Tuesday, February 12, 2008

मेकिंग ऑफ जोधा अकबर


मेकिंग ऑफ जोधा अकबर
-------------
"लगान', "स्वदेस' आणि आता "जोधा अकबर'. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी पडद्यावर हाताळलेली पहिलीच "आऊट अँड आऊट' प्रेमकहाणी म्हणजे "जोधा अकबर'. प्रेमासारखा हळूवार विषय असूनही या दिग्दर्शकानं त्याला भव्यदिव्य पातळीवर सादर करण्याचं स्वप्न पाहिलंय. या चित्रपटाचा विषय सुचण्यापासून ते आपलं स्वप्न पडद्यावर साकार होईपर्यंतच्या खडतर प्रवासाबद्दलची त्यांची ही निरीक्षणं.
------------------
""पुढचा चित्रपट आपण ऍक्‍शन चित्रपट बनवूया किंवा आपली पुढची फिल्म रोमॅंटिक असेल, असं पक्कं ठरवून मी कधीही चित्रपट करीत नाही. "पिरीयड फिल्म बनवून झाली, आता आपण एखादा "हिस्टॉरिक' बनवूया !' असा विचार माझ्या मनाला कधी शिवत नाही. एखादं कथानक सुचलं की काही महिने मी त्याच्यातच राहतो. त्यानंतरही माझा त्या कथेतला "इंट्रेस्ट' कायम राहिला तरच मी त्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतो. यापुढच्या काही महिन्यांमध्ये माझ्या मनात एखादं "हॉरर' कथानक घोळत राहिलं तर कदाचित माझा पुढचा चित्रपट "हॉरर'सुद्धा असेल.'' आशुतोष गोवारीकर मुलाखतीच्या सुरुवातीलाच चित्रपटाचं कथानक निवडण्यामागची आपली मतं अगदी स्पष्टपणे ऐकवतात. "जोधा अकबर' ही त्यांनी पडद्यावर साकारलेली पहिलीच प्रेमकथा. ती निवडण्यामागचं त्यांचं "लॉजिक'ही थोडंसं वेगळं होतं. त्याबद्दल ते म्हणतात, "" "जोधा अकबर'ची कथा हैदर अली यांची आहे. "लगान'च्या प्रदर्शनानंतर एक वर्षानं त्यांनी ती मला ऐकवली होती. पण, त्यावेळी मी ही प्रेमकहाणी हाताळण्यास पूर्ण तयार नव्हतो. "जोधा अकबर' करण्यासाठी मला त्याच्याआधी आणखी एक चित्रपट करणं आवश्‍यक वाटलं. म्हणूनच मी "लगान'नंतर लगेच "जोधा अकबर' न करता "स्वदेस' बनवला. "लगान' आणि "स्वदेस'मध्येही थोडाफार "रोमान्स' होता. पण, या चित्रपटांना "रोमॅंटिक' चित्रपट म्हणता येणार नाही. "जोधा अकबर'ची प्रेमकहाणी मला आवडण्याचं कारण म्हणजे त्यातला साधेपणा. "अरेंज्ड मॅरेज' ही आपली संस्कृती. लग्न झाल्यानंतरच आपल्याकडे पती-पत्नीमध्ये प्रेमकहाणी सुरू होते. एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो आणि "बॉंडिंग' घडतं. अकबर आणि जोधाबाई यांच्यात विवाहापूर्वी एक राजकीय करारनामा झाला होता. लग्नानंतर त्यांच्या नात्यात काय घडलं, याची इतिहासात नोंद नाही. ही जी "गॅप' आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही या फिल्मद्वारे केलाय.''
ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की, वादविवाद आलेच. संबंधित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्यापासून ते प्रदर्शनाच्या दिवसापर्यंत हे वाद सुरूच असतात. "जोधा अकबर' हा चित्रपटसुद्धा त्याला अपवाद ठरलेला नाही. काहींनी अकबर आणि जोधा यांच्यातल्या नात्यालाच आक्षेप घेतलाय. अशा परिस्थितीत संशोधन हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो. अशाप्रकारचे वाद भविष्यात उद्‌भवतील, याची गोवारीकर यांना बहुधा कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी संशोधनात कसलीच उणीव ठेवलेली नाही. याबद्दल ते सांगतात, ""ऐतिहासिक किंवा "पिरीयड फिल्म' करताना संधोधन करणं हे फक्त महत्त्वाचं नसून "कम्पलसरी' ठरतं. "स्वदेस'च्या वेळीही मी गावोगाव फिरून संशोधन केलं होतं. "जोधा-अकबर'च्या संशोधनासाठी प्रत्यक्ष फिरण्याऐवजी वाचनाची अधिक गरज होती. या चित्रपटात अकबराच्या 13 ते 28 वयापर्यंतचा कालावधी चित्रीत करण्यात आला आहे. मी, त्या काळातल्या घटनांचा अधिक अभ्यास केला. सर्वप्रथम अकबरावरची सर्व पुस्तकं वाचली. मोघलांचा, राजपुतांचा इतिहास नजरेखाली घातला. अलीगड मुस्लिम विद्यापीठाला भेट दिली. मुंबई तसेच जयपूर विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञांबरोबर चर्चा केली. अकबराच्या दरबारात अबुल फझल आणि बदायुनी असे दोन "कोर्टियर' होते. यापैकी फझलनं "अकबरनामा' हा ग्रंथ लिहिला तर बदायुनीनं "मुन्तखुबउल्तवारीख' या ग्रंथाची निर्मिती केली. अकबराच्या दरबारात राहून दोघांनी हे ग्रंथ लिहिले. गंमत म्हणजे हे दोघेही परस्परांचे कट्टर दुश्‍मन. दोघांनीही आपापल्या नजरेतून अकबराचं चरित्र लिहिलं. त्यांचे वेगवेगळे "व्ह्यू पॉईंटस्‌' मी विचारात घेतले आणि जोधा-अकबर यांच्या विवाहानंतर काय घडलं असेल, याची माझ्या नजरेतून कल्पना केली. अर्थात, मी जे काही स्वातंत्र्य घेतलंय, त्याचं प्रमाण खूप मर्यादित आहे. ते पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना त्या काळात असंच
काहीतरी घडलं असावं, यावर विश्‍वास बसेल.''
ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीमधली सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्याचं "मेकिंग'. अर्थात गोवारीकर यांना "लगान'च्या कठीण "मेकिंग'चा अनुभव गाठीशी असल्यानं "जोधा अकबर'च्या चित्रीकरणावेळी फारशी अडचणी आल्या नाहीत. याबद्दल ते सांगतात, ""या चित्रपटाची कार्यकारी निर्माती आहे माझी पत्नी सुनीता गोवारीकर. तिला सिनेमा हे माध्यम खूप छान उमगलंय. तसेच तिची प्रशासनावरही चांगली पकड आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निर्मितीच्या आघाडीवर मी खूप कमी लक्ष दिलं. या चित्रपटाचं "आऊटडोअर' तब्बल सहा महिन्यांचं होतं. "लगान'पेक्षा दोन महिन्यांनी अधिक. हा ऐतिहासिक चित्रपट असल्यानं आम्हांला युद्धसामग्री, कपडे तसेच प्राण्यांबद्दलचं वेगळं "डिपार्टमेंट' सुरू करावं लागलं. या चित्रपटात एकूण 100 हत्ती, 50 उंट आणि शंभर घोडे पाहायला मिळतील. कलाकारांचं "कास्टिंग' केल्याचं आपणास ठाऊक आहे. पण, या चित्रपटासाठी मी प्राण्यांचंही "कास्टिंग' केलं. कारण, शूटिंग सुरू झाल्यानंतर ऐन वेळी एखाद्या प्राण्याचं बिथरणं आम्हाला परवडणारं नव्हतं. म्हणूनच कोणता हत्ती मदमत्त आहे, याची आम्ही आधीच खातरजमा केली. त्यासाठी "अपोलो सर्कस'चे प्रतापसिंग यांची आम्ही मदत घेतली. चित्रीकरणासाठी आपण कोणत्याही प्राण्याचा उपयोग करू शकतो. मात्र, त्यासाठी "ऍनिमल वेल्फेअर बोर्डा'च्या किचकट नियमांची तुम्हांला पूर्तता करावी लागते. या संस्थेच्या सर्व नियमांचे आम्ही पालन केले. शूटिंग सुरू असताना दर दोन तासांनी आम्ही प्राण्यांना विश्रांती दिली. त्यांची देखभाल करण्यासाठी डॉक्‍टर्सही सेटवर उपस्थित होते. या प्रक्रियेमुळे शूटिंगचे दिवस वाढले. हत्तींचं शूटिंग असताना कधी कधी आम्ही दिवसाला फक्त एका शॉटच्या पुढं नाही जाऊ शकलो. त्यामुळे चित्रपट पूर्ण व्हायला 200 दिवस लागले.''
"जोधा-अकबर'चं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे त्याचे "लीड' कलाकार. या चित्रपटांचे ट्रेलर पहिल्यांदा चित्रपटगृहांमध्ये झळकले तेव्हा हृतिक आणि ऐश्‍वर्याचा "लूक' पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. या दोघांच्या "कास्टिंग'बद्दल गोवारीकर सांगतात, ""या चित्रपटाची पटकथा लिहीत असतानाच मी जोधा आणि अकबरच्या रूपात ऐश्‍वर्या आणि हृतिकला पहात होतो. ते आपल्या चित्रपटासाठी मिळतील की नाही, याची मला कल्पना नव्हती. पण, माझ्या सुदैवानं सर्व काही जुळून आलं. हृतिकचा राजबिंडेपणा आणि ऐश्‍वर्याचं सौंदर्य अकबर आणि जोधाच्या व्यक्तिरेखांना "सूट' ठरलं. विशेष म्हणजे "क्रिश' आणि "धूम-2' हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी मी हृतिक आणि ऐश्‍वर्याला या चित्रपटासाठी "साईन' केलं होतं. स्टारची प्रतिमा त्याच्या नव्या चित्रपटाला त्रास देते, असं मला वाटत नाही. कारण, चित्रपटगृहातले दिवे मालवले की प्रेक्षक त्यात हरवला गेला पाहिजे. तसं झालं तर ते कलाकार आणि दिग्दर्शकाचं यश असतं.''
"यूटीव्ही'चे रॉनी स्क्रूवाला आणि "आशुतोष गोवारीकर प्रॉडक्‍शन लिमिटेड' यांनी संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मिती केलीय. या चित्रपटाचं "स्केल' खूप मोठं असल्यानं सुरुवातीला त्याला अर्थपुरवठादार मिळण्यास अडचणी आल्याचं गोवारीकर सांगतात. मात्र, ऐतिहासिक चित्रपटांबरोबर आजच्या घडीचे चित्रपटही आपणास तेवढेच "रिस्की' वाटत असल्याचाही मुद्दा ते उपस्थित करतात. "चित्रपटाचा जॉनर हा "रिस्की' नसतो. तुम्ही कथानक कसं प्रेझेंट करता हे अधिक महत्त्वाचं,' असं सांगायलाही ते विसरत नाही. "लगान'प्रमाणेच "जोधा अकबर'च्या "मेकिंग'दरम्यान गोवारीकर यांचा पाठदुखीचा आजार बळावला. त्यामुळे दोनदा या चित्रपटाचं प्रदर्शन त्यांना पुढं ढकलावं लागलं. डॉक्‍टरांनी "कम्प्लिट बेडरेस्ट'चा सल्ला दिल्यानं या दिग्दर्शकाला संकलनाचं काम वेळेत पूर्ण होण्यासाठी आपल्या "एडिटिंग रूम'मध्येच बिछाना तयार करावा लागला. गोवारीकर यांची ही पाच वर्षांची मेहनत आता पडद्यावर येतेय. तेव्हा त्यांच्या या पहिल्यावहिल्या प्रेमकहाणीचं प्रेक्षक कसं स्वागत करतात ते पाहायचं.
- मंदार जोशी

No comments: