Saturday, March 2, 2013
सुन्न करणारं मृत्यूकांड....
१९९५ ते २०१० अशी तब्बल १५ वर्ष मराठी, हिंदी तसेच अधूनमधून इंग्रजी तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांवर ‘नॉनस्टॉप’ भाष्य केलं. शेवटचं चित्रपट परीक्षण मी साधारण अडीच वर्षांपूर्वी लिहिलं होतं. ‘तारांगण’ मासिकाच्या उभारणीसाठी काही काळ मी चित्रपट परीक्षण लिखाणातून ‘ब्रेक’ घेतला होता. रामगोपाल वर्मांचा ‘द ऍटॅक्स ऑफ २६/११’ हा चित्रपट पाहिला आणि पुन्हा एकदा लिहावंसं वाटलं.
---------
‘द ऍटॅक्स ऑफ’ २६/११’ हा चित्रपट पाहताना माझ्या मनात दोन गोष्टींची धाकधूक होती. एक तर या विषयासंबंधीचा तपशील सर्वांनाच ठाऊक आहे आणि प्रेक्षकांनी तो अनेक वेळा टीव्हीवरही पाहिलाय. त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये चित्रपटामध्ये नेमकं काय आणि कसं मांडलं जातं याचा अंदाज बांधणं कठीण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे दिग्दर्शक रामगोपाल वर्मांवरील माझा विश्वास उडत चालला होता. ‘मोस्ट अनप्रेडिक्टेबल’ दिग्दर्शक म्हणून मी त्यांचं नाव घेईन. अलीकडच्या काळात हा दिग्दर्शक विश्वासार्हतेपासून स्वतःला लांब नेत चालला होता. अर्थात वर्मांच्या गुणवत्तेबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. एवढा मोठा आवाका असलेला विषय प्रभावीपणे मांडण्याची वर्मांची इच्छाशक्ती नेमकी आहे का, एवढीच शंका माझ्या मनात होती. ‘द ऍटॅक्स...’ पाहिला आणि वर्मांबद्दलच्या सर्व शंकांना पूर्णविराम मिळाला. ‘द ऍटॅक्स’मधील सर्व घटनाक्रम आपल्या अंगावर येतो, आपल्याला हादरवून टाकतो, क्रौर्यानं गाठलेली परिसीमा पाहून आपण उद्ध्वस्त होतो. थँक्स टू रामू... रामगोपाल वर्मांचे असे आभार मानण्याची संधी १५ वर्षांपूर्वी ‘सत्या’च्या निमित्तानं मिळाली होती. अर्थात या चित्रपटातील काही गोष्टी खटकतात. काही गोष्टींची अपूर्णता अस्वस्थ करते. काही घटनांच्या अभ्यासात वर्मांनी ढिलाई दाखविलीय. तरीदेखील रामगोपाल वर्मांमधल्या दिग्दर्शकाला फॉर्म गवसलाय हेदेखील काही कमी नाही.
२६ नोव्हेंबर २००८ला मुंबईत दहशतवादानं जे थैमान घातलं त्या रात्री चार तासांमध्ये नेमकं काय घडलं, याचं थरारक चित्रीकरण या चित्रपटातून पाहायला मिळतं. हा नेहमीच्या पद्धतीचा चित्रपट नाही. दिग्दर्शक वर्मांनी ‘डॉक्युड्रामा’ पद्धतीनं चित्रपटातील आशय मांडलाय. चित्रपटाच्या सुरुवातीलाच या हल्ल्याची पार्श्वभूमी आणि त्यामागची कारणमीमांसा आपल्याला पाहायला मिळते. हा हल्ला अनेक तास चालला. त्यमुुळे त्याचे जसेच्या तसे चित्रीकरण दाखविण्याऐवजी वर्मांनी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतलीय. या हल्ल्याचा तपास करणारे पोलिस अधिकारी राकेश मारिया यांच्या नजरेतून त्या दिवशी रात्री नेमकं काय आणि कसं घडलं, याची निरीक्षणवजा कहाणी त्यांनी सांगितलीय. ‘स्टोरी टेलिंग’चा हा फॉर्म चांगलाच जमलाय. दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबई समुद्रकिनार्यावरील बोटीचा घेतलेला ताबा, लिओपोल्ड कॅफेवरील हल्ला, मुबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील हत्याकांड, कामा रुग्णालयातील थरार, अजमल कसाबचा पोलिसांनी घेतलेला ताबा, त्याच्या मनातील व्यक्त होणारी खदखद, त्याच्या बाष्कळ बडबडीला पोलिस यंत्रणेकडून मिळालेलं उत्तर आणि शेवटी त्याचं फासावर लटकणं या चित्रपटात पाहायला मिळतं.
प्र्रेक्षकांना माहित असलेला घटनाक्रम आणि त्याबरोबरच माहित नसलेला घटनाक्रम याचा अभ्यास करून दिग्दर्शक वर्मांनी ‘बीटवीन द लाईन्स’ भरल्यात. म्हणून माहित नसलेल्या गोष्टींवर अधिक भर दिलाय. त्यामुळेच अतिरेक्यांनी समुद्रमार्गे येऊन भारतीय बोटीचा ताबा घेताना नेमकं काय केलं, हे या चित्रपटात सविस्तर पाहायला मिळतं. वर्मांच्या चित्रपटामधील कॅमेरा थोडा अधिकच हालचाल करतो अशी अनेकांची ओरड असते. परंतु, या चित्रपटात वर्मांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलंय. किंबहुना कॅमेर्याच्या काही जागा पाहणार्याची दाद घेतात. उदा. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यातील दोन बोटी एकमेकींच्या जवळ येताना त्यांचं टायर एकमेंकांवर घासलं जाणं. लिओपोल्ड कॅफे, ताजमहाल हॉटेल आणि मुबई सीएसटीवरचं दहशतवादाचं थैमान अंगावर येतं. परंतु, काही ठिकाणी त्याचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो. त्यामुळेच कदाचित या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळालेलं असावं. चित्रपटाची लांबी दोन तासांपुरती मर्यादित ठेवण्याच्या खटाटोपात वर्मांचं बर्याच गोष्टींकडे दुर्लक्षही झालं आहे. चित्रपटाचा संपूर्ण फोकस अजमल कसाबभोवती असून इतर आठ दहशतवाद्यांबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मुख्य म्हणजे कसाबव्यतिरिक्त अतिरेक्यांचा खातमा करण्यात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीवरही हा चित्रपट भाष्य करीत नाही. प्रेक्षकांच्या दृष्टीनं हा भाग नवीन होता. संशोधनावर अधिक भर दिला असता तर हा दृश्यभागही दाखविण्यात काहीच अडचण आली नसती. वर्मांनी या गोष्टींवरही लक्ष केंद्रीत केलं असतं तर चित्रपटाचा परिणाम आणखी वाढला असता. कदाचित वर्मांना चित्रपट लवकर प्रदर्शित करण्याची घाई झाली असावी. असो.
‘द ऍटॅक्स’ लक्षणीय ठरलाय तो नाना पाटेकरांमुळे. राकेश मारियांची व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी कमालीचं बेअरिंग दाखवलंय. या दुर्घटनेचे पदर उलगडताना आपल्या मनातील घालमेल त्यांनी विलक्षणरीत्या सादर केलीय आणि चित्रपटाच्या शेवटी शवागारातील त्यांचे अजमल कसाबबरोबरचे प्रसंग उत्कृष्ट आहेत. चित्रपटामधील इतर कलाकारांचीही कामं चांगली आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत, कॅमेरा, ऍक्शन उत्कृष्ट. कलादिग्दर्शकाचंही कौतुक करायला हवं. एकुणात काही त्रुटी असूनही ‘द ऍटॅक्स..’ एकदा तरी पाहण्यासारखा आहे.
- मंदार जोशी
दर्जा - ***
Saturday, August 11, 2012
एक चावट काळ...
-------------
एक चावट काळ...
----------
इंट्रो...
चित्रपट आणि टीव्ही या माध्यमांमध्ये सध्या लैंगिक विषयांचीच चलती आहे. मराठी रंगभूमीवरही आता असे विषय येऊ लागले आहेत. प्रेक्षकांच्या भावनांना हात घालण्याऐवजी भावना चाळविणार्या विषयांनाच प्राधान्य दिलं जात आहे. आयटेम सॉंग, चावट विनोद आणि लैंगिक दृश्यांनी चित्रपटांमध्ये उच्छाद मांडला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कलाकृतींना व्यावसायिक यशदेखील मिळत आहे. त्यामुळे आपल्याकडचा सरसकट प्रेक्षकवर्ग आंबटशौकीन होऊ लागलाय की निर्माते-दिग्दर्शक मंडळीच त्यांना वाममार्गाला नेण्यास भाग पाडत आहे, याचं कोडं अनेकांना पडलं आहे.
----------
नेहा धुपिया नावाच्या एका अभिनेत्रीला मानायला हवं. अभिनयात तीर मारायला तिला कधी जमलं नाही. परंतु, तिनं काही वर्षांपूर्वी केलेलं एक वक्तव्य आता तंतोतंत खरं ठरत आहे. ‘बॉलीवूडमध्ये फक्त सेक्स आणि सलमान-शाहरुख खानच विकले जातात...’ असा बॉम्ब तिनं टाकला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यांना मिळालेलं यश पाहता नेहाच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं जाणवतं. ‘जिस्म २’, ‘क्या सुपर कुल है हम’ या दोन ताज्या चित्रपटांनी सध्या सगळीकडे हैदोस मांडलाय. आतापर्यंत चित्रपट हा सिनेमास्कोप तसेच ७० एम.एम.चा असतो, हे सर्वांना ठाऊक होतं. परंतु, ‘जिस्म-२’ची ठिकठिकाणी झळकलेली सनी लिओनची अर्धनग्न सिनेमास्कोप पोस्टर्स पाहून हा ‘स्कोप’ भलताच आहे, हे प्रेक्षकांनाही जाणवलंय. फक्त प्रसिद्धी आणि प्रेक्षकांमध्ये असलेली चर्चा या दोन मुद्यांना धरूनच क्रमवारी लावायची ठरवली तर सनी लिओनीनं दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा यासारख्या अभिनेत्रींनाही मागं टाकलं आहे. दिग्दर्शक महेश भट या सनीला एका ‘रिऍलिटी शो’मधून हिरोईन म्हणून ब्रेक देतात काय आणि ही सनी प्रेक्षकांना वेड लावते काय, सगळाच अजब प्रकार आहे. या चित्रपटानं पहिल्याच आठवड्यात तीस कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाच्या डिजिटल हक्कविक्रीच्या वेळी ‘जिस्म’ या शब्दावरच ‘ऍपल’ कंपनीनं आक्षेप नोंदवला होता. परंतु, या चित्रपटाची निर्माती पूजा भटनं ‘जिस्म’ म्हणजे शरीर आणि त्यात आक्षेपार्ह असं काहीच नाही, अशी आपली बाजू मांडली होती. मात्र त्यामुळे ‘ऍपल’च्या मंडळींचं काही समाधान झालं नाही आणि ‘गुगल’, ‘यू ट्यूब’ या ‘ऍपल’च्या स्पर्धक कंपन्यांनी मग ‘जिस्म’वर आपला ताबा घेतला.
इथं विशेष उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे पूजा भटची निर्मिती असलेल्या ‘जिस्म’नं २००३ मध्ये तब्बल १४ कोटींचा व्यवसाय केला होता आणि या चित्रपटाचा पुढील भागही आता चांगला व्यवसाय करतो आहे. एकीकडे ‘जिस्म २’ चांगला व्यवसाय करीत असताना ‘क्या सुपर कूल है हम’ हा चित्रपटदेखील फारसा मागं नाही. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये या चित्रपटानं ४४ कोटींचा व्यवसाय केलाय. ‘हाऊसफुल-२’ने या वर्षी शंभर कोटींचा टप्पा पार केलाय. ‘जिस्म २’मध्ये अश्लील दृश्यांची रेलचेल आहे तर ‘क्या सुपर कूल...’मध्ये चावट विनोदांचा भडीमार आहे. ‘सेक्स’ आणि चावट विनोद हा हिंदी चित्रपटांच्या यशाचा नवीन फॉर्म्युला बनलाय. एवढंच नव्हे तर गेल्या एक-दोन वर्षांमध्ये यशस्वी चित्रपटांच्या नावावर नजर टाकली तरी ‘सेक्स कॉमेडी’ हा हिंदी चित्रपटांचा ‘जॉनर’ बनल्याचं जाणवतं. ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल-२’, ‘विकी डोनर’, ‘दोस्ताना’, ‘दिल्ली बेली’ हे सर्व चित्रपट या ‘जॉनर’शी नातं सांगणारे आहेत. इम्रान हाश्मी तर ‘सेक्सी’ चित्रपटांचा बादशहाच बनलाय. ‘किसींग किंग’ असा बहुमान आता त्याला देण्यात आलाय. इम्रानची प्रमुख भूमिका असलेला ‘शांघाय’ चित्रपट त्याच्या ‘किसींग’ इमेजशी मिळताजुळता नसल्यामुळेच पडला असं म्हणतात. स्वच्छ, प्रसंगनिष्ठ विनोद आता इतिहासजमा झालाय. या विनोदाला लावलेला तडका म्हणजेच ‘सेक्स कॉमेडी’ हा प्रकार आहे.
पूर्वीच्या काळात शक्ती कपूर, कादर खान, जॉनी लिव्हर यासारखी मंडळी अगदी थोड्या प्रमाणात विनोदासाठी चित्रपटात असायची. या चित्रपटांमधील नायिकांच्या अंगप्रदर्शनालाही मर्यादा होती. मात्र खलनायकानं नायिकेवर केलेल्या अतिप्रसंगाची दृश्ये मात्र तेव्हा भरपूर पाहायला मिळत. खलनायकीकडून कॉमेडीकडे वळलेल्या शक्ती कपूरनं १९८०च्या दशकात भरपूर आचरटपणा आणि चावटपणा करण्यास सुरुवात केली. त्याला खतपाणी घातलं ते गोविंदानं. उडत्या चालीची गाणी आणि द्वैअर्थी संवादांचं बेसुमार पीक आलं. आता तर अजय देवगण, अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, तुषार कपूर, रितेश देशमुख यासारख्या ‘ए ग्रेड’ कलाकारांना चावट विनोदनिर्मितीमध्ये डांबण्यात आलं आहे. ‘आयटेम सॉंग’शिवाय हल्लीचा चित्रपट पूर्णच होत नाही, अशी परिस्थिती आलीय. करिना कपूर, दीपिका पदुकोणसारख्या नायिकांनाही अशी गाणी करावी लागताहेत. त्यात काही गैर वाटणं तर सोडाच, उलट फक्त ‘आयटेम सॉंग’साठी आपल्याला बोलावणं आलं तर या अभिनेत्री स्वतःला धन्य समजत आहेत.
‘सेक्स’ आणि चावट विनोदांमध्ये फक्त चित्रपट माध्यमच आघाडीवर नाही. टीव्ही माध्यमात तर दररोज हा प्रकार पाहायला मिळतोय. ‘बडे अच्छे लगते है’मधील राम कपूर आणि साक्षी तन्वर यांच्यातील तो ‘सुपरहिट’ प्रेमप्रसंगाचा ‘एपिसोड’ तर आता ‘माईलस्टोन’ ठरलाय. या भागानं टीव्हीवरील सगळी गणितंच बदलली आहेत. ‘सुपरहिट’ या शब्दाचा उपयोग करण्यामागचं कारण म्हणजे ‘बडे अच्छे लगते है’मधील ‘तो’ भाग ‘यू ट्यूब’वर अपलोड करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये या भागाला तब्बल २२ लाख प्रेक्षकांच्या हिट्स मिळाल्या आहेत. तसेच या भागाचे तुकडे करून टाकलेल्या ‘क्लिप्स’ आणि त्यांना मिळालेल्या ‘हिट्स’ची बेरीज केल्यास ही संख्या आणखी मोठी होते. ‘बडे अच्छे..’चा हा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर मोठं वादळ उठलं होतं. कारण चित्रपटामधील प्रेमप्रसंग किंवा गाणी ही फार तर दोन-चार मिनिटांची. पण ‘बडे अच्छे...’चा हा भाग अर्ध्या तासाच्या प्रणयदृश्यांनी व्यापला होता. या वादळानंतर निर्माती एकता कपूरनं प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं होतं, ‘मला असं वाटतं की हा भाग लोकांना आवडलाय. ज्यांना आवडला नाही त्यांची मी माफी मागते.’ अशा एका वाक्यात तिनं हा विषय संपवून टाकला होता. ‘बडे अच्छे...’चं हे वादळ अपेक्षेप्रमाणे केव्हाच संपुष्टात आलंय आणि त्यानंतर या भागापेक्षा बर्याच ‘अच्छे अच्छे’ गोष्टी टीव्हीवर दाखविल्या जात आहेत.
चावट विनोद आणि ‘सेक्स’ला प्राधान्य देणार्या कलाकृतींना यश मिळाल्यामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याकडचा सर्वच प्रेक्षक आंबटशौकीन झालाय का ? खुद्द बॉलीवूडमधील ‘मेकर्स’ मंडळींना आपला प्रेक्षकवर्ग आंबटशौकीन नसून सुजाण झाल्याचं वाटतंय. फेसबुक, ट्विटर, मेल, एसएमएस आदी माध्यमांमधून आपला प्रेक्षकवर्ग ज्या पद्धतीनं स्वतःला व्यक्त करतोय ते पाहिल्यानंतर तो बंधनमुक्त झालाय असंही या मंडळींना वाटतंय. हे काही प्रमाणात खरंही आहे. मात्र बॉलीवूड चित्रपट लाटांसाठी प्रसिद्ध आहेत हेदेखील विसरता येणार नाही. चावट विनोद आणि ‘सेक्स’ हीदेखील एक लाट असू शकते. ती विरली की पुन्हा एखादा नवीन ‘जॉनर’सुद्धा जन्म घेईल. पण आत्ताचा काळ मात्र चावट आहे हे मात्र खरंय. फक्त त्याचा आपण भाग व्हायचं की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं.
- मंदार जोशी
-----------
Sunday, July 29, 2012
पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू...
--------
पहिल्या मल्टिप्लेक्सचा मृत्यू...
-------
संत रामदासांच्या ‘दासबोधा’त एक सुंदर श्लोक आहे...
...मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे...
या श्लोकाची आता आठवण होण्यामागचं कारण म्हणजे मुंबईतल्या पहिल्या मल्टिप्लेक्सनं गेल्या आठवड्यात मान टाकली. अंधेरी भागामधील ‘सिटी मॉल’मधल्या फेम-ऍडलॅब्स मल्टिप्लेक्सची सेवा आता खंडित झाली आहे. या मल्टिप्लेक्सच्या चालकांनी काही महिन्यांनी पुन्हा आपण सेवेत रुजू होऊ, असा आशावाद व्यक्त केलाय. परंतु, चित्रपटसृष्टीतील सूत्रांच्या माहितीनुसार हे मल्टिप्लेक्स आता इतिहासजमा झालं आहे. एक काळ असा होता की देशभरातील ‘सिंगल स्क्रीन थिएटर्स’ एकापाठोपाठ एक काळाच्या पडद्याआड जात होती आणि त्यांच्या जागी आलिशान मल्टिप्लेक्स उदयाला येत होती. ‘सिंगल स्क्रीन’चा र्हास काही पाहवत नव्हता. मल्टिप्लेक्सचं चकचकीत वातावरण, त्यातल्या आरामदायी खुर्च्या, वातानुकूलित सेवा, स्वच्छ खाद्यपदार्थ... ही सेवा पाहून मल्टिप्लेक्स इथं दीर्घ काळ राज्य करतील असं वाटलं होतं. परंतु तसं घडलं नाही. ‘सिंगल स्क्रीन’ना श्रद्धांजली वाहणार्यांना एवढ्या लवकर मल्टिप्लेक्सलाही श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं.
‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू काही साधासुधा नाही. त्याला अनेक पदर आहेत. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली. ‘फेम’चे श्रॉफ बंधू आणि ‘ऍडलॅब्स’च्या मनमोहन शेट्टींनी एकत्र येऊन मल्टिप्लेक्सच्या क्रांतीला सुरुवात केली. मॉलमध्ये मल्टिप्लेक्स ही कल्पना तेव्हापासून यशस्वीपणे राबविली गेली. या मल्टिप्लेक्सच्या उदयानंतर काही काळात देशभरात मल्टिप्लेक्सचं पेव फुटलं. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. विपुल शहा दिग्दर्शित ‘आँखे’ चित्रपटापासून हे मल्टिप्लेक्स कार्यरत झालं होतं. या मल्टिप्लेक्सचा तेव्हाचा थाट पाहून अनेक जण चक्रावले होते. आपण विदेशात तर नाही ना, अशीही शंका अनेकांना आली होती. कारण तत्पूर्वी अशापद्धतीचा थाटमाट ‘सिंगल स्क्रीन’मध्ये पाहायला मिळाला नव्हता. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तब्बू यांच्या उपस्थितीत या मल्टिप्लेक्सचा शुभारंभ झाला होता. यावेळी श्री. बच्चन यांनी आपल्या भाषणामध्ये ‘फेम’चा गौरव केला होता. परंतु, अवघ्या दशकभरात या मल्टिप्लेक्सच्या वाट्याला मरण आलं. त्यामागच्या काही घडामोडींवर नजर टाकल्यास बर्याच गोष्टी त्यास कारणीभूत असल्याचं स्पष्ट होतं.
जानेवारी २०१२ मध्ये ‘फेम इंडिया’चं ‘आयनॉक्स लिजर लि.’मध्ये विलीनीकरण झालं. तेव्हापासून ‘आयनॉक्स’ आणि ‘फेम’च्या मालकांमध्ये खटके उडायला लागले. ‘आयनॉक्स’नं ‘लिव्ह अँड लायसन्स’चं नूतनीकरण न करण्यामागे आपल्याला भाडे परवडत नसल्याचं कारण पुढं केलंय. गेल्या काही वर्षांपासून या मल्टिप्लेक्सचा कारभार रडतखडतच चालला होता. २००२ मध्ये या मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली तेव्हा अंधेरीच्या पश्चिम भागामध्ये एकही चित्रपटगृह नव्हतं. त्यामुळे या मल्टिप्लेक्सवर सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. मात्र नंतर या भागात ‘सिनेमॅक्स’ आणि ‘फन रिपब्लिक’ ही आणखी दोन आलिशान मल्टिप्लेक्सेस सुरू झाली. अवघ्या शंभर मीटरच्या अंतरात सुमारे १५ ‘स्क्रीन्स’ सुरू झाले. एवढ्या ‘स्क्रीन्स’ना सामावण्याइतकी लोकसंख्या अंधेरी भागात नाही. त्यामुळे आसनखुर्च्या अधिक आणि प्रेक्षकांची वानवा हा मोठा प्रश्न उभा राहिला. ‘फेम’चं काळाबरोबर न राहणंही त्यांना महागात पडलं. सुरुवातीच्या एक-दोन वर्षांमध्ये अनेक बिगबजेट चित्रपटांचे ‘प्रीमियर शोज’ फेम-ऍडलॅब्जझाले झाले. परंतु, ‘सिनेमॅक्स’च्या आगमनानंतर सगळा लाईमलाईट त्यांच्यावर स्थिरावला. प्रीमियर शोज, पार्ट्या, सीडी प्रकाशन सोहळे यांचा ‘फेम’मधील ओघ आटला आणि सगळं ग्लॅमर ‘सिनेमॅक्स’वर स्थिरावलं. अलीकडच्या काळात एकही मोठा इव्हेंट ‘फेम-ऍडलॅब्स’मध्ये झाला नाही. त्याचा विपरीत परिणाम या मल्टिप्लेक्समधील तिकीटविक्रीवर झाला.
‘फेम-ऍडलॅब्स’ची जी वाताहत झाली, तशी वाताहत देशभरातील आणखी अनेक मल्टिप्लेक्सची नजिकच्या काळात होणार आहे. अनेक शहरांमध्ये गरज नसतानाही भरपूर ‘स्क्रीन्स’ची मल्टिप्लेक्सेस उभारली गेली आहेत. प्रेक्षकांअभावी चित्रपटांचे ‘शोज’ रद्द करण्याचे प्रकारही वरचेवर वाढताहेत. मल्टिप्लेकमधील तिकीट दर आणि खाद्यपदार्थांचे दर हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवाक्यातले नाहीत. सर्वसाधारणपणे सिनेमाचा मुख्य प्रेक्षकवर्ग हा मध्यमवर्गीय असतो. चार जणांच्या एका कुटुंबानं मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर किमान एक हजार रुपयांची नोट खर्चावी लागते. म्हणूनच बहुतेक सर्व मल्टिप्लेक्सचा कारभार हा तोट्यात आहे आणि आज ना उद्या त्यांच्यावर ‘फेम-ऍडलॅब्स’सारखी वेळ येणार आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असला की मल्टिप्लेक्सचे दर वाढवले जातात. प्रेक्षकांना ही नाडण्याची कृती अखेर मल्टिप्लेक्सचालकांच्या अंगाशी येऊ लागली आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यानेही मल्टिप्लेक्सचालकांनी तिकीट दरात कपात करणं आवश्यक असल्याचं सुचवलंय. मात्र अजूनही त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. ‘फेम-ऍडलॅब्स’चा मृत्यू हा इतर मल्टिप्लेक्सचालकांसाठी धोक्याची सूचना आहे. त्यातून धडा घेत तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे. अन्यथा आणखी काही मल्टिप्लेक्सेस बंद झाली तर आश्चर्य वाटू नये.
- मंदार जोशी
--------------
Wednesday, July 4, 2012
‘काकस्पर्श’च्या स्पर्शामागचं ‘लॉजिक’
यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या द्विशतकी टप्पा गाठणार आहे. प्रेक्षक, चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि कलाकारांसाठीही हा एक मोठा धक्का आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीतील आलेली सध्याची ‘बूम’ पाहता हा आकडा अगदीच फसवा नसल्याचं जाणवतं. हल्ली कोणालाही मराठी चित्रपट बनवायचाय. त्यामागचं कारण म्हणजे एक तर मराठी चित्रपट हिंदीच्या तुलनेत खूप कमी किमतीत बनतो आणि त्यामध्ये केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची कागदावरील परतफेड अगदी सुखकर आहे. तरीदेखील मराठी चित्रपटांच्या यशाचं प्रमाण हे अगदीच नगण्य आहे. अगदी संख्याच मांडायची झाल्यास दर शंभरी अवघे पाच चित्रपट यशस्वी झाल्याचं निदर्शनास येतं. यंदाच्या वर्षीचं चित्र तर खूपच निराशाजनक आहे. ‘काकस्पर्श’चा अपवाद वगळता एकाही मराठी चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिस’वर दणदणीत यश मिळवता आलेलं नाही.
‘काकस्पर्श’च्या यशाबद्दल लिहायचं झाल्यास गुणवत्ता, नशीब आणि मेहनत या तीनही गोष्टींचा संगम या चित्रपटात झाल्याचं आढळतं. मराठीत चांगले चित्रपट येत नाहीत असं नाही. परंतु, प्रत्येक चित्रपटच ‘काकस्पर्श’एवढा यशस्वी ठरलेला नाही. म्हणूनच या चित्रपटाच्या यशाचं मोल अधिक आहे. एखाद्या चित्रपटाची ‘सक्सेस पार्टी’ आयोजित केली की त्यामध्ये संबंधित चित्रपटाची मंडळी उपस्थित होतात. परंतु, ‘काकस्पर्श’च्या यशाची पार्टी त्यास अपवाद ठरली. या पार्टीस या चित्रपटाशी संबंधित नसलेली बरीच मंडळी होती. विशेष म्हणजे ‘काकस्पर्श’ ज्या चित्रपटगृहांमध्ये धो धो चालला त्या चित्रपटगृहांचे व्यवस्थापक आणि मालकांना आवर्जून बोलाविण्यात आलं होतं. मराठी चित्रपटाच्या यशाची ताकद यापूर्वी ‘नटरंग’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांबाबत अनुभवायला आली होती. त्या काळात हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेत या दोन्ही चित्रपटांचं यश अगदी उठून दिसलं होतं. मराठी चित्रपटांना चांगले ‘शो टायमिंग्ज’ मिळत नसल्याची खंत नेहमीच व्यक्त केली जाते. परंतु, त्यात तथ्य दिसत नाही. ‘काकस्पर्श’ला प्रेक्षकांनी कौल दिल्याचं लक्षात आल्यानंतर दुसर्या आठवड्यापासून या चित्रपटाला महाराष्ट्रातील सगळी चांगली चित्रपटगृहं आणि चांगले ‘टायमिंग्ज’ मिळाले. व्यावसायिक हिंदी चित्रपट दाखवून चित्रपटगृह रिकामं ठेवण्यापेक्षा चालणारा मराठी सिनेमा आपल्या चित्रपटगृहामध्ये कोण लावणार नाही ? परंतु, हल्ली नकारार्थी विचार करण्याकडेच आपला कल वाढला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या अपयशाची कारणमीमांसा करताना एक हक्काचं कारण म्हणून चित्रपटगृहांच्या ‘टायमिंग’चं कारण पुढं केलं जातं. परंतु, ते किती खोटं आहे हे ‘काकस्पर्श’च्या यशानं सिद्ध झालं आहे.
‘काकस्पर्श’च्या यशामागचं आणखी एक ठळक कारण म्हणजे ‘झी मराठी’ वाहिनीनं या चित्रपटाला दिलेला पाठिंबा. मालिका आणि ‘रिऍलिटी शोज’मधील रेटिंगमध्ये भले ही वाहिनी आपल्या स्पर्धकांच्या थोडी मागं पडली असेल. परंतु, या वाहिनीनं आपली सगळी ताकद ‘काकस्पर्श’च्या मागं उभी केली. आपली एकही मालिका किंवा ‘रिऍलिटी शो’ या वाहिनीनं सोडला नाही की ज्यावर या चित्रपटाची प्रसिद्धी झाली नाही. मुळात ‘काकस्पर्श’ हा काही ‘गोलमाल सिरीज’ किंवा आमिर खानचा नवीन चित्रपट नव्हता की प्रेक्षकांनी प्रदर्शनाच्या दिवशीच त्याच्यावर उड्या टाकाव्यात. तसेच चित्रपटाच्या शीर्षकामध्येही नकारात्मकता अगदी स्पष्ट दिसत होती. कोणत्याही चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये ‘लॉंग इनिंग’ खेळायची असेल तर त्याची ‘माऊथपब्लिसिटी’ चांगली होणं खूप महत्त्वाची असते. ‘झी’नं नेमकं हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं. या चित्रपटाच्या ‘प्रोमोज’चा, जाहिरातींचा, त्यातील कलाकारांच्या वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर जाण्याचा एवढा मारा झाला की प्रेक्षकांना ‘काकस्पर्श’ आता बघण्यापासून दुसरा पर्याय नाही, असंच वाटायला लागलं. ‘काकस्पर्श’ प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांचीही मानसिकता थोडी लक्षात घ्यायला हवी. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. मराठी तर जाऊदे पण चांगला हिंदी चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळाला नव्हता. ‘आयपीएल’च्या ‘ओव्हरडोस’नं प्रेक्षकही कंटाळले होते. थोडक्यात प्रेक्षकांना आपल्या खिशातले पैसे खर्च करून चित्रपटगृहात जाऊन काहीतरी चांगलं पाहायचं होतं. त्यामुळे एखाद्या कलाकृतीच्या यशामध्ये त्याच्या प्रदर्शनाचं ‘टायमिंग’देखील किती महत्त्वाचं असतं, ते या चित्रपटामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
‘काकस्पर्श’च्या यशाला कारणीभूत असलेल्या या काही तांत्रिक गोष्टी. परंतु, प्रत्यक्ष कलावंतांची कामगिरीही तितकीच लक्षणीय होती. गिरीश जोशीसारखा चांगला लेखक या कलाकृतीमुळे झळाळून निघाला हे खूप चांगलं झालं. ज्या पटकथेसाठी सचिन खेडेकर आणि गिरीश जोशी यांनी निर्मात्यांचे उंबरठे झिजवले, तीच कलाकृती एवढी लोकप्रिय ठरली. ज्या चित्रपटाच्या पटकथेत गाणी कुठं आहेत, असा प्रश्न दिग्दर्शक महेश मांजरेकरांना पडला होता. त्याच मांजरेकरांना प्रेक्षकांच्या आग्रहास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर काही दिवसांनी त्याची ध्वनीफित प्रकाशित करावी लागली. खरोखरीच या चित्रपटसृष्टीत कसलेही आडाखे बांधता येत नाहीत. सचिन खेडेकर आणि महेश मांजरेकर या दोन नावांशी आता विश्वासाचं नातं जोडलं गेलंय. या विश्वासाला ही जोडी जागल्यामुळे ही कलाकृती खरी बनली. ‘बॉक्स ऑफिस’साठी ओढून ताणून कराव्या लागणार्या क्लृप्त्या त्यात नव्हत्या. जे काही होतं ते प्रामाणिक होतं. ‘स्ट्रेट फ्रॉम द हार्ट’ होतं. हीच गोष्ट कदाचित प्रेक्षकांना भावली असावी. अशा कलाकृती आता वारंवार बनाव्यात एवढीच अपेक्षा प्रेक्षकांकडून आहे.
- मंदार जोशी
--------------
Saturday, June 16, 2012
‘स्टार्स’ जमीन पर...
‘पुढारी’च्या बहार पुरवणीमधील माझा ताजा लेख
--------
‘स्टार्स’ जमीन पर...
-------
गेल्या आठवड्यात एक आक्रीत घडलं. दिबाकर बॅनर्जीच्या ‘शांघाय’ चित्रपटाला प्रदर्शित होण्यापूर्वीच समीक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अक्षरशः खिरापत वाटल्यासारखे ‘स्टार्स’ समीक्षकांकडून वाटले गेले. विशेषतः इंग्रजी वर्तमानपत्रांनी तर या चित्रपटावर अधिकच आपली कृपानजर केली. चार ‘स्टार्स’च्या खाली ‘स्टार’ देणे हा गुन्हा आहे, असं समजून सर्वांनी ‘स्टार्स’ वाटले. या चित्रपटाची परीक्षणं वाचताना अनेक वेळी दिबाकर बॅनर्जीला या मंडळींनी व्ही. शांताराम, सत्यजित रे, विजय आनंद यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या रांगेतच नेऊन बसवलंय, त्याचा भास झाला. इम्रान हाश्मी या कलाकाराचा अभिनय किती ‘ग्रेट लेव्हल’ला गेलाय, अशी धक्कादायक मनोरंजक माहितीदेखील वाचायला मिळाली. सर्वसाधारणपणे समीक्षकही माणूस असल्यामुळे त्याच्याही आवडीनिवडी वेगळ्या असतात. त्यामुळे बहुतेक चित्रपटांबाबत समीक्षकांमध्ये कधीच एकमत आढळत नाही. कोण दोन स्टार देतो, तर कोण तीन... पण ‘शांघाय’बाबत अतिरेकच घडला. आता एवढ्या तार्यांचा मारा झाला असताना ‘शांघाय’ किमान हिट तरी होणं आवश्यक होतं. पण झालं भरलंच. हा चित्रपट प्रदर्शनानंतर जेमतेम ३० टक्के व्यवसाय करू शकला आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला ‘बॉक्स ऑफिसवर’ १५ टक्क्यांचीही मजल मारता आलेली नाही. ‘शांघाय’ला या मिळालेल्या ‘स्टार्स’ची पान पान भरून इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातही करण्यात आली. परंतु, तरीदेखील त्याचा परिणाम काही प्रेक्षकांवर झाला नाही.
एकीकडे ‘शांघाय’ला नाकारणार्या प्रेक्षकांनी अक्षयकुमारच्या ‘रावडी राठोड’वरील प्रेमात थोडीही कुचराई केली नाही. या चित्रपटानं अपेक्षेप्रमाणे शंभर कोटींचा टप्पा ओलांडला. तेव्हा प्रेक्षकांना फक्त मनोरंजनच हवंय, अशीही ओरड काहींनी केली. थोडं तटस्थपणे या संपूर्ण घटनाक्रमाकडे पाहायला गेल्याचं ठरवल्यास काही वेगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. इंग्रजी समीक्षकांची मानसिकताच अनेकदा समजत नाही. कोणत्याही इंग्रजी वर्तमानपत्रामधील समीक्षा वाचून संबंधित चित्रपटाचा कसलाच अंदाज प्रेक्षकाला बांधता येत नाही. दिबाकर बॅनर्जीचा ‘ओये लक्की लक्की ओये’ या साधारण चित्रपटालाही समीक्षकांनी यापूर्वी डोक्यावर घेतलं होतं. विशेष म्हणजे ‘शांघाय’ हा चित्रपट मी या इंग्रजी समीक्षकांसमवेतच पाहिला आणि बर्याच दृश्यांमध्ये माझ्याकडून कसलीच प्रतिक्रिया येत नसताना ही इंग्रजी समीक्षक मंडळी टाळ्या वाजवत होती, अधूनमधून ओरडत होती. याच वेळी मला ‘शांघाय’वर ‘स्टार्स’चा वर्षाव होणार असल्याचा अंदाज आला होता आणि शेवटी तो खरा ठरला. ‘शांघाय’ हा निश्चितच एक वेगळा चित्रपट आहे. परंतु, तो सर्वसामान्य प्रेक्षकाच्या डोक्यावरून जातो, हे सत्य नाकारता येत नाही.
अलीकडच्या काळात चित्रपट समीक्षेत कोणते मुद्दे मांडलेत यापेक्षा त्याला कोणी किती ‘स्टार्स’ दिलेत, याला अधिक महत्त्व आलंय. ‘स्टार्स’चं हे महत्त्व एवढं ठसलं गेलंय की हल्ली प्रेक्षकवर्गदेखील चित्रपटाची समीक्षा वाचण्याच्या फंदात पडत नाही. चित्रपटाला मिळालेले ‘स्टार्स’ पाहून तो ते वाचायचं की नाही, याचा निर्णय घेतो. चित्रपटसृष्टीतील मंडळीदेखील या ‘स्टार्स’च्या संख्येला अधिक महत्त्व देतात. आपल्या प्रतिस्पर्धी गटातील कलावंताच्या चित्रपटाला कमी स्टार्स मिळाले की ही मंडळी आनंदतात. परंतु, आपल्याही आयुष्यात एखादा शुक्रवार येणार आहे, याची आठवण त्यांना त्यावेळी तरी होत नाही. मराठीत अजूनपर्यंत समीक्षणाच्या ‘स्टार्स’ला तेवढं महत्त्व आलेलं नाही हे खरंय. परंतु, हा प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला आहे. मराठीत हल्ली वर्तमानपत्रांपेक्षा मुंबईतील एका खासगी एफ.एम. केंद्रावरील समीक्षेला अधिक महत्त्व आलंय. त्यामागचं कारण म्हणजे या एफएम वाहिनीचा ‘आरजे’ आपलं रेटिंग किमान तीन या आकड्यापासून सुरू करतो. त्यामुळे हल्ली निर्माते मंडळींचा तो एक आधारस्तंभ बनल्याचं बोलंय जातं. त्याच्या आगमनाखेरीज ‘प्रेस शो’ सुरू केला जात नाही. गेल्या दोन एक वर्षातलं सर्वसाधारण ‘ऍव्हरेज’ काढायचं झालं तर या ‘आरजे’नं बहुतेक चित्रपटांना किमान तीन ते चार स्टार्स दिले आहेत आणि बहुतांशी चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले आहेत. मराठी चित्रपटांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याची गरज आहे हे खरंय. परंतु, अशा पद्धतीनं चित्रपटांना पाठिंबा मिळणं हेदेखील गैर नाही का ?
थोडक्यात ‘शांघाय’च्या निमित्तानं चित्रपट समीक्षा ही गांभीर्यानं घ्यावी का, याचा विचार करण्याची वेळ आलीय. त्यामागे अनेक कारणं आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे समीक्षकांच्या लेखनाचा दर्जा आणि अनुभव. वर्तमानपत्रामधील सर्वात दुर्लक्षित अंग म्हणजे चित्रपट पत्रकारिता आहे. अशाप्रकारच्या पत्रकारितेसाठी गुणवत्ता असावी लागते, याचा विसर माध्यमांनाच पडला आहे. त्यामुळे समीक्षकाच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची गुणवत्ता तपासली जात नाही आणि मग नंतर अपघात घडतात. अनेकांच्या मते चित्रपट समीक्षा ही आता कालबाह्य गोष्ट झाली आहे. आताचा प्रेक्षक हुशार आणि सुजाण आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याचा संबंधित चित्रपट पाहावा की नाही, याबद्दल निर्णय झालेला असतो. एखादा प्रेक्षक जर सलमान खान आणि आमिर खानचा चाहता असेल तर त्याच्या दृष्टीनं समीक्षकाच्या समीक्षेला फारसं महत्त्व नसतं. समीक्षा नकारात्मक असली तरी तो चित्रपटगृहात जाऊन संबंधित चित्रपट पाहतोच. तसेच चित्रपट समीक्षेबद्दल चित्रपटसृष्टीमधील मंडळींकडून येणारा कौल हा सापेक्ष असतो. ज्याच्या चित्रपटाबद्दल चांगली समीक्षा प्रसिद्ध झाली असते, तेव्हा तो सातव्या अवकाशात असतो आणि समीक्षकांकडून टीकेचा भडिमार होतो तेव्हा माध्यमांमधून चित्रपट समीक्षा हा प्रकारच रद्द केला जावा, अशी मागणीही करायला तो मागेपुढे पहात नाही.
- मंदार जोशी
----------
Saturday, December 3, 2011
जीवनातला आनंद गेला...
Subscribe to:
Posts (Atom)