Thursday, April 10, 2008

कागदावरचा चित्रपट पडद्यावर उतरवायचाय...


अजय देवगण मुलाखत

"स्टार' कलाकारांनी दिग्दर्शक बनण्याचा "ट्रेण्ड' सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतोय. अभिनेता आमीर खानपाठोपाठ आता अजय देवगणही "यू मी और हम'द्वारे दिग्दर्शक बनलाय. त्यानिमित्तानं त्याच्याशी मारलेल्या गप्पा.
---------------
ः अभिनयात तब्बल 17 वर्षं घालविल्यानंतर एकदम अचानक दिग्दर्शक बनण्याचा निर्णय का घेतलास ?
ः "चलो अभी मैं एक फिल्म डिरेक्‍ट करता हूँ' असा टिपीकल डायलॉग टाकण्यासाठी मी हा चित्रपट बनवलेला नाही. माझ्या मते कोणताही चित्रपट बनण्यासाठी एका चांगल्या कल्पनेची गरज असते. ही कल्पना मी तीन वर्षांपूर्वी सुचली. तिच्यावर मग मी थोडं काम केलं आणि माझ्या लक्षात आलं की आता आपण त्यावर चित्रपट करू शकतो. त्यामुळं मी अगदी ठरवून दिग्दर्शक बनलेलो नाही.
ः पण, अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत करियर करण्यापूर्वी तुला दिग्दर्शकच व्हायचं होतं ना ?
ः हो, निश्‍चितच. दिग्दर्शनाकडंच माझा अधिक कल होता. अभिनयाची सुरुवात होण्यापूर्वी मी काही व्हिडीओपटही केले होते. माझे वडिल आणि प्रसिद्ध ऍक्‍शन दिग्दर्शक वीरू देवगण यांच्याबरोबर मी अनेक चित्रपटांच्या शूटिंगला जायचो. मला अजूनही आठवतंय अवघ्या अकरा-बाराव्या वर्षी मी संकलन करायला शिकलो होतो. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या हाताखाली काही काळ दिग्दर्शनाचेही धडे मी गिरवले होते. पण, त्यानंतरही मी अभिनेता व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. तेव्हा त्या दृष्टीनं प्रयत्न केला आणि थोडा फार यशस्वीही झालो.
ः "रफटफ ऍक्‍टर' अशी तुझी इमेज आहे. तरीदेखील दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करताना प्रेमाचा विषय तू का निवडलास ?
ः खरं तर मी गेल्या पंधरा वर्षांमध्ये एवढे वेगवेगळे "रोल्स' केले आहेत की, माझ्यावर "रफटफ इमेज'चा शिक्का मारणं योग्य नाही. पण, ते वास्तव आहे, हेसुद्धा मी नाकारीत नाही. दिग्दर्शक बनताना आपण "लव्हस्टोरी'च बनवायची असं मी ठरवलं नव्हतं. तो विषय मनात आला आणि मी दिग्दर्शक बनलो, एवढंच त्यामागचं सत्य आहे.
ः आजवर अनेक प्रेमकहाण्या प्रेक्षकांपर्यंत आल्यात. "यू मी और हम'मधली प्रेमकहाणी तू कशापद्धतीनं सांगितली आहेस ?
ः प्रेमाबाबत आपल्याकडे अनेक समज-गैरसमज आहे. आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो आणि समोरचीही व्यक्ती आपल्यासोबत नातं जोडते. मात्र कालांतरानं आपण आपल्या जोडीदाराला आपल्या पद्धतीनं बनविण्याचा प्रयत्न सुरू करतो. तेव्हा माझा प्रश्‍न असा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या आवडीनिवडीच तुम्हांला सुरुवातीलाच आवडत नव्हत्या तर तुम्ही तिच्याशी नातं का जोडलंत ? हा विचार मी या चित्रपटातून हलक्‍याफुलक्‍या, मनोरंजक पद्धतीतून मांडलाय.
ः काजोलची निवड कशी केलीस ?
ः तिनं मला तिची निवड करण्याची संधीच दिली नाही.
ः म्हणजे ?
ः मी तिला या चित्रपटाची "कॉन्सेप्ट' ऐकविली. तेव्हा तिनं मला हा चित्रपट करायचा असल्याचं सांगितलं. त्यामुळं, हा सिनेमा "प्लॅन' करायच्या आधीच ती माझ्या चित्रपटाची नायिका बनली होती.
ः आतापर्यंत तुम्ही दोघांनी एकूण सहा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. तिच्या अभिनयाबाबत तू काय सांगशील ?ः काजोल ही पहिल्यापासूनच "ग्रेट ऍक्‍ट्रेस' आहे. पण, अनुभवानं ती अधिक प्रगल्भ झालीय. सिनेमा माध्यमाची तिला आता आणखी चांगली जाण आलीय.
ः काजोलचंही तुझ्याबद्दलचं मत फारसं वेगळं नाहीय. "यू मी और हम' प्रदर्शित होण्यापूर्वीच तिनं तुझी गणना श्रेष्ठ दिग्दर्शकांमध्ये केलीय. याबद्दल तुला काय म्हणायचंय ?
ः हे खरंय की आम्हा दोघांना आमचं परस्परांचं काम खूपच चांगलं वाटतंय. पण, असं व्हायला नको की आमच्यातल्या नात्यामुळं उगाचच आम्ही एकमेकांचं स्तुती करावी. येत्या शुक्रवारपर्यंत थांबा. काय ते कळेलच.
ः तू आतापर्यंत अनेक चांगल्या दिग्दर्शकांबरोबर काम केलंस. दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना तुझ्यावर कोणाचा प्रभाव होता ?
ः विजय आनंद यांना मी आदर्श मानतो. पण, दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताना मी कोणालाही नजरेसमोर ठेवलं नाही. कारण, प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची एक स्टाईल असते. कथा सांगण्याची एक विशिष्ट पद्धत असते. माझ्या मते, चित्रपट हे फक्त "स्टोरी टेलिंग'चं माध्यम आहे. तुम्ही एखादं कथानक पडद्यावर किती आत्मियतेनं सांगता, यावर सर्व काही अवलंबून असतं. मला पटकथा लेखकानं जे कागदावर लिहिलंय ते पडद्यावर मांडायचं होतं. ही खूप कठीण गोष्ट असते. कारण, जगात एकही दिग्दर्शक असा नाही की जो कागदावर लिहिलेली कथा जशीच्या तशी पडद्यावर सांगू शकलाय. कागदावरचा चित्रपट पडद्यावर उतरताना काही टक्‍क्‍यांमध्ये कथानकाचं "रिसोल्युशन' कमी होतं. त्याची टक्केवारी फार घसरू न देण्याचं कसब एखाद्याला साधलं तर तो चांगला दिग्दर्शक म्हणून गणला जातो. मला हीच गोष्ट साध्य करायचीय.
ः "हल्लाबोल' का अपयशी ठरला असं तुला वाटतं ?
ः या चित्रपटाचा विषय खूप जुना झाला होता. एक तर या सिनेमाच्या चित्रीकरणास तब्बल चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. ज्यावेळी मी "ओंकारा' सुरू केला तेव्हा "हल्लाबोल'चं शूटिंग संपलं होतं. यावरून हा चित्रपट किती रेंगाळला होता, याची कल्पना येते. त्याशिवाय हल्लीचा प्रेक्षकवर्ग खूप जागरूक झालाय. तो "आऊटडेटेड' चित्रपट स्वीकारीत नाही.
ः गेल्या सतरा वर्षांमध्ये एक कलाकार म्हणून तुझी किती प्रगती झालीय ?
ः अनुभव ही अशी गोष्ट आहे की सर्वच माध्यमांमध्ये ती उपयोगाला येते. माझ्या करियरला सुरुवात झाली तेव्हा मी छायाचित्रकाराच्या खुर्चीवर बसून अप्रतिम दृश्‍यं टिपायचो. त्यावेळी तिथं हजर असणाऱ्यांना याबाबत आश्‍चर्य वाटायचं. त्यावेळी फक्त उत्कृष्ट "शॉट' घेण्याकडं माझा कल असायचा. पण, आता दिग्दर्शक बनल्यानंतर कथानक चांगलं वाटण्यासाठी उत्कृष्ट "शॉट' कोणता असेल यावर मी विचार करू लागलोय. माझ्या मते ही एका कलाकारामधली प्रगती आहे.
ः भविष्यात अभिनयावर अधिक लक्ष केंद्रीत करणार की दिग्दर्शनावर ?
ः या प्रश्‍नाचं उत्तर देणं कठीण आहे. कारण, एखादी खूप चांगला कल्पना मला स्वतःला सुचली तरच मी पुढचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. ही कल्पना मला अगदी उद्याही सुचू शकते किंवा पुढील तीन वर्षंही सुचणार नाही. मात्र, दरम्यानच्या काळात माझा अभिनय सुरूच राहील. सध्या मी तीन-चार चित्रपटांमध्ये काम करतोय. राजकुमार संतोषींच्या "लंडन ड्रीम्स'च्या चित्रीकरणास जूनमध्ये सुरुवात होईल.

No comments: