Wednesday, June 4, 2008

तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा

"आयपीएल' स्पर्धेला मिळालेल्या घवघवीत यशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून ऐकायला मिळतेय, पण या स्पर्धेच्या आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. "सेट मॅक्‍स' वाहिनीने उत्कृष्ट प्रक्षेपण करून या स्पर्धेच्या यशात मोठा वाटा उचलला. "सोनी' वाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल दासगुप्ता यांच्याशी या स्पर्धेने मिळविलेले यश; तसेच पुढील आव्हानांबद्दल केलेली चर्चा.
......................
: "आयपीएल'च्या आयोजनामध्ये एक प्रक्षेपक या नात्यानं तुमचा नेमका सहभाग कसा होता?
: "आयपीएल'च्या आयोजनामागची "बीसीसीआय'ची भूमिका मला खूप आवडली. क्रिकेटवर आधारलेला तीन तासांचा "रिऍलिटी' सिनेमा, अशी "थीम' घेऊन ते आमच्याकडे आले होते. "सेट मॅक्‍स' ही एक सिनेमाविषयक वाहिनी असल्यानं या "थीम'वर काम करायला मला आवडले. "बीसीसीआय'नं 2007 च्या मध्यावधीत या स्पर्धेच्या प्रक्षेपणासाठी निविदा मागविल्या होत्या. "निम्बस', "इएसपीएन' तसेच "सेट मॅक्‍स' हे तीनच स्पर्धक या शर्यतीमध्ये उतरले होते. जागतिक स्तरावरील प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेला कसे "प्रमोट' कराल? यावर त्यांचा अधिक भर होता. यावर आम्ही केलेले सादरीकरण त्यांना खूप आवडले आणि आमच्या वाहिनीला पाच वर्षांच्या प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले. सामन्यांचं नियोजन करताना ते "प्राईम टाईम' या वेळेत होतील याची आम्ही काळजी घेतली. शाळकरी मुलं हा आमचा "टार्गेट' प्रेक्षक असल्यानं आम्ही देशभरातील सर्व शाळांच्या परीक्षा संपल्याची खात्री करूनच या स्पर्धेला सुरुवात केली.
: "आयपीएल'ला एवढं मोठं यश मिळेल, असं तुम्हाला वाटलं होतं का?
: आता ज्याप्रमाणावर या स्पर्धेला यश मिळालंय, त्यापेक्षा अधिक यशाची आम्ही अपेक्षा करीत होतो. आतापर्यंत मिळालेल्या यशावर आम्ही आनंदी आहोत, पण आपण कुठं कमी पडलो, याचीही आम्हाला जाणीव आहे. "टीआरपी'च्या आकड्यांनुसार छोट्या शहरांमध्ये आम्हाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ही स्पर्धा यशस्वी करण्याचं आव्हान आता आमच्यापुढं आहे.
: "आयपीएल'च्या यशात सर्वाधिक वाटा कोणाचा आहे, असं तुम्हाला वाटतं?
: अर्थातच "बीसीसीआय'चे ललित मोदी आणि पर्यायानं या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचा. "बीसीसीआय'नं अत्यंत काळजीपूर्वकपणे या स्पर्धेचं खासगीकरण केलं. कलावंत, उद्योजक; तसेच समाजातील इतर दिग्गजांना एकत्र आणण्याची त्यांनी किमया केली. एकमेकांसमोर उभं राहूनही त्यांचे "इगो' दुखावले जाणार नाहीत, याची त्यांनी काळजी घेतली. "आयपीएल'चं आयोजन करताना पवारांनी खूप मोठा धोका पत्करला होता, कारण ही स्पर्धा अपयशी ठरली असती; तर पवार त्याचे धनी ठरले असते. धोका हा शब्द मी अशासाठी वापरलाय, की "झी नेटवर्क'ने काही महिन्यांपूर्वीच आयोजित केलेल्या "आयसीएल' स्पर्धेकडे रसिकांनी पाठ फिरविली होती. खुद्द "बीसीसीआय'मधील काही वरिष्ठ मंडळींना "आयपीएल'च्या यशाची खात्री नव्हती. "टीम इंडिया' जोपर्यंत खेळत नाही, तोपर्यंत प्रेक्षक हा "फॉर्म्यट' स्वीकारणार नाहीत, असं अनेकांचं म्हणणं होतं. हा विरोध डावलून पवारांनी "आयपीएल'चं आयोजन केलं. फक्त त्यापुरतंच त्यांनी स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला त्यांची मदत झाली. योग्य जागी योग्य माणसांची त्यांनी निवड केली.
: "आयपीएल'चं वर्षातून दोन वेळा आयोजन करणं शक्‍य आहे, असं तुम्हाला वाटतं?
: पुढील काही वर्षे तरी "आयपीएल'चं आयोजन वर्षातून एक वेळाच व्हावं, असं मला वाटतं, कारण यश मिळालंय म्हणून अधिक पदरात पाडण्याची हाव बाळगणं चुकीचं ठरेल. या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठी तयारी करावी लागते. या वेळच्या स्पर्धेतला प्रत्येक सामना वेळेत सुरू झाला. अनेक शहरांमध्ये सामने खेळले जाऊनही खेळाडू "प्रॅक्‍टिस'साठी किंवा प्रत्यक्ष सामन्याच्या स्थळी उशिरा पोहोचल्याची तक्रार आली नाही. कोणत्याही संघातल्या खेळाडूंचं विमान चुकलं नाही. नियोजन उत्तम असल्यानं असे प्रकार घडले नाहीत. एकाच वर्षी दोन वेळा ही स्पर्धा आयोजित करायची असेल; तर संघांची संख्या वाढवावी लागेल. या स्पर्धेत रिकी पॉंटिंग, मॅथ्यू हेडन, मॅकलमसारखे खेळाडू स्पर्धेच्या पूर्वार्धात; तर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू फक्त उत्तरार्धातच खेळले. प्रचंड गुणवत्ता असलेले विदेशी खेळाडू आम्हाला पूर्ण स्पर्धेत खेळवायचे आहेत. त्यामुळे सध्या तरी वर्षातून एकदाच ही स्पर्धा आयोजित करणं योग्य ठरेल.
: "आयपीएल'च्या यशामुळं "सेट मॅक्‍स'चा नेमका किती फायदा झालाय, असं तुम्हाला वाटतं?
: गेले चार आठवडे "सेट मॅक्‍स' वाहिनी लोकप्रियतेच्या तक्‍त्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोणत्याही "नेटवर्क'चा कारभार पाहिल्यास त्यांच्याकडे एक अत्यंत यशस्वी वाहिनी आणि त्याच्या छायेखाली असणाऱ्या इतर वाहिन्या असल्याचं आढळते, पण "आयपीएल'च्या यशामुळं "सोनी' आणि "सेट मॅक्‍स' या एकाच समूहाच्या दोन प्रबळ वाहिन्या उभ्या करण्यात आम्हाला यश आलंय.

No comments: