Thursday, June 26, 2008

कुणाल कोहली "दिल से'

"थोडा प्यार थोडा मॅजिक' हा चित्रपट म्हणजे दिग्दर्शक कुणाल कोहलीसाठी दुहेरी दडपण आहे. पहिलं दडपण म्हणजे या सिनेमाचे सहनिर्माते "यशराज फिल्म्स'च्या वाट्याला सातत्यानं आलेलं अपयश आणि दुसरं दडपण म्हणजे कुणालचे लागोपाठ हीट ठरलेले दोन चित्रपट. या दोन दडपणांच्या पार्श्‍वभूमीवर हा सिनेमा उद्यापासून (ता.27) प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं कुणाल कोहली म्हणतोय, "मैं कॅल्क्‍युलेटरसे नहीं, दिल से फिल्में बनाता हूँ।'
---------------
कुणाल कोहलीला खरं तर नशीबवानच मानायला हवं. कारण, "मुझसे दोस्ती करोगे'सारखा सुमार चित्रपट दिल्यानंतर त्याला पुन्हा कोणी संधी देईल, असं वाटलं नव्हतं. पण आदित्य चोप्रानं त्याला एक अखेरची संधी दिली आणि त्यानं त्याचं सोनं केलं. "हम तुम' आणि "फना' असे दोन सुपरहिट चित्रपट आता कुणालच्या नावावर जमा होते. "थोडा प्यार थोडा मॅजिक'चा विषय आपल्याला योगायोगानं सुचला नसल्याचं स्पष्ट करून तो म्हणतो, ""सध्याचा काळ खूप धकाधकीचा आहे. सर्वसामान्यांचं आयुष्य खूप खडतर झालंय. रोज आपल्याकडं काही ना काही तरी वाईट घडतंय. एकीकडं महागाई वाढतेय; दुसरीकडं खून, आत्महत्या यांचेही प्रकार वाढलेत. आपण सर्व जण या नकारात्मक गोष्टींवरच चर्चा करतोय. परीक्षेत 90 टक्के मार्क्‍स मिळविणाऱ्या मुलांवर 95 टक्के मार्क्‍स मिळवण्यासाठी आणखी दबाव टाकतोय. ज्यांना चांगले मार्क्‍स मिळालेत, त्यांना आपल्याला फेमस कॉलेज मिळेल की नाही याची शंका आहे. एकंदरीत सर्वच जण कसल्या ना कसल्या दडपणाखाली आयुष्य जगत आहे. काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ग्रॅंट रोडच्या "अप्सरा' मल्टिप्लेक्‍सबाहेर मी उभा होतो. तिथं एक कुटुंब आपल्या मुलांसमवेत आलं. त्यानं कुणाला तरी इथं कोणकोणते सिनेमे लागलेत, याबद्दल विचारणा केली. पाच-सहा सिनेमांची नावं ऐकल्यानंतर या कुटुंबाचा प्रमुख म्हणाला, ""चलो बच्चे, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्हपर घुमने जाते है ।' त्याच्या या उत्तरात "थोडा प्यार थोडा मॅजिक'चा विषय दडला आहे. लहान मुलं, पालक, आजी-आजोबा या सगळ्यांनी एकत्र बसून पाहावा असा चित्रपट बऱ्याच काळात आपल्याकडं आलेला नाही. तशा प्रकारचं मनोरंजन देण्याचा प्रयत्न मी या सिनेमातून केलाय.''
1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मिस्टर इंडिया'चा या सिनेमावर खूप प्रभाव आहे. हा प्रभाव मान्य करीत कुणाल सांगतो, "" "मिस्टर इंडिया'मध्ये वास्तव होतं, फॅंटसी होती, मोगॅम्बोसारखा व्हिलन होता. तो एक परिपूर्ण मनोरंजक सिनेमा होता. "मुझसे दोस्ती करोगे'चा अपवाद वगळल्यास मी नेहमीच माझ्या पद्धतीचा सिनेमा बनवलाय. या सिनेमातनं आयुष्याकडं "पॉझिटिव्ह ऍटिट्यूड'नं पाहण्याचा संदेश मी दिलाय. नातेसंबंध हे जन्माद्वारे नाही; तर प्रेमातून बनतात, ही गोष्टसुद्धा सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मी त्यातून छान काव्य सादर केलं आहे. यातल्या गाण्यात चांगलं काव्य आहे. अर्थात, माझ्या एका चित्रपटामुळं पुन्हा "साफसुथऱ्या' कॅटेगरीतील चित्रपटांचा दौर सुरू होईल, असा माझा दावा नाही. पण त्या पद्धतीची प्रोसेस तरी सुरू होईल, यावर माझा ठाम विश्‍वास आहे. माझ्या पूर्वीच्या तीन सिनेमांच्या तुलनेत हा सिनेमा बनविणं, हे खूप कठीण काम होतं. कारण यात हसता हसता डोळ्यातून पाणी आणण्याचं आव्हान मी स्वीकारलंय. प्रेक्षकांचं मनोरंजन करता करता त्यातून एखादा "सोशल मेसेज' देणं हे खूप अवघड काम आहे. या सिनेमाद्वारे मी हे काम केलंय.''
कुणालच्या पहिल्या तीन चित्रपटांची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली होती. पण या सिनेमाद्वारे तो आता निर्माताही झालाय. यापूर्वीच्या दोन चित्रपटांनी केलेला जबरदस्त व्यवसाय लक्षात घेऊन निर्माता होण्याचा निर्णय घेतलास का? साहजिक आपल्या मनात येणाऱ्या या प्रश्‍नावर कुणाल म्हणतो, ""एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात मी वाढलोय. माझे आई-वडील दोघंही नोकरी करायचे. मी जेव्हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला, तेव्हाच खरं तर मला दिग्दर्शक बनायचं होतं. त्यावेळी माझ्याकडं भरपूर पैसे असते तर मी कधीच निर्माता बनलो असतो. निर्माता बनण्यामागं माझी थोडी वेगळी कारणं आहेत. सिनेमाबाबत मी खूप "पॅशनेट' आहे. मैं मेरी फिल्म कॅल्क्‍युलेटरसे नहीं, दिल से बनाता हूँ। त्यामुळेच या सिनेमाची "ओनरशिप' आपल्याकडेच राहावी, असं मला वाटतं. याचा अर्थ असा नाही की, "यशराज'ची निर्मिती असेल तर मला आपलं नाव घेतलं जाईल की नाही, याबद्दल असुरक्षितता वाटते. किंबहुना "हम तुम' आणि "फना'चं नाव घेतलं की "यशराज फिल्म्स'च्या ऐवजी माझंच नाव घेतलं जातं. स्वतःचं बॅनर सुरू करण्यामागची आणखी एक भावना म्हणजे चित्रपट बनविणाऱ्या प्रत्येक घटकाचा योग्य सन्मान करणं. आपल्याकडे सिनेमा बनला की, कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकाचा गौरव होतो. पण स्पॉटबॉय, लाईटमन, एक्‍स्ट्रा कलाकार यांच्याकडं दुर्लक्ष होतं. या दुर्लक्षित कलाकारांना मला मान मिळवून द्यायचाय. ही मंडळी शूटिंग करताना प्रत्येक सीन चित्रीत होताना पाहतात. पण सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यांना तो पाहा, असं कोणीच म्हणत नाही. म्हणूनच मी "थोडा प्यार...' प्रदर्शित होण्यापूर्वीच हा सिनेमा माझ्या बॅनरसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना दाखवलाय. ही मंडळी सलग गेले चार सिनेमे माझ्यासोबत होती. त्यांच्यासाठी मी एका विशेष "ट्रायल शो'चं आयोजन केलं होतं.''
कुणालला नेहमीच स्टार कलावंतांचं साह्य मिळालंय. याची त्यालाही कल्पना आहे. याबद्दल तो सांगतो, ""या सिनेमाच्या कथानकासाठी माझ्या डोक्‍यात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि अमिषा पटेल या तिघांची नावं होती. विशेष म्हणजे हे तिघेही कलाकार मला मिळाले. सैफला अभिनयात तुम्ही काही तरी वेगळे चॅलेंजेस दिले की तो खुलतो, असा आजवरचा अनुभव आहे. मी नेमकं तेच केलंय. हा पूर्ण सिनेमाभर तो टायसुटात वावरलाय. अमिषा पटेलचा तिच्या कारकिर्दीतला हा सर्वोत्तम "रोल' ठरावा. प्रथितयश कलाकारांचा होकार मिळविण्यापेक्षा त्यांच्याकडून सर्वोत्तम अभिनय करवून घेणं, ही खूप अवघड कला आहे. कारण हे सर्व चांगले कलाकार आहेतच.''
"यशराज फिल्म्स'च्या यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांचे आपल्यावरचे ऋण कुणालला मान्य आहेत. त्यांनी चान्स दिला नसता तर आज आपण कुठं असतो, ही कल्पनाही तो करू शकत नाही. यश चोप्रांना तो आदर्श मानतो. चाळीस वर्षं निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आदर मिळविणं ही सोपी गोष्ट नाही, हे तो आवर्जून सांगतो. म्हणूनच त्यानं आपल्या सहायकांनाही आता संधी देण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या तीन असिस्टंट दिग्दर्शकांना त्यानं पटकथा लिहिण्यास सांगितलीय. ज्याची पटकथा प्रथम तयार होईल, त्याला तो स्वतंत्रपणे आपल्या बॅनरसाठी दिग्दर्शनाची संधी देणार आहे. चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनाव्यतिरिक्त आपल्याला कशाचीही आवड नसल्याचं कुणाल म्हणतो. पेज थ्री पार्ट्यांमध्ये जाणं त्याला पसंत नाही. त्याला पैसा कमवायचाय. पण शेवटी तो शेअरबाजारात न गुंतवता अधिकाधिक चांगल्या फिल्म्स करणं, हेच त्याचं स्वप्न आणि महत्त्वाकांक्षाही आहे.

No comments: