आणखी एक प्रयोग!
गेल्या वर्षीच्या "भेजा फ्राय'चं यश वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाची नांदी करणारं होतं. "पॅरलल सिनेमा'च्या नावाखाली ज्या कल्पना दोन दशकांपूर्वी हेटाळल्या गेल्या, त्यांचं आता बऱ्यापैकी स्वागत केलं जात आहे. "मिथ्या' हा चित्रपट याच जातकुळीतला आहे. विशेष म्हणजे, "भेजा फ्राय'च्याच "टीम'नं या चित्रपटाची निर्मिती केलीय. दिग्दर्शक रजत कपूर यांनी या वेळी फक्त विनोदाच्या ट्रॅकवरच आपल्या सिनेमाला मर्यादित ठेवलेलं नाही. पुढच्या क्षणाला काय घडेल, याचा प्रेक्षकाला कसलाही थांगपत्ता लागू न देण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय; पण वेगळ्या कल्पनेकडे केवळ प्रयोगाच्याच चष्म्यातून दिग्दर्शकानं पाहणं पसंत केलंय. त्यामुळे हा सिनेमा काही तुकड्या-तुकड्यांमधून मनोरंजन करतो. सुरुवातीला धमाल ट्रॅकवर सुरू झालेला हा सिनेमा उत्तरोत्तर गंभीर होत जातो आणि त्याचा प्रभावही उत्तरोत्तर फिका पडतो. रणवीर शौरीचा अप्रतिम अभिनय आणि त्याला नेहा धुपियानं दिलेली साथ, ही या चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू. कपूर यांच्यात एक चांगला दिग्दर्शक दडला आहे. त्याला प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी त्यांनी आता प्रयोगशाळेतून बाहेर पडायला हवे.
"मिथ्या'ची कथा-पटकथा सौरभ शुक्ला आणि रजत कपूर या दोघांनी लिहिली आहे. मुंबईतल्या ग्लॅमर जगतात आपलं नशीब आजमावून पाहण्यासाठी इथं दररोज अनेक जण येत असतात. व्हीके (रजत कपूर) हा त्यापैकीच एक. चांगला अभिनेता बनण्याचं स्वप्न त्यानं पाहिलेलं असतं. हे स्वप्न साकारण्यासाठी वाट्टेल ते करायची त्याची तयारी असते. दुर्दैवानं काही गुन्हेगाराच्या मदतीनं (नसिरुद्दीन शाह, विनय पाठक) त्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू होतो; मात्र या प्रवासात त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातलं एक प्यादं म्हणून उपयोग केला जातो. या व्हीकेकडे गुन्हेगारी क्षेत्रातल्या मंडळींचं लक्ष जाण्याचं कारण म्हणजे त्याचा चेहरा. तो हुबेहूब अंडरवर्ल्डमधल्या डॉनसारखा दिसत असतो. या डॉनची विरोधक मंडळी नेमकी या गोष्टीचा फायदा घेतात. त्याचा काटा काढून ते व्हीकेला डॉन करतात. हा भाग अमिताभ बच्चनच्या "डॉन' चित्रपटाशी बराचसा मिळताजुळता आहे; पण एका अपघातात व्हीकेची स्मृती हरवते आणि त्याचं आयुष्य आणखीनच अवघड बनते. खोटा डॉन बनून तो खऱ्या डॉनच्या घरी जातो. पुढे त्याच्या मुलांचा त्याला लळा लागतो. अर्थातच खऱ्या डॉनच्या सहायकांना कालांतरानं व्हीकेचं खरं रूप कळतं. आपला जीव गमावून त्याला अभिनय करण्याची किंमत मोजावी लागते.
चित्रपटाचं कथानक फार काही नवीन नाही. त्याचा शेवट मात्र खूपच अनपेक्षित आहे. क्षणभर त्यावर विश्वास बसत नाही. अशा प्रकारचे विषय हाताळणं, हे खूप धाडसाचं काम आहे. "भेजा फ्राय'च्या यशानं दिग्दर्शक रजत कपूर यांनी हा प्रयोग केला असावा. हा प्रयोग काही प्रसंगांमध्ये जमलाय, तर काहींमध्ये फसलायसुद्धा. व्हीकेचं अभिनयाचं वेड आणि त्याचं गुन्हेगारी क्षेत्रात फसत जाण्याचा भाग छान जमलाय. व्हीकेच्या व्यक्तिरेखेतला निरागसपणा दिग्दर्शकानं चांगला दाखवलाय; परंतु तो कधी कधी "ओव्हर' झालाय. खोटा "डॉन' बनल्यानंतर व्हीकेनं काही गुन्हेगारांची घेतलेली फिरकी धमाल उडवते. या सिनेमाची गाडी घसरलीय ती रणवीर शौरी आणि नेहा धुपिया यांच्या प्रेमाच्या ट्रॅकनं. मूळ कथानकाशी फारशी जवळीक नसूनही दिग्दर्शकानं तो विनाकारण ताणलाय. रणवीर शौरी या चित्रपटात खूपच उठून दिसलाय. विनोदी प्रसंगांबरोबरच गंभीर दृश्यांमध्येही तो चांगला वाटतो. त्याच्या वाट्याला आणखी दमदार व्यक्तिरेखा यायला हव्यात. नेमकी हीच गोष्ट नेहा धुपियालासुद्धा लागू होते. अगदी छोट्या व्यक्तिरेखेतही ती लक्षात राहते. गॅंगस्टर गावडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच "परफेक्ट' कॅटेगरीतला आहे. विनय पाठक या वेळी "रोल'च्या दृष्टीनं "बॅकसीट'ला आहे. हर्ष छाया या कलाकाराचाही अभिनय अगदी सहज वाटतो. वेगळ्या "थीम्स'च्या शोधात असलेल्या प्रेक्षकांना हा चित्रपट आनंद देईल. बाकीच्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी फारसा फरक पडणार नाही.
Tuesday, February 26, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment