Monday, March 31, 2008

खोल खोल पाणी

खोल खोल पाणी

शरीराची भूक, कोवळं प्रेम आणि अंधश्रद्धेतून निर्माण झालेलं भयावक वास्तव म्हणजे "डोह' हा चित्रपट. प्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या "काळेशार पाणी' या वादग्रस्त लघुकादंबरीवर हा चित्रपट आधारलाय. मराठे यांनी 1970 च्या दशकात ही कादंबरी लिहिली होती. तब्बल चार दशकांनंतर तिला पडद्यावर येण्याचं भाग्य लाभलंय.
मानवी नात्यांचे पदर चित्रपटातून उलगडणं म्हणजे खूप कठीण गोष्ट. "डोह'सारखा मन विषण्ण करणारा विषय असेल, तर दिग्दर्शकाची खरी कसोटी लागते. पुष्कराज परांजपे यांनी चित्रपट करताना मूळ कादंबरीतल्या काही गोष्टी घेतल्यात; तर काही टाकल्यातसुद्धा. एक स्वतंत्र चित्रपट म्हणून "डोह' पाहणाऱ्याला खिळवून ठेवतो; पण कादंबरीच्या तुलनेत त्याचा परिणाम थोडा उणावल्यासारखा वाटतो. तरीदेखील एक "बोल्ड' विषय साधेपणानं कसा सादर करता येऊ शकतो, याचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
भिकी (लीना भागवत) ही भजी विकून स्वतःचं व आपल्या तीन मुलांचं पोट भरत असते; पण गावातल्या रिकामटेकड्या विष्णूची "ठेवलेली बाई' अशीच तिची ओळख असते. कमळी ही तिची वयात आलेली मोठी मुलगी. अभ्यासात मंद असलेल्या कमळीचा हात चित्रकलेत अगदी सफाईनं चालत असतो. वर्गातल्या एका टारगट मुलाची आणि गावातल्या वाण्याची तिच्यावर नजर असते; पण खुद्द कमळीला मुंबईहून शिकण्यासाठी आलेल्या हुशार व देखण्या अजयबद्दल ओढ वाढू लागते. इकडे आपल्या वासनेवर ताबा ठेवू न शकणाऱ्या भिकीचीही अजयवर नजर पडते. विष्णूचा अकाली मृत्यू झाल्यानंतर तिच्यावर आकाश कोसळतं. घरातली चूल सुरू ठेवण्यासाठी कमळीच्या शरीराचा सौदा ठरविण्यापर्यंत तिची मजल जाते. इकडे भिकीच्या तावडीतून सुटलेला अजय अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. परीक्षेत नापास झाल्याचं अपयश पचवू न शकल्याने तो आत्महत्या करतो. अजयच्या मृत्यूनं वेड्यापिशा झालेल्या कमळीला बरं करण्यासाठी भिकी मग एका मांत्रिकाला बोलावते. हा मांत्रिक कमळीचं शरीर तर लुटतोच; पण तिच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतो. कमळीचे प्राण गेल्यानंतर तिच्या एका चित्राला "युनेस्को'कडून पुरस्कार मिळाल्याची बातमी भिकीच्या कानावर येते; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
"काळेशार पाणी' ही कादंबरी वादग्रस्त ठरली, ती त्यातल्या मानवी व्यक्तिरेखांच्या थेट चित्रीकरणासाठी. या कादंबरीचा शेवट खूपच धक्कादायक आहे; पण हा धक्का चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकाला कदाचित पचणार नाही, या हेतूने या चित्रपटाचा शेवट बदलण्यात आलाय. अंधश्रद्धेचा एक स्वतंत्र "ट्रॅक' चित्रपटाच्या शेवटाशी जोडण्यात आलाय. कादंबरीचा विषण्ण करणारा भाव अवघ्या दीड तासात पकडण्यात दिग्दर्शकाला यश आलंय; पण भिकी आणि कमळीच्या व्यक्तिरेखेतील गुंतागुंत पुरेशी स्पष्ट झालेली नाही. भिकी एकीकडे पोटासाठी परपुरुषाशी संबंध ठेवण्याची भाषा करते आणि दुसरीकडे ती आपल्या मुलीच्या वयाच्या अजयकडेही आकर्षित होताना दाखवलीय. भिकीची व्यक्तिरेखा आणखी व्यवस्थित स्पष्ट व्हायला हवी होती; ती न झाल्यामुळे कमळीच्या मृत्यूनंतर भिकीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं की नाही, याबाबत दिग्दर्शक संभ्रमावस्थेत पडल्याचं जाणवतं.
"डोह'ला उंचीवर नेण्याचं काम त्यातल्या कलाकारांनी केलंय. लीना भागवत यांनी भिकीच्या व्यक्तिरेखेतले सर्व भाव छान टिपलेत. हर्षदा ताम्हनकर आणि अभय महाजन या दोन तरुण कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखा खूप समरसून केल्यात. सुहास पळशीकर छोट्याशा व्यक्तिरेखेत लक्षात राहतात.

1 comment:

मोरपीस said...

आपले परिक्शन फ़ार आवडले.