Thursday, February 7, 2008

इरसाल!



मराठी चित्रपट बदलतोय, असं आपण गेली दोन-तीन वर्षं सतत म्हणतोय, पण या बदलाच्या पलीकडं जाऊन काहीतरी छान आणि वेगळं पाहिल्याचं एकत्रित समाधान उमेश कुलकर्णी दिग्दर्शित "वळू' हा चित्रपट देतो. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या ग्रामीण ढंगाच्या कथेतला विनोद आजही आपल्या मनात घर करून बसलाय. कुलकर्णींच्या चित्रपटरूपी विनोदाची जातकुळी मिरासदारांच्या साहित्यकृतींशी जवळीक साधणारी आहे.

देवाच्या नावानं गावात सोडण्यात आलेल्या एका वळूनं घातलेला धिंगाणा आणि त्याला पकडण्यासाठी गावकऱ्यांनी लावलेली "फिल्डिंग' हा या चित्रपटाचा अगदी सरळ आणि साधा विषय. त्याला ग्रामीण वातावरणनिर्मिती, तांत्रिक हुशारी आणि सर्व कलावंतांच्या उत्तम अभिनयाची जोड मिळाल्यानं हा चित्रपट अगदी झक्क जमून गेलाय. पटकथेत काही जरूर त्रुटी आहेत, पण त्यांच्याकडे साफ डोळेझाक करून पाहावा, असा हा चित्रपट आहे.

कुसावडे गावात बऱ्याच महिन्यांपासून एका बैलाचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याची मोठी धास्ती घेतलेली असते. या बैलाला आवर घालण्यासाठी शहरातून स्वानंद गड्डमवार (अतुल कुलकर्णी) या फॉरेस्ट ऑफिसरला बोलाविण्यात येतं. खरं तर हा वाघ, बिबट्यांना आवर घालणारा अधिकारी. त्यामुळेच वळू पकडण्यासारखं किरकोळ काम काय करायचं, असा त्याचा आविर्भाव असतो, पण गावात आल्यानंतर सरपंच (मोहन आगाशे), जीवन्या (गिरीश कुलकर्णी), भटजी (दिलीप प्रभावळकर) अशा काही इरसाल व्यक्तिमत्त्वांशी त्याची गाठ पडते. माजलेला वळू पकडणं, या कथानकावर अडीच तासांचा सिनेमा करणं ही खरोखरच खूप कठीण गोष्ट आहे. ती सोपी करण्यासाठी लेखक-दिग्दर्शकानं वळू पकडण्याच्या प्रक्रियेवर "डॉक्‍युमेंटरी' बनविण्याची आयडिया लढवलीय आणि ती शंभर टक्के यशस्वी ठरलीय. "डॉक्‍युमेंटरी' या प्रकाराबद्दल गावकऱ्यांमध्ये असलेल्या प्रचंड कुतूहलाचा दिग्दर्शकानं विनोदनिर्मितीसाठी पुरेपूर वापर करून घेतलाय. त्याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अतुल कुलकर्णीलाच एका गावकऱ्यानं "डॉक्‍युमेंटरी' या नावानं हाक मारणं. अलीकडच्या काळात ग्रामीण भाषेचा अतिशय चांगला वापर झालेला चित्रपट म्हणून "वळू'चं नाव घ्यावं लागेल. व्यक्तिचित्रणातून हा चित्रपट पुढं सरकतो. छोट्या छोट्या व्यक्तिरेखाही सुरेख जमल्यानं पाहणारा त्यात स्वतःला गुंतवून टाकतो. या झाल्या सगळ्या जमेच्या बाजू. हा चित्रपट कमी पडलाय तो दोन-तीन गोष्टींमध्ये. एक तर चित्रपटाच्या वेगात सातत्य नाही. वळू हा काल्पनिक आहे की तो खरोखरीच अस्तित्वात आहे, याबद्दल दिग्दर्शकानं थोडं जास्तच रहस्य निर्माण केलंय. एकीकडे दिग्दर्शक एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूला हा बैल कारणीभूत असल्याचं सांगतो, तर दुसरीकडे काही गावकऱ्यांकडून त्याच्या निरुपद्रवीपणाचे किस्सेही ऐकवतो. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी खरा बैल पडद्यावर दिसल्यानंतर त्याच्या अस्तित्वाबद्दल एवढं कुतूहल निर्माण करण्यामागचं कारण कळत नाही. गावातला सरपंच आणि तरुण राजकारणी आबा (नंदू माधव) यांच्यातलं वैरही जिथं सुरू झालेलं पाहायलं मिळतं. त्याच्या पुढं काही केल्या ते जात नाही. गावातल्या भटजीवर केलेला विनोद चांगला असला तरी त्या व्यक्तिरेखेचं महत्त्व दिग्दर्शकाला टिपता आलेलं नाही.

अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, भारती आचरेकर, अमृता सुभाष, ज्योती सुभाष, सतीश तारे, मंगेश सातपुते... अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळते. यापैकी काही कलाकारांच्या भूमिका लांबीच्या दृष्टीनं फार मोठ्या नाहीत, पण त्यांचा "ग्राफ' प्रत्येकानं खूप छान पकडलाय. कलाकाराचं त्याच्या अभिनयासाठी कौतुक केलं जातं, पण हे कलाकार त्यापेक्षाही जास्त कौतुकास पात्र आहेत. या चित्रपटामधल्या छोट्या व्यक्तिरेखांतील मोठा भाव त्यांनी बरोबर ओळखला, ही त्यांची खरी कमाई. छायाचित्रकार सुधीर पळसणे यांनी आपल्या कॅमेऱ्याद्वारे चित्रपटाचा विलक्षण "लुक' बदललाय.

No comments: