Monday, June 16, 2008

तुमच्या-आमच्यातला "सरकार'

तुमच्या-आमच्यातला "सरकार'

"Power can not be given, it needs to be taken.` सध्या विशेष चर्चेत असलेल्या "सरकार राज' या चित्रपटाची ही "टॅगलाईन'. "पॉवर' हा शब्द राजकारणाशी अधिक जवळचा असला तरी इतर क्षेत्रांमध्येही तो अगदी सहजपणे रूजला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी "शिवा', "सत्या', "सरकार', "कंपनी'... आदी चित्रपटांमधून या "पॉवर'चीच वेगवेगळी रुपं दाखविली आहेत. त्यानिमित्तानं वर्मांनी शब्दबद्ध केलेली ही "पॉवर'मागील "पॉवर'.
-------------
टेक वन ः स्थळ ः भारतामधली कोणतीही एक शाळा. दोन मुलं एका पेन्सिलीसाठी भांडताहेत. वादावादीतूनही या पेन्सिलीचा ताबा न मिळाल्यानं ही दोन्ही शेवटी हाणामारीपर्यंत जाऊन पोचतात.
(या दृश्‍याचा शेवट या दोन मुलांमधला शक्तिशाली मुलगा पेन्सिल मिळवतो किंवा शाळेतील शिक्षक मध्ये पडून त्यांचं भांडण सोडवतात आणि पेन्सिल कोणालाही देत नाहीत, असा असू शकतो.)
टेक टू ः स्थळ ः नवी दिल्ली. भारत-पाकिस्तानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली शिखर बैठक. विषय अर्थातच काश्‍मीर. दोन्ही बाजूकडचे अधिकारी तावातावानं आपली बाजू मांडतात.
(ही बैठक कोणताही निष्कर्ष न निघता संपते आणि भविष्यातील आणखी एका शिखर बैठकीची तयारी सुरू होते.)
तसं पाहायला गेलं तर हे दोन प्रसंग अगदी टोकाचे आहेत, असं पटकन कोणीही म्हणेल. पण, मला तसं वाटत नाही. मला त्यांच्यात कमालीचं साम्य वाटतं. पहिला प्रसंग अगदी आपल्या दररोजच्या पाहण्यातला आहे. म्हणूनच आपण या मुलांच्या भांडणाकडे "एका पेन्सिलीसाठी काय भांडताय !' असं म्हणून जातो. मात्र, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या नजरेतून पाहिल्यास ते ज्या पेन्सिलीसाठी भांडताहेत, ती पेन्सिल म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं-तिसरं काही नसून काश्‍मीरच आहे. फक्त त्यांच्यामधल्या वादाचं माध्यम आणि त्याच्या व्यापकतेत फरक आहे.
"पॉवर' हा असा प्रकार आहे की, ज्याच्यातून कोणीही सुटलेला नाही. वर उल्लेखिलेल्याप्रमाणे या "पॉवर'कडे आकर्षित होण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. पण, त्याचं "टार्गेट' एकच असतं. "मला इतरांच्यावर सत्ता गाजवायचीय !' अनेक जण मला म्हणतात, की तुमच्या चित्रपटांमध्ये कोणत्याही दृष्टीनं पराकोटीला गेलेल्या व्यक्तिरेखा अधिक पाहायला मिळतात. हे पराकोटीला जाणं म्हणजे नक्की काय असतं ? त्याचा "पॉवर'शी काही संबंध असतो का ? "मला जे योग्य वाटतं, ते मी करतो !' माझ्या दृष्टीनं "पॉवर'ची ही सोपी व्याख्या आहे. त्यापुढं जाऊन मी असं म्हणेन की, जी व्यक्ती माझं लक्ष वेधून घेते आणि बराच काळ त्या व्यक्तीचा माझ्यावर प्रभाव असेल, तर तिला मी "पॉवरफुल' व्यक्ती मानतो. अशा व्यक्तिरेखांचं मूळ आपल्या घरापासून शोधता येईल. घरातील पत्नी, मुलं माझ्या मताला मान देत असतील, तर घरात माझा आदर केला जातो. त्यापुढं जाऊन इतर माणसं माझ्या विचारांशी सहमत असतील तर मग मी लगेचच नगरसेवक बनतो. अल्पावधीत अगदी आमदार-खासदार बनण्यापर्यंतही माझी मजल जाते. एक दिग्दर्शक म्हणून विचार करताना उच्च पदापर्यंत जाताना कोण कुठले मार्ग वापरतो, याला माझं फारसं महत्त्व नसतं. या रस्त्यानं येणाऱ्या-जाणाऱ्यांचे चेहरे आणि त्यांची "मोडस ऑपरेंडी' टिपण्याकडं माझा अधिक कल असतो. त्यांच्या कृती योग्य की अयोग्य, हे ठरवायला मला आवडत नाही. ते मी प्रेक्षकावर सोपवून टाकतो.
"शिवा' चित्रपटामध्ये मी दिशा हरवलेल्या कॉलेजमधल्या तरुणांचा विषय हाताळला होता. आपल्या देशामधली ही एक "पॉवर'च आहे. "सत्या'मध्ये त्याचं पुढचं "एक्‍स्टेंशन' दाखवण्यात आलंय. मुंबईत दररोज हजारो नोकरी-धंद्यानिमित्त आपल्या आशा-आकांक्षांना सोबत घेऊन येतात. त्या पूर्ण न झाल्या की, मग त्यांना वेगळं जग खुणावू लागतं. त्याचंच प्रतिबिंब "सत्या', "कंपनी'मध्ये पडलं होतं. मुंबईच्या समुद्रातील एका खडकावर भिकू म्हात्रे जेव्हा आपले हात फैलावतो, तेव्हा त्याच्या मनात कुठंतरी आलं असतं की, हे सगळं आता माझंच आहे. सत्तास्थान गाठलं की मग ते टिकवण्यासाठी धडपड सुरू होते. काही लोकांकडे पैसा असतो, ताकद असते. तरीदेखील त्यांना म्हणावे तेवढं यश मिळत नाही. त्यामागचं कारण म्हणजे सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना मिळत नाही. तेव्हा लोकांचं प्रेम ही सुद्धा एक "पॉवर'च आहे. मध्यमवर्गीय समाज म्हणजे "ना इधर का ना उधर का'. पण, त्याचीही एक ताकद असते. ही ताकद माझ्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. "पॉवर'च्या आणखी काही "शेडस्‌' बघितल्या तर ती एकप्रकारची पशूप्रवृत्ती असल्याचं जाणवेल. आपण आणखी एक अगदी साधं उदाहरण घेऊ. गल्लीत कुत्र्यांना भांडताना आपण नेहमीच पाहतो. या कुत्र्यांमध्ये जो कुत्रा अधिक ताकदवान असतो, तो आपल्या टोळक्‍यावर वर्चस्व गाजवतो. सत्तास्थानाकडे वाटचाल करणं, ही आपल्या समाजाची सहज प्रवृत्तीच आहे.
समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ही "पॉवर' आपल्याला पाहायला मिळते. अगदी सर्वांच्या परिचयाच्या एकता कपूरच्या मालिकांचं सूत्रही या "पॉवर'भोवतीच फिरतं. राजकारणाचा "पॉवर'शी अधिक जवळचा संबंध आहे, हे खरंय. पण, मला स्वतःला राजकारणात फारसा रस नाही. मला विलक्षण आकर्षण आहे ते समाजावर प्रभाव असलेल्या व्यक्तिरेखांचे. नावच घ्यायचं झालं तर मी अमिताभ बच्चन, राज ठाकरे आणि मल्लिका शेरावत यांचा उल्लेख करीन. तिसऱ्या नावाबद्दल अनेकांना कदाचित आश्‍चर्यही वाटेल. पण, ते खरं आहे. तिच्या "आयटेम सॉंग्ज'चा प्रभाव तुम्ही नाकारू शकत नाही. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयानं भारावून जाणाऱ्यांमधल्या लक्षावधी रसिकांपैकी मीसुद्धा एक आहे. बच्चन म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून अभिनयातलं सत्तास्थानच आहे. एक दिग्दर्शक या नात्यानं मी या सत्तास्थानाला माझ्या चित्रपटातून थोड्या वेगळ्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला.
राज ठाकरे यांच्या पक्षाबद्दल तसेच त्यांच्या भूमिकेबद्दलही मला फारसे ठाऊक नाही. ते जाणून घेण्यातही मला विशेष रस नाही. पण, त्यांना भाषण करताना पाहिलं की, माझी नजर टीव्हीवरून हलत नाही. ते आपल्या स्टाईलनं पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात. हे खिळवून ठेवणं म्हणजेसुद्धा एकप्रकारची "पॉवर'च आहे. ती लाखातल्या काही थोड्या लोकांच्याच वाट्याला येते. माझ्या चित्रपटात मी नेहमीच समाजाच्या चर्चेत असणाऱ्या व्यक्तींना स्थान देतो. मात्र, त्यांच्या कृतीचं जसंच्या तसं चित्रण मी करीत नाही. "जंगल'मध्ये वीरप्पनच्या जवळ जाणारी व्यक्तिरेखा होती. हा चित्रपट करूनही या व्यक्तिरेखेबद्दलचं माझं कुतूहल शमलं नाही. तेव्हा मी आता नव्यानं वीरप्पनवर एक चित्रपट करतोय.
"पॉवर'च्या प्रभावामागची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातला आत्मविश्‍वास. याबद्दल माझंच एक उदाहरण देतो. वयाच्या सातव्या वर्षापासून मी सिनेमामुळं झपाटलोय. लहानपणी घरच्यांना न सांगता मी अनेक सिनेमे बघितलेत. त्यापायी आईचा बराच मारही खाल्लाय. इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतली तेव्हाही माझं सिनेमाचं वेड काही कमी झालं नव्हतं. केवळ "डिग्री' हवी म्हणून शिकलो. लेन्सेस म्हणजे काय असतात, कॅमेरा हा काय प्रकार असतो, हे माहिती नसूनही मी दिग्दर्शक झालो. दिग्दर्शक बनण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात होती, त्यामुळेच इथवरचा प्रवास झाला. मात्र, माझ्याप्रमाणे सर्वांनाच दिग्दर्शक बनायचं नसतं. काहींना आपल्या कंपनीचा "सीईओ' बनायचं असतं, काहींना मालक, तर काहींना राजकारणात जाऊन मोठी पदं भूषवायची असतात. त्यासाठी मग सुरू होतो संघर्ष. हा संघर्ष म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. त्याला आपण "पॉवर वे'सुद्धा म्हणू शकतो.
(शब्दांकन ः मंदार जोशी)

1 comment:

HAREKRISHNAJI said...

भलताच पॉवर्फुल लेख