Monday, June 9, 2008

"रामू ईस्टाईल' रोमांचक खेळ!

"सरकार राज' चित्रपट म्हणजे राजकीय सारीपटावरचा एक रोमांचक खेळ आहे. सर्वसाधारणपणे गाजलेल्या चित्रपटांचे पुढचे भाग क्वचितच रंगतदार ठरतात, पण "सरकार राज' हा चित्रपट मूळ "सरकार'पेक्षाही अधिक थरारक झालाय.
हा खेळ रंगलाय "टाइट क्‍लोजअप्स'च्या अनोख्या छायाचित्रणानं, अमर मोहिले यांच्या वेगवान पार्श्‍वसंगीतानं आणि बच्चन कुटुंबीयांच्या अभिनयातील करिश्‍म्यामुळं, पण या खेळाची सर्व सूत्रं हातात ठेवलीयत ती दिग्दर्शक रामगोपाल वर्मांनी. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये वर्मांनी दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट सुमार दर्जाचे होते. त्यामुळेच वर्मांच्या विश्‍वासार्हतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झालं होतं. या वेळी वर्मांनी कसलेही प्रयोग न करता ज्या पद्धतीच्या सिनेमाचा "फॉर्म' आपणास चांगला समजतो, त्याच "फॉर्म'चा "सरकार राज'साठी उपयोग केलाय. त्यामुळेच हा चित्रपट जमून गेलाय. कथा-पटकथा तसेच संवादाच्या आघाडीवर खूप मोठी मजल मारता आलेली नाही; मात्र या त्रुटी झाकण्यात वर्मांची "स्टायलिश' हाताळणी कामास आलीय. प्रतिभावंत तरीही एका वाट चुकलेल्या दिग्दर्शकाला पुन्हा रस्ता सापडणं, हीच या सिनेमाची सर्वात मोठी कमाई आहे.
"सरकार राज' हा कागदावर "सरकार'चा दुसरा भाग आहे; मात्र वर्मांनी मूळ व्यक्तिरेखांचे मुखवटे कायम ठेवून त्यांना या वेळी वेगळी कामगिरी करायला लावलीय. गुन्हेगारी आणि सत्तेच्या राजकारणातील हेव्यादाव्यांचा विषय असला की, वर्मांमधला दिग्दर्शक खुलतो हा यापूर्वीचा अनुभव होता. "आग', "डार्लिंग', "निशब्द'सारखे प्रयोग करून झाल्यानंतर वर्मांनी या वेळी कसलाही धोका पत्करलेला नाही. म्हणूनच हा सिनेमा रंगतदार बनलाय. सुभाष नांगरे (अमिताभ बच्चन), शंकर नांगरे (अभिषेक बच्चन) यांचं राजकीय वजन एव्हाना चांगलंच वाढलंय. विशेषतः महाराष्ट्रासाठी काहीतरी भरीव करण्याची कळकळ या वेळी शंकर नांगरेच्या वक्तव्यातून जाणवते. याच वेळी विदेशी नागरिक असलेली ऐश्‍वर्या राय एका वीजप्रकल्पाचा प्रस्ताव घेऊन नांगरेंकडं येते. या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी दोन तास चाललेला शह-काटशहाचा खेळ म्हणजे "सरकार राज'. शिवसेना सरकार राज्यात सत्तेत असताना एन्‍रॉन प्रकल्पाचं नाव प्रथम चर्चेत आलं होतं. दिग्दर्शकानं वास्तव आणि कल्पिताचं झकास मिश्रण यात केलंय. सत्तेसाठी केला जाणारा रक्तरंजित खेळ आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पाहिलाय. हाच खेळ वर्मांनी आपल्या पद्धतीनं मांडलाय. या चित्रपटात ऐश्‍वर्या राय आणि दिलीप प्रभावळकर या दोन व्यक्तिरेखा नव्यानं आल्यात. वर्मांनी कथानकाच्या तपशिलात फार न शिरता सर्व घटना खूप वेगानं दाखविल्यात. या वेळी त्यांनी संवादाला "बॅक सीट'ला ठेवून छायाचित्रणाच्या खेळावर बाजी मारलीय. या चित्रपटातले कलाकारांचे "टाइट क्‍लोजअप्स' हा प्रेक्षकांना सुखद धक्का देणारा प्रकार आहे. पूर्वार्धात विसविशीत वाटणाऱ्या कथानकाला दिग्दर्शकानं शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये प्रचंड गती दिलीय. त्यामुळेच चित्रपटाचा शेवट खिळवून ठेवतो.
"सरकार राज' हा दिग्दर्शकाचा सिनेमा असल्यानं अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांचा अभिनय वेगळ्या धाटणीचा वाटतो. अमिताभ बच्चन यांचे बरेचसे संवाद तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखे वाटतात, पण हा प्रकार बहुधा जाणीवपूर्वक केलेला असावा. ऐश्‍वर्या राय हे या चित्रपटाचे "सरप्राईज पॅकेज' आहे. ऐश्‍वर्याच्या "लूक'मधला बदल चांगला वाटतो. अमिताभप्रमाणेच तिच्याही व्यक्तिरेखेच्या वाट्याला कमी संवाद असूनही ती प्रभाव पाडण्यात यशस्वी झालीय. "सरकार'प्रमाणेच अतुल काळेनं "सरकार राज'वरही आपली छाप उमटवलीय. गोविंद नामदेव, दिलीप प्रभावळकर, सयाजी शिंदे यांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या निभावल्यात. "गोविंदा गोविंदा'च्या सुरावटीवर अमर मोहिलेंनी पार्श्‍वसंगीतामधून केलेली करामत दीर्घकाळ लक्षात राहणारी आहे.

1 comment:

ऋयाम said...
This comment has been removed by the author.