Monday, March 10, 2008

मळलेली वाटच बरीब्लॅक ऍण्ड व्हाईट

मळलेली वाटच बरी

सध्या सगळीकडे बदलांचं वारं वाहतंय. या वाऱ्याची एक झुळूक आपणही अनुभवायला काय हरकत आहे, असा प्रश्‍न हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांना हल्ली पडलाय. "ब्लॅक ऍण्ड व्हाईट' पाहताना प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घईंनासुद्धा या प्रश्‍नानं घेरलंय याची खात्री पटते. सध्याची तरुण दिग्दर्शक मंडळी सध्या खूप वेगवेगळे विषय अगदी सहजरीत्या हाताळत आहेत. त्यामुळे आपल्या नेहमीच्या मसालापटांपासून थोडं दूर जात घईंनी "ऑफबीट' चित्रपटाची वाट पत्करण्याचा धोका पत्करलाय.
एखाद्या अपरिचित दिग्दर्शकानं "ब्लॅक ऍण्ड व्हाईट' दिग्दर्शित केला असता तर कदाचित तो अधिक भिडलाही असता, पण घईंच्या दिग्दर्शनामुळं या चित्रपटाची गुणवत्ता वेगळ्या दृष्टीनं पडताळावी लागते. दहशतवादावर आधारलेल्या अनेक चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही साधारण त्याच पठडीतला आहे. विदेशातील कट्टरपंथीय दहशतवादी आणि दहशतवादाच्या रस्त्यावर जबरदस्तीनं चालणाऱ्या भारतातल्या काही तरुणांच्या मानसिकतेवर दिग्दर्शकानं प्रकाश टाकलाय. हा एकमेव वेगळा "अँगल' वगळता हा सिनेमा फार काही मोठी मजल मारू शकलेला नाही. त्यामुळे असल्या प्रयोगापेक्षा घई आपल्या "ट्रॅक'वरच राहिले असते तर ते अधिक चांगलं ठरेल.
रंजन माथूर (अनिल कपूर) हे नवी दिल्लीतल्या एका कॉलेजमधले उर्दूचे प्रख्यात प्राध्यापक. राजकीय क्षेत्रातही त्यांची बऱ्यापैकी उठबस असते. सामाजिक क्षेत्रात काम करणारी रोमा (शेफाली शहा) ही त्यांची पत्नी. एके दिवशी नुमेर (अनुराग सिन्हा) हा तरुण माथूर यांच्या संपर्कात येतो. गुजरातमधल्या जातीय दंग्यांमध्ये त्याच्या आई-वडिलांना जाळण्यात आलेलं असतं. या गोष्टीचा नेमका फायदा घेत काही कट्टरपंथीय मंडळी नुमेरचं माथं भडकवतात. नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात तो मानवी बॉम्ब म्हणून जाणार असतो. नुमेरचा हा चेहरा माथूर ओळखू शकत नाहीत. ते आपल्या घरी त्याला आश्रय देतात, पण त्याच्यामुळेच त्यांना आपली पत्नी गमवावी लागते. आपली प्रतिष्ठा पणाला लावून ते त्याला 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचा पास मिळवून देतात. तेव्हा शेकडो निरपराध व्यक्तींना मारण्यास तयार झालेल्या नुमेरचं मन पालटतं.
वरुण वर्धन यांच्या कथानकातला दहशतवादाचा मूळ धागा दिग्दर्शकानं चांगला पकडलाय, पण या धाग्याचं वस्त्र करताना दिग्दर्शकाला बऱ्याच अडचणी आल्यात. मुळात हा चित्रपट त्यांनी द्विधा मनोवस्थेत केलाय. एकीकडे त्यांना सर्व काही प्रयोगात्मक पातळीवर करायचंय आणि दुसरीकडे हा प्रयोग त्यांना व्यावसायिक स्तरावर यशस्वीही करायचाय. ही सांगड घालण्यात त्यांना अपयश आलंय. "लार्जर दॅन लाईफ' व्यक्तिरेखा आपल्या चित्रपटातून रेखाटणं ही घईंची खासियत. आपल्या या बलस्थानाला मुरड घालून त्यांना हा चित्रपट करावा लागलाय. या कसोटीत त्यांना संमिश्र यश लाभलंय. रंजन माथूरची व्यक्तिरेखा ठसठशीत झालीय खरी, पण तीच गोष्ट नुमेरच्या व्यक्तिरेखेबाबत घडलेली नाही. त्याच्या संपर्कात कोणत्या अतिरेकी संघटना आहेत, याची दिग्दर्शकाला माहिती द्यावीशी वाटलेली नाही. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्याला पुरेशा गांभीर्याची जोड मिळालेली नाही. त्यात भर म्हणून घईंनी नुमेरच्या व्यक्तिरेखेला एक "लव्ह ट्रॅक'ही जोडलाय. त्याच्या अवतीभवतीनं गाणीही पेरलीयत. रोमाची व्यक्तिरेखा खूपच बटबटीत झालीय. 14 ऑगस्टच्या रात्री तिची हत्या होते आणि 15 ऑगस्टला सकाळी माथूर तिच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार करून स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याचं दाखविण्यात आलंय. पटकथेतील ही त्रूट धक्कादायक आहे. नुमेरचं मनःपरिवर्तन होण्यामागचा घटनाक्रम पडद्यावर नीट आलेला नाही. त्याचे प्राण वाचविण्यामागची माथूर यांची भूमिकासुद्धा गोंधळात टाकणारी आहे.
अनिल कपूरनं माथूर यांची व्यक्तिरेखा सफाईदारपणे साकारलीय. नवोदित अनुराग सिन्हाचा म्हणावा तितका कस लागलेला नाही. चेहऱ्यावर कसलेही भाव न दाखविता तो वावरलाय. व्यक्तिरेखेच्या गरजेपोटी हे घडलंय की त्यामागचं आणखी काही कारण आहे, हे जाणण्यासाठी अनुरागचा दुसरा चित्रपट यायला हवा. शेफाली शहाची व्यक्तिरेखा बटबटीत असूनही ती आपला प्रभाव उमटविण्यात यशस्वी झालीय. कथानकाकडून गीत-संगीताची मागणी नसल्यामुळे सुखविंदर यांचं संगीत लक्षात राहत नाही.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

बॉग झक्कास आहे