Monday, June 30, 2008

थोडा प्यार थोडा मॅजिक-review

सगळ्याच आघाड्यांवर थोडा...
चांगला सिनेमा बनायला केवळ "हट के' विषय असून चालत नाही. तो विषय दीड-दोन तासांमध्ये पुरावा आणि मुरावाही लागतो. तसं न झालं तर ते बूमरॅंग ठरण्याची भीती असते. कुणाल कोहली दिग्दर्शित "थोडा प्यार थोडा मॅजिक'बद्दल नेमका हाच घोळ झालाय. "हम तुम', "फना' या दोन सिनेमांचं दणदणीत यश पाठीशी असताना कुणालनं प्रेक्षकांना "इमोशनल डोस' देण्याचं धाडस दाखवलंय. मात्र दुर्दैवानं या डोसची मात्रा थोडी अधिक झाल्यानं हे धाडस अंगलट येण्याचीच दाट शक्‍यता आहे. सध्या समाजात सगळीकडं नकारात्मक घटना घडताहेत. त्याचा उबग येऊन कोहलींनी हा सिनेमा बनविणं समजण्यासारखं आहे. या सिनेमाची निर्मिती "यशराज फिल्म्स'नं केली असून त्यांच्यावर अलीकडच्या काळात सतत "मिनिंगलेस' सिनेमे दिल्याचा आरोप होतोय. या पार्श्‍वभूमीवर कोहलींनी आपला "ट्रॅक' बदललाय. पण सकारात्मकता दाखविण्याच्या भरात आपला सिनेमा कंटाळवाणा होतोय, याकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासारखे दोन मुरब्बी कलाकार असूनही हा अवघा सव्वादोन तासांचा सिनेमा तीन-साडेतीन तासांचा सिनेमा पाहिल्याचा "फील' देतो. हा त्रास आणखी वाढलाय तो शंकर-एहसान-लॉय यांच्या हरवलेल्या जादूमुळं. त्यामुळेच या सिनेमातलं प्रेम ना आपलं हृदय जिंकतं ना जादू.
सैफ अली खान या सिनेमात एका उद्योजकाच्या रूपात पाहायला मिळतो. त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते ते एका अपघातामुळं. तो स्वतः चालवीत असलेल्या गाडीला अपघात होऊन त्यात एका जोडप्याचा मृत्यू होतो. त्यामुळं त्यांची मुलं उघड्यावर येतात. हे अपघात प्रकरण पुढं न्यायालयात जातं. यावेळी न्यायमूर्ती एक ऐतिहासिक निकाल देताना ही मुलं सज्ञान होईपर्यंत सैफनं त्यांचा सांभाळ करावा, असा आदेश देतात. न्यायालयाचा मान राखण्यासाठी सैफ या मुलांना आपल्या घरी आणतो. पण त्यांच्याशी जुळवून घेणं त्याला कठीण जातं. यावेळी सैफ आणि मुलं यांच्यातला दुवा बनण्याचं काम करण्यासाठी स्वर्गातली गीता (राणी मुखर्जी) पृथ्वीवर येते. तिला पृथ्वीवर येऊन या मुलांची मदत करण्याचा आदेश ऋषी कपूरनं साकारलेला एक देव देतो. कथानकातला हा भाग अगदीच सुमार पद्धतीनं चित्रीत करण्यात आलाय. राणीला जादूचं वरदान असल्यानं मग ती त्याद्वारे मुलं आणि सैफमधली दरी कमी करते.
"थोडा प्यार...'वर "मेरी पॉपीन्स' या हॉलीवुडपटाचा मोठा प्रभाव आहे. आपल्याकडं अपघात प्रकरणांचा निकाल लवकर न लागण्याची परंपरा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर "थोडा प्यार...'मधल्या न्यायाधीशांनी सैफला मुलांचा सांभाळ करण्याचा दिलेला आदेश या सिनेमाला वेगळा बनवितो. या आदेशाचं सुरुवातीला पालन करताना सैफचा नकारार्थी सूर, मुलांचा त्याच्यावरील खुन्नस आणि कालांतरानं राणी मुखर्जीनं या दोघांना एकत्र आणण्यासाठी केलेले प्रयत्न... हा भाग कागदावर चांगला वाटतो. पण त्याचं पडद्यावरचं रूपांतर फारसं जमलेलं नाही. या मुलांनी सैफला त्रास देण्यासाठी सुरुवातीला केलेल्या क्‍लृप्त्या अगदीच सुमार वाटतात. सैफची "गर्लफ्रेंड' म्हणून अमीषा पटेल जे काही करते, ते काहीच समजणारे नाही. तिची व्यक्तिरेखा कापली गेली असती तरी कथानकाला काहीच धक्का बसला नसता. राणीची व्यक्तिरेखा एखाद्या उपटसुंभासारखी सिनेमात अवतरलीय आणि तिचा सिनेमात वावरही तसाच आहे. दिग्दर्शकानं या व्यक्तिरेखेच्या पडद्यावरील "एन्ट्री'साठी थोडं डोकं लढवायला हवं होतं. सैफचं मुलांबद्दलचं मनःपरिवर्तनही असेच अचानक दाखविण्यात आलंय.
पटकथाच गडबडली असल्यानं सर्वच कलाकारांचा अभिनय गोंधळल्यासारखा वाटतो. सैफ अली खान सध्या ज्या पद्धतीनं वेगळ्या व्यक्तिरेखा साकारतोय, त्या पद्धतीची ही व्यक्तिरेखा नाही. राणी मुखर्जी चांगली दिसली असली तरी आपण या चित्रपटात आहोत, अशी "बॉडी लॅंग्वेज' तिच्या अभिनयातून जाणवत नाही. अमीषा पटेलच्या व्यक्तिरेखेचंच भजं झाल्यानं तिच्या अभिनयाबद्दल न सांगितलेलंच बरं. लहान मुलं चांगली असली तरी त्यातल्या कोणालाही आपली छान छाप उमटवता आलेली नाही. शंकर-एहसान-लॉय यांच्या बिघडलेल्या सुराचा मोठा फटका सिनेमाला बसलाय. कोहलींनी चित्रपटाचा "लूक' चोप्रांच्या बॅनरला साजेसा ठेवून प्रेक्षकांना हॉलीवुडची सैर घडवून आणलीय. पण विषयातला सैरभैरपणा टाळता न आल्यानं या सहलीला काहीच अर्थ उरत नाही.

No comments: