्टी फर्स्ट'ची रात्र बाहेरगावी जाऊन साजरी करण्याचा त्यांचा "प्लॅन' असतो. आपल्या नवरे मंडळींना अंधारात ठेवून त्यांनी हा "प्लॅन' आखला असतो. पण हा "प्लॅन' फसतो आणि या तीन बायका आणि त्यांचे नवरे एकाच हॉटेलमध्ये गोळा होतात. याच हॉटेलमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला खलनायक प्रवेश करतो आणि एका धमालनाट्याला सुरुवात होते.
दिग्दर्शकानं स्वतः पडद्यावर येऊन घटनाक्रम उलगडून दाखविण्याची कल्पना चांगली आहे. तीन मैत्रिणींचा "थर्टी फर्स्ट'ला धमाल करण्याचा "प्लॅन' आणि त्या घरात नसताना त्यांच्या नवऱ्यांनी आखलेल्या दुसऱ्या "प्लॅन'चे प्रसंग चांगले जमलेत. आपल्या जागी दुसऱ्याच बायकांना देवदर्शनाला पाठविण्याची कल्पना मस्त आहे. हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर या तिघी मैत्रिणींनी केलेली धमाल पाहणाऱ्याची करमणूक करते. इथंपर्यंत अगदी वेगानं धावणाऱ्या या चित्रपटानं नंतर खाडकन्‌ स्वतःला "ब्रेक' लावलाय. इथून पुढं लेखक-दिग्दर्शकाची गती आणि मतीही खुंटलीय. त्यामुळेच हा चित्रपट तुकड्यातुकड्यांमध्ये बरा वाटतो. पण नेमकं शेवटाचं चढण चढतानाच लेखक अभिराम भडकमकर आणि दिग्दर्शक महेश कोठारेंची दमछाक झालीय. दिलीप प्रभावळकरांच्या रूपातला एक सर्वसाधारण खलनायक पाहायला मिळतो. चित्रपटाचा शेवटचा हा अर्धा तास अगदीच ढिसाळ आहे. कोठारेंनी त्यावर अधिक मेहनत घेतली असती तर हा चित्रपट आणखी मनोरंजक बनला असता. मकरंद अनासपुरेनं स्वतःला ग्रामीण बाजाच्या व्यक्तिरेखांमध्ये चांगलंच बांधून ठेवलंय. पण जोपर्यंत तो अशा व्यक्तिरेखांमध्ये धमाल करतोय, तोपर्यंत त्याची ही "इमेज' आपण "एन्जॉय' करायला काही हरकत नाही. प्रिया बेर्डेनंही त्याला चांगली साथ दिलीय. या दोघांच्या तुलनेत प्रसाद ओक, सुचित्रा बांदेकर, दिलीप प्रभावळकर, सुनील तावडे हे बाकीचे कलाकार आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. लिखाणाच्या बाबतीत अगदीच कच्ची असलेली व्यक्तिरेखा प्रभावळकरांनी स्वीकारणं आश्‍चर्यकारक आहे. श्रीरंग गोडबोले-अशोक पत्की या जोडीची कामगिरी कामचलाऊ आहे. या चित्रपटातील आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे विविध वस्तूंच्या जाहिराती. अशा प्रकारचं "ब्रॅण्डिंग' करताना अधिक कल्पकतेची गरज आहे.

No comments: