Wednesday, March 5, 2008

"बूम'

"बूम'
ग्लॅमर क्षेत्रातील सर्वाधिक "हॅपनिंग इंडस्ट्री' म्हणून सध्या मराठी चित्रपटसृष्टीचं नाव घेतलं जातंय. अवघ्या दशकभरापूर्वी जी चित्रपटसृष्टी मरणासन्न अवस्थेला जाऊन पोचली होती, ती आता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही उंचच उंच भराऱ्या मारण्याचं स्वप्न पाहतेय. काही चित्रपटांनी अनपेक्षित यश मिळवलंय, तर काहींना अपयशही चाखावं लागलं. अगदी अमराठी प्रेक्षकही तिची सध्या दखल घेताना आढळतोय. पण, मराठी चित्रपटसृष्टीची सध्या नेमकी काय अवस्था आहे ? एकीकडे मराठी चित्रपटाचा दर्जा उंचावलाय, तर दुसरीकडे त्यांना चांगली चित्रपटगृहं मिळणं दुरापास्त झालंय. या क्षेत्रात काम करणाऱ्या काही तज्ज्ञ मंडळींबरोबर चर्चा करून सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीचा घेतलेला हा आढावा.
-------------
लालबागमधलं "भारतमाता' चित्रपटगृह हे नेहमी चर्चेत असतं ते या चित्रपटागृहाच्या संरक्षणासाठी रसिकांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनामुळं. मात्र, पंधरवड्यापूर्वी हे चित्रपटगृह एका निराळ्या विक्रमाच्या निमित्तानं रसिकांच्या नजरेस आलं. या चित्रपटगृहात एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे "शोज' होण्याचा चमत्कार घडला. मराठी चित्रपटसृष्टीला भरभराटीचे दिवस आल्यानेच हा चमत्कार घडल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण, मराठी चित्रपटांनी घेतलेल्या भरारीचं समर्थन करण्यास हे एकमेव उदाहरण पुरेसं नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी चित्रपटांचं चित्रपटगृहांमधील उत्पन्नाचा टक्का वाढलाय. या चित्रपटांच्या सॅटेलाईट, व्हिडीओ तसेच सीडी-डीव्हीडी हक्कांना मोठी मागणी आलीय. मराठी चित्रपटांच्या संगीताच्या कॅसेटस्‌बाबतही रसिक विचारणा करीत आहेत. मराठी चित्रपटांमधील भरभराट लक्षात आल्यानं निर्माते-वितरक मंडळी आपल्या "प्रॉडक्‍ट'चं चांगलं "मार्केटिंग'करू लागले आहेत. सुभाष घई, अनिल अंबानी, डी. रामानायडू, परवेझ दमानिया ही अमराठी मंडळी मराठी चित्रपटांच्या निर्मितीत रस घेऊ लागली आहेत. "डोंबिवली फास्ट'चा विषय आणि निशीकांत यांचं तांत्रिक कौशल्य आवडल्यानं अब्बास-मस्तान यांनी त्याचा तमीळमध्ये "रीमेक' करण्याचं धाडस दाखविलं.
गेल्या वर्षभरात निव्वळ विषयांच्या दृष्टीनं खूप चांगल्या कलाकृती पडद्यावर आल्या आहेत. "टिंग्या', "वळू', "एवढंसं आभाळ', "जिंकी रे जिंकी' ही काही त्याची ठळक उदाहरणं. सचिन पिळगावकर, महेश कोठारे, चंद्रकांत कुलकर्णी, स्मिता तळवलकर, संजय सूरकर, सुमित्रा भावे-सुनील सुकठणकर... आदी जाणत्या निर्माता-दिग्दर्शकांबरोबरच उमेश कुलकर्णी, बिपीन नाडकर्णी, गिरीश मोहिते हे नव्या दमाचे लेखक-दिग्दर्शक आता उत्साहानं पुढं येत आहेत, ही चांगली गोष्ट आहेत. दंतवैद्यकशास्त्रात विशेष नाव कमावणारे डॉ. उदय ताम्हनकर आता "काय द्याचं बोला'च्या यशानंतर आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. आपला मुख्य व्यवसाय सांभाळून त्यांनी मराठी चित्रपटाच्या वितरण यंत्रणेत दाखविलेला रस, ही खूप विशेष गोष्ट मानावी लागेल.
"झी टॉकिज'ची निर्मिती असलेल्या "साडे माडे तीन' चित्रपटानं आतापर्यंत तब्बल साडे चार कोटींचा व्यवसाय केला. बहुचर्चित "वळू' चित्रपटानंही अवघ्या चार आठवड्यांमध्ये दोन कोटींपर्यंत मजल मारलीय. "चेकमेट'नं पहिल्याच आठवड्यात 85 ठिकाणी प्रदर्शित होऊन आपला ठसा उमटवला. आतापर्यंत हिंदी चित्रपटांच्या अधिकाधिक प्रिंटस्‌बद्दल चर्चा व्हायची. मात्र, त्याबाबतीत आपण मागं नसल्याचं हे द्योतक आहे, असं वितरक सचिन पारेकर यांनी सांगितलं. या दोन्ही चित्रपटांच्या यशात त्यांच्या वृत्तपत्र आणि टीव्हीवरून केलेल्या प्रसिद्धीला खूप महत्त्व दिलं जातंय. मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी आता स्वतंत्र "बजेट' असायला हवा, हा मुद्दा निर्मात्यांच्या पचनी पडू लागला आहे. पूर्वी मराठी चित्रपटगृहांना चांगली चित्रपटगृहं मिळायला बऱ्याच अडचणी यायच्या. परंतु, आता प्रतिष्ठीत मल्टिप्लेक्‍सगृहांचे चालक आपणहून मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास इच्छुक असल्याची माहिती प्रसिद्ध वितरक सादिक चितळीकर यांनी दिली. मल्टिप्लेक्‍समध्ये सक्तीनं मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा राज्य शासनाचा आदेश चित्रपटसृष्टीच्या पथ्यावर पडला आहे. अगदी एक-दोन वर्षांपूर्वी मराठी चित्रपटांच्या सॅटेलाईट हक्कांना अगदी क्षुल्लक किंमत मिळे. पण, आता निर्मात्यांना आपल्या कलाकृतीची किंमत कळून ते मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याची माहिती या क्षेत्रात काम करणाऱ्या नानूभाई यांनी दिली.
ह्या झाल्या सर्व जमेच्या बाजू. पण, या यशाला काळी किनार आहेच. मार्केटिंग, प्रसिद्धी आणि वितरण हे चित्रपट निर्मितीमधले तीन प्रमुख खांब. या तीन खांबांकडेच निर्माते-वितरक मंडळींचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे "साडे माडे तीन' आणि "वळू'सारखे चित्रपट उत्तम कामगिरी करीत असतानाच दुसरीकडे अनेक चित्रपट धराशायी झाले. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे वितरण यंत्रणेचा अभाव आणि चित्रपटाच्या प्रदर्शनातील विसंगत अंतर. महाराष्ट्रात सध्या सुमारे 550 ठिकाणी मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याची सुविधा आहे. परंतु, तो प्रत्यक्षात अवघ्या 50 ते 55 सेंटरमध्येच प्रदर्शित केला जातो. त्याचा विपरीत परिणाम मराठी चित्रपटांच्या एकूण उत्पन्नावर होत आहे. राज्यातील अनेक विभाग असे आहेत की जिथे मराठी चित्रपट प्रदर्शितच होत नाही. कोकण, वाशीम, जालना, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या भागात गेल्या काही वर्षांमध्ये किती चित्रपट प्रदर्शित झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. याबाबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार सांगतात, ""राज्यातल्या अनेक भागात मराठी चित्रपट प्रदर्शित होत नाही, ही खरी बाब आहे. पण, ही समस्या दूर करण्यासाठी मी स्वतः सध्या कष्ट घेत आहे. नागपूर, मराठवाड्यातील हिंदीभाषिक वितरकांबरोबर मी नुकतीच चर्चा केली आहे. या वितरकांनी आता आपल्या विभागात मराठी चित्रपट लावण्यास तयारी दर्शविली आहे.''
चित्रपटांमधून "ब्रॅण्डस्‌'ची प्रसिद्धी करण्यास सुरुवात झाली असली तरी हे तंत्र अजूनही आपल्याकडच्या निर्माते-मंडळींना अवगत झालेलं नाही. ते अवगत झाल्यास निर्मात्यांना आपला निर्मितीखर्च वसूल करण्याची वेगळी वाट सापडण्याची शक्‍यता आहे. गेल्या दोन-तीन महिन्यात जवळपास 15 ते 20 मराठी चित्रपट लागोपाठ प्रदर्शित झाले आणि त्याचा फटका सर्वांनाच बसला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे वितरक आहेत. चांगल्या वितरकांच्या संख्येत वाढ होण्याबरोबरच निर्मात्यांनीही प्रदर्शनाची घाई करू नये, अशी माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिली. वितरणाच्या समस्येयाबाबत सादिक चितळीकर म्हणतात, ""प्रदर्शनाबाबत घाई केल्यानं काही चित्रपटांना फटका बसल्याचा मुद्दा बरोबर आहे. परंतु, मी स्वतः वितरक असल्यानं दोन चित्रपटांच्या प्रदर्शनामध्ये योग्य अंतर ठेवण्याची नेहमीच काळजी घेतो. "बकुळा नामदेव घोटाळे' हा चित्रपट सेन्सॉरसंमत असूनही प्रदर्शनयोग्य काळ न वाटल्यानं तो आम्ही तब्बल तीन महिन्यांनी प्रदर्शित केला. निर्मात्यांनी फक्त स्वतःचा फायदा न बघता संपूर्ण चित्रपटसृष्टीचा विचार करण्याची वेळ आता जवळ आली आहे.''
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे... ही सध्याची मराठी चित्रपटसृष्टीतील गाजणारी नावं. तरीदेखील मराठी सिनेमा अजूनही ताज्या दमाच्या नायक-नायिकेच्या शोधात आहे. पुढील दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीची आणखी भरभराट करायची झाल्यास ही त्रुटी लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. मराठी चित्रपटासृष्टीला कधीच चांगल्या अभिनेत्यांची कमतरता जाणवली नाही. इथं उणीव आहे ती "स्टार्स'ची. श्रेयस तळपदे आणि रितेश देशमुख हे हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे सध्याचे दोन मराठी कलाकार. त्या दोघांनाही मराठी चित्रपट करायचा. त्यांच्या "स्टार स्टेटस'ला फायदा उठविण्याचे प्रयत्न आता व्हायला हवेत. या सर्व गोष्टी जुळून आल्यास चित्रपट माध्यमात तरी मराठीवर कोणी अन्याय करण्यास धजावेल, असं वाटत नाही.

चौकट करणे

मराठी चित्रपटाच्या कमाईचे विविध मार्ग
1) चित्रपटगृहातील उत्पन्न
2) व्हिडीओ, केबल, सॅटेलाईट राईटस्‌
3) राज्य शासनाचे अनुदान (15 ते 30 लाख)
4) चित्रपटातून "ब्रॅण्डस्‌'ची प्रसिद्धी

No comments: