Thursday, March 13, 2008

दादा माणूस


दादा माणूस
प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक दादा कोंडके यांचा 14 मार्चला दहावा स्मृतिदिन. सलग नऊ सुवर्णमहोत्सवी चित्रपट दिल्याबद्दल "गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस्‌'मध्ये स्थान मिळविणाऱ्या दादा कोंडकेंवर रसिकांनी भरभरून प्रेम केलंय. आजही त्यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालतात. अभिनेते मकरंद अनासपुरे व विजय कोंडके यांनी दादांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
--------------
"थेटर'चा पडदा फाटेल, इतकं खळखळून हास्य निर्माण करणाऱ्या दादा कोंडकेंचा आज दहावा स्मृतीदिन. कलाकाराचं मोठेपण ठरतं ते त्याला लाभणाऱ्या लोकाश्रयात. याबाबतीत दादांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. कारण, आजही त्यांचे चित्रपट थिएटरमध्ये तुफान चालताहेत. "रिपीट रन'ला सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही दादांच्या नावावर नोंदला जाऊ शकतो. लालबागमधल्या एका सामान्य गिरणीकामगाराच्या कुटुंबात दादा जन्मले. साधा कामगार, बॅन्ड कंपनीतील सहकलाकार, सेवा दलाचा कार्यकर्ता, वगनाट्यातील कलाकार, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता...दादांच्या आयुष्याचा प्रवास हा असा चढत्या भाजणीनं झाला. "तांबडी माती' चित्रपटातून फुटलेलं दादा कोंडके नावाचं तांबडं कालांतरानं मराठी चित्रपटसृष्टीला उजळवून गेलं. मराठी चित्रपटाच्या सर्व चौकटी त्यांनी मोडीत काढल्या. ढगळी अर्धी चड्डी, त्यावर लोंबणारी नाडी आणि विस्कटलेला शर्ट अशी त्यांची वेशभूषा. असा हा अजागळ प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला तो त्याच्या साध्याभोळ्या आणि सरळसोट स्वभावानं. गावरान भाषा, ग्रामीण ढंगातला विनोद हा त्यांच्या सिनेमाचा "यूएसपी.' दादांमधल्या शाहिरानं तमाशा, वग, लावणी... असा कोणताही कलाप्रकार वर्ज्य मानला नाही. त्यांचा "डबल मिनिंग'चा विनोद काहींनी डोक्‍यावर घेतला तर काहींनी त्यामुळेच त्यांच्यावर कायमस्वरूपी फुली मारली. "कॉमन मॅन'ची सुख-दुःखं त्यांनी जाणली होती. म्हणूनच दादांच्या प्रत्येक चित्रपटाच्या पदरात रौप्यमहोत्सवाचे, सुवर्णमहोत्सवाचे दान प्रेक्षकानं टाकलं. "आये' ही त्यांची हाक घुमली की थिएटरच्या निर्जीव भिंतीही जाग्या होत. राज्य शासनाच्या करपरतीच्या योजनेला त्यांनी कडाडून विरोध केला. आपला चित्रपट पडण्याची खात्री असणाऱ्यांनी चित्रपट निर्मितीकडे वळूच नये, असं ते स्पष्टपणे सांगत. "चित्रपट पाहण्यास
ाठी येणाऱ्या प्रेक्षकाचे पैसे शंभर टक्के वसूल झालेच पाहिजेत, या उद्देशानं ते चित्रपट निर्मिती करीत. शाहिराचे विचार अमर असतात. कोणी निंदा, कोणी वंदा... दादा कोंडके या शाहिराचा विनोद भविष्यातही मराठी माणसाच्या सोबतीस असेल.


दादांचे चित्रपट "क्‍लासिक'!
ज्या माणसानं आयुष्यात खूप जास्त दुःख भोगलंय, त्याला उत्तम विनोद करता येतो, असं म्हणतात. दादा कोंडकेंनी खूप भोगलं म्हणूनच त्यांचे सर्व चित्रपट एकापेक्षा एक असे सरस मनोरंजन करणारे ठरले. सामान्य माणसाला समजेल, उमजेल असा विनोद त्यांनी आपल्या चित्रपटाद्वारे सादर केला. त्यांच्या व्यक्तिरेखेत भोळेपणा, भाबडेपणा असायचा. मुख्यतः त्यांच्या चित्रपटांमधून काहीतरी संदेश सादर केला जायचा. त्यांच्या एका चित्रपटातला प्रसंग मला अगदी स्पष्ट आठवतोय. एका नेत्याची सभा उधळण्याचा हा प्रसंग आहे. सभेला लोकांची मोठी गर्दी जमलेली असते. एक सायकलस्वार या गर्दीत घुसून मोठ्यानं ओरडतो, "अरे, राशनवर साखर आली रे!' बस, दुसऱ्या क्षणी ही सभा उधळली जाते. अशा प्रकारची जाणीव त्यांच्या चित्रपटांमधून पाहायला मिळायची. त्यांच्या विनोदात नेहमी सामाजिक भाष्य असायचं. अशा प्रकारचं भाष्य नसतं, तर त्यांचे चित्रपट आजच्या काळात चित्रपटगृहांमधून प्रदर्शितच झाले नसते.
दादांच्या विनोदाला दुय्यम स्थान देण्यात आलं, ते त्यातल्या "डबल मिनिंग'च्या संवादांमुळे. मनोरंजनासाठी त्यांनी हा प्रकार कदाचित केलाही असेल; पण मला तो कधीही खटकला नाही. लोकनाट्य, वगनाट्य आणि मुक्तनाट्यात लोकांना हसविण्यासाठी द्वयर्थी विनोदाचा आधार कधी कधी घेतला जातो; पण त्यामुळे हा विनोद आचरट किंवा वाईट ठरत नाही. मराठी भाषा ही वळवावी तशी वळते. तेव्हा दादांना भाषिक विनोदाची खूप चांगली जाण होती, असं मी म्हणेन. काहींना दादांचे चित्रपट "क्‍लासिक्‍स' न वाटता सर्वसाधारण वाटतात. ठराविक साच्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं म्हणजे "क्‍लासिक', असं काहींना वाटतं; पण माझ्या मते- दादांचे सर्व चित्रपट हे "क्‍लासिक'च होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा एक ऐकलेला किस्सा मी इथं नमूद करतो. त्यांच्या "एकटा जीव सदाशिव' या चित्रपटाला राज्य शासनाचे बरेच पुरस्कार मिळाले होते. हे पुरस्कार स्वीकारताना दादा स्टेजवरून म्हणाले, ""आपल्याकडे पडेल आणि भिकार सिनेमांना पुरस्कार देण्याची परंपरा आहे; पण माझ्या "एकटा जीव सदाशिव'नं सिल्व्हर ज्युबिली केलीय. तेव्हा परीक्षकांनी अजूनही या चित्रपटाचं बक्षीस काढून घेतलं तरी माझी काही हरकत नाही.''
- मकरंद अनासपुरे

काळाच्या पुढचा दिग्दर्शक
"सोंगाड्या' पूर्ण होऊन त्याला वितरक मिळत नसतानाचा हा किस्सा आहे. या चित्रपटाच्या जवळपास 30-35 "ट्रायल्स' झाल्या; पण चित्रपट विकत घ्यायला कोणी पुढे येत नव्हतं. या चित्रपटातील दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीवर अनेकांचा आक्षेप होता. ते या चित्रपटात सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांना पाहत होते. वितरकांचं अडेलतट्टू धोरण पाहून दादांनी मला वितरणाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितलं. त्या वेळी मी नुकताच कुठे बी.कॉम. झालो होतो. वितरकांच्या नकारामुळे दुसरा एखादा निर्माता घाबरून गेला असता; पण दादा कमालीचे डेअरिंगबाज होते. हा चित्रपट अमावस्येच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. चित्रपटसृष्टीतील काही ज्येष्ठ मंडळींनी या दिवसाला आक्षेप घेतला. मी हा दादांजवळ मुद्दा काढल्यानंतर ते म्हणाले, ""कसली अमावस्या अन कसलं काय? लावून टाक. बघूया काय होतंय ते!'' आश्‍चर्य म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. त्यानंतर एकदा "कोहिनूर' चित्रपटगृहाचा मालक आम्हाला त्याचं चित्रपटगृह लावण्यास देत नव्हता. आता काय करायचं, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला होता. आम्ही विचारात पडलो असताना दादा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. मराठीवर अन्याय होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून, त्यांनी आपली बाजू बाळासाहेबांकडे मांडली. अर्थातच, हा प्रश्‍न त्यांनी लगेचच सोडवला. एकंदरीत कोणत्याही अडचणीवर मात करण्याची शक्ती दादांमध्ये होती, त्याचे हे प्रसंग म्हणजे पुरावा आहेत.
दादांनी आपल्या कामाची विभागणी खूप छान पद्धतीनं केली होती. लेखन-दिग्दर्शनावर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करून, त्यांनी वितरणाची धुरा माझ्यावर सोपविली होती. दादांचा विनोद हा चावटपणाकडे झुकणारा होता, अशी आजही त्यांच्यावर टीका केली जाते; पण- माझ्या मते दादा हे काळाच्या पुढचा विचार करणारे दिग्दर्शक होते. दादांनी केलेल्या विनोदाची नक्कल हल्लीच्या हिंदी चित्रपटांमध्ये सर्रास केली जाते; पण ती कोणाला आक्षेपार्ह वाटत नाही. दादांचे "तेरे मेरे बीचमें' आणि "अंधेरी रात में दिया तेरे हात में' हे दोन हिंदी चित्रपट खूप यशस्वी ठरले होते. त्यावरून प्रेरणा घेऊन अभिनेते कादर खान यांनी आपल्या चित्रपटांमध्ये "डबल मिनिंग' संवाद लिहिण्यास सुरुवात केली होती. त्याबद्दल दिल्लीच्या एका वर्तमानपत्रात कादर खान यांच्या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध झालेला मथळा मला अजूनही आठवतोय, "दादा कोंडके टाइप डबलमिनिंग फिल्म'.
- विजय कोंडके

1) सोंगाड्या
2) एकटा जीव सदाशिव
3) राम राम गंगाराम
4) पांडू हवालदार
5) तुमचं आमचं जमलं
6)आंधळा मारतो डोळा
7) ह्योच नवरा पाहिजे
8) बोट लावीन तिथं गुदगुल्या
9) आली अंगावर

(दादांच्या या सुपरडुपर हिट चित्रपटांपैकी तुमचे आवडीचे सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडा आणि दादांच्या कारकिर्दीवर आपला अभिप्रायही नोंदवा.)

No comments: